डॉ बाबा आढाव हे महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरातील सामाजिक कार्याचे एक प्रेरणा स्त्रोत आहेत. ते कामगार चळवळीचे आधारस्तंभ आणि उपेक्षित कष्टकरी वर्गाचे आधारवड आहेत. गेली सात दशके देशातील 45 कोटी असंघटित कष्टकरी वर्गासाठी त्यांनी अहोरात्र संघर्ष केला आहे, त्यांनी आपले सारे आयुष्य असंघटित वर्गातील हमाल माथाडी, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, टेम्पो चालक, मातेरी गोळा करणारे महिला, कागद काच पत्रा गोळा करणाऱ्या महिला, धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी अशा सर्व ‘नाही रे’ घटकासाठी अर्पण केले आहे.
कष्टकरी वर्गास केवळ आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी त्यांचे संघटन नव्हते तर त्यांच्या घामाला कष्टाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी यावर त्यांचा जास्त भर होता. त्यामुळे जिथे जिथे शोषण आहे, विषमता आहे, जातिभेद आहे त्या त्या ठिकाणी बाबा आढाव आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचले आहेत. डॉ. बाबा आढाव येत्या 1 जून रोजी वयाची 95 वर्षे पूर्ण करून 96 वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने या सात दशकांचा चळवळीचा प्रवास टिपून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून करीत आहोत…
ऍड . शारदा वाडेकर : आपण डॉक्टरकीची पदवी 1953 ला घेतली होती आणि त्यानंतर तुम्ही दवाखाना सुरू केला होता. तुमची प्रॅक्टिस जोरात चालू होती, तरी अशी प्रॅक्टिस जोरात सुरू असताना सुद्धा तुम्हाला असं का वाटलं की हमालासाठी चळवळ करावी किंवा हमालाचं संघटन करावं?
बाबा आढाव : मुद्दा असा आहे की मी नाना पेठेमध्ये राहात होतो. तेव्हा नानापेठ, गणेशपेठ ,भवानी पेठ वैगरे ह्या सगळ्या व्यापारी पेठा होत्या. व्यापारी पेठामध्ये आडत चालू असते. लोकांना लागणारं धान्य तिथे असायचं. त्यामुळे आमच्याकडे एका बाजूला धान्याचं बाजार, दुसरं तेल बाजार आळी वस्ती होती. 1953 साली मी डॉक्टर झालो आणि प्रॅक्टिसला सुरूवात केली. माझा पुण्यातलाच जन्म आणि राष्ट्रसेवा दलाचे संस्कार स्वातंत्र्य चळवळीपासून आलेले होते.
जडणघडणीचा माझा जो काळ होता तो स्वातंत्र्य चळवळीचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आणि गोवा मुक्ती स्वातंत्र्य आंदोलनाचा. अशा ह्या सगळ्या चळवळीचा जो काही इतिहास आहे याचा परिणाम माझ्यावर नक्कीच झालेला आहे. विशेष म्हणजे माझा स्वातंत्र्यपूर्व काळातील 1930 सालचा जन्म आणि घरामध्ये थोडंसं स्वातंत्र्याचा वातावरण होतं. माझे वडील मी लहान असतानाच वारले होते आणि माझे जे आजोळ होते ते स्वातंत्र्य चळवळीतले विचाराचे होते.
माझे जे आजोबा होते ते ब्राम्हणेतर चळवळीतले प्रमुख होते, असं सांगायला हरकत नाही 1925 साली ज्यावेळेस मंडई मध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा कशाला बसवता? महात्मा फुलेंचा बसवा असा प्रस्ताव जेव्हा केशवराव जेधेनी मांडला तेंव्हा त्या ठरावाचे अनुमोदक माझे आजोबा होते. हा थोडासा इतिहास यामागे होता. आता नाना पेठेमध्ये आम्ही जेथे राहात होतो तेथे एक भाग असा होता की वारकरी संप्रदायाचा प्रभाव तिथे खूप होता.
ज्ञानेश्वरांची पालखी येथे एका ठिकाणी आणि एका ठिकाणी तुकारामांची. तर त्या व्यापारी पेठा असल्याने पालख्यांचे स्वागत तसेच दुकानांमध्ये राहावयाची सोय होत होती. दुसऱ्या बाजुला माझं सेवा दलामध्ये जाणं. मला फार कळत होतं असं नाही, पण मला एवढं कळतं होतं की येथे सगळे बहुजन आहेत.आणि व्यापारी सगळे जैन - मारवाडी, सिंधी वर्ग. आणि माझी शाळा देखील महानगरपालिकेचीच. तिथेच शिकलो.
