अभिजीत तांगडे,
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘शिवाजी’ किंवा ‘संभाजी’ या एकेरी नावावरून जे जे उपलब्ध आहे मग ते नाटक असो, सिनेमा असो, पुस्तक असो वा संस्था असो त्या विरोधात गेल्या काही काळापासून मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. एकेरी नावासोबतच छत्रपतींच्या धर्मनिरपेक्ष असण्याच्या ज्या कलाकृती आहेत त्यांच्याविरुद्धदेखील सध्या राज्यात घमासान सुरू आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाई फासत झालेली धक्काबुक्की, प्रखर विरोधानंतर ‘संभाजी बिडी’चे ‘साबळे बिडी’ असे झालेले नामांतर, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करण्याची मागणी, गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ या अत्यंत गाजलेल्या पुस्तकावर बंदी घालण्याची वेळोवेळी होत असलेली मागणी अशी गेल्या काही महिन्यापासूनची अनेक उदाहरणे सांगता येतील.
यातच आता नव्याने भर पडली आहे ती पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ‘खालिद का शिवाजी’ या मराठी सिनेमाची… या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मोरे यांनी केलं आहे. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात खालिद या एका मुस्लिम मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. जो त्याच्या जीवनातील विविध अनुभवांमधून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकतो.
या चित्रपटात इतिहासाचा एक वेगळा दृष्टीकोन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु यामुळेच नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठीही निवडला गेला आहे.
‘खालिद का शिवाजी’वर बंदीची हिंदुत्ववादी संघाटनांची मागणी
मात्र आता अशा नावजलेल्या सिनेमाविरुद्ध मोहीम सुरू झाली आहे. ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई- पुण्याच्या हिंदुत्ववादी संघटनेने या चित्रपटावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाकडे त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे इथल्या हिंदू महासंघाने सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना निषेधाचं पत्र पाठवलं आहे. “चित्रपटाच छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष शासक म्हणून दाखवण्यात आलं आहे, जे त्यांच्या खऱ्या ओळखीच्या विरुद्ध आहे. जर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली नाही तर आम्ही थिएटरबाहेर निषेध करू”, असा इशारा हिंदू महासंघाने दिला आहे. हे प्रकरण इथेच थांबले नसून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार कार्यक्रमात, या चित्रपटाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांचे भाषण मध्येच थांबवावे लागले.
या घटनेनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान ही घटना घडली. मुख्यमंत्री फडणवीस भाषण देण्यासाठी व्यासपीठावर उभे होते, तेव्हाच एका हिंदू संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी 'खालिद का शिवाजी' चित्रपटाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. चित्रपटावर बंदी घालण्याची आणि त्यातील आक्षेपार्ह सीन काढून टाकण्याची या कार्यकर्त्यांची मागणी होती. अचानक झालेल्या या गोंधळामुळे कार्यक्रमात गदारोळ झाला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान निषेध, हिंदू महासंघ आक्रमक
परिस्थिती बिघडत चालली हे पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला. त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि म्हणाले, "मी तुमचे ऐकले आहे, आता कार्यक्राम बिघडवू नका." पण तरीही ते कार्यकर्ते शांत न झाल्याने पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी तातडीने तिथे जाऊन दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना कार्यक्रमस्थळाबाहेर काढले.
