(किरण गिते)
‘’हा ‘नो ब्रा डे’ फक्त ऑक्टोबरच्या 13 तारखेला का साजरा करतात…? खरं तर उन्हाळाच्या तीन-चार महिन्यात दररोज हा दिवस साजरा करायला हवा…इतकं कडक ऊन लागतयं आणि त्यात ही गच्च ‘ब्रा’, मला तर इतका त्रास होतोय की, असं वाटतं हे ‘ब्रा’चं ओझंच फेकून द्यावं…’’ ऑफिसची सहकारी संजना ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच संतप्त होऊन बोलत होती…
ही फक्त ‘संजना’चीच कैफियत नसून या देशातल्या प्रत्येक महिलेची कैफियत आहे. मात्र तरीही हे ‘ब्रा’चं ओझं यापैकी कुणालाही फेकून देता येत नाहीये, भले मग कितीही शारीरिक आणि मानसिक त्रास होत असला तरीही… कारण हे ओझं फक्त गच्च ‘ब्रा’चं नाहीये, हे ओझं आहे पितृसत्तेचं… हे ओझं आहे धर्म आणि संस्कृतीचं… हे ओझं आहे जात,वर्ग,धर्म, शहर,खेडी, पातिव्रत्य,व्यभिचार, मालकी हक्क,लैंगिक सुखापासून असलेला वंचित समाज, लैंगिक नैराश्य अशा अनेक गोष्टींचं…
"ब्रा" – एक साधा कपड्याचा तुकडा… पण समाजाच्या नजरेत त्याला दिलं गेलेलं महत्त्व अनेक पटींनी मोठं... शरीराचं संरक्षण करण्यासाठी वापरली जाणारी वस्तू मात्रअनेक महिलांसाठी एक सामाजिक ओझं. विशेषतः उन्हाळ्यात..! घाम, घुसमट, आणि अस्वस्थता यामुळे अनेक स्त्रियांना ब्रा घालणं नकोसं वाटतं, पण तरीही ‘घालणं गरजेचं आहे’ ही एक सामाजिक बांधिलकीच. त्यात “लोक काय म्हणतील?” ती एक गोष्ट आलीच म्हणा. या सगळ्यातून एक बाब प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे, स्त्रियांच्या शरीरावर नेमका कोणाचा जास्त अधिकार आहे? खुद्द स्त्रियांचा की समाजाच्या सो कॉल्ड रूढी परंपरेतून आलेल्या मापदंडांचा? 
तीव्र उन्हाळादेखील पुरुष आणि स्त्रीमध्ये भेदभाव करतो
निसर्गाने पुरुष आणि स्त्रियांची शरीरं वेगळी बनवली आहेत. तीव्र उन्हाळादेखील त्यांच्यात भेदभाव करतो. जरी उष्णता सर्वांनाच जाणवते आणि घामाचा त्रास सर्वांनाच होतो, परंतु या ऋतूत महिलांना जास्त उष्णता जाणवते.वाढत्या तापमानाचा फटका पुरुषांपेक्षा महिलांनाच अधिक बसतो हे आता अनेक संशोधनातून स्पष्ट झालेच आहे. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांचा, हवेतील प्रदुषित घटकांचा त्रास पुरुषांपेक्षा महिलांना अधिक होत असतो आणि यात महिलांचे कपडे आणि त्यांच्या कामाचं स्वरूप या गोष्टी जबाबदार आहेत.
संबंधित लेख वाचा: 1) हवामान बदलांमुळे तापू लागलंय स्त्रियांचं जगणं |
कडक उन्हाळा आणि ब्राचे सामाजिक ओझं…
आणि म्हणूनच उन्हाळ्यात महिलांना गच्च कपड्यांचा त्रास होतो. उन्हाळ्याच्या उकाड्यात ज्या महिला रोजच्या प्रवासात असतात, त्यांना ब्रा घालणे हा एक मोठाच त्रासदायक अनुभव ठरतो. सकाळपासूनच बाहेर उन्हात, बस-ट्रेनमध्ये प्रवास करत कामावर जाणाऱ्या महिलांना टाईट ब्रामुळे घाम, घर्षण, आणि त्वचेवर पुरळ येणे याचा सामना करावा लागतो.
