2018 पर्यंत भारतातल्या सगळ्यात मोठी माओवादी संघटना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (माओवादी) महासचिव होते मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती… मात्र त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांची जागा कोण घेणार यावर माओवाद्यांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बराच खल सुरू होता. गणपती यांनी नंबाल्ला केशव राव उर्फ बसवराजू हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे महासचिव असतील, असा पर्याय ठेवला आणि सगळ्यांनीच त्या नावाला मान्यता दिली.
माओवादाच्या अभ्यासकांच्या मते बसवराजू यांना महासचिव केल्यावर देशभरात माओवादी हल्ल्यांमध्ये वाढ होऊ शकेल अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केली होती आणि झालेही तसेच. बसवराजूकडे माओवादी संघटनेचे नेतृत्व आल्यानंतर देशभरातील नक्षली हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती..
छत्तीसगडच्या नारायणपुरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आणि त्यात नक्षलवादी संघटनेचा महासचिव नंवबल्ला केशव राव उर्फ बसवराजू ठार झाला. 2024 पासून केंद्र सरकारने नक्षलवाद्यांविरोधात जी मोठी मोहीम सुरू केली होती त्यात आजवरचे सुरक्षा दलाचे हे सगळ्यात मोठे यश आहे. बसवराजूवर तब्बल दीड कोटींचं बक्षीस होतं. बसवराजू हे 24 वर्षांपासून पॉलिटब्युरो सदस्य म्हणून सक्रिय होता. त्याने पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचा प्रभारी म्हणूनही काम केलं आहे.
माओवाद्यांचा कणा मोडला, म्होरक्या बसवराजू ठार
आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या जियन्नापेटा गावातील रहिवासी असलेल्या बसवराजने गेली 18 वर्षं संघटनेच्या केंद्रीय सैन्य आयोगाचे प्रभारी म्हणूनही काम केलं आहे. प्रारंभी विद्यार्थी नेता, नंतर 'टाईम्स ऑफ पीपल' या माओवादी मुखपत्राचा संपादक, आणि नंतर PLGA चा सरसेनापती असा त्याचा प्रवास आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हजारो युवकांनी बंदूक हाती घेतली. त्याने छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, तेलंगणा अशा अनेक राज्यांमध्ये माओवादी चळवळीचा विस्तार केला.
'रणनीती-कार्यनीती' तयार करणे, घातपात घडवून आणणे, गुप्त शस्त्र साठवणे यासाठी त्याचा उपयोग माओवादी संघटनेने केला. यामुळेच तो सुरक्षा यंत्रणांच्या हिट लिस्टमध्ये होता.1980 साली झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या वादात त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो भूमिगत होता आणि 70 वर्षांच्या बसवराजूचा कोणताच फोटो सध्या उपलब्ध नाही. त्याच्यावर विविध राज्यांच्या आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांनी एकूण 1.57 कोटींचं बक्षिस ठेवलं होतं.
संबंधित लेख वाचा: 1) महाराष्ट्रातील हिंस्र व अमानुष माओवादाचा 'लाल सूर्य' अखेर मावळला…? |
बसवराजूचा मृत्यू ही एक ऐतिहासिक संधी
नंबाला केशवराव उर्फ बसवराजू ठार झाला, ही घटना नक्षल चळवळीच्या इतिहासात निर्णायक टप्पा ठरू शकते. भारतात गेल्या चार दशकांपासून सशस्त्र नक्षल चळवळ पुन्हा पुन्हा उभी राहत होती. मात्र या चळवळीच्या सैनिकी नेतृत्वाचा आणि विचारसरणीचा एक महत्वाचा स्तंभ कोसळल्यामुळे ही लढाई केवळ रणभूमीवरच नाही, तर मानसिक, वैचारिक स्तरावरही पांगत चालली आहे. बसवराजुच्या मृत्यूने माओवादी संघटनेची जबरदस्त हानी झाली आहे, हे निर्विवाद. मात्र केवळ एका नेत्याच्या मृत्यूने विचारांचे मरण होत नाही.
माओवाद हा एका बंदुकीधारी गटाचा चेहरा नसून, तो व्यवस्थेविरुद्धचा एक 'राजकीय आक्रोश' आहे. जिथे सरकारी यंत्रणा पोहोचत नाही, जिथे नागरी सुविधा अपुरी, वनहक्कांचे उल्लंघन, भ्रष्टाचार व पोलीस बळाचा गैरवापर सर्रास आहे - तिथे माओवादी विचाराला खाद्य मिळतं. आजही देशात 70 हून अधिक जिल्ह्यांमध्ये नक्षल प्रभाव आहे. म्हणजेच ही लढाई संपलेली नाही. 