या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही काळ भाषण थांबवावे लागले. या संपूर्ण वादाचे मूळ चित्रपटाचे नाव आणि त्याची कथा आहे. निषेध करणाऱ्या हिंदू संघटनांच्या मते 'खालिद का शिवाजी' मध्ये निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. या चित्रपटाद्वारे समाजात जातीय तणाव आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. जर इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला तर समाजात वाद निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच ते चित्रपटाच्या रिलीज बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
‘आम्ही या चित्रपटातील वादात असलेले संवाद काढून टाकतोय’’
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’ सिनेमाच्या टीमने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. अभिनेता कैलास वाघमारे, दिग्दर्शक राज मोरे, निर्माता मायकल थेवर आणि संवाद लेखक राजकुमार तांगडे यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘नमस्कार समस्त रसिक मायबाप प्रेक्षकहो’ अशी सुरूवात करून या निवेदनात म्हटलं आहे की,
तुमच्याशी जरा बोलायचंय, तुम्हाला काही सांगायचंय म्हणून हा प्रपंच… आमचं म्हणणे तुमच्यातल्या काहींना पटेल आणि काहींना पटणारही नाही. आमच्या म्हणण्यावर तुमचे आक्षेपही राहतील, पण छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाही. येणाऱ्या ८ ऑगस्ट २०२५ रोजी आमचा "खालिद का शिवाजी" हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर मतमतांतरे सुरू झाली. या अनुषंगाने आम्हाला आमचं म्हणणं तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणी रुजू करायचंय… आमच्या कलाकृतीवर प्रामुख्याने चार आक्षेप नोंदवले गेलेत त्याबाबत आमचं हे म्हणणं आहे..
1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुसलमान होते आणि त्यांचे १९ अंगरक्षक मुस्लीम समाजाचे होते…?
याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कर्तृत्व बघून संधी दिली जात असल्याने त्यांनी सैन्याची जाती-धर्माच्या आधारावर शिरगणती केली नाही. त्यामुळे त्यांचं एकूण सैन्य किती आणि त्या एकूण सैन्यात कुठल्या जाती धर्माचे किती लोक होते हे सांगणं निव्वळ अशक्य आहे.
आम्ही चित्रपटातील पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असू शकतो किंवा कमी देखील, मात्र छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हे म्हणणे देखील अनैतिहासिकच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख किंवा दौलतखान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लीम छत्रपती महाराजांच्या सैन्यात होते, अर्थात ती त्या काळातील म्हणजे मध्ययुगातील परिस्थितीच होती. जसे अनेक मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यात होते तसेच मुघलांच्या सैन्यात अनेक गैरमुस्लीमही होते, त्यामुळे आकडे चूक असतीलही पण माहिती अनैतिहासिक नाही आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
2) रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली…?
याबाबतही काही गोष्टी आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे. मुळात पहिल्यांदा हे बघावं लागेल की रायगडावर मस्जिद होती की नाही याबाबत आपल्याला कालसापेक्ष विचार करावा लागेल. 1964 साली भारत सरकारने प्रकाशित केलेल्या कुलाबा गॅझिटीयरमध्ये पान क्र. 128 वरील शेवटच्या परिच्छेदात रायगडावरील परिच्छेदात मस्जिदीचा उल्लेख आला आहे. यात संबंधीत वास्तुचे मोजमापही स्पष्टपणे नोंदवण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने 1962 साली प्रकाशित केलेल्या शांताराम विष्णु आवळसकर लिखित ‘रायगडाची जीवनकथा’ या संशोधनात्मक पुस्तकाच्या पान क्र. 22 वर किल्ले रायगडाचा नकाशा दिला आहे. त्यात महा दरवाज्याच्या आत गेल्यावर डाव्या हाताला दारूच्या कोठारा समोर "पीर" लिहून मस्जिदीची आकृती चितारण्यात आली आहे.
अर्थात ती मस्जिद छत्रपती महाराजांनी बांधून घेतली याबाबतचा उल्लेख नागपूर विद्यापीठाच्या इतिहासशास्त्र विभागाचे प्रमुख, इतिहास संशोधक प्रा.मा.मा. देशमुख लिखित ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा’ भाग तिसरा या पुस्तकाच्या पान क्र. 51 वर "शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी मशीद बांधली होती" अस स्पष्टपणे लिहीलेलं आहे.
या पुस्तकावर आधी महाराष्ट्र सरकारने बंदी आणली होती, मात्र त्या बंदी विरोधात उच्च न्यायालयात स्पष्टीकरण आणि पुरावे सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने ती बंदी उठवण्यात आली. याशिवाय रायगडावर गेल्यावर आपल्या हेही लक्षात आल्याशिवाय रहाणार नाही की, रायरेश्वराच्या मंदिराचे स्थापत्य महाराजांनी स्वतः हिंदू-मुस्लीम स्थापत्यशैलीत करून घेतले होते.