अनेक वेळा या त्रासामुळे लक्ष विचलित होते, चिडचिड वाढते आणि आरोग्यही बिघडते. विशेषतः ज्या महिला शारीरिक काम करतात, ज्यांना सतत उभं राहावं लागतं, त्यांना हा त्रास अधिक जाणवतो. पण तरीही सामाजिक अपेक्षा आणि आम्ही बायका आहोत, समाजाने आम्हाल सभ्यतेच्या बेड्या घातलेल्या आहेत आणि आम्हाला त्याचा त्रास झाला तरी आम्ही कोणालाच काही बोलणार नाही. कारण, आम्ही सभ्य आहोत, म्हणून ब्रा घालणे बंधनकारक मानले जाते. 
परंतु आता काळ बदलतोय. महिलांना त्यांच्या आरोग्याचं भान आलंय. उन्हाळ्यात कशाप्रकारच्या ब्रा वापरल्या हव्यात अशा कैक जाहिराती आणि व्हिडियो उपलब्ध आहेत. डॉक्टरदेखील सांगतात की, योग्य ब्रा नसेल तर ती न वापरणं हे आरोग्यदृष्ट्या कधी कधी जास्त योग्य असतं. काही स्त्रिया विशेषतः घरी असताना ब्रा वापरणं टाळतात आणि त्यात काही चुकीचं नाही. शरीर मोकळं राहिलं की मनही थोडं मोकळं होतं.
कडक उन्हामुळे खांदा, पाठ, स्तनांच्याखाली लाल रॅशेज्
यासंदर्भात ‘बाईमाणूस’ने ऑफिसच्याच महिला सहकाऱ्याशी बातचीत केली. फिल्ड रिपोर्टिंगकरताना ब्राचा किती आणि कसा त्रास होतो यावर बोलताना पत्रकार संजना खंडारे सांगते, “ मी तशी प्लस साईज फिगरची. माझ्या स्तनांचा आकार मोठा आहे. त्यामुळे पाठ आणि खांदा खूप दुखतो. घरात असल्यावर मी ब्रा घालत नाही पण सामाजिक जबाबदारीच्या ओझ्यामुळे घराबाहेर पाऊल टाकताना ब्रा घालावी लागते इतकंच नाही तर त्यांचा आकार ठिक दिसतोय ना ते चेक करतच बाहेर निघते. त्यानंतर मला जास्त अस्वस्थ होतं. मी मराठवाड्यासारख्या अति उष्ण भागात रिपोर्टिंग करते. जेव्हा रिपोर्टिंगसाठी फिल्डवर असते त्यात ऊन्हात जास्तच त्रास होतो. स्तनांखाली घाम येतो, खाज सुटते आणि पुरळ उठतात. घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी ब्रा अक्षरश: फेकून देते आणि मोकळा श्वास घेते. पण, ब्रा काढल्यानंतर मी स्वत:ला जेव्हा आरशात बघते तेव्हा खांदा, पाठ, स्तनांच्याखाली लाल रॅशेज् आलेल्या असतात. त्वचेवर जळल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं ब्रा म्हणजे स्त्रियांसाठी रोजचा तुरूंग आहे.”
संजना पुढे म्हणते की, नो ब्रा डे हा मुळात फक्त ऑक्टोबरमध्येच का साजरा करायचा? ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी एक आवाज म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण प्रश्न असा निर्माण होतो की, ही सवय जर आरोग्यदृष्ट्या काहींना त्रासदायक वाटत असेल, तर त्याविरोधात एक दिवस पुरेसा आहे का? विशेषतः भारतात उन्हाळ्याचे तीन-चार महिने हे महिलांसाठी अत्यंत क्लेशदायक असतात. अंगावरून सतत घाम येतो, त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी बऱ्याचवेळा रॅशेस, फंगल इन्फेक्शन्स, श्वास घ्यायला त्रास अशा समस्या उद्भवतात. याच पार्श्वभूमीवर “नो ब्रा डे” केवळ एक दिवस न राहता, गरज आहे ती नो ब्रा डे अवेअरनेस सिझनची– जेव्हा महिलांना मोकळेपणाने हा निर्णय घेता येईल की, त्यांना ब्रा घालायची आहे की नाही. शरम किंवा नजरा यापेक्षा आरोग्य, आराम आणि आत्मसन्मान या गोष्टींकडे प्रकर्षाने आपण माणूस म्हणून लक्ष घातलं पाहिजे.’’
