हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गाझा तीव्र अन्नटंचाईचा सामना करत आहे. गाझाला जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे. 20 लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या गाझा पट्टीला अन्न, इंधन आणि वैद्यकीय पुरवठ्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र मार्चपासून इस्रायलने गाझा पट्टीला केली जाणारी अन्न, पाणी, औषध आणि इंधनाची सर्व सेवा रोखली आहे.
ही भीषण परिस्थिती लक्षात घेऊन जगविख्यात स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि तिचे 12 कार्यकर्ते मदतीचं अत्यावश्यक सामान घेऊन एका जहाजात बसले. गाझाच्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी फ्रीडम फ्लोटिला कोअॅलिशन (FFC) या संस्थेद्वारे हे जहाज सिसिली या बेटावरून गाझाच्या दिशेने निघाले. ‘मॅडलीन’ नावाच्या या जहाजात बेबी फॉर्म्युला, तांदूळ आणि वैद्यकीय साहित्य यांसारख्या महत्त्वाच्या मानवतावादी वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. गाझाच्या बिघडत्या मानवतावादी परिस्थितीकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती.
मात्र जहाज गाझापर्यंत पोहताच इस्रायली लष्करी दलांनी या जहाजाचा ताबा घेतला आणि बोटीवर असणाऱ्या पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि इतर कार्यकर्त्यांना अटक केली. ग्रेटासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीला ताब्यात घेतल्यामुळे याचे पडसाद साऱ्या जगात उमटले. बोट ताब्यात घेतल्याच्या वृत्तानंतर FFC च्या आयोजकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी इस्रायलवर शांततापूर्ण कार्यात बेकायदापणे हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. मात्र, इस्रायली अधिकाऱ्यांनी जागतिक माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले आहे.
ताज्या माहितीनुसार, इस्रायलने ग्रेटा थनबर्गला त्यांच्या ताब्यातून स्वीडनला परत पाठवले आहे. ग्रेटाला फ्रान्सला जाण्यासाठी विमानाने पाठवण्यात आले आहे, जिथून हद्दपार केले जाईल. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर पोस्ट करून ग्रेटा यांच्या हद्दपारीची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले- 'सेल्फी यॉट' मधील सर्व प्रवासी सुखरूप आणि सुरक्षित आहेत. त्यांना सँडविच आणि पाणी देण्यात आले आहे. शो आता संपला आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ग्रेटा थनबर्ग आणि इतरांना 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्याचा व्हिडिओ दाखविण्याचे आदेश दिले.
ग्रेटाला ताब्यात घेण्यापासून ते तिला स्वीडनला परत पाठवण्याच्या या 24 तासांच्या दिनक्रमात बरेच नाट्य घडले असून इस्रायलने ग्रेटा थनबर्ग आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात का घेतले? गाझाला केली जाणारी मदत इस्रायल कशी रोखत आहे? आणि कोण आहे ग्रेटा थनबर्ग हे आपण जाणून घेणार आहोत.
इस्त्रायलने ताब्यात घेतल्यानंकर ग्रेटा थनबर्गचा बोटीवरून व्हिडिओ…
‘फ्रीडम फ्लोटिला कोअॅलिशन ‘च्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे 2 वाजता जहाज आंतरराष्ट्रीय सीमेवर असताना इस्रायली सैन्याने बोटीवर प्रवेश केला आणि त्यावर चढले. कार्यकर्त्यांच्या या गटाने कारवाईचा उल्लेख सागरी कायद्याचे उल्लंघन म्हणून केला. “बेकायदापणे सैनिक बोटीवर चढले. निःशस्त्र कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आणि अन्न व वैद्यकीय साहित्य यांसह जीवनरक्षक सामग्री जप्त करण्यात आली.” ‘एफएफसी’च्या प्रतिनिधी हुवैदा अराफ म्हणाल्या, “मॅडलीन बोटीवरील स्वयंसेवकांना ताब्यात घेण्याचा इस्रायलला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. हे स्वयंसेवक इस्रायली अधिकार क्षेत्राच्या अधीन नाहीत आणि मदत पोहोचवल्याबद्दल त्यांना गुन्हेगार ठरवता येत नाही. त्यांची अटक बेकायदा आहे आणि त्यांना ताबडतोब सोडले पाहिजे.”
