- शैलजा तिवले
“पाणी जोरात आलं की चूल विझते.” मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील शिरपूर गावात आपल्या झोपडीबाहेर मातीची चूल वाळवत बसलेली 27 वर्षीय रेखा असोले सांगते. “अनेकदा भूक लागलेली असतानाही उपाशीच झोपावं लागतं,” ती ‘101 रिपोर्टर्स’शी बोलताना म्हणाली.
भारतीय हवामान खात्याच्या मते, वर्धा जिल्ह्यात मेच्या पहिल्या आठवड्यात 106 मिमी पावसाची नोंद झाली जो या दशकातील मे महिन्यातील सर्वाधिक पाऊस होता. विदर्भातील नंद गवळी समाजातील रेखा असोलेसारखे कुटुंब, जे दरवर्षी नियमीत स्थलांतराच्या काळात, ज्याला ‘वऱ्हाड’ म्हणतात, पत्र्याच्या छपराच्या झोपड्यांमध्ये मोकळ्या शेतीवर राहतात, अशा अचानक पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या संकटात सापडतात.
असोलेचे मूळ गाव वर्धा जिल्ह्यातील चोपन असून ती दरवर्षी उन्हाळ्यात आपल्या कुटुंबासह व जनावरांसह सुमारे 27 किलोमीटर अंतरावर शिरपूर येथे स्थलांतर करते. “आम्ही एक छोटा गॅसस्टोव्ह आणला होता, त्यामुळे काही पोळ्या करून उरलेली भाजी खाल्ली,” ती सांगते. सामान्यतः स्त्रिया बाहेर स्वयंपाक करतात. लहानशा झोपड्यांमध्ये माणसं आणि चूल दोन्ही बसत नाहीत. पाऊस आला की त्या मातीच्या चुलीवर भांडी किंवा प्लास्टिक टाकून झाकतात, पण ओलावा आत शिरतोच.
भिजलेल्या चुलीला आग लागणे कठीण; आणि जर लाकूड किंवा शेतीतील कचरा ओला झाला असेल, तर काम अधिकच कठीण. “कधी कधी आम्हाला आग लावण्यासाठी जुने कपडे किंवा प्लास्टिक जाळावं लागतं,” वर्धा जिल्ह्यातील दानापूर येथील २३ वर्षीय राजकन्या साठे सांगते. “धूर इतका होतो की श्वास घेणंही अवघड होतं. फुंकून फुंकून छाती भरून जाते.” असोले जोडते, “वऱ्हाडात काहीच सुख नाही. ना पाण्याचं, ना ऊन्हाचं – दोन्हीं गोष्टी दिलासा देत नाहीत.”
भिजलेले उत्पन्न
हवामानाचा फटका केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित नाही. दूध खराब झालं की थेट उत्पन्नावर परिणाम होतो. कारण नंद गवळी कुटुंबांचा मुख्य उदरनिर्वाह हाच दुधावर अवलंबून आहे. असोलेचे कुटुंब दरवर्षी वऱ्हाड करणाऱ्या सुमारे 700 घरांपैकी एक आहे. विदर्भातील मूळ रहिवासी असलेले नंद गवळी देशी वंशाच्या गवळाऊ गायी आणि नागपूरी म्हशी पाळतात. फेब्रुवारी ते जून या कोरड्या महिन्यांत चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे ते जनावरांसह सुमारे 25 किमी चालत स्थलांतर करतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर तात्पुरते तळ ठोकतात. त्यांच्या शेणखताच्या मोबदल्यात त्यांना चरण्याचा हक्क आणि पाण्याचा वापर मिळतो.