‘’अखेर माझं उजव्या बाजूचं स्तन काढून टाकण्यात आलं…’’
28 वर्षांची मेघा सांगते… “वयात यायला लागले आणि माझ्या स्तनांची वाढ भरपूर होत गेली. तेव्हा ही बाब लक्षात आली नाही. पण, स्तन मोठे असल्याने ब्रा घालणं गरजेचं वाटायचं. ब्रा घातली नाही तर तस घरातही वावरायला लाज वाटायची. म्हणून सतत ब्रा घालूनच असायचे. झोपतानाही तसंच. त्यामुळे 23-24 ची झाल्यावर स्तनांमध्ये गाठी झाल्याचं लक्षात आलं. पुढे मेडिकल चेकअप केल्यानंतर छातीचा कर्करोग झाल्याचं समजलं. पुढे अनेक महिने किमोथेरपी केली पण औषधांचा फरक पडेना. डॉक्टरांनी शेवटी माझं उजव्या बाजूचं स्तन काढून टाकण्याचा उपाय सांगितला आणि माझं जग हललं. माझ्या कुटुंबावर हा एक मोठा आघात होता. संकंट आलं आहे तर सामोरं जावंच लागणार म्हणून सगळ्यांनी मनाची तयारी केली आणि माझ्या छातीचा एक भाग काढण्यात आला. वयात येत असतानाच माझ्या जीवनात आलेला हा सगळ्या मोठा कठीण प्रसंग होता. त्याला सामोरं जाणं मुळीच सहज नव्हतं. पण, मी त्यातून सावरले आहे असं स्वत:लाच सांगून मनाला शांत करते. मी आता मुलींना ब्रा आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम सातत्याने सांगत असते. स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करते. कारण, मी आणि माझ्या कुटुंबाने जे सहन केलं आहे जगात कोणावरच ती वेळ येऊ नये असं मला वाटतं.”
उन्हाळ्यात ‘ब्रा’ घालण्याबाबत डॉक्टर काय म्हणतात?
आता या सगळ्यामध्ये वैद्यकीय बाजू नेमकी काय आहे? ब्रा घालायला हवी की नाही? त्याचे बरे वाईट परिणाम नेमके कोणते आहेत? महिलांनी उन्हाळ्यात काय विशेष काळजी घ्यावी या सगळ्यावर डॉ. रेवत कानिंदे यांच्याशी संवाद साधला. डॉ. रेवत यांच्यानुसार, “ब्रा घालावी की नाही हा पूर्णपणे त्या महिलेचा प्रश्न आहे. अनेकवेळा असं वाचण्यात येतं की ब्रा घातली नाही तर स्तन ‘सॅगी’ म्हणजे खाली झुकले जाऊ शकतात. पण, झुकलेले स्तन हा काही रोग नाही. स्तनांचं काम हे फक्त नवजात बालकांना दूध पाजणे एवढंच आहे. त्यासाठी छोटे किंवा मोठे, टाईट असतील किंवा सॅगी बूब्स (खाली झुकलेले स्तन) असतील त्याने दूध पाजण्यासाठी काहीही फरक पडत नाही. त्यामुळे ब्रा घातली नाही म्हणून स्तन खाली झुकणं हे मुळातच वाईट नाही. उन्हाळ्यात महिलांनी सुती, फिकट रंगाचे आणि विशेषत: ढिल्ले कपडे घालावेत जेणेकरून त्रास होणार नाही. तुमचा कंफर्ट काय आहे? हे फार महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी आदिवासी महिला तर ब्लाऊजसुद्धा घालत नाहीत. कारण त्या त्याच पोषाखात कंफर्टेबल आहेत. उन्हाळ्यात फक्त गच्च ब्रा किंवा सुती कपड्याशिवाय ब्रामुळे पाठीवर,स्तनाखाली जखमा होतात. अशा स्थितीत महिलांना ब्रा टाळलेली कधीही योग्य. उन्हाळ्यात थेट उन्हात काम करणं टाळावं. आणि शरीराला सजल ठेवलं पाहिजे त्यासाठी तुम्ही जास्त पाणी प्यावं. लिंबूपाणी तर अधिक चांगलं. ” 
ग्रामीण भागातील स्त्रियांच्या तुलनेत शहरी महिला ब्राचा वापर अधिक प्रमाणात करतात. ग्रामीण भागात महिला प्रामुख्याने साडी परिधान करतात. ब्लाऊज आणि त्यावर साडीचा पदर. त्यामुळे त्याच्यासाठी ब्रा घालणं हे मुळात निरर्थक गोष्ट आहे. ग्रामीण स्त्रिया ब्रा घालत नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये छातीच्या त्वचेचा आजार होण्याच्या घटना कमी आहेत. ग्रामीण पोषाख हा सैल आणि प्रामुख्याने सुती असतो त्यामुळे त्याच्या त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. याचमुळे त्यांना शरीरिक अडचणी तुलनेत कमी असतात.