संबंधित लेख वाचा: 1) या इस्त्रायलला झालयं तरी काय…? कुणाचंच कसं ऐकत नाहीये…? |
फ्रीडम फ्लोटिला कोअॅलिशन ‘ने ग्रेटा थनबर्गचा एक रेकॉर्ड केलेला संदेशदेखील प्रकाशित केला. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. त्या व्हिडीओमध्ये थनबर्ग म्हणाली, “जर तुम्ही हा व्हिडीओ पाहिला तर आम्हाला इस्रायली सैन्याने आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर अडवले आणि अपहरण केले आहे. मी माझ्या सर्व मित्रांना, कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना विनंती करते की, त्यांनी स्वीडिश सरकारवर दबाव आणावा, जेणेकरून मला आणि इतरांना लवकरात लवकर सोडले जाईल.”
‘सेलिब्रिटींची सेल्फी यॉट’... इस्त्रायलकडून ग्रेटा थनबर्गची चेष्टा
इस्रायलने ग्रेटालाआधीच गाझाला न जाण्याचा सल्ला दिला होता. इस्रायलेन स्पष्ट सांगितले होते की, इस्रायली सैन्या ग्रेटा आणि त्यांच्या सैन्याला गाझात प्रेवश करुन देणार नाही. त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांना अटक करण्यात येईल. इस्रायलच्या या धमकीनंतर ग्रेटा थनबर्ग यांनी मानवाधिकार संघटनांकडून मदत मागितली होती. पण अद्याप मानवाधिकार संघटनांकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
या संदर्भात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, त्यांच्या नौदल दलांनी बोट ताब्यात घेतली आहे आणि ही बोट इस्रायली बंदरात ठेवण्यात आली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये या मंत्रालयाने बोटीचे वर्णन ‘सेलिब्रिटींची सेल्फी यॉट’ म्हणून केले आहे. मंत्रालयाने असेही नमूद केले आहे की, बोटीवर असणाऱ्या व्यक्तींना कोणतीही इजा झाली नसून त्यांना मूलभूत अन्न आणि पाणी पुरवण्यात आले आहे. ‘सेल्फी यॉट’मधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही हानी झाली नाही. त्यांना सँडविच आणि पाणी देण्यात आले, असे मंत्रालयाने लिहिले आहे. त्यांनी लाईफजॅकेट घातलेल्या आणि जहाजावर बसलेल्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओही दाखवण्यात आला आहे.
इस्रायलकडून ग्रेटाची परतपाठवणी, आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सैन्याला गाझाच्या पाण्यात या बोटीचा प्रवेश रोखण्याचे निर्देश दिले होते. हा एक प्रचार स्टंट असल्याचे सांगत काट्झ यांनी म्हटले की, इस्रायल गाझाभोवती असणाऱ्या त्यांच्या सागरी निर्बंधांचे कोणतेही उल्लंघन होऊ देणार नाही. सरकारने म्हटले की, सर्व सामान अधिकृत मानवतावादी मार्गांनी गाझाला पाठवले जाईल.
यानंतर इस्रायलने ग्रेटा थनबर्गला त्यांच्या ताब्यातून काही तासांनी सोडले असून तिला फ्रान्सला जाण्याऱ्या विमानात बसवले आहे. ताज्या माहितीनुसार ग्रेटा आता फ्रान्समध्ये पोहचली आहे. इस्रायलहून पॅरिस विमानतळावर पोहोचल्यावर ग्रेटाने गाझामध्ये मदत पोहोचवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अधिक पुढाकार घेण्याचे आवाहन केले. अन्य कार्यकर्त्यांची सुटका करावी, असे आवाहनही ग्रेटाने केले. ‘जहाज ताब्यात घेताना अत्यंत गोंधळाची आणि अनिश्चित परिस्थिती होती. मात्र पॅलेस्टाइन, विशेषत: गाझामध्ये सध्या लोक ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्या तुलनेत आम्ही ज्या परिस्थितीला सामोरे गेलो, ते काहीच नव्हते,’ असेही ग्रेटा हिने सांगितले.
मार्चपासून इस्रायलने गाझा पट्टीला केली जाणारी अन्न, पाणी, औषध आणि इंधनाची सर्व सेवा रोखली आहे. इस्रायलने रफाह आणि केरेम शालोमसारखे महत्त्वाचे मार्ग बंद केले आहेत. आंतरराष्ट्रीय दबाव असल्याने विशेषतः अमेरिकेच्या दबावाखाली इस्रायलने अधिकृत क्रॉसिंगमधून मर्यादित मदत पोहोचवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मानवतावादी तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, सध्याची मदत अपुरी आहे. संयुक्त राष्ट्रांनी गाझा पट्टीच्या बहुतांश भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
22 वर्षांच्या या तरुणीला इस्त्रायल का घाबरली?
