जगज्जेता डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगेसी, विदीत गुजराथी या नव्या दमाच्या खेळाडूंनी बुद्धिबळ विश्वात आपल्या नावाचा प्रचंड दबदबा निर्माण केल्यानंतर आता भारताच्या महिला खेळाडूही त्याच वाटेने निघाल्या आहेत. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण आला आहे की, FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकमध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार हे निश्चित झाले आहे. कारण अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू भारतीय आहेत, अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि युवा प्रतिभा दिव्या देशमुख….
गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये पराभूत केलं. सामन्याच्या सुरुवातीच्या दोन डावांमध्ये दोघींनीही ड्रॉ खेळले. त्यानंतर टायब्रेकच्या 15-15 मिनिटांच्या डावांमध्ये देखील 1-1 अशी बरोबरी झाली. 10-10 मिनिटांच्या पुढील डावांमध्ये लेईने पहिला डाव जिंकून आघाडी घेतली, पण हम्पीने दुसरा डाव जिंकून सामना पुन्हा बरोबरीत आणला. नंतरच्या टायब्रेक सेटमध्ये हम्पीने पहिल्याच डावात जबरदस्त खेळ करत लेईचा पराभव केला. त्यानंतर फक्त एक ड्रॉ पुरेसा होता, पण हम्पीने तो डावही जिंकून थेट अंतिम फेरी गाठली.
त्यापूर्वी, बुधवारी दिव्या देशमुखने माजी विश्वविजेती चीनच्या झोंगयी टॅन हिला 1.5-0.5 अशा फरकाने हरवून फाईनलमध्ये प्रवेश केला. या ऐतिहासिक अंतिम फेरीमुळे भारताला पहिल्यांदाच FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती मिळणार हे निश्चित झालं आहे. आता सगळ्यांचं लक्ष आहे की, ही ट्रॉफी अनुभवी हम्पी जिंकेल की तरुण दमदार दिव्या देशमुख इतिहास घडवेल.
FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकमध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार
FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 चा अंतिम सामना भारताच्या दोन खेळाडूंमध्ये होणार असून, कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात ही ऐतिहासिक लढत रंगणार आहे. हा अंतिम सामना शनिवार, 26 जुलै रोजी सुरू होईल. पहिला डाव - 26 जुलै (शनिवार) आणि दुसरा डाव - 27 जुलै (रविवार) रोजी असले, आणि जर टायब्रेक्स झाला तर 28 जुलै (सोमवार) रोजी खेळवले जातील.
विजेत्या खेळाडूला $50,000 (सुमारे ₹41.6 लाख रुपये) मिळतील. उपविजेत्याला $35,000 (सुमारे ₹29.1 लाख रुपये) दिले जातील. 2021 पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात यायची. यापूर्वी 2021 व 2023 मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती.
यंदा मात्र भारताच्या चार महिला उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्या आणि त्यापैकी दोन थेट अंतिम फेरीत…द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. कोनेरू हंपी हे नाव यापूर्वीही जागतिक स्तरावर कोरले गेले आहे. यापूर्वी कोनेरूने दोनदा जागतिक रॅपिड चेस स्पर्धा जिंकली आहे.काही वर्षांपासून जागतिक महिला बुद्धिबळात भारताचा झेंडा फडकावण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या कोनेरू हम्पीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली.
त्यामुळे जॉर्जिया येथे सध्या सुरू असलेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकमध्ये तिच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा होतीच आणि अंतिम फेरीत प्रवेश करून तिने तमाम भारतीयांना निराश केले नाही. मात्र दिव्या देशमुखने या स्पर्धेत अनेकांचा आश्चर्यचकीत केले. नागपूरच्या इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली.
अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या विजयामुळे दिव्या आता 2026 मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तसेच तिने आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे. उपान्त्य फेरीत चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला पराभऊत केल्यानंतर दिव्या देशमुख म्हणाली की, मी यापेक्षा खूप चांगलं खेळू शकले असते.