संबंधित लेख वाचा: 1) वयाच्या 94 व्या वर्षीही बाबा आढाव माथाडी कामगारांच्या न्यायासाठी मैदानात उतरले… |
आम्ही जेथे राहात होतो तिथे अहिल्याश्राम त्यात मातंग, महार म्हणजेच बहुजन समाजातील. तिथे हमालांची संख्या खूप मोठी होती बरेचसे हमाल माझे पेशंट होते. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यावर होणाऱ्या शोषणाची अन्यायाची मला जाणीव झाली. त्यांचे साक्षरता वर्ग घेण्याचे काम त्यावेळी मी सेवा दलातर्फे करत होतो. सेवा दलामध्ये बरेचसे नेते कामगारांच्या युनियनशी जोडलेले होते .त्यामुळे मला देखील हमालांचे संघटन करावेसे वाटले.
ऍड . शारदा वाडेकर : आपण सत्यशोधक चळवळीकडे कसे वळलात?
बाबा आढाव : लहानपणी सेवा दलात जात होतो. तेथे महात्मा फुले आणि साने गुरुजी यांचे विचार सतत कानावर पडायचे. तसेच मी ज्या शाळेत जात होतो ते शिवाजी मराठा हायस्कूल अब्राह्मणी चळवळीशी जोडलेली होती.आजोबांकडून आलेले अब्राह्मणी चळवळीचे संस्कार व घराभोवती वारकरी संप्रदायाचे वातावरण.
ज्ञानेश्वर तुकारामांच्या पालख्या घराजवळ यायच्या त्यामुळे भजन, प्रवचन ,कीर्तन सारखे आजूबाजूला चालूच असायचे. शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक गुरुवर्य जगताप यांचे समाजवादी व ब्राह्मणेतर चळवळीतील संस्कार कळत न कळत होत राहीले. यामुळे सत्यशोधक चळवळीकडे आकर्षित झालो. त्यामुळे राष्ट्र सेवादल व ब्राह्मणेतर चळवळ असे दुहेरी संस्कार लहान वयातच झाले. मी पदवीधर 1953 ला झालो.
त्यानंतर 1960 ला महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. त्या अगोदर पाच सात वर्ष गोवा मुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बहुजनांची ब्राह्मणेतर चळवळ, मंडल आयोगाची चळवळ यासारख्या अनेक चळवळीशी संबंध आला. त्यामध्ये बऱ्याचदा जेलवारी देखील झाली. या सर्वांचा परिणाम माझ्या जडणघडणीत नक्कीच झाला. 1955 ला गोवा आंदोलनात डॉक्टरांचे पथक घेऊन गोव्यात गेलो होतो .नाना, भवानी पेठा या मूळ दलित वस्ती असणाऱ्या होत्य. नाना पेठेतील विठ्ठल रामजी शिंदे यांचे वास्तव्य होते. त्या भागात मुस्लिमांचे घरे देखील जास्त होती.
ऍड . शारदा वाडेकर : हमालांसाठी माथाडी कामगार कायदा करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
बाबा आढाव : समाजवादी चळवळीचा कामगार चळवळीवर खूप मोठा प्रभाव होता. समाजवादी चळवळीचा रेल्वे युनियन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस एम जोशी यांची डिफेन्स कामगार युनियन होती असे अनेक उदाहरणे सांगता येतील. मुंबईमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट म्हणजेच गोदीमध्ये मालाची, अन्नधान्याची खूप मोठी आयात परदेशातून व्हायची. सर्व सामान बोटीतून यायचे. तिथून त्या सर्व वस्तू गोदी पर्यंत कामगारांना डोक्यावरून आणावे लागायच्या.
डोक्यावरून वस्तूंची ने आन करावी लागत असल्याने माथाडी कामगार हा शब्द गोदी कामगारांपासून प्रचलित झाला. हा शब्द मुंबईत गोदी कामगारांसाठी वापरण्यात आला तर पुण्यातील पाठीवर ओझे वाहणाऱ्या कामगाराला हमाल असे म्हणण्यात आले. समाजवादी चळवळीमुळे साहजिकच हमालांच्या प्रश्नाकडे माझे लक्ष गेले. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने हे कामगार पोटापाण्यासाठी शहरात येत होते. पण ते फॅक्टरी कामगार नव्हते.
