भारताच्या मुख्य भूमीपासून दूर अंदमान बेटांच्या समूहातल्या एका उत्तरीय बेटावर सेंटिनलिज (मानववंशशास्त्रज्ञांनी बेटाच्या नावावरून दिलेली ओळख) जमातीची वस्ती आहे. हे लोक तिथे साठ हजार वर्षांहून अधिक काळापासून राहत असावेत, असा कयास आहे. या मोठ्या कालखंडात सेंटिनलिज लोकांची जीवनपद्धती ही बरीचशी अश्मयुगीन कालखंडाप्रमाणेच राहिली आहे.
त्यांना धातुंचे उत्पादन वा त्यांच्या वापराचे ज्ञान नाही. हजारो वर्षे मुख्य भूमीपासून दूर राहिल्या नागरी वस्तीत असलेल्या आजाराशी त्यांची जनुकीय ओळख नाही, त्यामुळे या आजारांप्रती त्यांची रोगप्रतिकारक शक्ती शून्य आहे. त्यांच्याशी बाह्यजगातला माणूस संपर्कात आल्यास त्यांना कांजण्या व गोवरसारखे आजार झाल्याने त्यांचा पूर्ण समूह नष्ट होऊ शकतो, हा धोका ओळखून भारत सरकारने त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क करण्यास मज्जाव केला आहे. सेंटिनलिज लोकांचे बेट हे सगळ्यांसाठीच प्रतिबंधित असून तिथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही. 
… आणि अमेरिकन पर्यटकाला बाण मारून ठार मारले
जगभरातल्या अशा दूरस्थ कोपऱ्यांमध्ये एकाकी जीवनपद्धतीत जगणाऱ्या समूहांच्या प्राकृतिक आवासांचे आणि बाह्यजगापासून होणाऱ्या हस्तक्षेपापासून संरक्षण करण्याचे काम ‘सर्व्हायव्हल इंटरनॅशनल’ ही संस्था करते. या संस्थेने वेळोवेळी जाहीर केलेल्या आर्जवांना न जुमानता आणि भारतीय सरकारचे नियम डावलून 2019 साली जॉन अॅलन चाऊ या अमेरिकी युवकाने सेंटिनलिज बेटावर जाऊन चौदा नोव्हेंबर रोजी तिथल्या माणसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जॉन चाऊच्या दिशेने बाण मारला, ज्यातून जॉन थोडक्यात बचावला. हल्ला होऊनही शहाणपण न आलेल्या जॉनने पुन्हा अगोचरपणा केला आणि पुन्हा सेंटिनलिज लोकांकडून त्याला जिवे मारण्यात आले. त्याचा मृतदेह त्याच बेटावर जमिनीत पुरण्यात आला.
जॉन चाऊच्या मृत्यूनंतर आंतराष्ट्रीय माध्यमांत त्याचे पडसाद उमटले, सेंटिनलिज मानव समूहाच्या बातम्या आणि त्यांच्या जीवनपद्धतीविषयी बरीच चर्चा झाली आणि एका क्षणानंतर ही घटना विस्मृतीत गेली. मात्र आता पुन्हा सेंटिनलिज बेट चर्चेत आले ते मिखाइल व्हिक्टोरोविच पॉलिकोव्ह नावाच्या अमेरिकन पर्यटकामुळे… मिखाइल परवानगी नसतानाही या बेटावर घुसला. त्यानं आपला प्रवास व्हिडियोवर रेकॉर्ड केला आणि जाताना किनाऱ्यावर नारळ आणि सोडा कॅन सोडून आला. फॉलोअर्स मिळवण्यासाठी त्यानं हे केल्याचं सांगितलं जातंय. स्थानिक पोलिसांनी मिखाईलला अटक केली असून, तो या बेटावर कसा पोहोचला याचा तपास सुरू आहे.
संबंधित लेख वाचा: 1) …तर ग्रेट निकोबार बेटावर आदिम जमातींचे अस्तित्वही शिल्लक राहणार नाही…. |
सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी मिखाइल ‘सेंटिनलिज’ बेटावर घुसला
भारतीय माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार मिखाइलनं असं पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यानं असा प्रयत्न केला होता, पण हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखलं. मिखाईलनं जानेवारीतही असंच एक पाऊल उचललं होतं. बंदी असतानाही त्यानं अंदमानच्या जरावा जमातीचे व्हिडियो काढले होते. 