एका टप्प्यावर मी जिंकत होते, पण नंतर सगळंच जरा गुंतागुंतीचं झालं. माझ्याकडून मधल्या टप्प्यात थोड्या चुका झाल्या. ही लढत मी सहज जिंकायला हवी होती. परंतु, तिने इतका जोरदार प्रतिकार केला, की मला वाटलं हा डाव आता बरोबरीत सुटेल. शेवटी नशीब माझ्या बाजूने होतं."
दिव्या देशमुख नेमकी कोण आहे?
दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 ला झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती भवन्स सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे. इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवलेली दिव्या 2023 च्या ऑगस्ट महिन्यात ज्युनिअर खेळाडूंमध्ये मुलींमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली.
त्यावेळी तिची रेटिंग 2472 झाली होती. दिव्याला 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर, 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर, 2018 मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2013 मध्ये महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून दिली जाणारी मास्टर पदवी मिळाली आहे. दिव्या पाच वर्षांची होती तेव्हापासूनच बुद्धिबळ खेळते. पण, तिला सवय लावणं हे काही सोप्पं काम नव्हतं.
दिव्याची मोठी बहिण बॅडमिंटन खेळायला जायची. त्यामुळे दिव्याही बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न करायची. पण, रॅकेट तिच्यापेक्षा मोठं होतं. तिला ते सांभाळता येत नसत. त्यामुळे तिथेच जवळपास असलेल्या बुद्धिबळ अकदामीत दिव्याला प्रवेश दिला, असे दिव्याची आई नम्रता देशमुख सांगतात. बुद्धिबळ हा एकाग्रतेने खेळण्याचा खेळ आहे. त्यामुळे अगदी लहान वयात तिला हा खेळ खेळण्यासाठी खूप प्रोत्साहित करावं लागलं. पण, तिला हळूहळू सवय लागली आणि आता ती जागतिक स्तरावर पोहोचली त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या.

वादग्रस्त पोस्टमुळे दिव्या आली होती चर्चेत
"पुरुष खेळाडू खेळतात तेव्हा त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं काम प्रेक्षक करत होते. पण, महिला खेळाडू खेळत होते तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी कशी दिसते? मी कपडे कोणते घातले आहेत? मी केस बांधले आहेत का? मी कशी वावरते? याची चर्चा करत होते." अशी एक पोस्ट काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर केल्यामुळे दिव्या देशमुख चर्चेत आली होती.मात्र या पोस्टची चर्चा झाल्यानंतर तिने ती पोस्ट इन्स्टाग्रामवरून हटवली होती.
दिव्याने काही महिन्यांपूर्वीच खेळात तिला आलेला अनुभव सांगितला होता. तिने नेदरलँडमध्ये झालेल्या टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. यात तिने प्रेक्षकांकडून तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल लिहिले होते. तिनं पुढे म्हटलं होतं, "मी बुद्धिबळ कशी खेळत होते, यासोबत त्या प्रेक्षकांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी जेव्हा मुलाखत देत होते तेव्हाही मी पाहिलं की लोक माझ्या खेळाबद्दल जाणून न घेता माझ्या शरीराकडे, माझ्या कपड्यांकडे, केसांकडे पाहत होते. मी खेळ कसा खेळले आणि मला काय अडचणी आल्या हे जाणून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती."
दिव्याची आतापर्यंतची कारकिर्द
दिव्याने मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. तिने तीन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकली. त्याशिवाय आशियाई अजिंक्यपद, वर्ल्ड युथ आणि वर्ल्ड ज्युनियर स्पर्धांमध्येही तिने अनेक जेतेपदे मिळवली आहेत. दिव्याने 2023 मध्ये अल्माटी येथे झालेली आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर टाटा स्टील इंडिया आणि शारजा चॅलेंजर्ससारख्या रॅपिड स्पर्धांतील तिच्या यशस्वी कामगिरीमुळे ती विविध टाइम फॉरमॅटमध्येही तितकीच सक्षम असल्याचं दिसून आले आहे.
तिने 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड टीम रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या ब्लिट्झ विभागात तिचा परफॉर्मन्स रेटिंग 2600 पेक्षा जास्त होता. 2012 मध्ये दिव्याने आपले पहिलं राष्ट्रीय जेतेपद जिंकत अंडर-7 चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये अंडर-10 आणि 2017 मध्ये ब्राझीलमध्ये अंडर-12 वर्ल्ड युथ टायटलवरही तिने आपलं नाव कोरले.