ग्रेटा थनबर्ग ही अवघ्या 22 वर्षांची तरुणी आहे. पण तरीही इस्त्रायलने तिला गाझापट्टीत येऊ दिले नाही. लेखक आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी ग्रेटा थनबर्गच्या कारकिर्दीवर ‘ग्रेटाची हाक : तुम्हाला ऐकू येतेय ना...?’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातून ग्रेटा खरोखरच किती ‘ग्रेट’ आहे हे लक्षात येते.
स्वीडनमधील एक चिमुकली ‘हवामानासाठी शाळा बंद’ असा फलक घेऊन स्वीडनच्या संसदेबाहेर धरणे देऊन बसली तो दिवस होता, 20 ऑगस्ट 2018…पालक, बहिण वा मैत्रिणींपैकी कोणीही तिच्या सोबतीला नव्हते. स्वीडनमध्ये शाळा चुकविणे हा गुन्हा असल्यामुळे तिला शिक्षा होऊ शकली असती. तरीही नवव्या इयत्तेत शिकणारी ग्रेटा थुनबर्गने स्वतःच्या देशाच्या संसदेबाहेर ठाण मांडून बसण्याचे धाडस करते. यानंतर मिळालेल्या पाठिंब्यामुळे ती मुले ‘हवामानासाठी शाळा बंद आंदोलन’ चालू करतात. त्यानंतर केवळ 13 महिन्यांत म्हणजे 20 सप्टेंबर 2019 रोजी तिच्या साथीला जगातील सुमारे 50 लक्ष मुले रस्त्यावर येतात. पाहता पाहता हे आंदोलन जगभर पसरते.
पर्यावरण वाचवण्यासाठी शाळा बुडवणारी मुलगी
छोट्या मुलीच्या एका छोट्या कृतीमुळे लक्षावधी मुलांना व तरुणांना स्फूर्ती मिळाली आणि भवितव्याच्या धास्तीने हादरलेली शाळकरी मुले आणि तरुण हे लाखोंच्या संख्येने हवामान बदलाविरोधी लढ्यात उतरु लागले. त्यांना जगातील आघाडीचे शास्त्रज्ञ पाठिंबा देऊ लागले. ही मुले ‘‘आमचं नाही, विज्ञानाचं ऐका आणि कर्ब उत्सर्जन थांबवा, जगाला वाचवा’ असं त्यांच्या नेत्यांना सांगू लागली.
आणि तो दिवस उजाडला… 23 सप्टेंबर 2019 हा तो दिवस होता जेव्हा जगाच्या नकाशावर ग्रेटा थनबर्ग हे नाव कोरले गेले, त्यावेळी ग्रेटा फक्त 16 वर्षांची शाळकरी मुलगी होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी ग्रेटाला आमंत्रित केले होते. असे आक्रित आजवर कधीही घडले नव्हते. त्यादिवशी न्यूयॉर्कमध्ये जगातील 66 राष्ट्रप्रमुख एकत्र जमले होते. आजवर अनेक आश्वासने झाली, तरी कर्ब उत्सर्जन काही कमी होत नाही आणि हवामान बदलाचा अतिरेक संपूर्ण जगाला वेठीला धरत आहे, हे पाहून संयुक्त राष्ट्रसंघाने केवळ एक दिवसाची विशेष परिषद भरवली होती.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत, जगातील नेत्यांना पाहून रुद्रावतारात ग्रेटा गरजली, ‘‘मी इथे असणेच चुकीचे आहे. मी समुद्राच्या पलिकडे शाळेत असायला पाहिजे. तुम्ही आम्हा तरूणांना आशा दाखवता? तुम्हाला हिंमत होतेच कशी? तुम्ही माझं बालपण, माझी स्वप्नं हिरावून घेतली आहेत.’’ मग भावनोत्कटतेने तिचा आवाज कंप पावू लागला. पुढे ती म्हणाली, ‘‘मानवजातच लुप्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व सर्वकाळ होणाऱ्या आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही पोक्त व पक्व नाही आहात. तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आता तुमची फसवणूक आम्ही सहन करणार नाही.’’ उद्वीग्न ग्रेटा बोलतच होती,‘‘ पुढील सर्व पिढ्यांच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत. त्यामुळे आता आणि इथेच सोक्षमोक्ष लागला पाहिजे.’’