अंदमानच नाही तर अनेक आदिवासी भागांमध्ये अशा पद्धतीचं पर्यटन वाढत असल्याची खंत सध्या व्यक्त केली जातेय. अलीकडच्या काळात काही यूट्यूबर्सनी फॉलोअर्स मिळवण्यासाठी अशी 'अॅडव्हेंचर्स' – साहसं केली आहेत किंवा इथे येण्याचा मानस सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. असे इन्फ्लुएन्सर्स ही अंदमानमधल्या अतीअसुरक्षित जनजातींसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचं सर्व्हायवल इंटरनॅशनल या संस्थेचं म्हणणं आहे.
आता ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आदिम जमातींचे नवे जग उघडे
त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून ड्रोनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आधुनिक संस्कृतीपासून दूर असलेल्या आणि दुर्गम भागात एकाकी जीवन जगणाऱ्या आदिम जमातींचे नवे जग उघड झाले आहे. ॲमेझॉनचे घनदाट जंगल, भारतातील अंदमान व निकोबार बेटे यांसह जगातील अनेक जंगलांतील जगापासून दूर राहणाऱ्या आदिम जमातींची छायाचित्रे व चलचित्रे ड्रोनने टिपली आहेत.
ड्रोनद्वारे टिपलेल्या या आदिम समाजाविषयी… ड्रोनद्वारे टिपलेल्या आदिवासी जीवनाच्या छबीआधुनिक काळात संगणकीय क्रांती आणि प्रगत तंत्रज्ञान यांमुळे जग जवळ आले… जगातील सर्वच देश एकमेकांना जोडले गेले… अगदी दुर्गम भागांतही मानवस्पर्श झाला. जगभरातील कित्येक जंगलांतील आदिवासी जमातींशी संपर्क झाला आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या या जगात काही आदिवासी गट आधुनिक संस्कृतीपासून अस्पर्शित राहण्यात यशस्वी झाले. नुकत्याच हवाई फुटेज आणि ड्रोन प्रतिमांनी घनदाट वनराशीत लपलेल्या आदिम जमातींची जगाला ओळख झाली.
ड्रोन प्रतिमांनी या आदिवासी समाजाच्या एकाकी जीवनाचे क्षण टिपले आहेत. बेटाच्या हवाई फुटेजमध्ये सेंटिनेलीज लोक क्लिअरिंगमध्ये उभे असलेले, कुतूहल आणि सावधगिरीच्या मिश्रणाने ड्रोनकडे पाहत असल्याचे दिसून येते. स्थानिक साहित्यापासून बनवलेल्या पारंपरिक झोपड्या दिसतात. त्यांच्या जीवनातील साधेपणा आधुनिक जगाशी तीव्रपणे विरोधाभास करतो, ज्यामुळे प्रेक्षकांना अदृश्य होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जीवनशैलीचे दर्शन होते.
अंदमानच्या सेंटिनलिज समूहाची संख्या अवघी दोनशे वा त्यापेक्षा कमी असावी, असा कयास आहे. त्या बेटावर गेलेले कुणीही आजपर्यंत जिवंत परत आलेले नाही, हे वास्तव ठाऊक असूनही जॉन अॅलन चाऊ या अमेरिकी तरुणाने काही मासेमारांच्या साहाय्याने या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला. जगातल्या केवळ या भागात अजूनही देवाचे वचन पोहोचलेले नाही आणि अजूनही सैतानाचेच राज्य आहे, त्यामुळे या लोकांना परमेश्वरासंबंधी व धर्मासंबंधी सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा जॉन चाऊ याला विश्वास होता.
या बेटावर गेल्यानंतर सेंटिनलिज लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, ज्यातून जॉन बचावला. हल्ल्यानंतरही त्याने मागे न फिरता सेंटिनलिज लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्याने देवाची भजने आणि वचने म्हणून दाखवली. त्याच्या तिथे येण्याला पूर्णतः विरोध करून सेंटिनलिज जमातीने त्याला जिवे मारले आणि त्याचा मृतदेह तिथेच दफन केला.
जॉन चाऊच्या हत्येनंतर आणि आता मिखाईलच्या बेटावर घुसण्याच्या प्रयत्नावर माध्यमांनी या बातमीचे अनेक अंगांनी विश्लेषण केले. अनेकांनी या बेटावर कुणीही हस्तक्षेप करू नये, असे पुन्हा एकवार सांगितले, तर काहींनी या लोकांना मुख्य धारेत आणून त्यांचा विकास घडवावा असेही ‘उदारमतवादी’ वक्तव्य केले.