बसवराजुचा मृत्यू ही एक ऐतिहासिक संधी आहे त्या भागात सरकारने 'फक्त बंदूक नेली' असे न वाटता 'सहभाग, समाधान आणि समावेश घेऊन आले' अशी भावना रुजवण्याची. अन्यथा, आज बसवराजु संपला असला तरी उद्या दुसरा केशवराव पुन्हा जन्म घेईल - आणि जंगल पुन्हा पेटेल. शासन व सुरक्षा यंत्रणांनी बसवराजुचा खात्मा करून यश मिळवलं आहे. पण आता पुढचं पाऊल अधिक विचारपूर्वक आणि संवेदनशीलतेने टाकायला हवं. ही केवळ युद्धाची नाही, तर लोकशाही मूल्यांची आणि सामाजिक समतेची लढाई आहे.
माओवादी आंदोलन आणि गुमुडावेल्ली रेणुका
ते 80 चे दशक होतं… आंध्र प्रदेशच्या वारंगल जिल्ह्यातील तरुणाई शाळा-महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडून देत होती आणि सशस्त्र संघर्ष संघटनेत सामील होत होती. सशस्त्र संघर्षात सहभागी होण्याचे वारे त्याकाळात जोरात वाहात होते. विशेष करून कडावेंडी गावात तर प्रत्येक घरात हेच घडत होतं. त्याच दशकात तेलंगणा संघर्षाचं दुसरं पर्व शिखरावर होतं आणि कडावेंडी गाव हे स्वतंत्र तेलंगणा व नक्षलवादी/ माओवादी आंदोलनांचं केंद्र बनलं होतं.
पण हा तो रस्ता नव्हता जो गुमुडावेल्ली रेणुकानं स्वतःसाठी निवडला होता. रेणुका कॉलेजला गेली आणि तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. या भीतीनं की ती आपला भाऊ जीव्हीके प्रसाद याच्याप्रमाणे सशस्त्र संघर्षात सहभागी होईल. पण हे लग्न घरगुती हिंसाचारामुळे लवकरच तुटलं.रेणुकाचा भाऊ प्रसाद सांगतो की, याच काळात रेणुकानं पहिल्यांदाच पितृसत्तेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते.
रेणुका… भूमिगत गोरिल्ला, पत्रकार आणि कवयित्री
दहा वर्षांच्या सशस्त्र संघर्षानंतर प्रसादनं शरणागती स्वीकारली आणि आता तो एका तेलुगू वृत्त वाहिनीत पत्रकार म्हणून काम करतोय. गेल्या ३१ मार्च रोजी दक्षिण छत्तीसगढ मधल्या बिजापूर जिल्ह्यात पोलिस गोळीबारात रेणुका मारली गेली. दंतेवाडा पोलिसांनी सांगितलं की ती चकमकीत मारली गेली पण याच्या खरेपणाविषयी शंका घेण्यास जागा आहे.
प्रसाद सांगतो की 54 वर्षांची रेणुका, जी नक्षलवादी आंदोलनात ओव्हरग्राऊंड वर्कर व भूमिगत गोरिल्ला म्हणून तीन दशकं कार्यरत होती, लघु कथाही लिहायची आणि चांगली पत्रकारही होती. तिच्या मृत्युच्या वेळी ती दंडकारण्य विशेष झोनल कमेटीची सदस्य होती आणि तिच्यावर 45 लाखांचं बक्षिस होतं.
गुमुडावेल्ली लोकं पद्मशाली किंवा विणकर समुदायातून येतात ज्यांना तेलंगणा व आंध्र प्रदेशात मागास समुदाय समजलं जातं. कडावेंडी गावात मिश्र वस्ती आहे. बरेचसे लोक भूमिहीन होते. गावातील जमिनदार वर्गातील रेड्डी लोकही भूमिहीनच होते. प्रसाद शाळेत असतानाच नक्षलवादी आंदोलनात सहभागी झाला. त्यावेळी रेणुकाचा आंदोलनाकडे कल नव्हता.
प्रसाद सांगतो, “रेणुकाचं लग्न तुटल्यानंतर तिनं कौटुंबिक व्यवस्थेवर प्रश्न विचारणं सुरू केलं. तिनं एकदा मला भलं मोठं पत्र पाठवलं ज्यात विचारलं होतं की मार्क्सवादी पितृसत्तेला कशा प्रकारे बघतात आणि पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांच्या रोजच्या संघर्षाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. मला दिसत होतं की तिच्या आत एक विचार-मंथन सुरू झालं आहे. तुटलेल्या लग्नानं तिला स्वतंत्र केलं होतं.”