ग्रेटाच्या 4.5 मिनिटांतील 495 शब्दांत व्यक्त केलेल्या विधानांचा संपूर्ण जगावर विलक्षण परिणाम झाला. ग्रेटा जगातील पर्यावरण चळवळीची राजदूत झाली, त्यावेळी तिच्यावर टीकेचे हिंस्त्र हल्लेदेखील सुरू झाले. ‘डाव्या-उदारमतवादी विचारांच्या प्रसारासाठी अब्जावधी डॉलर्स खर्चून जनसंपर्क माध्यमांच्या मदतीने उभी केलेली ग्रेटा ही एक कळसूत्री बाहुली आहे.’ ‘आत्ममग्न व विषण्णतेच्या विकाराने ग्रस्त असणारी ग्रेटा ही हेकेखोर आणि एकसूरी आहे. तिला गांभीर्याने घेणे हाच एक विनोद आहे.’ या टीकेला जगातील आघाडीच्या वृत्तपत्रांनी आपल्या अग्रलेखांतून उत्तर दिले आहे.
सत्तेच्या संघर्षातील महत्वाचा मुद्दा हवामान बदल हाच आहे, हे जगाला दाखवून देण्याची लक्षणीय कामगिरी ग्रेटाने आपल्या संबोधनातून केली आहे. तेथे जमलेल्या सत्ताधीशांना तिने थेट आव्हान दिले. सोप्या शब्दांत, हवामान बदलावर कृती करण्याची मागणी करणारे ‘आम्ही’ आणि त्यास नकार देणारे ‘तुम्ही’ अशी मांडणी तिने केली. प्रदूषणकर्ते आणि प्रदूषणग्रस्त, पर्यावरणमस्त व पर्यावरणत्रस्त अशी विभागणी करण्यात ती यशस्वी ठरली. कोट्यवधी लोकांच्या भावना सत्ताधीशांपर्यंत पोहचवून जनसामान्यांमध्ये तिने चेतना निर्माण केली. लंडनच्या ‘द गार्डियन’ने ‘आम्हाला धोक्याचा इशारा!’ असे आपल्या संपादकीयातून मान्यही केले.
कसा सुरू झाला हा प्रवास?
पर्यावरणीय संकटासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक, तज्ज्ञ व तळमळीचे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होते. तरीही लोकांना पर्यावरण व हवामान बदल समस्येचे गांभीर्य समजत नव्हते. त्यांची कारणे व उपाय लक्षात येत नव्हते. ती अतिशय दूरची वाटत होती. या समस्यांना काही तात्काळ उत्तरही नव्हते. अशा समस्यांना समाजशास्त्रज्ञ ‘दुष्ट समस्या’ असे संबोधतात. ग्रेटा म्हणाली, ‘‘हवामान बदलामुळे आमचे (मुलांचे) भविष्य धोक्यात आले आहे. भविष्यच नसेल तर शाळेत का जाऊ?’’ आणि तिने एकटीने शाळेवर एक दिवस बहिष्कार घातला, या कृतीने जगातील मुलांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रेटाने मांसाहार वर्ज्य करून शाकाहार स्वीकारला, मोटारीऐवजी बस निवडली. विमानाऐवजी जहाजाने खडतर प्रवास केला. जिथे कडाक्याच्या थंडीत उष्णतेसाठी शेगडी नाही वा गरम करून खाण्याची सोय नाही इतकंच काय शौचालयाऐवजी बादली वापरावी लागते, अशा ठिकाणी जाऊन हाल-अपेष्टा कोण व का सहन करेल? ती मानधन घेत नाही, स्वतःच्या पुस्तकाच्या स्वामित्वधनातून देणग्या देते. हे साधेपणाचे प्रदर्शन की इतरांनी स्वतःला अपराधी समजावे यासाठी? हा सारा खटाटोप हा तिची विचारपूर्वक जीवनशैली व्यक्त करतो.
ग्रेटाची अशी आहे जीवनशैली…
संपूर्ण जगाच्या नजरा कायम तिच्याकडे असतात, याचे भान या मुलीला आहे. मत तयार करणे, मत बदलणे हेच महत्त्वाचे आहे, याची तिला जाण आहे. कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही कृती ही किरकोळ नसते. त्यातून एक तरंग उमटला, तर त्यातून अनेक तरंग पसरत जायला वेळ लागत नाही, हेच ती आपल्या कृतींमधून सांगत आहे. आज एक शाळकरी बालिका तिच्या कर्तृत्वाने संपूर्ण जगातील जनतेची प्रतिनिधी झाली आहे. जगाला वाटणारी हवामानाची भीती व पर्यावरणीय धास्ती ती व्यक्त करीत आहे. जगातील प्रसारमाध्यमे तिचे म्हणणे ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. एखाद्या राष्ट्रप्रमुखाला सुध्दा मिळत नसेल एवढा मान तिच्या वक्तव्याला मिळत आहे.