अंदमानची आणखी एक आदिम जमात… जारवा
चाकाचा आणि बंदुकीचा शोध लागण्याच्याही हजारो वर्षे अगोदर स्वअस्तित्वाची सहजप्रेरणा घेऊन आफ्रिकेतला माणूस जेव्हा जगभरातली भूमी पादाक्रांत करीत होता, त्या वेळी काही आदिमानव समूह भारताच्या अंदमान बेटापर्यंत येऊन पोहोचले आणि सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी प्राचीन भारतातल्या पहिल्या मानवी वस्त्यांपैकी एक वस्ती अंदमानात आकारास आली. 
मुळात, हा प्रदेश नैसर्गिक संपत्तीने नटलेला असल्याने या समूहाची प्रगती अश्मयुगीन प्रगतीच्या पलीकडे झालेली नाही. त्यानंतर या गटातल्या लोकसंख्येमध्ये काही हजार वर्षांनंतर उपप्रकार पडून त्यांचे पाच वेगवेगळ्या समूहात रुपांतरही झाले. या पाच समूहांपैकी एक समूह पूर्णतः नाश पावला. उरलेल्या चार समूहांची एकूण लोकसंख्या सहाशेपेक्षा कमी राहिली. ‘जारवा’ ही या चार उरलेल्या जमातींपैकी एक जमात. अंदमान बेटावर त्यांची संख्या चारशेच्या आसपास आहे.
भारताच्या मुख्य जमिनीपासून दूर बेटावर संसार मांडून हजारो वर्षे सुखात जगणाऱ्या या प्रजातीवर पहिले संकट आले, ते सतराव्या शतकात, डॅनिश लोकांनी अंदमानात पाऊल ठेवल्यानंतर. पुढे अंदमान येथे कारागृह बांधताना ब्रिटिश सरकारने आणि नाविकतळ उभारताना भारतीय नौदलाने त्यांना जंगली श्वापदांसारखी वागणूक दिली. जंगलाच्या अत्यंत दुर्गम प्रदेशात राहात असल्याने स्वातंत्र्यानंतरही अंदमानच्या या मूलनिवासी लोकांचा मुख्य भूभागातल्या लोकांशी फारसा संबंध आला नाही.
जारवा स्त्रियांशी बाहेरच्या जगातल्या पुरुषांचे शारीरिक संबंध
अंदमानच्या या आदिवासींच्या आयुष्यात मुख्य भूभागावरच्या लोकांची ढवळाढवळ १९७०मध्ये त्यांच्या वस्तीमधून मधोमध जाणारा महामार्ग बांधल्यानंतर वाढली. अगोदर कधी बाहेरच्या माणसाशी संपर्क न आल्याने, जारवा लोकांना पाहण्यासाठी मग पर्यटकांच्या रांगा लागू लागल्या. जारवांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्याकडे प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्यांकडे पाहावे, त्या कुतूहलाने लोक पाहू लागले. त्यांच्याकडे अन्नाची पाकिटे फेकली जाऊ लागली, त्यांच्या नग्न देहांचे फोटो काढले जाऊ लागले. हे इथेच थांबते तर ठीक; पण जारवांना बाहेरच्या लोकांनी दारू व गांजाचे व्यसन लावले.
अलीकडे तर लज्जेचे भान नसणाऱ्या निरागस नग्न जारवा स्त्रियांचे नाचताना व्हिडिओ बनविले गेले. त्यांच्या स्त्रियांशी बाहेरच्या जगातल्या पुरुषांचे शारीरिक संबंध होऊ लागले. अशा शारीरिक संबंधातूनच जारवा स्त्रियांना अपत्ये होऊ लागली. जारवांच्या मूळ रूपांपेक्षा वेगळी दिसणारी ही मुले अर्थातच जारवांच्या पारंपरिक नियमात बसत नसल्याने त्यांची हा समूह परंपरेनुसार हत्या करतो. प्रथमदर्शनी ही कृती अमानुष अशीच वाटते, पण नीट खोलात जाऊन विचार केल्यानंतर हा गुंता निर्माण करण्यासाठी पूर्णतः बाह्य हस्तक्षेप कारणीभूत आहे, हे वास्तवही नाकारता येणार नाही.
