- अप्सरा आगा
देवाची आळंदी… संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या स्पर्शाने पवित्र झालेली आळंदी… विठूनामाचा गल्लोगल्ली गजर सुरू असणारी आळंदी… याच आळंदीमध्ये गुरुकुलात राहून वारकरी संप्रदाय, परंपरेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षणासोबतच गुरुकडून कीर्तन, भजन, गायन यासह टाळ, पखवाज, मृदंग, वीणा आणि हार्मोनियम आदी वाद्य वादनाची कला आत्मसात करतात. यातून एक सशक्त संस्कारी पिढी घडण्यासह अनेक उत्तम कीर्तनकार, गायक, वादकही तयार होत आहेत आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय वाढण्यास मदत होत आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 1917 साली आळंदी येथे उभारली गेली होती. महाराष्ट्र धर्माचे अनौपचारिक विद्यापीठ त्या संस्थेच्या द्वारे निर्माण झाले. त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते गुरुवर्य जोग महाराज! त्यांचेच प्रयत्न त्या पीठाच्या स्थापनेमागे होते. यातूनच प्रेरणा घेत आजमितीस आळंदीमध्ये सुमारे 250-300 गुरुकुल आणि वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 5 हजार विद्यार्थी वसतिगृहात राहून वारकरी संप्रदायाचे पाठ गिरवत आहेत.
मात्र याच वारकरी शिक्षण संस्थांच्या श्रुंखलेत आळंदीत अनेक अनधिकृत संस्थाचा सुळसुळाट वाढला असून अशा अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थेमुळे सध्या आळंदीचे वातावरण तापले आहे. समस्त आळंदीवासीय या अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरले असून त्याला कारण आहे खासगी वारकरी शिक्षण संस्थांमधील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना.
आळंदीत त्या दिवशी नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी तर याच आळंदीत एक अतिशय धक्कादायक आणि लाज आणणारी घटना घडली. आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत एका तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका कीर्तनकार महिला सहभागी असल्याचे समोर आले असून, पीडितेने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
2 जून 2025 रोजी पीडिता घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. त्याचवेळी वाटेत काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिने आरडाओरड केली असता अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली.
नंतर तिला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
या सर्व प्रकारानंतर पीडितेने स्वतःला सावरत हुशारीने 112 या क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत घटनास्थळ गाठले आणि संबंधित व्यक्तींना अटक करून आळंदी पोलिस ठाण्यात आणले.सुरुवातीला पीडित तरुणी खूप घाबरली असल्यामुळे तिने तक्रार दिली नव्हती. परंतु, 7 जुलै रोजी तिने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
संबंधित लेख वाचा: 1) 24/7... 365 दिवस सुरू असणारा; पळून जाऊन लग्न करण्याचा आळंदी पॅटर्न! |
आळंदीत वारकरी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना
आळंदीचे पावित्र्य ओळखून अध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाचीही सुरुवात खासगी वारकरी शिक्षण संस्थांनी सुरू केली. अध्यात्मिक आणि शालेय शिक्षण एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे मुलांना याठिकाणी शिक्षणासाठी पाठविण्याची संख्याही वाढू लागली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत असलेल्या खासगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.
या खासगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 200 विद्यार्थी असतात. विशेषतः मुले आणि मुली काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामुळे तिथे शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आर्थिक शोषणाबरोबर लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी एकमुखानी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या असा ठराव काही महिन् यांपूर्वी मंजूर करून घेतला होता.
मागील काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यावर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केलेली आहे. या प्रकरणातील संबंधितांना शिक्षा झाली आहे, तर काही जण शिक्षा भोगत आहेत. परंतु अशा प्रकारावर आळा बसेल असे आळंदीकरांना वाटत होते. परंतु अशा घटना वारंवार घडतच आहेत. काही प्रकार उघडकीस येतात, तर काही प्रकार उघडकीस येत नाही. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीचे नाव खराब होत आहे.
आळंदीमध्ये अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था का वाढल्या?
आळंदी गावची लोकसंख्या पूर्वी चार-पाच हजार होती. आता ती जवळपास चाळीस हजारावर गेली आहे. आळंदी गावाचं रूपांतर शहरात झालं. दररोज दर्शनासाठी, व्यवसायासाठी, आळंदीमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आळंदी ही देवाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे याठिकाणी वारकरी शिक्षण संस्थांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातून अध्यात्मिक आणि शालेय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी याठिकाणी येतात. त्यांना घडविण्याचा काम अनेक संस्था करतात. या संस्थांचं धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी असते. बरीच मूलं वसतिगृहात राहून शिक्षण घेतात. पण अनेक संस्था अनधिकृत असल्याचे ग्रामस्थ म्हणत आहेत.
