चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहूल कोरपना तालुक्यातील कारवाई हे २५ घरांचं पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेलं छोटंस गाव. या गावात अजूनही महामंडळाची बस येत नाही. मुख्य रस्त्यापासून जवळपास पाच कि.मी गावापर्यंत गावक-यांना पायी यावं लागतं. गावात इयत्ता चौथी पर्यंत शाळा, विद्यार्थी मात्र तीनच. शिक्षणाचे फारसे वातावरण नाही. शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय. त्यातही दरसाल पुराचा फटका या गावाला नित्यनेमे बसतो.
याच गावातील किसन प्रल्हाद आत्राम (वय ३८) या तरुणांची झेप मात्र शिक्षणापासून दुरावलेल्यांना प्रगतीची आस दाखवत प्रेरणादायी ठरणारी आहे. किसन अजूनही बारावी नापास आहे. मात्र मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा देत थेट पदवीला प्रवेश मिळवून राज्यशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेतून केंद्र शासनाच्या रेल्वे विभागातील गट-ड ची नौकरी मिळवून वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव रेल्वेस्थानकात आता ते कार्यरत आहेत.
शिक्षण थांबलं आणि शेतीत राबता झालो...
आई-वडील निरक्षर असलेल्या किसनचे शिक्षण पहिली ते तिसरीपर्यंत छोट्याशा कारवाई गावात झाले. चौथा वर्ग मात्र गावात नव्हता. मग चार किलोमीटरवर असलेल्या सांगोडा या गावातील जिल्हा परिषद शाळेत पायदळ वारी करत इयत्ता चौथीचे शिक्षण घेतले. नंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत आवाळपूर येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणाचं फारसं वलय नसलेला किसन इयत्ता दहावीत गणित आणि इंग्रजी या दोन विषयात नापास झाला. ते साल होते 2010. 'शिकून कुणाचं भलं झालं?' असं एकंदरीत गावचे वातावरण. त्यात आदिवासी कुटुंबातील किसनला ना कुणाची प्रेरणा ना मार्गदर्शन. पोरगा नापास झाला तर घरची कोरडवाहू शेती कसणार, असे आई-वडिलांनी ठरवले. किसन शेतीत राबू लागला. शेतात गुरे-ढोरे राखू लागला. गावातील पोरांचे शिक्षण थांबले की शेतीत राबावेच लागते; त्यामुळे मी ही राबता झालो, असेच किसन सांगतो.
शेतात मित्र भेटला आणि शिक्षण सुरु झाले...
किसन हा शेती कसत असला तरी वैचारिक परिपक्वता होती. महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वात रुजलेला होता. शेतात गुरे-ढोरे राखतांना किसन नेहमी पुस्तके सोबत न्यायचा. एक नजर गुरा-ढोरांकडे तर दुसरी नजर पुस्तकांकडे असायची. याच काळात 'कोल्हाट्याचं पोर', 'उपरा', 'बि-हाड', 'बलुतं' ही शून्यातून विश्व उभे करणारे दलित आत्मकथने किसनने वाचून काढली.
किसन प्रभावित होताच, मात्र मार्ग सापडत नव्हता. किसनच्या शेताला लागूनच सोनुर्ली येथील बांदुरकर यांचे शेत होते. गणेश बांदुरकर हा सुशिक्षित तरुण मित्र देखील शेतात यायचा. दोघांच्याही हातात पुस्तके. पुस्तकामुळेच शेतात दोघांची मैत्री घट्ट झाली. किसनची वाचनाची आवड व शिक्षणाबद्दलची ओढ गणेश बांदुरकर या मित्राने ओळखली. 'दहावी नापास असलो तरीही आपल्याला उच्च शिक्षणाचे पर्याय आहेत, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकची पदवी पूर्व परीक्षा देऊन आपण थेट पुढील शिक्षण घेऊ शकतो' याबद्दल माहिती दिली व शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तब्बल 5 वर्षाच्या अंतरानंतर किसने 2005 साली मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा दिली. किसन पास झाला.
दहावी नापास असतानाही चक्क बी.ए- प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. एकीकडे बी.ए चे शिक्षण सुरू असताना पाच वर्षाच्या अंतरानंतर दहावीची पुन्हा परीक्षा दिली 2007 साली दहावी उत्तीर्ण केली. शेतीची जबाबदारी असल्याने नियमित विद्यालयात जाऊन शिक्षण घेणे कठीण होते, एकीकडे बीए चे शिक्षण सुरू असताना अकरावीत एम.सी.व्ही.सी माध्यमात किसनने प्रवेश घेतला. मात्र शाळेत जाणे शक्य झाले नाही. 2009 साली किसनने बि.ए ची पदवी 50% गुण घेवून मिळवली. 2013 साली चंद्रपूरच्या आंबेडकर महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयात एम.ए चे शिक्षण 45% गुण घेवून पुर्ण केले. अजूनही बारावी नापास असलेल्या किसनने पदव्युत्तर शिक्षण मात्र एकही दिवस महाविद्यालयात न जाता थेट परीक्षा देत यशस्वी केले. किसन आणि गणेश हे दोघे शेतात गुरा-ढोरांच्या मागे फिरणारे जिवलग मित्र आता पदव्युत्तर व उच्चशिक्षित आहेत. मित्र गणेश बांदुरकर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे शिक्षक आहे. त्यांनी त्यांच्या सर्व विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व आदर्श शिक्षकाचा परिचय दिला आहे. किसनचा शैक्षणिक प्रवास मात्र अविश्वसनीय, थक्क व अचंबित करणारा आहे.