या चराऊ अर्थव्यवस्थेचा कणा फक्त जनावरांवर नाही, तर स्त्रियांवरही अवलंबून आहे. पुरुष जनावरांची देखभाल करतात, तर स्त्रिया तळ सांभाळतात. स्वयंपाक करतात, मुलं आणि वासरांची काळजी घेतात, आणि दुधापासून तूप, लोणी, खवा तयार करतात. खवा हे दुधाच्या तुलनेत जवळपास दुप्पट किमतीत विकले जाते. मात्र मुसळधार पावसात खवा बनवणं जवळपास अशक्य होतं.
एका कुटुंबाच्या जनावरांकडून रोज सुमारे 30 लिटर दूध मिळतं, आणि ते उकळून खवा बनवण्यासाठी पाच तास सलग हलवावं लागतं. एका पावसानं सारी मेहनत वाया जाते. “दूध जर तळाला लागलं किंवा जळलं, तर खव्याला धुराचा वास येतो आणि कोणी मग ते विकत घेत नाही,” असोले म्हणाली. दानापूरच्या 43 वर्षीय लिला साठे सांगतात, “मी रोज साधारण २ किलो खवा करते. पण ज्या दिवशी बनवू शकत नाही, त्या दिवशी 700 ते 800 रुपयांचं नुकसान होतं.”
उन्हात भाजलेले आयुष्य
पावसामुळे उत्पन्न बुडतं, तर ऊन्हामुळे आरोग्य धोक्यात येतं. या वर्षी एप्रिलमध्ये वर्ध्याने 44.7°C तापमान नोंदवलं जे राज्यातील सर्वाधिक तापमानांपैकी एक होतं. महिलांनी थकलेल्या शरीरांची, डोकेदुखीची आणि लघवी करताना होणाऱ्या जळजळीची तक्रार केली. ही सर्व निर्जलीकरणाची चिन्हं आहेत. “खवा बनवताना असं वाटतं, जणू शरीरातील रक्तच सुकतं,” राजकन्या साठे सांगते. 
काही स्त्रिया दिवसातून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी खवा तयार करतात. रेखा असोलेचा दिवस सूर्योदयाआधीच सुरू होतो. ती आदल्या दिवसाचं दूध आंबवते. मग लोणी घुसळते, ताक वेगळं करते, आणि ताजं दूध, दही कॅनमध्ये भरते. यानंतर ती मोठ्या चुलीवर कढईत दूध उकळून खवा घोटायला सुरूवात करते. “सूर्य वर आला की चुलीजवळ बसणं अशक्य होतं,” ती म्हणते. या कामात पाच तासांपर्यंत सतत चुलीच्या धगीत बसावं लागतं.
गवताच्या छपराखाली असतानाही उष्णतेचा त्रास कमी होत नाही. अनेक स्त्रिया चक्कर येणे किंवा मळमळ होणे याचा अनुभव सांगतात, पण काम थांबत नाही. “आम्ही थोडं औषध घेतो, डोक्यावर शाल गुंडाळतो आणि पुन्हा काम सुरू करतो,” 58 वर्षीय मीराबाई अवथळे सांगतात. “मी नाही केलं, तर घर, दूध, खवा कोण सांभाळणार?”
स्थलांतराच्या काळात अशी कुटुंबं गावांपासून दूर शेतांवर राहतात. त्यांना आशा कामगार किंवा प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध नसते. मे महिन्याच्या सुरुवातीला नंद गवळी समाजातील २६ वर्षीय एका महिलेचा अशाच एका ठिकाणी अचानक मृत्यू झाला. ती त्या वेळी एकटीच होती. “लोक म्हणतात, ती दुपारच्या उन्हात काम करत होती, त्यामुळे असं झालं असावं,” असे ‘गवळाऊ ब्रीडर असोसिएशन’चे प्रफुल्ल कालोकर सांगतात. “पण शवविच्छेदनाशिवाय नक्की कारण समजू शकत नाही. अशा घटना टाळण्यासाठी लोकांना हवामानाशी संबंधित जोखमी आणि त्यावरील प्रतिबंधाबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे.”
