- टीम बाईमाणूस
पत्रकारिता हे स्त्रियांसाठी नेहमीच आव्हानात्मक क्षेत्र. तरीही महाराष्ट्रात क्षेत्रात महिलांची उपस्थिती आणि प्रभाव दोन्ही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय महिला पत्रकार संमेलनात विविध अनुभवी पत्रकारांनी आपापले अनुभव, आव्हाने आणि उपाय स्पष्टपणे मांडले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून आणि एमजीएम युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड मीडिया यांच्या नॉलेज पार्टनरशिपखाली हे संमेलन पार पडले. राज्यभरातून शेकडो महिला पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.
“पत्रकार म्हणजे फक्त पत्रकार” - सुप्रिया सुळे
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकारांना ‘महिला पत्रकार’ या चौकटीतून बाहेर पडून “मी पत्रकार आहे” ही ओळख स्वीकारण्याचे आवाहन केले. पत्रकारिता क्षेत्रात महिलांची वाढती उपस्थिती स्वागतार्ह असली तरी सुरक्षित आणि सक्षम वातावरण देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. विशेषतः विशाखा समित्या अधिक सक्षम आणि सक्रिय करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळवणुकीपासून महिला पत्रकारांचे संरक्षण, तक्रारींची तातडीने दखल आणि न्याय्य मार्गदर्शन या सर्व गोष्टी अत्यावश्यक असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कल्पना शर्मा, डॉ. रेखा शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक महिला पत्रकार सहभागी झाल्या. राही भिडे यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगताना, पत्रकारितेत असलेल्या अडचणींचा विचार न करता काम करण्याची मनोवृत्ती स्त्री पत्रकारांनी जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारितेचा कमी होत चाललेला प्रभाव - कल्पना शर्मा
ज्येष्ठ पत्रकार कल्पना शर्मा यांनी भारतीय माध्यमांची सद्यस्थिती अत्यंत स्पष्ट शब्दांत उलगडली. परदेशात माध्यमे प्रभावशाली सरकारे, उद्योगसमूह यांच्यावर निर्भीड स्टिंग ऑपरेशन्स करतात; घोटाळ्यांचे पर्दाफाश करतात. मात्र भारतात संशोधक पत्रकारिता हवी तिथे पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, “सत्तेच्या मूळ केंद्राला प्रश्न विचारणाऱ्या कथा आपल्या माध्यमात दिसत का नाहीत? परदेशी माध्यमाने उद्योगपतीवर खुलासा केला; पण आपल्या पत्रकारांनी मौन का बाळगले?” कुपोषण, दारिद्र्य, आदिवासी समस्या, झोपडपट्ट्यांची स्थिती अशा मूलभूत प्रश्नांना मुख्य पानावर स्थान मिळत नाही, कारण ते ‘विकत नाहीत’, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
विविध सत्रांत अनेक अनुभवी पत्रकारांनी आपापले प्रत्यक्ष अनुभव सांगितले. प्राची कुलकर्णी यांनी रिपोर्टिंगदरम्यान ताण, वेळेचे दडपण आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या यांचा समतोल साधताना महिलांना भेडसावणाऱ्या मानसिक तणावाचा उल्लेख केला. महिलांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सामंजस्य राखणे ही मोठी कसरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिरीन दळवी यांनी पत्रकारिता करताना मिळालेल्या धमक्यांचा सामना कसा केला आणि दीर्घ ब्रेकनंतर पुन्हा या क्षेत्रात कशी परतली, याचा प्रवास अतिशय प्रभावीपणे मांडला. त्यांच्या अनुभवाने अनेकांना प्रेरणा मिळाली.
पत्रकारितेत वरिष्ठ पदांवर महिलांची उणीव..
‘मराठी पत्रकारितेत वरिष्ठ पदांवर महिला अजूनही मर्यादित’ या सत्रात मृणालिनी नानिवडेकर, अरुंधती रानडे, जान्हवी पाटील आणि मानसी फडके यांनी चर्चा केली. तानूबाई बिर्जे यांसारख्या प्रारंभीच्या महिला संपादकांपासून आजपर्यंतच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला. आजही निर्णयप्रक्रियेत, संपादकीय नेतृत्वात, बजेट नियंत्रणात महिलांचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले.
पत्रकारितेत एआयचे आगमन : संधी की धोका?
विदुला टोकेकर आणि मुक्ता चैतन्य यांनी ‘पत्रकारितेत एआयचा वापर आणि सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. विदुला टोकेकर यांनी एआयचे फायदे आणि धोके दोन्ही स्पष्ट केले त्या म्हणाल्या, “एआय जितकं उपयुक्त आहे, तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. जर वापरकर्त्याने आत्महत्येबाबत विचारलं, तर एआय त्याला पद्धतीही सांगू शकतं. त्यामुळे वापरकर्त्याची जबाबदारी आणि तंत्रज्ञान नियमांची गरज मोठी आहे.”
पत्रकारितेत माहिती पडताळणी, डेटा अॅनालिसिस यासाठी एआय उपयुक्त असले तरी चुकीची माहिती, डीपफेक्स, सुरक्षिततेचे प्रश्न यामुळे सतर्कता महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
स्वच्छतागृहे, हिंसाचार, खोटे गुन्हे…
प्रीती सोमपूरा यांनी सांगितले की, एका रिपोर्टसाठी आर्मी कॅम्पमध्ये गेल्यावर महिलांसाठी शौचालयच नव्हते. पुरुषांच्या शौचालयात जावे लागले. आजही गावांमध्ये, घटना स्थळी, आपत्कालीन परिस्थितीत स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीरच आहे. स्वाती नाईक यांनी हिंसक प्रसंगात रिपोर्टिंग करताना स्वतःचे रक्षण कसे केले, जमावाचा रोष, धमक्या, ढकलाढकली यांचा कसा सामना केला, हे सांगितले.
मोहिनी जाधव आणि सुकेशनी नाईकवाडे या दोघींनी त्यांच्या विरोधात चुकीच्या हेतूने गुन्हे दाखल करण्यात आलेल्या घटनांचा वेध घेतला आणि अशा परिस्थितीत पत्रकारांनी कायदेशीर तसेच मानसिक तयारी ठेवण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यस्थळी सुरक्षितता आणि कायदेशीर मदत..
महिला पत्रकारांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर अनघा सरपोतदार यांनी विशाखा समित्यांची रचना, कायदे, तक्रार प्रक्रिया याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. लता व्यंकटेश यांनी आर्थिक पत्रकारितेतील अडचणी आणि न्यूज रूममधील तणावाची चर्चा केली. कार्यक्रमाच्या शेवटी आरती कदम यांनी दिवसभराचा सारांश मांडला, तर डॉ. रेखा शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन साधना तिजोत्पन्ना आणि यशश्री मुळे यांनी केले.
महिला पत्रकारितेला अधिक बळ देण्याची सामूहिक गरज..
या भव्य संमेलनातून स्पष्ट झाले की महिला पत्रकारिता आज नवे आयाम गाठत आहे, परंतु मैदानातील वास्तव अजूनही कठोर आहे. सुरक्षित कार्यस्थळ, वरिष्ठ पदांवरील सहभाग, प्रत्यक्ष रिपोर्टिंगची सुविधा, एआयचे नियमन, मानसिक आरोग्य या सर्व बाबींमध्ये एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील महिला पत्रकारांचे हे संमेलन केवळ अनुभवांची देवाणघेवाण नव्हती; तर महिला पत्रकारितेला अधिक सक्षम आणि संवेदनशील बनवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.