त्वचारोग तज्ञ डॉ सम्राट गुट्टे यांनी सांगितलं की, “उन्हाळ्याती गच्च कपडे घातल्यामुळे शरीराला जास्त घाम येतो. त्यामुळे बुरशीजन्य आजार उद्भवतात. उन्हाळ्यात याचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्यामुळे शक्य तेवढे ढिल्ले कपडे घालावेत. सुती कपड्यांचा वापर जास्त ठेवावा. विशेषत: जेवणात गोड पदार्थ खाणं टाळावं. गोड खाल्याने एखाद्या व्यक्तीला बुरशी रोग झाला असेल तर तो आणखी शरीरावर पसरतो आणि संपूर्णपणे बरा होण्यासाठी खूप काळ जातो. सकाळी आंघोळ केल्यानंतर शरीराला पूर्णपणे कोरडं केल्यानंतरच कपडे परिधान करावेत आणि कामावरून घरी आल्यानंतर शरीरावर आलेला घाम पुसून घ्यावा. जेणेकरून त्वचेसंदर्भातील आजार होणार नाहीत.”
चाळीस डिग्री तापमानात मुलींना कपड्यांची दोन-तीन आवरणं घालावी लागतात
समाजात पितृसत्तेचं ओझं असताना जर अशा संवेदनशिल विषयांवर जेव्हा पुरुष मोकळेपणाने बोलतात, तेव्हा ‘लाज’ या शब्दाचं ओझं कमी होतं. उदाहरणार्थ, पुरुष जर ‘ब्रा’च्याअसहजतेविषयी बोलू लागले, तर ती केवळ 'महिलांच्या कपड्यांबाबतची फालतू तक्रार' म्हणून हिणवलं जाणार नाही, तर मानवी गरज म्हणून ऐकून घेतलं जाईल.आपण जोवर स्त्रियांना त्यांच्या शरीराच्या अडचणींबाबत एकटं बोलू देतो, तोवर ती लढाई अर्धीच राहते.
पुरुषांनी यावर बोलणं म्हणजे, संवादाच्या टेबलावर दोन्ही बाजूंनी जागा घेणं. जर तुमचं नातं आई, बहिण, मैत्रीण, सहकारी यांच्याशी आहे. तर, त्यांचा अनुभव समजून घेणं, त्यांच्यासाठी बोलणं ही जबाबदारी नक्कीच आहे. यामुळेच यावर पुरूषांची मतंही महत्त्वाची आहेत.