हवामानाशी एकटी झुंज
गवळी समुदायातील महिलांनी सांगितले की, त्यांना उष्णतेचा शरीरावर होणारा परिणाम फारसा माहीत नाही. त्यांना ऊन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे किंवा त्यापासून बचाव करण्याचे उपाय माहित नाहीत. ‘प्रयास हेल्थ ग्रुप’च्या वरिष्ठ संशोधन फेलो ऋतु पर्चुरे यांनी सांगितलं की तीव्र उष्णतेमुळे शरीरातील अनेक अवयवांवर ताण येऊ शकतो, विशेषतः ज्यांना आधीच काही आजार आहेत त्यांच्यावर. “अनेक मृत्यू हे उष्णतेमुळे वाढलेल्या हृदय, फुफ्फुसे किंवा मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे होतात. धुराचा आणि उष्णतेचा दीर्घकाळ सामना करणाऱ्या महिलांना या जोखमींबाबत जागरूक करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
अशा लिंगाधारित आरोग्य परिणामांनंतरही, हवामानविषयक धोरणांमध्ये त्याचा विचार क्वचितच केला जातो. ‘द लॅन्सेट’ मधील एका अभ्यासात नमूद केलं आहे की जागतिक हवामान प्रशासनाच्या यंत्रणांमध्ये अजूनही स्त्रियांच्या विशिष्ट आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते, जरी जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी संस्थेने या मुद्द्यांची दखल घेतलेली असली तरी.
आणखी एका अभ्यासात असंही म्हटलं आहे की हवामान बदलाचा परिणाम स्त्री आणि पुरुषांवर वेगळा होतो. जैविक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांमुळे आणि भारतासारख्या देशांमध्ये तो विद्यमान लिंगाधारित आरोग्य विषमता आणखी वाढवू शकतो. अभ्यासानुसार, हवामान आणि आपत्ती व्यवस्थापन धोरणांमध्ये लिंगाचा समावेश केल्यास या आरोग्य जोखमी कमी करता येऊ शकतात.
विषम जोखीम
गवळी समुदायातील महिलांसाठी आरोग्याच्या जोखमी जास्त आहेत, पण आर्थिक परतावा मात्र मर्यादित आहे. दूध बाजारात विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये रूपांतर करण्याचं आणि विक्रीचं बहुतेक काम महिलाच करतात, तरीसुद्धा तरुण महिलांच्या हातात आर्थिक नियंत्रण क्वचितच असते. “महिला दूध किंवा खवा विकायला बाहेर गेल्या तरीही, पैसे हाताळण्याचे काम प्रामुख्याने वयस्कर महिलांकडेच असते,” असे ‘गवळाऊ ब्रीडर असोसिएशन’चे प्रफुल्ल कालोकर यांनी सांगितले. “तरुण सुनांना मिळकतीचा वापर कसा करायचा यावर मत देण्याचा फारच कमी अधिकार असतो.” कालोकर यांच्या मते, स्थलांतराच्या हंगामात एका कुटुंबाचे सरासरी उत्पन्न दरमहा 40,000 ते 50,000 रुपये असते.
पण चाऱ्याचा आणि जनावरांच्या औषधोपचाराचा खर्च वजा केल्यानंतर नफा जवळजवळ निम्मा राहतो. उष्णतेमुळे या ओझ्यात भर पडते. टिनच्या छपरांच्या झोपड्यांमध्ये सकाळी दहानंतर बसणंही अशक्य होतं. “दहा वाजल्यानंतर आत बसताच येत नाही, आतून भट्टीसारखं वाटतं,” असं असोलेंची सासू, सिताबाई (65) सांगतात. त्यांच्या कुटुंबाला दिवसाढवळ्या छपराच्या झोपडीत रहावे लागते, पण उन्हाळ्याच्या कडक दिवसांत त्यातून फारसा दिलासा मिळत नाही.