त्यानंतर रेणुका कायद्याच्या शिक्षणासाठी चित्तुरला गेली. तिथंच ती एका महिला शक्ती समुहात सहभागी झाली, जे हुंडाबळी, स्त्री हिंसाचार, स्वच्छता अशा गोष्टींवर काम करायचे. नंतर तिनं क्रांतिकारी मासिक ‘महिला मार्गम’साठी लिहीणं सुरू केलं. याच काळात विशाखापट्टणम इथं तिनं आपली वकीली सुरू केली.
1996 पर्यंत रेणुकानं ओव्हरग्राऊंड नक्षलवादी म्हणून काम करणं सुरू केलं होतं. ती लघु कथा लिहायची, सभा घ्यायची व भूमिगत नक्षलवाद्यांच्या घरच्या सदस्यांना कायदेशीर मदत करायची. रेणुका अनेक नावांनी कथा, लेख, वृत्तांत लिहायची. २००३ मध्ये एकदा रेणुकाचा लहान भाऊ, आई-वडिलांना घेऊन प्रसादला भेटायला जंगलात जात होते. प्रसादला तेव्हा पोलिसांनी फरारी घोषित केलं होतं. पोलिसांनी या सर्वांना पकडलं तेव्हा रेणुकानं सर्वांची सुटका केली. याच प्रसंगी दमयंती नावाची एक मुलगी पोलिस गोळीबारात मारली गेली. त्यानंतर रेणुकानं बी. डी. दमयंती नावानं लिहिणं सुरू केलं. नक्षलवादी चळवळीसाठी याच नावानं रेणुकानं सर्वाधिक लेखन केलं आहे.
रेणूका माओवाद्यांच्या प्रभावाखाली कशी आली?
प्रसाद सांगतो की, तिच्या लिखाणात तिनं सरकार प्रायोजित सलवा-जुडूम द्वारा बस्तर आदिवासींवर झालेल्या हिंसेवर लिहिलं, आदिवासींच्या विस्थापनावर तसेच त्यांच्या कमी होत जाणाऱ्या वन-संसाधनांविषयी लिहीलं. मग मिडको नावानं लघु कथा लिहील्या. गोंडी भाषेत त्याचा अर्थ काजवा असा होतो. मग पार्टीत त्यांना भानु किंवा चैते नावानं ओळखलं जाऊ लागलं.
2003 मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या खूनाचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात अटक-सत्र सुरू झालं त्यात रेणुकाच्या लहान भावालाही अटक करण्यात आली. पण शेवटी त्याची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर त्यानं वकीली सुरू केली व मानवाधिकार संघटनांसोबत कामही सुरू केलं. तर रेणुकानं भूमिगत होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये ती गोरिल्ला आंदोलनात सहभागी झाली. लहान चणीच्या रेणुकानं शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. प्रसाद सांगतो की ते भूमिगत असताना क्वचितच एकमेकांना भेटायचे.
आंदोलनात असतानाही रेणुकाचा प्रेमाचा शोध संपलेला नव्हता. 1997 मध्ये ती जेव्हा शहरी आंदोलनात होती तेव्हाच पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने तिला संतोष रेड्डी (महेश) याच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. संतोष तेव्हा पार्टीच्या आंध्र प्रदेश राज्य समितीचा सचिव होता व केंद्रीय समितीचा सदस्यही. त्यालाही हाच सल्ला देण्यात आला होता. तोही कडावेंडीचाच होता. पण दोघांची पूर्वीची ओळख नव्हती. रेणुका व संतोष यांची कामासाठी म्हणून लवकरच भेट झाली आणि त्यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण झाले. संतोष वरिष्ठ नेता होता आणि रेणुका शहरात उघडपणे काम करायची त्यामुळे त्यांना आपलं लग्न लपवून ठेवावं लागलं.
2 डिसेंबर 1999 रोजी संतोष पोलिसांच्या तथाकथित चकमकीत मारला गेला. प्रसाद सांगतो, “रेणुकाला आपल्या लग्नाविषयी उघडपणे कोणाला सांगता आलं नाही. उघडपणे रडताही आलं नाही. तिच्या प्रेम कथेचा दुःखद अंत झाला. तिचं संतोषवर खूप प्रेम होतं.”
