(संजना खंडारे)
देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या त्रावणकोरमध्ये साधारण अठराव्या शतकात जात उतरंडीत सगळ्यात खालच्या स्तरावर असलेल्या महिलांना स्वतःचे स्तन झाकण्यासाठी मनाई होती. स्तन झाकायचे असतील तर त्यांना द्यावा लागायचा कर. या अमानुष प्रथेविरोधात आवाज उठवला नांगेलीने.
ही लढाई चन्नार क्रांती म्हणजेच ‘मरु मक्कल समारम’ म्हणून ओळखली जाते. नांगेलीने व्यवस्थेविरोधात पुकारलेल्या बंडाची गाथा सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होती. मात्र, 2016 साली न्यायालयाने स्वतःचे शरीर झाकण्याचा नैसर्गिक अधिकार व तो मिळवण्यासाठी झालेली ही क्रांती याबद्दलचा हा आक्षेपार्ह वृत्तात अभ्यासक्रमातून काढण्याचे आदेश दिले.
दलित महिलांना त्यांचे स्तन झाकण्यास मनाई
तिचं नाव नांगेली. मुळातच बंडखोर, गाव त्रावणकोरमध्ये चेरथाला. नांगेली व तिचा जीवनसाथी चिरुकंदन दोघेही एझवा जातीचे म्हणजे ताडी गाळणारे कष्टकरी. समाजाच्या विषम उत्तरंडीतील अशा अवघड पायरीवरचे. या भागात अत्यंत लाजिरवाण्या प्रथेचे प्रचलन होते.
या पट्ट्यात एझावा, शानर नडार, थिया या मागासवर्गीय जमाती नय्यर या तथाकथित उच्चवर्णीयांच्या अधिपत्याखाली गुलामीत राहत होत्या. या जमातीतील स्त्री व पुरुषांना नय्यर समाजातील तथाकथित उच्चकुलीन राज्यकर्त्या पुरुषांचा आदरसन्मान म्हणून कमरेवरील भाग निर्वस्त्र ठेवावा लागत असे.
जितके मोठे स्तन तितका जास्त कर
मंदिरात पुजाऱ्यांसमोर कमरेवरील भाग निर्वस्त्र ठेवण्याची ही प्रथा खरे तर सर्व महिलांसाठी होती, पण कथित उच्चवर्णीय आपल्या महिलांना सोयीस्करपणे यापासून दूर ठेवीत. पण दलित महिलांवर शतकानुशतके या प्रथेमुळे शारीरिक व मानसिक अत्याचार होत राहिले. तथाकथित संस्कृती रक्षक लांब काठीला चाकू बांधून फिरत.
स्त्री पूर्ण वस्त्रांत दिसली तर तिचे वस्त्र फाडून तिला नग्नावस्थेत स्तनांना लटकावून ठेवले जात. त्याहूनही भयंकर म्हणजे, स्त्रियांना शरीर झाकायचे असल्यास त्यासाठी 'मुलाक्करन' नामक कर द्यावा लागत असे 'मुलावकरन कर' म्हणजे छाती झाकण्यासाठी द्यावयाचा कर. जितके मोठे स्तन तितका जास्त कर.
अन्यायकारक कराचा निषेध म्हणून दलित नांगेलीनं कापले स्वतःचे स्तन
या प्रथेविरुद्ध बंड करणारी नांगेली ही पहिली दलित महिला. नांगेली पूर्ण अंग झाकून लोकवस्तीत गेल्याने अधिकारी तिला कर देण्याची जबरदस्ती करू लागला. आधीच राज्यकत्यांच्या विविध कारणांमुळे पिचलेली नांगेली व तिचा परिवार हा कर देण्यास असमर्थ होते. नांगेलीने विरोध दर्शवण्यासाठी स्तन कापून त्या अधिकाऱ्यास केळीच्या पानात अर्पण केले.
अधिकारी घाबरून निघून गेला, पण अति रक्तस्त्रावाने नांगेली मरण पावली. नांगेलीच्या हृदयद्रावक निषेधानंतर या जमातीतील स्त्रियांत या प्रथेविरुद्ध असंतोष खदखदत गेला. त्याची परिणती म्हणून या प्रथेविरुद्ध नंतरच्या काळात नादर जमातीतील स्त्रियांनी बरीच आंदोलन केली. पाच दशकांच्या लढ्यानंतर 26 जुलै 1859 रोजी त्रावणकोरच्या राजाने हा कायदा रद्द केला.