त्यामुळे फॅक्टरीतल्या कामगाराला ज्या सामाजिक सुरक्षा दिल्या जातात त्या सर्व हमालांना नाकारण्यात आल्या होत्या. हमालांनी दुकानाच्या बाहेर झोपायचे, बाहेरच रस्त्यावर आंघोळ करायची त्यामुळे या कामगारांची अवस्था कुत्र्या मांजरासारखी होती. तिकडे मुंबईत गोदी कामगारांचे म्हणजेच माथाडी कामगारांचे संघटन सुरू झाले होते .त्यातून प्रेरणा घेऊन हमालांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी आपण माथाडी कामगार कायदा करणे आवश्यक असल्याचे वाटले.
ऍड . शारदा वाडेकर : सध्याचे सरकार माथाडी कामगार कायदा दुरुस्तीच्या नावाने मोडीत काढत आहे का?
बाबा आढाव : श्रमकरी वर्गाची सामाजिक सुरक्षेची जबाबदारी सरकार घ्यायला तयार नाही. आठवड्याची सुट्टी, कामाचे आठ तास, ग्रॅच्युईटी, फंड, आरोग्य विमा वगैरे लाभ सरकारला द्यायचं नाही. मुंबईमध्ये दिवंगत कामगार नेते डिमेलो यांनी गोदी कामगारांची संघटना केली होती. गोदी कामगारांचे होणारे हाल, अपेष्टा, कष्ट पाहून डिमेलो यांनी गोदी कामगारांची युनियन केली व त्यांनीच खरा माथाडी शब्द हमालासाठी प्रचलित केला. मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी कंत्राटदार व गोदी कामगार यांच्याशी करार केला. त्या कराराच्या वेळी डीमेलो यांनी एक शर्थ टाकली त्यामध्ये गोदी कामगारांच्या हितासाठी लेव्हीची कल्पना त्यांनी मांडली.
त्यातून गोदी कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली. लेवीचा वापर कामगार हितासाठी कसा करायचा यासाठी माथाडी बोर्डाची संकल्पना आणली. त्या धर्तीवरच माथाडी कामगार कायदा तयार करण्याचे प्रेरणा मिळाली. माथाडी कामगार कायदा अनेक कामगार कायद्यांचा रोल मॉडेल आहे. परंतु आता व्यापाऱ्यांना लेवीची संकल्पना मान्य नाही. त्यांना ती भरायचे नाही व सरकारला कामगार हितापेक्षा व्यापाऱ्यांच्या हिताकडे जास्त लक्ष आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली कायद्याचा प्रभाव कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न चाललाय.
सरकारने याआधी अनेक कामगार कायदे मोडीत काढलेत व चार कामगार संहिता कायद्याच्या नावाने नव्याने तयार केलेल्या आहेत. परंतु अद्याप त्यांनी माथाडी कामगार कायद्याला हात लावलेला नाही. तसा त्यांनी प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातील सर्व हमाल माथाडी कामगार रस्त्यावर येऊन संघर्ष करतील. आम्ही कुठल्याही परिस्थितीत माथाडी कामगार कायदा दुरुस्तीच्या नावाखाली मोडीत काढू देणार नाही.
ऍड . शारदा वाडेकर : हमालांचे लेव्ही बंद करून त्यांना पेन्शन दिले जाणार आहे का?
बाबा आढाव : आम्ही लेव्ही बंद करू देणार नाही व पेन्शन देखील सरकारकडून घेणार आहोत. हमालांमध्ये कनिष्ठ शेतकरी,दलित, बहुजन समाज यांचे प्रमाण जास्त आहे.त्यात एकही ब्राह्मण नाही हे विशेष. अनेक कामगार संघटनाचा माथाडी कामगार कायदा हा रोल मॉडेल आहे. माथाडी कामगार कायद्यामुळे कामगार चळवळीला एक आयाम मिळाला.
पूर्वी आम्हाला अकुशल कामगार म्हटले जायचे परंतु आता प्रत्येक काम हे कुशल काम आहे असे समजले जाते. या प्रश्नावर नेमलेल्या आयोगाने देखील हे तत्व मान्य केले आहे. नव्या अर्थव्यवस्थेत अदानी-अंबानी या दोन भांडवलदारांचे वर्चस्व वाढत आहे. ते प्रचंड नफेखोरी करत आहे व कामगारांचे शोषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गोवा मुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मराठा विद्यापीठ नामांतराची चळवळ, मंडल आयोग चळवळ या सारख्या चळवळींमुळे जनजागरण चांगले झाले आहे.