हाच मुद्दा घेऊन ‘बाईमाणूस’ने पत्रकार आशय येडगे यांच्याशी संवाद साधला. आशय सांगतो, "मला वैयक्तिक पातळीवर सगळ्यात जास्त त्रास जर कुठल्या ऋतूचा होत असेल तर तो उन्हाळा आहे. कारण पावसापासून वाचण्यासाठी तुम्ही रेनकोट वापरू शकता, थंडीत उबदार वाटावं म्हणून जॅकेट्स वापरू शकता पण उन्हाळ्यात होणाऱ्या गर्मीपासून सुटका करून घेण्यासाठी किमान सार्वजनिक ठिकाणी तरी कपडे काढू शकत नाही. यातला विनोद सोडला तर लक्षात येईल की किमान पुरुषांना तरी उन्हाळ्यात सैल कपडे घालता येतात, कधी बंडी घालता येते, कधी हाफ पॅन्ट वापरता येते उन्हाळ्यात पुरुषांना बरेच ऑप्शन्स आहेत. जेणेकरून उन्हापासून आणि उष्णतेपासून तुम्ही थोडी सुटका करून घेऊ शकता पण महिलांना तसं स्वातंत्र्य आहे का? एखादी महिला सर्रास अगदी ढिले किंवा सैल कपडे वापरू शकते का? खरंतर चाळीस डिग्री तापमानात कुणी साधा माझ्या खांद्यावर हात ठेवला तरी माझी चिडचिड होते आणि अशा अवस्थेत महिलांना, तरुण मुलींना कपड्यांची दोन तीन आवरणं घालावी लागतात. त्यात छातीला घट्ट चिकटलेली ब्रा असेल, साडी असेल, ब्लाउज असेल...मी अजिबात ही कल्पनाच करू शकत नाही की एवढ्या गर्मीत मी एखादी चादर अंगावर ओढून चालू शकेन पण मग महिलांची साडी ही एखाद्या चादरीसारखीच तर असते, तिला मोकळेपणानं हाफ पॅन्ट, बनियान किंवा असे कपडे घालण्याची मोकळीक आहे का?"
ब्रा हे प्रकरण तर जरा अतीच आहे. कुणीतरी सतत तुमची छाती घट्ट आवळून धरल्याचा तो प्रकार. कसं सहन होत असेल या बायांना. अर्थात ब्रा किंवा महिलांना घालाव्या लागणाऱ्या इतर तत्सम कपड्यांचं पुरुषी राजकारण आहेच. पुरुषांच्या नजरेला घाबरून, शरमून आपल्या समाजात महिलांच्या अंगावर वेगवेगळे पदर चढवले गेले. पण पुरुषांच्या नजरेचं कधीच काही केलं गेलं नाही. तिच्यावर कोण पदर चढवणार, ती नजर कोण निकोप करणार? असं घडलं कधी तर आणि तरच महिलांना उन्हाळ्यात मोकळा श्वास घेता येईल.”, असेही आशय येडगेने सांगितले.
‘ब्रा’चा इतिहास नेमका काय आहे?
ब्रा चा इतिहास अगदी प्राचीन आहे. ग्रीक आणि रोमन स्त्रियाही अंग झाकण्यासाठी कपड्याच्या पट्ट्या वापरत असत. मात्र असं म्हणतात की, पहिली मॉर्डन ब्रा फ्रान्समध्ये तयार करण्यात आली होती. फ्रान्सच्या हर्मिनी कॅडोल यांनी 1869मध्ये कॉर्सेटला दोन तुकट्यांत तोडून अंतर्वस्त्र बनवलं होतं. याच वस्त्राचा वरचा भाग नंतर ब्रा म्हणून घालण्यात येऊ लागला आणि नंतर तसा विकण्यातही आला. पुढे 1914 मध्ये "मेरी फेल्पस जेकब" या अमेरिकन महिलेनं सध्याच्या स्वरुपातील ब्रा तयार केली. ती कॉरसेटच्या त्रासाला वैतागली होती, आणि त्यातूनच हा सहज वावरणारा पर्याय निर्माण झाला.
पुढच्या काही दशकांत ब्रा ही केवळ उपयोगाची वस्तू राहिली नाही, तर सौंदर्य आणि स्त्रीत्वाची ‘ओळख’ बनवली गेली. ब्रा च्या आकारात, डिझाइनमध्ये आणि उपयोगामध्ये बरेच बदल होत गेले – पॅडेड ब्रा, पुश अप ब्रा, स्ट्रॅपलेस ब्रा, स्पोर्ट्स ब्रा, ट्रान्सपरंट ब्रा, टी शर्ट ब्रा आणि बरंच काही. परंतु गरज होती स्त्रीच्या सोयीची, की समाजाच्या अपेक्षांची? हा महत्त्वाचा प्रश्न आहेच.
कॉरसेट म्हणजे काय?
कॉरसेटचा वापर विशेषतः युरोपात16व्या शतकापासून सुरू झाला. तो स्त्रियांच्या कपड्यांच्या आतमध्ये घालावा लागत. अनेक वेळा त्यात लाकडाचे, कोणत्याही धातूचे किंवा व्हेलच्या हाडाचे पट्टे घातले जायचे जेणेकरून स्त्रियांचं शरीर एकदम ताठ आणि आकृतीबद्ध दिसेल. ज्यात, कंबर बारीक दिसणं, छाती उंच सुडौल आणि मोठी दिसणं, एकूण शरीर सौंदर्य युरोपियन्सच्या सौंदर्य मापात दिसावं म्हणून कॉरसेट वापरलं जायचं.