ग्रेटामुळे ही समस्या सर्वांना आपली वाटू लागली. ती अतिशय मोजक्या व नेमक्या शब्दांत मांडणी करते. हवामान बदलामुळे काय झालं? काय होणार आहे? काय केलं पाहिजे? हे मार्मिकपणे ती सांगते. मोठ्यांनी कधीही न विचारलेले प्रश्न जाहीरपणे विचारण्याचे धैर्य तिच्याकडे आहे. ती सातत्याने विज्ञानाचे ऐकण्याचा आग्रह धरते. तिच्या भाषणांत तर्क आणि भावना, नीती आणि मूल्ये यांचा उत्तम समतोल असतो. तिला संपूर्ण मानवजातीची काळजी वाटते. गरीब लोक आणि गरीब देशांची बाजू घेऊन ती श्रीमंत देशांना फटकारते. उधळ्या जीवनशैलीला फोडून काढते.
जगातील प्रभावशाली तत्त्वज्ञ अशी ख्याती असलेले प्रो. पीटर सिंगर (प्रीन्सटन विद्यापीठ) म्हणतात, ‘‘एकविसाव्या शतकासमोरील सर्वात मोठे नैतिक आव्हान हवामान बदलाचेच आहे, हे ध्यानात आणून देणे हेच ग्रेटाचे विलक्षण कार्य आहे.’’ ती दरवेळी नवी प्रतिके वापरते. तिच्या मांडणीत कल्पकता व नाविन्य असते. ‘आपले घर जळत आहे’ असे ती म्हणते तेव्हा पर्यावरण समस्या ती आपल्यापर्यंत आणून भिडवते. जनतेच्या (भीती, दुःख, संताप या) भावनांना ती वाचा फोडते.
मग ती विचारते ‘तेव्हा तुम्ही शांत कसे बसाल? बोलत बसाल? की आग विझवाल?’ अखेरीस आवाहन करते, ‘चला, वाचवायचा प्रयत्न करू’ आणि त्याचा परिणाम थेट होतो. एकाचवेळी लहान विद्यार्थ्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत, राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत जगातील कोट्यवधी लोकांसाठी ग्रेटा ही प्रेरक ठरत आहे.
2018 च्या ऑगस्टपासून जगातील मुले पर्यावरणाबाबत संवेदनशीलता प्रकट करू लागले आणि तेव्हापासून त्यांना निसर्ग व पर्यावरणावरील पुस्तके वाचण्याचा छंदही जडला. जगातील ग्रंथविक्रीचे मापन व विश्लेषण करणाऱ्या ‘निएल्सन बुक रीसर्च’ या संस्थेने ‘‘मागील 12 महिन्यात बालकांच्या पुस्तक मागणीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली.’’ असे सांगितले. निसर्गविनाश, प्रदूषण, निसर्गदूत अशा विषयांवरील पुस्तकांना बालकांची पसंती आहे. ‘ए वाइल्ड चाइल्डस गाईड टू एनडेन्जर्ड ॲनिमल्स’, ‘व्हेअर द रिव्हर रन्स गोल्ड’, ‘किड फाइट प्लास्टिक’ आणि ‘अर्थ हिरोज’ या पुस्तकांवर मुलांच्या उड्या पडत आहेत.
‘अर्थ हिरोज’मध्ये पृथ्वी वाचविण्याचा वसा घेतलेल्या २० व्यक्तींच्या कार्याची महती सांगितली आहे. त्यामध्ये विख्यात वृत्तपटकार सर डेव्हिड ॲटनबरो, चीनमधील मंगोलियाच्या वाळवंटात सहा लक्ष वृक्षांची लागवड करणाऱ्या यिन युझेन, पर्यावरणस्नेही वस्तूंचे कल्पक डिझाइन करुन त्यांना लोकप्रिय करणाऱ्या स्टेला मॅकार्टनी यांचे कार्य व त्याचे महत्त्व सांगतिले आहे. आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे ग्रेटा! ‘निएल्सन बुक रीसर्च’च्या विश्लेषक राशेल केलर म्हणतात, “हा ‘ग्रेटा थुनबर्ग परिणाम’ आहे.” तिच्यामुळे मुलांमध्ये बदल घडत आहेत. मुले अंतर्मुख होऊन या पुस्तकांतून प्रेरणा घेत आहेत.