आम्ही उपरे नाहीत, आम्हाला कामगार म्हणून मान्यता द्या, आम्हाला प्रतिष्ठा द्या, पत द्या! यासारख्या मागण्या कामगार त्यांचे हक्क म्हणून करू लागलेत. यासाठी 2005 मध्ये असंघटित कष्टकरी वर्गाचा पुणे ते दिल्ली असा सायकल मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चात दिल्लीमध्ये देशातील अनेक राज्यातील असंघटित वर्ग हजारोंच्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळेच तत्कालीन सरकारने त्यावर कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारा सामाजिक सुरक्षा कायदा 2008 मध्ये मंजूर केला. परंतु अद्याप असंघटित वर्गाला पेन्शन मिळाली नाही . ती मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.
ऍड . शारदा वाडेकर : हमालांचे लेव्ही बंद करून त्यांना पेन्शन दिले जाणार आहे का? तुम्हाला आठवतंय का? तुमचं पहिलं आंदोलन महागाई बद्दल होतं? दिवसेंदिवस वस्तूंचे भाव वाढत आहेत.
बाबा आढाव : तेच सांगतोय. आपण आंदोलन करणार आहोत. भले तुरुंगात टाकले तरी चालेल. स्वातंत्र्य चळवळीतील भाग घेणाऱ्या माणसाला देखील तु भिकेला लागशील असं म्हणत होते. आपल्याला अजून ही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्वातंत्र्य चळवळीतील काही गोष्टी पुढे घेऊन गेल्या पाहिजेत.
ऍड . शारदा वाडेकर : आपण वयाच्या 95 व्या वर्षी महात्मा फुले वाड्यात तीन दिवस आत्मक्लेष उपोषण केले. ते का करावे लागले? त्या मागची कारणे काय ?
बाबा आढाव : ई.व्ही एम. मशीन बद्दल लोकांमध्ये साशंकता आहे आणि त्यात काही तथ्य देखील आहे असे मला वाटते. पण आता निवडणुकीचे प्रकरण त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. आता सरळ पैसे देऊनच निवडणूका होत आहेत. म्हणजे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री जेव्हा फुशारकीने सांगतात की मी दोन वेगवेगळे पक्ष फोडले आणि राज्य उलथून टाकलं.. पण कसं? त्या साठी जो पैसा ओतला गेला तो कुठून आणला. त्याबद्दल ते सांगत नाहीत .जनताही त्याबद्दल जाब विचारत नाही. याबद्दल एक नागरिक म्हणून मी अस्वस्थ आहे.
आम्ही तर केवळ बोलतो म्हणून नव्हे. काही भांडवलदार सर्व काही आपल्या ताब्यात आल पाहिजे असं वागत आहेत. आज अदानी- अंबानीने जे काही चालवलं आहे अजून लोकांना कळत नाहीये. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये लोकांना उघड उघड पैसे दिले. लोकांना फारसं काही वाटत नाही.
आता इथं जाणीव निर्माण करणं गरजेचे आहे. आपल्याला समाज बदलायचा आहे.म्हणून आता नव्या संदर्भांत नव्हे तर नव्याने निर्माण झालेले संदर्भ लक्षात घेऊन कम्युनिकेशनची साधनं निर्माण झालेली आहेत. त्याचे शोध घेऊन तुम्हाला नव्याने मांडणी करावी लागेल आणि ती मांडणी कशी आहे तर तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ,
जोडिली अक्षरे | नव्हती बुद्धीची उत्तरे ||
नाही केली आटी |
काही मानदंभासाठी ||
कोणी भाग्यवंत |
तया कळेल उचित||
इथं एकच मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यातल्या काही विचारवंत यामध्ये समुदायाचा विचार करावा. आता माझ्याकडे पाहताना लोक असं पाहतात हमालाची, भटक्या विमुक्त लोकांनी माझी भाषा घेतली. त्यांच्या बोली भाषेत गेलं पाहिजे ना? साहित्यामध्ये गेलं पाहिजे तरुणांच्या बेकारीचा प्रश्न अफाट आहे. जेव्हा आम्ही जंतर मंतरला पेन्शनच्या मागणीसाठीउपोषणासाठी बसलो होतो. तेव्हा तेथे तरुण मुले सकाळी माझ्या कडे आले आणि म्हणाले " अंकल आप पेन्शन के लिये इतना कर रहे हो हमारे नौकरी के लिये कुछ करोना".
मला असं वाटतं की ब्राम्हण वर्गाचे जाऊ द्या पण इतर गोष्टींचा नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. इथं अनेक धर्म आहेत,अनेक जाती आहेत,स्त्री पुरुष असमानता आहे. आता सरकारच्या विरोधात बोललं की सरकार तुरुंगात टाकतं.आपला प्रयत्न आहे छोट्या मोठ्या आंदोलन करण्याचा. आपण प्रतिष्ठान च्या माध्यमातून एकत्र काम करू..