सध्या आळंदीमध्ये अधिकृत नसलेल्या वारकरी शाळांची संख्या वाढू लागली आहे. कोणीतरी महाराज येतोय आळंदीमध्ये दोन गुंठे जागा विकत घेतो, तिथे चार-पाच खोल्या बांधतात. तिथेच शिक्षणाचं काम चालू होतं. त्या पण अधिकृत असतात की नसतात, हे कोणी बघत नाही. अशा परिस्थितीत काही महाराजमंडळी वारकरी शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण मिळेल, अशा पद्धतीचा प्रचार-प्रसार करतात. अशाप्रकारे मुलं जमवायची, 35 हजार रुपये वर्षाची फी घ्यायची. पालकही मुलांना वारकरी शिक्षणाबरोबर शालेय मिळतंय म्हणून आळंदीत पाठवतात.
‘’अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरुपी बंद करा’’
आळंदी येथील नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगतात, ‘‘महानगरपालिकेच्या नियमानुसार दहा बाय दहाच्या खोलीमध्ये किती मूल असावेत, हे ठरलेलं असतं. पण सध्या इथे एक खोलीमध्ये 10, 15 मूल अक्षरशः कोंबलेली असतात. त्यांची राहण्याची व्यवस्था, स्वछतागृहाची व्यवस्था अपुरी असते. अशा स्थितीत मुलं शिक्षण घेत असताना त्यांना त्या सुख-सुविधा दिल्या पाहिजेत. त्या संस्थेकडून पुरवल्या जात नाही. नुकताच घडलेला जो प्रकार, तो उघडकीस आला म्हणून समजला. याच्या अगोदरही किती प्रकार उघडकीस आले असतील. महाराजांनी आपल्या शाळेत मुलांना शिकवायचं, घडवण्याचं काम करायचं.
ज्या संस्थेत प्रकार घडला, तिथल्या महाराजांचा पाहुणा, नातेवाईक म्हणून आला. धर्मशाळेत राहिला. त्याच्याकडून हे कृत्य घडलं. धर्मशाळेत आणायच्या अगोदर त्याच वर्तन, वागणूक कशी आहे, वसतिगृहात ठेवायचं की नाही. या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे होते. त्याच्या या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. यापूर्वी सुद्धा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डनुसार जवळपास 16 गुन्हे घडले आहेत. अशा गोष्टीमुळे आळंदीच नाव खराब होतंय. हे प्रकार थांबविण्यासाठी तरुणपिढी पुढे आली आहे. यापुढे असे काही प्रकार घडलेलं दिसलं, तर त्यासंबंधित शाळेवर कायमचा पायबंद घालायचा, असं ठरवलं आहे.
लहान-लहान मुलं इथे शिकायला येतात. ज्या मुलांचं वय 15 वर्षाच्या पुढे असेल, त्यांनाच शाळांमध्ये परवानगी द्यावी. आम्ही सर्वजण पालकांनाही याबाबतीत जागरूक करणार आहोत. पालकांनी मुलांना ज्या ठिकाणी पाठवतात, त्या ठिकाणाची पाहणी करावी. वेळच्यावेळी जाऊन संस्थेला भेट द्यावी.
त्यामुळे अशा गोष्टींना कुठेतरी आळा बसेल. मुलांची सुरक्षितता महत्वाची आहे. अशाप्रकारच्या घटना घडू नये, म्हणून आम्ही त्या बंद करणार नाही. मुलांच्या परीक्षा तोडांवर आहेत. त्या झाल्यावर ज्या संस्थेला धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी बघणार. परवानगी नसेल, तर कायदेशीर पद्धतीने पुढची प्रक्रिया करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी घेतली आहे.
‘’देवाची आळंदी बदनाम होतेय…’’
आळंदीचे स्थानिक रहिवासी प्रदीप बावळे सांगतात, ‘‘आळंदीसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये वारंवार महाराजांकडून अत्याचाराच्या घटना घडतात. याबाबतीत आम्ही एक आळंदीचा नागरिक म्हणून प्रकरणाचा निषेध करतो. आळंदीत संप्रदायक पार्श्वभूमी असल्यामुळे एखाद्या दोन चुकीच्या माणसांमुळे संपूर्ण संप्रदायाला बदनाम न करता, या वृत्तीची जी लोक आहेत, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात अशाप्रकारचं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही आणि संप्रदायाची परंपरा चांगल्या प्रकारे जोपासली गेली पाहिजे. ज्या काही संस्था आहेत, त्याच व्यवस्थित ऑडिट करून त्यांना नियमावलीत संस्थांना बसवल्या पाहिजेत. ज्ञानदानाचं काम योग्य प्रकारे झालं पाहिजे. अशापद्धतीने अनुचित प्रकार घडेल, अशी संधीच मिळता कामा नये.’’
आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू
आळंदी परिसरातील वारकरी वसतीगृहांमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाबाबत अनेक तक्रारी आल्यामुळे याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची फेब्रुवारी महिन्यात तपासणी सुरू केली होती. याप्रकरणी अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या आहेत. यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे.
ज्या वारकरी शिक्षण संस्थांनी नोंद धर्मादाय आयुक्तांकडे नाही , महिला व बालविकास विभागाकडे नोंद नाही अशा सर्व तसेच नोंद असूनही नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थावर दोन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.






