विठ्ठल साबळे
नाशिकच्या तपोवनात साधुग्रामसाठी झाडतोडीचा सुरू असलेला वाद आता शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही. श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक आयोजनाच्या नावाखाली होणारी ही हिरवाईची कत्तल आता राजकीय, सामाजिक आणि पर्यावरणीय लढाईत रूपांतरित होत आहे. शेकडो वर्षांचे वृक्ष आणि शहराची ओळख असलेले तपोवन आता मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहे.
झाडतोडीचा प्रस्ताव आणि महापालिकेची भूमिका
नाशिक महानगरपालिकेने साधुग्राम विस्तारासाठी तब्बल 54 एकर जागा मोकळी करण्याचा प्रस्ताव मांडला. या जागेत सुमारे 3500 झाडे असून त्यापैकी 1700 पेक्षा जास्त झाडे तोडण्याची योजना समोर आली. महापालिकेनुसार मुख्यतः बाभूळ आणि इतर स्थानिक प्रजातींची झाडे काढली जाणार असून वड, पिंपळ, उंबरसारखी मोठी झाडे वाचवण्याचा प्रयत्न होईल असा दावा करण्यात आला आहे.
या आराखड्यावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या. चिपको आंदोलनाला अनुसरून अनेक नागरिक झाडांना मिठी मारून थेट प्रतिकार करीत उभे राहिले. या तणावामुळे महापालिकेला ले आउट बदलावा लागला आणि सुमारे 500 ते 800 झाडे वाचवण्याची घोषणा करावी लागली.
सरकारचे आश्वासन आणि नागरिकांचा प्रश्न कायम
झाडतोडीवर वाढती टीका पाहता मंत्री गिरीश महाजन पुढे आले आणि एका झाडामागे 10 रोपे लावण्याचे आश्वासन दिले. शहरात 15000 पेक्षा जास्त खड्डे खोदून रोपलागवड सुरू केल्याचेही सांगण्यात आले. सरकारचा दावा स्पष्ट होता की साधुग्राम उभारण्यासाठी काही झाडे काढावी लागतील आणि रोपलागवड ही त्याची भरपाई आहे.
याचवेळी गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका घेतली
झाडे तोडणे हा आमचा हेतू नाही, पण साधुग्रामच्या व्यवस्थेसाठी काही बदल करावे लागतात. लाखो भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे.
त्यांनी पुढे असेही म्हटले
एका झाडाच्या बदल्यात दहा रोपे लावू, पंधरा हजारांहून अधिक खड्डे आम्ही तयार केले आहेत. मोठ्या झाडांना हात लावणार नाही, वड पिंपळ उंबर अशी झाडे वाचवण्यासाठी ले आऊटच बदलला आहे.
मात्र लोकांचा मूलभूत प्रश्न अजूनही तसाच आहे. झाडे दुसरीकडे का लावताय. कुंभमेळा दोन वर्षांचा कार्यक्रम आहे तर साधुग्राम संपल्यानंतर तपोवनातच ही झाडे का लावू शकत नाही. तपोवनची जमीन मूळतः वनश्रीमंतीची आहे ,तर मग ती कायम मोकळी ठेवण्याचा हट्ट नेमका कशासाठी.
सयाजी शिंदे मैदानात उतरले आणि लढाईचा रंग बदलला
या वादात सर्वात मोठा राजकीय धक्का बसला तो अभिनेता आणि एनसीपीच्या अजित पवार गटातील नेता सयाजी शिंदे मैदानात उतरले तेव्हा. त्यांनी झाडांच्या शेजारी उभे राहून सरकारवर थेट टीका केली. साधू आले गेले तरी फरक नाही, पण झाडे गेली तर नाशिकची ओळख जाते हे त्यांनी निर्भयपणे सांगितले.
सत्ताधारी आघाडीत असलेल्या पक्षाचे नेतृत्व करीत असतानाही त्यांनी गिरीश महाजनांना थेट उद्देशून भूमिका घेतली. गिरीश महाजन यांच्याशी माझं काही वैर नाही, असलं तरी मला फरक पडत नाही, झाडांसाठी उभा राहणारच अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली. त्यामुळे संपूर्ण आंदोलनाला नवी दिशा मिळाली आणि तपोवनचा वाद राज्याच्या राजकीय मध्यभागी पोहोचला.
या पार्श्वभूमीवर महाजन यांनी सयाजी शिंदेंबाबतही प्रतिक्रिया दिली
सयाजी शिंदे यांचा विरोध हा त्यांचा अधिकार आहे. भावना आम्ही समजतो, पण भावना आणि वास्तव यांचा समतोल साधावा लागतो.