दिव्या 2021 मध्ये वुमन ग्रँडमास्टर झाली. ती विदर्भातील पहिली आणि भारतातील 22वी महिला ग्रँडमास्टर ठरली. 2023 मध्ये दिव्या देशमुख इंटरनॅशनल मास्टर झाली. त्यानंतर 2024 मध्ये जगातील नंबर एक अंडर-20 महिला खेळाडू म्हणून तिने वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स अंडर-20 चॅम्पियनशिप जिंकली. तिने जबरदस्त खेळ करत 11 पैकी 10 गुण मिळवत ही स्पर्धा जिंकली. 2024मध्ये ऑलिम्पियाडमधील महिलांच्या स्पर्धेत सर्व 11 डाव खेळलेली दिव्या ही एकमेव भारतीय होती.
दिव्या देशमुख
पंतप्रधानांनी केलं दिव्याचं कौतुक
दिव्या देशमुखने लंडन येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड ब्लिट्ज टीम चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनची दिग्गज बुद्धिबळपटू होउ यिफान हिला पराभूत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा तिचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिले की, 'लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्ज चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या स्टेजच्या ब्लिट्ज सेमीफायनलमध्ये जगातील नंबर 1 ची खेळाडू असलेल्या यिफानला हरवल्याबद्दल दिव्या देशमुख हीच अभिनंदन.
त्याचे यश त्याचा संयम आणि दृढनिश्चय दर्शवितो. यामुळे बऱ्याच बुद्धिबळ खेळाडूंना देखील प्रेरणा मिळेल. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पोस्टवर दिव्या देशमुखने रिप्लाय दिला. तिने म्हंटले की, धन्यवाद आदरणीय पंतप्रधानमंत्रीजी , तुमच्याद्वारे मला सन्मानित करण्यात येणं हे माझ्यासाठी सन्मान आणि प्रोत्साहनात्मक आहे.
लहानशी लेक सांभाळत कोनेरु हम्पीचं दणक्यात पुनरागमन
जॉर्जियामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आपली लहान लेक सांभाळत कोनरू हम्पीने केलेले हे पुनरागमन फार महत्वाचे ठरले. भारतीय बुद्धिबळ विश्वातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी नाव म्हणून कोनेरु हम्पी ओळखली जाते. आंध्र प्रदेशातील एका मध्यमवर्गीय घरातून आलेली ही मुलगी. अफाट मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण केली.
वडिलांना बुद्धिबळ खेळण्याची आवड होती. नोकरी आणि घरातील इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पूर्णवेळ खेळाडू म्हणून कारकीर्द घडवता आली नाही. मुलीला लहानपणापासून बुद्धीबळाची आवड असल्यामुळे त्यांनी तिच्या स्वप्नांना पंख दिले. तिच्या बुद्धिबळ कौशल्याची झलक त्यांना लहानपणापासूनच जाणवली आणि त्यांनी तिच्या पाऊलांना आधार दिला. शांत दिसणारी हम्पी बुद्धिबळाच्या पटावर मात्र आक्रमक आणि निर्भीडपणे खेळताना दिसते.
हम्पी कोनेरु
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ग्रँडमास्टर म्हणून ती जगातील सर्वात तरुण महिला ग्रँडमास्टर बनली. तिने अनेक पदकं आणि गौरव मिळवून भारताचे नाव उंचावले. पालकांचा त्याग, त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत हम्पीनं विविध वयोगटातून आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली. संसार, मातृत्व या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत तिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केलं. ही गोष्ट अनेक महिलांसाठी स्फूर्तिदायक उदाहरण आहे.
आज कोनेरु हम्पी ही केवळ बुद्धिबळपटू नाही तर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यावर मात करुन शिखर गाठता येतं. तिला पाहून लाखो मुलींना स्वप्नं बघण्याचं आणि ते पूर्ण करण्याचं बळ मिळतं.