इतिहासात उल्लेख नसताना नांगेलीची कथा कशी समोर आली?
नांगेलीची कथा योगायोगानेच समोर आली. काही वर्षांपूर्वी कलाकार मुरली टी एका स्थानिक बॅंकेचं मासिक सहज चाळत होते. तेव्हा त्यांना केरळमधल्या चेरथला गावातल्या एकानं त्या दलित स्त्रीसंदर्भात लिहिलेला एक छोटा लेख दिसला. त्या लेखाने त्यांचं कुतूहल चाळवलं. त्यांनी छोट्याशा आणि निवांत अशा चेरथला गावाला जायचं ठरवलं.
"मी तिथे स्थानिकांबरोबर खूप वेळ घालवला. मला ती जागाही सापडली जिथे नांगेली शंभर वर्षांपूर्वी राहात होती असं म्हणतात. नांगेली राहायची त्या गावाला मुलाच्छीपुरम किंवा स्तन असणाऱ्या स्त्रियांचा प्रदेश असं नाव दिलं आहे. स्तनांवर लादलेल्या कराविरुद्ध नांगेलीने आवाज उठवला आणि जे बलिदान दिलं त्याची आठवण म्हणून हे नाव दिलं आहे," अशी माहिती मुरली टी. देतात. मुरली टी हे घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नांगेलीच्या कहाणीने ते इतके हेलावले की, त्यांनी तिची कथा चित्ररूपात मांडायच ठरवलं. "मला कुठलीही रक्तरंजित गोष्ट चितारायची नव्हती. उलट तिच्या बलिदानाचं उदात्तीकरणं करणं हा माझा उद्देश होता, ज्यामुळे सगळ्यांना प्रेरणा मिळेल", मुरली म्हणाले.
ही ती लोककथा आहे जिचा भारताच्या इतिहासात कागदोपत्री कुठेही उल्लेख नाही. पण मुलाच्छीपुरमच्या गावकऱ्यांना मात्र नांगेलीचा अभिमान आहे. मुरलींची इच्छा आहे की, या कथेचा ऐतिहासिक दस्तावेजात समावेश व्हावा आणि केरळ सरकारने या घटनेचा राज्याच्या इतिहासात समावेश करावा. त्यांनी काढलेली नांगेलीची चित्रं त्यांच्या 'Amana - The Hidden Picture of History' या पुस्तकात प्रकाशित झाली आहेत. त्यांनी या चित्रांची 15 प्रदर्शनंही आजवर केरळमधे आयोजित केली आहेत आणि चेरथलात अजून एक सार्वजनिक प्रदर्शन आयोजित करण्याचा त्यांचा विचार आहे.
नांगेलीचे जिवंत असणारे वंशज काय म्हणतात?
नांगेलीच्या बलिदानाविषयी फारसं कोणाला माहिती नाही याचं तिच्या वंशजांना वाईट वाटतं. मणियन वेलुला - नांगेलीच्या चुलत भावाचा पणतू - म्हणाला, "नांगेलीने त्रावणकोरच्या महिलांसाठी बलिदान दिलं. तिच्या बलिदानानं राजाला हा अन्यायकारक कर मागे घेण्यास भाग पाडलं." आज म्हाताऱ्या मणियन यांच्याकडे स्वतःची जमीन नाही. त्यांची मुलं शेतमजूर म्हणून काम करतात. पण त्यांना दयेची भीक नको आहे. काय घडलं याची दखल घेतली जावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. "नांगेलीच्या परिवाराचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जास्तीत जास्त लोकांना तिच्या बलिदानाविषयी कळावं इतकीच आमची अपेक्षा आहे. तिचं नाव इतिहासात असायला हवं", मणियन म्हणतात. चन्नार क्रांतीला विसरून चालणार नाही. आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपल्या समाजात जातीच्या नावावर दलित, अल्पसंख्यंक, स्त्रिया यांच्यावर किती अत्याचार झाले. त्याविरोधात लोकांनी लढा दिला तेव्हा त्यांना सन्मानाने जगण्याचे अधिकार मिळाले आहेत. ज्या गोष्टी आज आपल्याला साध्या सामान्य वाटतात त्या मिळवण्यासाठी लोकांनी कधीतरी प्रचंड लढा दिला आहे त्याची जाणीव आपल्याला हवी. ती नसेल तर आपण पुन्हा त्याच जुन्या खोट्या ढोंगी क्रृर समाजाकडे वाटचाल करत राहू, कधी धर्माच्या नावाखाली कधी जातीच्या नावाखाली.