पण, स्त्रियांना त्याचा अधिक त्रास होत असे. दम लागणं, शारीरिक हालचालींवरही बंधन येत असे, श्वसनाचे आजार यामुळे 16व्या शतकातील महिला वर्ग या कॉरसेट प्रकारला वैतागला होता. हळूहळू यावर टीका होऊ लागली आणि स्त्रिया स्वतःच या प्रथेला विरोध करू लागल्या. त्यातूनच ब्रा घालण्याची सुरुवात झाली. ब्रा जरी काही प्रमाणात त्रासदायक असली तरी कॉरसेटच्या तुलनेत कमीच होती.
म्हणून 13 ऑक्टोबर हा नो ब्रा डे साजरा होतो…
‘नो ब्रा डे’ दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे स्तन कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करणे. २०११ साली पहिल्यांदा नो ब्रा डे साजरा करण्यात आला. एका व्यक्तीने सोशल मीडियावर NO BRA DAY अशी मोहीम सुरू केली होती. त्यानंतर जगभरात ही मोहीम सुरू झाली. 13 ऑक्टोबर हा दिवस फक्त कर्करोगाच्या जनजागृतीसाठीच नाही तर महिलांना ब्रामुळे उद्भवणाऱ्या अडचणीपासून सजग ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी महिला ब्रा घालण्याचं बंधन ठेवत नाहीत आणि त्या आपल्या शरीरावरचा हक्क, सशक्तता आणि आत्मविश्वास व्यक्त करतात.
‘नो ब्रा डे’ फक्त एक ट्रेंड नाही, तर एक सामाजिक संदेश आहे – जो महिलांच्या शरीराबाबत असलेल्या पारंपरिक कल्पनांना आव्हान देतो आणि स्तनाच्या आरोग्याबद्दल बोलण्याची गरज अधोरेखित करतो. आजही अनेक ठिकाणी ब्रा न घालणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट मानली जाते, पण ‘नो ब्रा डे’ याच मानसिकतेला बदलण्याचा प्रयत्न करतो. स्त्रियांच्या शरीरावर त्यांनाच अधिकार आहे, हे अधोरेखित करणारा आणि आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणारा हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो.
मेल गेझ किंवा पुरुषी नजर हा एक यातला अविभाज्य घटक आहे. आपल्याला समाज म्हणून, म्हणजे स्त्री, पुरुष आणि इतर लैंगिक, कोणीही व्यक्ती असली तरीही स्त्रीकडे पाहण्याची नजर / दृष्टिकोन हा पुरुषी आहे. स्वतःला आवडते म्हणून तयार होताना जाचक, बंधनकारक, त्रासदायक, घट्ट असे कपडे का कुणी स्वतःहून घालेल? पुरुषी नजरेला जे चांगले दिसते, ती त्या त्या काळातली फॅशन असते.
म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्री देहाची महती गाताना गजगामिनी, भरल्या छातीची, कमनीय बांधा अशा पद्धतीची वर्णने व्हायची. त्या काळातल्या कलांमधून होणाऱ्या स्त्री देहाच्या आविष्कारातही हेच चित्र आपल्याला दिसते. आत्ता बारीक, उंच आणि तरीही कमनीय अशा ठेवणीचे आकर्षण आहे (हे देश, कालानुरूप बदलणारेही आहे) तेव्हा अनेक स्त्रियांची इच्छा तसेच दिसण्याची असते.
कारण पुरुषी नजरेला जे आवडते तेच सुंदर असते, ही धारणा समाज म्हणून सगळ्यांच्या मनात आहे. त्यात कपड्यातून दिसणारा किती भाग हा लपवायचा असतो आणि किती भाग दाखवायचा, याचे पुरुषी फँटसीमधून ठरलेले काही निकष आहेत. या सर्व निकषांवर खरं उतरत आजची स्त्री मुक्त जगण्याची तारेवरची कसरत करत आहे.