मायेच्या कष्टाची जाणीव आणि स्पर्धा परिक्षेत यश

किसनची आई ललिता यांना आपल्या लेकरावर खूप विश्वास. स्वतः अशिक्षित असूनही आपल्या मुलांनी शिकावं यासाठी त्या आग्रही होत्या. किसन शेती करत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. शिकत असताना कष्ट करूनच किसनला आपले शैक्षणिक शुल्क भरावे लागायचे. किसनने पोलीस भरतीसाठी बरेच प्रयत्न केले. राज्यसेवा व लोकसेवा आयोगाचीही परिक्षा दिली, मात्र त्यात अपयश आले. जेव्हा परीक्षेसाठी किसन बाहेर जायचा तेव्हा शेतीची पूर्ण जबाबदारी आई सांभाळायची. 2013 साली केंद्र शासनाच्या रेल्वे विभागात पदभरतीसाठी किसनने अर्ज केला. त्यासाठी अभ्यासही सुरू ठेवला. यात स्पर्धा परीक्षेतून ट्रॅकमन (गट-ड) या पदासाठी पात्र ठरुन यश मिळवले. किसन रेल्वे विभागात वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव या रेल्वे स्थानकात आपली सेवा देत आहे. आपल्या यशात मायेच्या कष्टाची जाणीव व कुटुंबिय, मित्रांचा मोठा हात असल्याची भावना किसन व्यक्त करतो.
साहित्यिक योगदान, अविरोध ग्रामपंचायत सदस्य ते गावातील ऐतिहासिक लेणीचे संशोधन...
किसन आत्राम हे संवेदनशील मनाचे तरुण कवी आहेत. 2012 साली त्यांचा 'अंगार आणि शृंगार' हा प्रातिनिधीक कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. ग्रामीण जीवन जाणिवा आणि वास्तव यांचा वेध घेणाऱ्या कवितांची निर्मिती त्यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा-कोरपणा-जिवती या आदिवासीबहुल परिसरात 2010 साली अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानची समविचारी मित्रमंडळींनी स्थापना केली. या प्रतिष्ठानद्वारे राज्यस्तरावर तीन अभंग साहित्य संमेलने झाली. यात किसन आत्राम यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. लोकमतच्या तालुकास्तरिय महोत्सवात काव्यवाचन स्पर्धेत प्रथम व जिल्हास्तरिय स्पर्धेत तृतीय पारितोषिकही पटकावले होते. राज्यस्तरिय राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलन व इतर साहित्य संमेलनातही निमंत्रित कवी म्हणून किसनने छाप सोडली आहे.
2010 साली किसनला गावकऱ्यांनी अविरोध गट ग्रामपंचायत सांगोडा येथे गावचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले. सुशिक्षित व धडपडणारा तरुण म्हणून किसनने गावात व परिसरात आपली ओळख निर्माण केली. ग्रामपंचायत सदस्य असताना छोट्याशा गावात पहिल्यांदाच सोलर पाणीपुरवठा करण्यात किसनला यश आले. मात्र रेल्वे विभागात नोकरी मिळवल्याने पुढील तीन वर्षातच 2013 मध्ये ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला. किसनच्या कारवाई गावात सातवाहनकालीन महायान पंथीयांची प्राचिन व ऐतिहासिक गुहा आहे. साधारणत: एक हजार वर्षापेक्षाही जूनी ही ऐतिहासिक गुहा दुर्लक्षित होती. किसन आत्राम यांनी चंद्रपूरचे खगोलतज्ञ प्रा.सुरेश चोपने व इतिहासतज्ञ अशोकसिंह ठाकूर यांना संपर्क साधून या ऐतिहासिक गुहेचा इतिहास पुढे आणला. पुरातत्व विभागाने दखल घेवून जतन व संवर्धन करण्याची मागणीही केली.
ग्रामीण तरुणांना किसन ठरतोय प्रेरणादायी...
गावगाड्यात किसन आत्राम यांच्यासारखे प्रचंड उर्जा असलेले अनेक तरुण आहेत. पुरेसे शिक्षण नसल्याने किंवा नापास झाल्याने त्यांचे शिक्षणच सुटले आहे. परिणामी जगण्याशीच संघर्ष करावा लागतो. आपला आत्मविश्वास व इच्छाशक्तीच्या बळावर किसन आत्राम यांनी दहावी नापास असूनही मुक्तविद्यापिठातून शिक्षण घेतले. शेती केली. साहित्यात योगदान दिले. गावात अविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले. विशेषत: स्पर्धा परिक्षेतून यश मिळवून रेल्वे विभागात नोकरीही मिळवली. ग्रामीण तरुणांना स्वतःच्या क्षमता विकसित करुन प्रेरणा घेण्याची गरज आहे. किसन आत्राम यांचा शैक्षणिक प्रवास व कार्य ग्रामीण तरुणांना प्रेरणादायी ठरत आहे.