यावरून महाराजांना परधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा द्वेष होता असं म्हणता येणार नाही. उलट काफी खानाने लिहिलेल्या समकालीन इतिहासात अशी नोंद सापडते की, शिवाजी महाराजांचा युद्धादरम्यान मुस्लिम धर्मग्रंथ सापडले तर महाराज ते ग्रंथ सैन्यातील मुस्लिम सैनिकांस देऊन टाकीत असे. एक महत्वाची गोष्ट आपण रसिक मायबापांना लक्षात घ्यायला हवी की, आम्ही कलाकार मंडळी आहोत, इतिहास संशोधक नाही, त्यामुळे इतिहास संशोधकांनी केलेल्या इतिहास संशोधनावर आम्ही विश्वास ठेवून संवाद लिहीतो.
3) इतिहासाचं विकृतीकरण केलं…?
मुळात हा चित्रपट ऐतिहासिक नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक महापुरुषावरही आधारलेला नाही. हा चित्रपट पूर्णतः खालिद नावाच्या एक मुस्लिम मुलाचा छत्रपती शिवाजी महाराज समजून येण्याच प्रवास आहे. जो चित्रपट ऐतिहासिक नाही, तो चित्रपट इतिहासाच विकृतीकरण करू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. चित्रपटाच्या टीमला छत्रपती शिवाजी महाराज माणुसकी सर्वोपरी समजणारे, उच्च शुद्र असा भेद नसलेले, युगानूयुगांचा जनकल्याणाचा विचार देणारे रयतेचे कुळवाडी भुषण राजे होते असा विश्वास आहे.
महाराजांच्या याच गुणांना एका गोष्टीनुरूप तुम्हा मायबाप प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात झालेला आहे. महाराज कोण्या एका भौगोलिक स्थानापुरते, सामाजिक घटकापुरते मर्यादित आहे असे आम्ही दाखवले असते, तर ते इतिहासाचे विकृतीकरण झाले असते. कारण त्याने महाराजांची आभाळाइतकी उंची कमी करण्याचा प्रयत्न झाला असे म्हणता येईल.
आमच्या दृष्टीने महाराज हे केवळ एक व्यक्ती नाही तर विचार आहे, जो जगभरातल्या लोकांचा आदर्श आहे आणि ते भौगोलिक स्थानापुरते, सामाजिक घटकापुरते मर्यादित नाही असं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केल्याने यात इतिहासाचं विकृतीकरण नाही तर महाराजांची वैश्विक स्विकार्हारता दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
4) शिवाजी खालिदचा कसा असेल…?
"शिवाजी महाराज कोणाचे? ज्याला कळाले त्याचे" असा चित्रपटात दाखवलेला संवाद यासाठी बोलका आहे. महाराज केवळ एका राज्याचे, एका देशाचे किंवा एका खंडाचे नाही तर जगाचे आदर्श आहेत. जगभरातील प्रत्येकाला महाराज समजून घेण्याचा आणि त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार आहे. याचमुळे महाराज हिंदू-मुसलमान-इसाई बौध्द-गोरे-काळे-उंच-बुटके-स्त्री-पुरुष अशा सगळ्यांचेच आहे.
चित्रपटाची मांडणी करतांना एक मुस्लिम मुलगा महाराजांविषयी नेमका कशा पध्दतीने विचार करतो या कथेभोवती हा चित्रपट असल्याने ज्याला इतर कशाही पेक्षा माणुसकी सर्वश्रेष्ठ वाटते अशा प्रत्येकाचे ते असतील, हा विचार या चित्रपटात देण्यात आला आहे
आपण रसिक प्रेक्षक आमचे मायबाप आहात, चित्रपटातून आम्ही मनोरंजनाबरोबरच एक विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत आमच्यामागे कुणी मोठा स्टुडीओ नाही. कुणी मोठी संस्था नाही, तरीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर विश्वास ठेऊन आम्ही आमचा चित्रपट आपल्या सेवेत दाखल करीत आहोत.
