जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहर शनिवारी दुपारी घडलेल्या हत्याकांडाने हादरून गेले आहे. 21 वर्षीय सुलेमान पठाण हा दहा-बारा हल्लेखोरांच्या निर्दयी मारहाणीचा बळी ठरला. उघड्यावर झालेल्या या भयानक हत्याकांडाने शहर हादरून गेले असून गल्लीबोळात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली असली तरी नागरिकांच्या मनातील अस्वस्थता अजूनही कायम आहे.
नेमकं प्रकरण काय?
11 ऑगस्ट 2025 रोजी बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथील 21 वर्षीय सुलेमान रहिमखाँ पठाण पोलीस भरतीचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सकाळी जामनेरला गेला होता. दुपारी साडेचार वाजता जामनेरच्या ब्रँड कॅफेबाहेर अभिषेक राजपुत, रणजीत माताडे, आदित्य देवरे, सोज्वळ तेली, कृष्णा तेली यांच्यासह 10 ते 12 साथीदारांनी सुलेमानला विवस्त्र करून लोखंडी रॉड, लाठ्या व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व मोबाईल हिसकावला.
आरोपींनी त्याला ओढत नेऊन बेटावद खुर्द बसस्टँडवर पुन्हा मारहाण केली. या वेळी सुलेमानचे वडील, आई व बहीण त्याला वाचवण्यासाठी आले असता त्यांच्यावरही मारहाण व शिवीगाळ करण्यात आली, तसेच “आज यांना सोडणार नाही” अशा धमक्या दिल्या. घटनास्थळी काही गावकरी जमल्याने आरोपी पळून गेले. गंभीर जखमी सुलेमानला घरी नेऊन कपडे घालण्यात आले, तेव्हा त्याने वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला.
सुलेमानची तब्येत अधिक खालावल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हल्ल्यामुळे परिसरात तणाव पसरला असून पोलिसांनी नामोल्लेखित पाच आरोपींसह 10 - 12 अज्ञातांवर खून, मारहाण व धमकीचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमागे प्रेमसंबंधांचा वाद, धार्मिक तणाव आणि मॉब लिंचिंग अशा विविध शक्यता पोलिस तपासात आहेत.
जामनेर येथील पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "या घटनेत 12 संशयितांची नावे तपासादरम्यान समोर आली आहेत. त्यापैकी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. बाकी आठ आरोपींचा तपास आम्ही करत आहोत. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. लवकरच उर्वरित आरोपीही पोलिसांच्या ताब्यात असतील. तोपर्यंत नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा आपल्या हातात घेऊ नये."
"तो मुस्लिम असल्याकारणाने त्याचा जीव घेतला..."
वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा पदाधिकारी राहुल इंगळे यांनी बाईमाणूसशी बोलताना सांगितले की, "जामनेर मधील ब्रँड कॅफेमध्ये सुलेमान हा एका मुलीसोबत बसलेला होता. सुलेमान मुस्लिम असल्याकारणाने एवढा मोठा प्रकार घडल्याचा संशय आहे. मी स्वतः शनिवारपासून या घटनेचा मागोवा घेत आहे.
काही प्रत्यक्षदर्शींशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की कॅफेमध्ये तो मुलगा फक्त बसलेला होता. त्या कॅफेच्या बाहेर 10 ते 12 जणांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर बसस्टँडवर नेऊनही मारहाण करण्यात आली. एवढी मारहाण झाल्यानंतरही तो जखमी अवस्थेत घरी गेला. त्याचा पाठलाग करत आरोपींनी त्याच्या दारातही मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले."






