भारताच्या स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या आईपणाच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. अलीकडेच आई म्हणून तिच्या आयुष्याची एक झलक तिने दाखवली. ज्यामध्ये तिने तिच्या गर्भधारणेचे, स्तनपानाच्या संघर्षांचे आणि तिच्या निवृत्तीसंदर्भातील अनेक गोष्टींचे खुलासा केले.
मी आणखी तीन वेळा गर्भवती होईन, पण स्तनपान…?
एका पॉडकास्टमध्ये बोलताना सानिया मिर्झाने आईपणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ब्रेस्टफिडिंगचा तिचा अनुभव सांगिला. ती म्हणाली की, “"मी अडीच ते तीन महिने स्तनपान केलं. माझ्यासाठी, तो गरोदरपणाचा सर्वात कठीण काळ होता. मला वाटतं, मी आणखी तीन वेळा गर्भवती होईन, पण स्तनपान करताना, मला माहीत नव्हतं की, मी ते करू शकेन की नाही. माझ्यासाठी, हा शारीरिक पैलू नव्हता तर भावनिक आणि मानसिक पैलू होता. जो पूर्णपणे थकवून टाकत होता. वर्किंग वुमन म्हणून, ते तुम्हाला बांधून ठेवतं. लहान मुलं त्यावर खूप अवलंबून असतात, वेळ पाळावी लागते, पुरेशी झोप नसते आणि तुमची सर्व कामं ब्रेस्टफिडिंगच्या टाईमटेबलभोवती केंद्रीत असतात."
सानियाने पहिल्यांदाच तिच्या बाळापासून वेगळे होण्याच्या भावनिक आव्हानाबद्दल सांगितलं. ती म्हणाली की “मी पहिल्यांदाच इज़हानला सोडून गेले होते तेव्हा तो फक्त सहा आठवड्यांचा होता. मला दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं आणि तो सर्वात कठीण विमान प्रवास होता. मी गोंधळून गेले होते. जरी मला माहित होते की अनेक माता यातून जातात. तरीही, अपराधीपणाची भावना माझ्या मनात तीव्र होती.कधी कधी आपण स्वतःवर अनावश्यक भावनिक भार टाकतो ज्याला लोकं आता ‘मदर गिल्टी’ म्हणतात’.
वर्किंग वुमन आणि स्तनपान… तारेवरची कसरत
सानिया मिर्झाच्या या अनुभवांमुळे वर्किंग वुमन आणि स्तनपान हा विषय किती महत्वाचा आहे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. लग्नानंतर बाळ झाल्यानंतर विशेषतः आजच्या तरुणीं घरी बसण्यापेक्षा ऑफिसला जाणे अधिक पसंत करतात. परंतु त्याचसोबत त्यांना घर ही सांभाळायचे असते. त्यामुळे त्यांच्यावर पुरुषांपेक्षा अधिकची जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे त्यांची अधिक तारांबळ होत असते. असं असतानाही त्या सर्वोतोपरी आपली जबाबदारी निभावतात.
पण, जेव्हा तीच महिला गरोदर किंवा नवीन माता होते तेव्हा मात्र यामध्ये अधिक अडचणी वाढतात. यामध्ये नवीन मातांना एकतर आपल्या बाळाची काळजी घ्यावी लागते किंवा ऑफिस. दोन्ही एकाचवेळी सांभाळणे कठीण असते, त्यात सुरुवातीच्या काळात बाळाला स्तनपान करणे अत्यंत गरजेचे असल्याने सहसा ऑफिसला मुकावे लागते.
संबंधित लेख वाचा: 1) बदलत्या लाइफ स्टाईलमुळे तरुणींमध्ये वाढतोय स्तनांचा कर्करोग |
स्तनपान बाळासाठी का महत्वाचं असतं?
प्रत्यक्षात मातांनी स्तनपान बंद करू नये. कामाच्या तासांमध्ये स्तनपान किंवा अंगावरील दूध काढून ठेवण्यासाठी आवश्यक वेळ आणि सुविधा कामाच्या ठिकाणी असल्या पाहिजे. त्यासाठी नियोजन करावे. आईचे दूध नवजात बालकांसाठी जीवनदायी असते. आईचे दूध बाळासाठी जेवढे फायदेशीर आहे तितके गाय, म्हैस किंवा पावडरचे दूध नसते. कारण त्यात तितके पोषक तत्वे नसतात. आईच्या दुधात पोषक तत्वे असतात.