साधुग्राम की उद्योगग्राम, तपोवनावर लपलेला अजेंडा
तपोवनाभोवतीचा सर्वात गंभीर प्रश्न उघड झाला तो माईस हब आणि एक्झिबिशन सेंटरच्या निविदांमुळे. साधुग्रामची जागा नंतर कायमस्वरूपी भूसंपादन करून कॉर्पोरेट प्रकल्पांसाठी वापरण्याचा डाव असल्याचा आरोप केल्यानंतर नागरिकांचा संशय आणखी गडद झाला.
महापालिकेने 220 कोटी रुपयांच्या एक्झिबिशन सेंटरसाठी जागा राखून ठेवली, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर निविदा काढल्या आणि या प्रदेशासाठी 95 एकर जमीन मागवली. साधूदरबाराच्या नावाखाली तपोवनाची जमीन उद्योगपतींसाठी तयार केली जात आहे असा आरोप आता मोठ्या प्रमाणावर होत आहे.
शेतकऱ्यांचा आवाज आणि जमिनीवरील हक्क
तपोवन परिसरातील अनेक शेतकरी आणि जमीनमालकांच्या अडचणी वेगळ्या आहेत. साधुग्रामसाठी आरक्षित जमिनीवर शेतकऱ्यांचा पारंपरिक हक्क असून, ही जमीन कायमस्वरूपी संपादित करू नये असा त्यांचा आग्रह आहे. जमिनी भाडे तत्त्वावर घ्याव्यात असा त्यांचा ठाम पवित्रा आहे.
यामुळे तपोवनाचा प्रश्न फक्त झाडे वाचवा एवढा राहिलेला नाही, तर जमिनीचा हक्क, स्थानिकांची भूमिका आणि प्रशासनाची पारदर्शकता यावरही आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
समाज एकवटला तर झाडतोड थांबू शकते, इतिहास साक्षीदार
तपोवनातील लढाईचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे यामध्ये समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला आहे. आणि जेव्हा समाज एकवटतो तेव्हा झाडतोड थांबते याची देशभरात अनेक उदाहरणे आहेत.
बेंगळुरूमध्ये बिल्डर प्रकल्पासाठी 35000 झाडे वाचवण्यात आली, मुंबईतील आरे कारशेडमध्ये आंदोलनानंतर निर्णय मागे घेण्यात आला, पुण्यात सातारा रस्त्यावरील शेकडो झाडांची कत्तल नागरिकांनी अडवली. या उदाहरणांमुळे नाशिककरांच्या मनात आशा निर्माण झाली आहे की संघर्ष व्यापक झाला तर तपोवनही वाचू शकते.
तपोवनानंतरची जमीन कोणासाठी, हा मोठा आणि अनुत्तरित प्रश्न
सरकार म्हणते साधुग्राम तात्पुरता आहे, झाडे काढून रोपे लावू. पण जेव्हा कुंभमेळा संपेल तेव्हा तपोवनाची मोकळी जमीन कोणासाठी. हे प्रशासनाकडून स्पष्ट बोलले जात नाही.
झाडे तोडणे आवश्यक आहे हे सरकारचे म्हणणे असले तरी त्यांची जागा कायमस्वरूपी मोकळी ठेवण्याचे धोरण कोणी उघड करत नाही. एक्झिबिशन सेंटरच्या निविदा, उद्योगपतींच्या बैठकांच्या चर्चा आणि आराखडे पाहिले तर तपोवन पुढील काळात व्यापारी केंद्रात रूपांतरित करण्याचा काहीतरी गुप्त आराखडा असावा असा लोकांचा संशय अधिकच वाढतो आहे.
जर साधुग्राम तात्पुरता असेल तर झाडेही तात्पुरती काढली पाहिजेत आणि नंतर त्या जागीच पुन्हा उभारली पाहिजेत. पण अशी स्पष्ट भूमिका सरकारकडून घेण्यात आलेली नाही, म्हणूनच हा प्रश्न अधिकच टोकदार होत आहे.
परंपरा की पर्यावरण, नाशिकचा उंबरठा
कुंभमेळा हा नाशिकचा अभिमान आहे. लाखो साधू, भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे शहराची अर्थव्यवस्था फुलते. पण तपोवन म्हणजे नाशिकचा श्वास आहे. नदीकाठचा जंगलाचा पट्टा हा शहराचा आत्मा आहे.
या हिरवाईने अनेक कुंभमेळे पाहिले, अनेक साधूंना सावली दिली आणि निसर्गाला संतुलन दिले. आता त्याच झाडांची मुळे उखडली जात आहेत. सयाजी शिंदे, राज ठाकरे, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी आणि शेकडो नाशिककर एकत्र येऊन एकच संदेश देत आहेत की तपोवनाची हिरवाई व्यवहाराची भाषा मानू नका.
साधू येतात आणि जातात, पण झाडे गेली तर शहराचा भविष्यकाळ उध्वस्त होईल. तपोवन वाचवण्याची ही लढाई आता संपणार नाही आणि या लढाईत नाशिककर एकटे पडणार नाहीत हेच आता स्पष्ट दिसत आहे.