2005 मध्ये रेणुकानं दुसऱ्या एका पार्टी नेत्याशी लग्न केलं. 2010 मध्ये त्याचाही तथाकथित चकमकीत मृत्यू झाला. प्रसाद सांगतो की सर्वांना वाटतं की ती माझ्यामुळे सशस्त्र आंदोलनात सहभागी झाली, पण तसं नाही आहे. रेणुका तिच्या विचारानं आली होती. ती स्वतंत्र विचारांची होती आणि तिच्या भवतालात घडणाऱ्या गोष्टींनी चिंतीत होऊन त्यावर प्रश्न विचारायची.
रेणूकाचा मृत्यू संशयास्पद… भावाचा आरोप
याच महिन्याच्या सुरूवातीला तेलंगणाच्या एका पोलिस अधिकाऱ्यानं प्रसादला फोन करून रेणुकाच्या मृत्यूची माहिती दिली. त्याचा प्रसादला धक्का बसला पण तिचा मृत्यू असा होऊ शकतो याची त्याला कल्पनाही होती. प्रसाद सांगतो, “रोज सकाळी माझी बायको (जिनं 2014 मध्ये प्रसाद सोबतच शरणागती स्विकारली होती) सर्व पेपर्स वाचायची, न्यूज चॅनेल्स बघायची, की बस्तरमध्ये कोणाचा मृत्यू तर झालेला नाही ना. हैदराबादेत माझी आई देखील हेच करायची. मागील एक वर्षांत सरकारनं माओवादी आंदोलन चिरडून टाकताना शेकडो लोकांना ठार केलं. कोणतीही चर्चा नाही, फक्त निर्दयी हत्याकांड.”
प्रसाद जेव्हा रेणुकाचं शव घेण्यासाठी दंतेवाडा इथं गेला तेव्हा पोलिसांनी तिचं शव एका पॉलिथीन बॅगेत पॅक करून त्याचं प्रदर्शन मांडलं होतं. प्रसाद सांगतो, “तोवर मला वाटलं होतं की तिचा मृत्यू तिच्या सोबत्यांसोबत झाला असेल. एक दिवस आधीच शेजारच्या सुकमा जिल्ह्यात 17 नक्षलवाद्यांना मारण्यात आल्याची बातमी आली होती. पण नंतर मला शंका येऊ लागली. रेणुका कधी कानात रिंग, कुंडल घालत नव्हती. टिकलीही लावायची नाही. पण यावेळी तिच्या प्रेतावर हे सारं होतं. त्याचा अर्थ हाच होता की ती आता गावात येऊन गावकऱ्यांसोबत सामान्य जगणं जगत होती. मग पोलिसांनी तिला पकडलं का नाही?”
पोलिसांचा दावा आहे की रेणुकाचा मृत्यू चकमकीत इंद्रावती नदीच्या काठी, दंतेवाडा-बिजापूर सीमेवर झाला. कुटुंबियांचं म्हणणं आहे की तिच्या हातावर मारहाणीच्या खूणा होत्या. पोलिसांनी तिला मारहाण केली असेल किंवा फॉरेंसिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल. पोलिसांनी तिच्याकडून शस्त्रं जप्त केल्याचं सांगितलं. तिचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं पण त्याचा अहवाल घरच्यांना देण्यात आला नाही.
2 एप्रिलला प्रतिबंधीत सीपीआय (माओवादी) संघटनेच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटीने एक प्रेस-नोट जाहिर केली, ज्यात त्यांनी दावा केली की रेणुकाला बिजापूर जिल्ह्यातील भैरमगढ ब्लॉक मधील बेलनार गावात पकडण्यात आलं होतं. रेणुकाची तब्येत बिघडल्यामुळे ती तिथं राहत होती. 31 मार्च रोजी सकाळी 4 च्या सुमारास पोलिसांनी तिच्या घराला वेढा घातला. सकाळी 9-10 च्या दरम्यान पोलिसांनी तिला इंद्रावती नदीकडे नेलं व तिला गोळ्या घातल्या असं नोटमध्ये म्हटलं आहे.
याच भागात ४०० हून जास्त हत्या झाल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. यात सशस्त्र आंदोलनातील नक्षलवादी तसेच सामान्य लोकही आहेत. आता पार्टीला सरकारशी चर्चा करण्याची इच्छा आहे. प्रसाद व त्याची बायको, रेणुकाचं शव घेऊन कडावेंडीला पोहोचले तेव्हा परिसरातील हजारो लोक तिथं जमले होते. प्रसाद सांगतो की तिला एखाद्या शहीदाप्रमाणे अंतिम निरोप देण्यात आला.