वाढत्या तापमानाचा परिणाम जनावरांवरही होतो. जनावरे मोकळ्या शेतात बांधलेली असतात, आणि पुरुष त्यांच्या देखरेखीकरिता तात्पुरत्या शेडमध्ये राहतात. पण त्यांची खरी काळजी घेण्याचे काम महिलांकडेच असते. “जनावरे आजारी पडली की त्यांना खाऊ घालायचे, औषध द्यायचे, आणि लक्ष ठेवायचं हे आमचंच काम असतं,” रेखा असोले सांगतात. वासरांना झोपडीजवळ बांधलेलं असते, त्यामुळे दुपारी सावली, पावसात आसरा, आणि नेहमी पाण्याची सोय ठेवणे ही अतिरिक्त कामं महिलांनाच करावी लागतात.
‘द लॅन्सेट’ मधील एका अभ्यासाने रेखा सारख्या स्त्रियांना आधीपासूनच माहीत असलेलं सत्य अधोरेखित केलं आहे, ते म्हणजे तीव्र उष्णतेमुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, भूक घटते आणि आजाराचा धोका वाढतो. ‘सेंटर फॉर पीपल्स ऑर्गनायझेशन’चे संचालक, सजल कुलकर्णी सांगतात की नंद गवळींसारखे गवळी समुदाय हवामान बदलांसाठी विशेषतः असुरक्षित आहेत.
“बदलत्या हवामानामुळे चरणे, स्थलांतराचे मार्ग आणि जनावरांचे आरोग्य विस्कळीत होत आहे,” असे त्यांनी सांगितले. “या समुदायांमध्ये जनावरांच्या आजारांचे आकडे उपलब्ध नसल्यामुळे योग्य आरोग्य सहाय्य व्यवस्था तयार करणे कठीण जाते.”
आक्रसणारे संतुलन
कुटुंबाचं उत्पन्न सांभाळण्याबरोबरच, असोलेसारख्या बायकांवर स्थलांतराच्या जागेवरील सर्वांच्या कल्याणाची जबाबदारीही असते. शाळेचा हंगाम असताना केवळ वयस्कर महिला गावात राहतात. सुट्ट्या लागल्या की संपूर्ण गावातील कुटुंबे पुरुषांसोबत निघतात. “गुरांसाठी माणूस लागतो, घरचं काम करायला बाई लागते,” असोले म्हणतात.
हे सर्व त्या काळात घडत आहे, जेव्हा स्थलांतर स्वतःच वर्षानुवर्षे अधिक कठीण बनत आहे. चरण्यासाठीची जमीन कमी होणे, जंगलांमध्ये प्रवेश मर्यादित होणे, आणि शेतकऱ्यांशी बदलती नाती यामुळे कुटुंबांना जुन्या मार्गांवर टिकून राहणे अवघड जात आहे. “पूर्वी शेतकरी आमच्याकडून शेणखतासाठी स्वतः पैसे देऊन आम्हाला त्यांच्या जमिनीवर राहायला बोलवत असत,” रेखाचे सासरे, रामरावजी असोले (75), सांगतात. “आता ते फक्त कुठं राहायचं ते सांगतात, पैसे देत नाहीत आणि पाऊस जास्त झाला की लवकर निघून जा असं सांगतात.” या बदलांची कोणतीही औपचारिक नोंद उपलब्ध नाही.
गवळाऊ ब्रीडर असोसिएशनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि कारंजा तालुक्यांतील 357 कुटुंबांचे स्थलांतर नोंदवले आहे, पण अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांतील स्थलांतराची कोणतीही अधिकृत नोंद नाही. भारतातील चराऊ जीवन बहुधा पुरुष गुराख्यांच्या प्रतिमेतून पाहिले जाते, पण या जीवनशैलीतील अदृश्य श्रम आणि आता हवामान बदलाचे ओझे देखील विषम प्रमाणात बायकांवरच पडत आहे.
(This story was originally published by 101Reporters)
मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी क्लिक करा…