बाहेरच्या पुरुषाशी झालेल्या शरीरसंबंधातून जन्माला आलेल्या बाळाच्या हत्या
स्वयंपूर्ण जीवनपद्धती आणि आपल्या जंगलापलीकडे असणाऱ्या अवाढव्य जगाबद्दल काहीही माहिती नसणाऱ्या जारवांना पैसा वा देश आणि त्याचा कायदा याचे काहीही आकलन नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीवर भारतीय कायदा लादणे नैसर्गिकरीत्या अशक्य आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या एका बातमीनुसार, नागरी वस्तीतल्या पुरुषाशी झालेल्या शरीरसंबंधातून जन्माला आलेल्या चार महिन्याच्या एका बाळाच्या हत्येनंतर जारवांच्या नागरिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. इतक्या लहानग्या बाळाच्या हत्येचे कुठल्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा हत्येकरिता जारवांना कडक शासन केले गेले पाहिजे, असा नेहमीचा ‘सोशल मीडिया’ तर्क येथे कुणीही सहज लावील. पण या गुन्ह्याकरिता जारवांच्या पूर्ण समूहालाच अटक करावी लागेल आणि त्यांना नेमके का अटक केले गेलेय, याचे स्पष्टीकरणही द्यावे लागेल.
जारवांची भूमी ही कुठल्याशा देशाचा अविभाज्य घटक असून त्या देशाला स्वतःचा असा एक विस्तृत कायदा आहे. या देशाच्या कायद्यानुसार जारवांनी केलेली हत्या हा गुन्हा ठरतो, हे जारवांना प्रचलित व्याख्या आणि देश संकल्पनेतून समजावून सांगावे लागेल. गुंतागुंतीच्या या प्रक्रियेत मग सुरू होते ती जगभरातले आदिवासी आणि त्यांच्यावर अतिक्रमण करणाऱ्या प्रगत समाजाच्या परस्परसंबधातली अतिप्राचीन समस्या.
आदिवासींच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावरच गदा
जगाच्या इतिहासात जिथे कुठे म्हणून अप्रवासी लोक क्षेत्रविस्ताराच्या कारणाने नव्या भूप्रदेशातील आदिवासींच्या संपर्कात आले, तिथे तिथे त्यांनी आदिवासींच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावरच गदा आली. यात एरवी स्वातंत्र्याचे गोडवे गाणारी अमेरिका, समतेच्या पुरस्काराची वल्गना करणारे जमिनीवरचे धर्म आणि पैशांच्या नशेला हपापलेले भांडवलवदार सर्वात पुढे येतात.
अमानुष वा जंगली म्हणून आदिवासींच्या हत्या करणे, त्यांच्या जमिनी बळकावून त्यांना गुलाम करणे, त्यांच्या मूळ संस्कृतीचे विसर्जन करून त्यांच्यावर आपला धर्म लादणे, त्यांच्या प्राकृतिक आवासांना नष्ट करून तिथे कंपन्या, पाम तेलाची झाडी, खाणी आणि टुरिस्ट स्पॉट्स विकसित करणे आणि संकल्पना राबवून जगातल्या आधुनिक मानवाचे हात अशा शेकडो संस्कृतींच्या हत्येमुळे रक्ताने माखलेले आहेत. जगातले जवळजवळ सगळे भूभाग आधुनिक अर्थव्यवस्थेचे पाईक बनल्यानंतर, या मुख्य धारेपासून अजूनही दूर स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या आदिवासींची संख्या आता काही लाखांवर आलेली आहे. सेंटिनलिज, जारवा त्या अत्यल्प लोकसंख्येचाही अत्यल्प भाग आहेत, त्यांना समाजाच्या "मुख्य धारेत' आणण्याचा जुनाच मतप्रवाह येथेही लागू पडू शकतो.
मात्र जगाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता ही प्रक्रिया कितपत न्यायाने होईल, यावर शंका घेण्यास बराचसा वाव आहे. मुळात, हजारो वर्षे मुख्य समाजापासून दूर राहिल्याने आदिवासींची रोगप्रतिकारक शक्ती ही मुख्य जमिनीवरच्या लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीपेक्षा कितीतरी क्षीण असते. यामुळे जेव्हा म्हणून आदिवासींचे पुनर्वसन केले जाते, त्या वेळी त्यांना विविध रोगांची लागण होऊन कित्येकदा त्यांचा पूर्ण समूह नष्ट झाल्याची उदाहरणे आहेत. बाह्यजगातल्या लोकांशी संपर्कात येऊन जारवा लोकही गोवर आणि कांजण्यांसारख्या रोगांना बळी पडत आहेत.
कशासाठी मुख्य प्रवाहात आणायचं…?