चित्रपटावर मत व्यक्त करणं हा आपला अधिकार आम्ही शिरोधार्य मानतो आणि विनंती करतो की १२० मिनिटाच्या चित्रपटाविषयी ३ मिनिटांचा ट्रेलर बघून टीका करू नका. आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट बघितल्यावर आपल्याला नक्की आवडेल, चित्रपट बघितल्यावरही तो आवडला नाही तर मात्र नक्की टिका करा. आम्हाला विश्वास आहे की आमच्या तंत्रावर, कथामांडणीवर तुमचे आक्षेप असतीलही पण आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाहीत.
याउपरही आपल्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करता चित्रपटामुळे केवळ मनोरंजन व्हावं कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही या चित्रपटातील वादात आलेले संवाद त्वरीत काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वंदे मातरम, जय शिवराय…
'खालिद का शिवाजी'ची देश-परदेशातही चर्चा
विदर्भातल्या एका शाळेत पाचवीत शिकणाऱ्या खालिदला 'छत्रपती शिवाजी महाराजांबाबत' प्रश्न पडू लागतात. याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी खालिद त्याच्या भोवतालातील शिवाजी राजांचे उल्लेख धुंडाळून त्याचा स्वतःचा 'शिवाजी' शोधू लागतो. पाचवीतला खालिद एका सत्यशोधकाच्या भूमिकेतून त्याच्या प्रिय शिवाजी महाराजांना, महाराजांनी शिकवलेल्या जीवनमूल्यांना, त्यांनी दिलेल्या समतेच्या विचारणा शोधत असतो आणि याच शोधप्रवासात 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट तयार होतो.
विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक स्थानिक कलाकारांच्या सहभागातून तयार झालेला हा अस्सल वऱ्हाडी भाषेतला चित्रपट थेट कानमध्ये पोहोचला आहे. या चित्रपटाची गोष्ट उलगडून सांगताना ‘बीबीसी’शी बोलताना दिग्दर्शक राज मोरे म्हणाले, "पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुसलमान मुलाची ही गोष्ट आहे. खालिदला त्याच्या धर्मावरून त्याचे वर्गमित्र सतत चिडवत असतात.
त्याला सतत 'अफझलखान, अफझलखान' म्हणून चिडवलं जातं. यानंतर खालिदच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. त्याच्या बालसुलभ बुद्धीला मला याच नावावरून का चिडवलं जातं? शिवाजी नेमका कोण? असे प्रश्न पडू लागतात." खालिदला पडलेले प्रश्न तो केवळ स्वतःजवळ ठेवत नाही. त्याच्या सभोवारात, त्याच्या कुटुंबात तो या प्रश्नांची उत्तरं शोधू लागतो. आईला, आजीला हे प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आणि याच प्रवासात त्याला त्याचे त्याचे शिवाजी महाराज भेटतात. चित्रपट आणि सध्याची सामाजिक परिस्थिती याबाबत बोलताना दिग्दर्शक राज मोरे म्हणाले, "हा चित्रपट 2025चा आहे. या चित्रपटात आम्ही फक्त एखाद्या विशिष्ट धर्माबाबत, फक्त शिवाजी महाराजांबाबत बोललो नाही तर खालिदच्या एकूणच प्रवासाचं चित्रण यामध्ये आहे. खालिदला पडणारे प्रश्न या देशासमोरचे ज्वलंत प्रश्न आहेत, तुम्हा-आम्हाला रोज भेडसावून टाकणारे हे प्रश्न आहेत."
"सध्या शिवाजी महाराजांचा इतिहास बदलून, तोडून मोडून सांगण्याचा एक प्रघात पडला आहे. दुसरीकडे चिकित्सेच्या जोरावर, कष्ट घेऊन खरा इतिहास वाचणाऱ्यांचं, शोधणाऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. पुस्तकच मुळात कमी वाचली जात असताना, चित्रपटासारख्या मनोरंजक आणि लोकप्रिय माध्यमातून खरा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक महापुरुषांवर अनेक प्रकारच्या चित्रपटांची गर्दी झालेली असताना आम्ही 'खालिद का शिवाजी'च्या माध्यमातून खरे महाराज मांडण्याचा प्रयत्न केला आहे," असं राज मोरे म्हणाले.