अशा वेळी शिकारी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर हजारो वर्षे टिकून राहिलेल्या या स्वयंपूर्ण लोकांना आधुनिक अर्थव्यवस्थेत आणून त्यांचे जीवन सुखमय करण्याचे स्वप्न कुठल्याही सरकारला पडू शकते. सुखाची आणि विकासाची सर्वमान्य व्याख्या सरकारला जारवांच्या संदर्भातही लागू करावीशी वाटू शकते. मुळात सुखाची मुख्य धारेतली व्याख्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेने गरीब माणसाला कितपत सुखी केले आहे, याचा शोध घेतला, तर हाती येणारी उत्तरे मन विदिर्ण करणारी आहेत. वेगाने नष्ट होत चाललेली जंगले आणि शेतीच्या वाढत्या औद्योगिकरणाने आता कुठेही स्वयंपूर्णता उरलेली नाही.
कित्येक जातींचे पारंपरिक व्यवसाय पूर्णतः बंद झालेले आहेत. या जातींमध्ये जन्माला येणाऱ्या लोकांना शहरीकरणाने तयार केलेल्या कनिष्ठ आणि कष्टाच्या रोजगार संधीशिवाय दुसरे कुठले मार्ग नाहीत. जागतिकीकरणात संस्कृतीची पाळेमुळेच उखडली गेल्यामुळे या संस्कृतीवर अवलंबून असणाऱ्या लोककलेतल्या जातींवर भीक मागण्याची पाळी आली आहे. राखीव जागांमुळे उपलब्ध असणाऱ्या संधी आणि एकूण बेरोजगारांची संख्या यांचा अनुपात पाहता प्रत्येक जातीला १००% आरक्षण देऊनही बेरोजगारीची समस्या सोडविता येणार नाही, अशी परिस्थिती आज देशात आहे.
या भयानक परिस्थितीशी पूर्णतः अनभिज्ञ राहून स्वत:च्या जंगलात सुखनैव जगणाऱ्या सेंटिनलिज, जारवांना देण्यासाठी मुख्य भूमीवरच्या भारताकडे काहीही नाही. शहरीकरण आणि चंगळवादात कुठलीही मूलभूत संधी न देता आणखी चारशे जिवांना आपण सहभागी करून घ्यावे का? हा गंभीर प्रश्न येथे उपस्थित होतो आहे. एकीकडे हजारो वर्षांनंतर अजूनही अश्मयुगीन अंधारातूनही बाहेर न पडू शकलेल्या या आदिवासींना नव्या युगातील मानवाने केलेल्या प्रगतीचा उपभोग घेण्याची संधी उपलब्ध आहे, तर त्यांच्या जैविक मर्यादा आणि अत्यल्प लोकसंख्या पाहता त्यांचे मुख्य धारेत येऊन टिकून राहणे कितपत शक्य होईल, यावर साशंकताही आहे. याशिवाय मुख्य धारेत येण्यासंबंधी जारवांचे स्वतःचे मत काय आहे, यासंबंधी आपल्याला काहीही माहिती नाही.
यानंतरही सेंटिनलिज, जारवांना आपल्याशी संपर्क करायचाच असेल, तर त्याबद्दल आपण त्यांना आडकाठीही करू नये, इतपत जाणीव आपण ठेवायला हवी. सेंटिनलिज, जारवांच्या आयुष्यात बाह्यजगातल्या लोकांचा हस्तक्षेप रोखणे आणि अंदमानचे बाह्यभागातून संरक्षण करणे, ही कामे भारत सरकार बरीच वर्षे व्यवस्थित करीत असले, तरी त्यांची लोकसंख्या आणि परंपरा लक्षात घेता कुठल्याही नाजूक क्षणी ही जमात संकटात येऊ शकते. त्यामुळे शक्य त्या उपाययोजना करून या जमातींचे पूर्ण संरक्षण करणे, हे भारत सरकारचे कर्तव्य आहे.
निरनिराळ्या मुखांमधून ऐकू आलेल्या निरनिराळ्या इतिहासाच्या पलीकडे, सेंटिनलिज, जारवा हे आपल्या सर्वांत प्राचीन पूर्वजांपैकी एक आहेत, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. या पूर्वजांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करणे ही आपली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. सद्य:स्थितीत ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सेंटिनलिज, जारवांच्या आयुष्यात कसलाही संपर्क वा हस्तक्षेप न करणे, हा एकच मार्ग आपल्याजवळ उपलब्ध आहे.
(संदर्भ - राहुल बनसोडे, निवडक लेखसंग्रह)