आईचे दूध पचनास हलके असते. या दुधात अधिक रोगप्रतिकारक शक्ती असते. आईच्या दुधाचे तापमान योग्य असते. या दुधामुळे स्थुलता, रक्तदाब, मधुमेह या रोगांपासून बचाव होतो. गरोदरपणात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. बांधा सुडौल होतो. स्तनांच्या, गर्भाशयाच्या, अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. पाळणा लांबतो.
आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात असतात. आईच्या दुधाचे तापमान योग्य असते. हे दूध निर्जंतुक असते. कारण ते आईच्या स्तनातून सरळ बाळाला मिळते. आईच्या दुधामुळे बाळाची रोगप्रतिकारक्षमता चांगली होते. यामुळे न्यूमोनिया, जुलाब, दमा, अॅलर्जी इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. आईच्या दुधावर वाढणार्या मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता जास्त असते. भावी आयुष्यात स्थुलता, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या रोगांपासून संरक्षण मिळते. तसेच, काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण होते.
पहिलं स्तनपान कधी?
प्रसुतीनंतर लवकर स्तनपानाला सुरुवात केल्याने गर्भाशयाचे आकुंचन होऊन पूर्वस्थितीत येण्यास मदत होते. गरोदरपणाने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. स्तनपान सुलभ असते. त्यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची गरज नसते. मातेला उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळते. प्रसूतीनंतर पहिले दोन ते तीन दिवस दूध येत नसले तरी चिकाच्या स्वरुपात दूध येते. या दुधाचे प्रमाण कमी असले तरी ते पौष्टिक असते.
या दुधात रोगप्रतिकारशक्ती भरपूर असल्याने जंतूपासून बचाव होतो. त्यामुळे हे दूध बाळाची पहिली लसच असते. या दुधामुळे (चिक) बाळाला पहिली शी होण्यास मदत होते. काविळीचा धोका कमी होतो. या दुधात क जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात असते. मानवाला वरदान ठरलेल्या मूलपेशी अर्थात स्टेमसेल्स मातेच्या दुधात असतात. प्रसूतीनंतरच्या पहिल्या तीन दिवसांतील घट्ट दुधात कोलॉस्टम म्हणतात. यात मूळ पेशींचे प्रमाण सर्वात जास्त असते.
कामाच्या निमित्ताने घराबाहेर जाणाऱ्या महिलांनी स्तनपान कसं द्यावं?
प्रसूतीनंतर पहिले तीन महिने प्रसूती रजा मिळते. आजकाल सहा महिन्यांसाठी लॅक्टेशन लिव्ह म्हणजे स्तनपानासाठी रजा मिळण्याचीसुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांनी बाळाच्या योग्य पोषणासाठी सहा महिने रजा घेऊन बाळाचे स्तनपान केलं पाहिजे.
जर कामाला जावंच लागत असेल आणि ऑफिस घरापासून जवळ असेल तर दिवसातून दोन वेळा घरी येऊन स्तनपान करायला हवं. जर ते जमत नसेल तर कुटुंबीय बाळाला आईकडे घेऊन येऊ शकतात.
ऑफिसजवळ पाळणाघर असेल तर तिथेही बाळाला ठेवून स्तनपानाची सोय केली जाऊ शकते. यामुळे स्तनपानात खंड पडत नाही आणि आईला दूध येत राहतं. स्तनपानात खंड पडला की आईचं दूधच बंद होतं आणि मी मग बाळाला स्तनपान देता येत नाही.
आईचं घरी येऊन बाळाला स्तनपान करणं शक्य नसेल तर अशा परिस्थितीत Expressed Breast Milkचा पर्याय वापरता येऊ शकतो.
जर आईला बाळासाठी दूध काढून ठेवायचं असेल तर सकाळच्या वेळी जेव्हा बाळ झोपलेलं असेल अशावेळी आईने पाठीला आणि स्तनांना शेक द्यावा. त्यांनतर खोबरेल तेल किंवा हातांनी मसाज करावा. असा मसाज केल्यानंतर स्तनांमध्ये दूध जमा होतं आणि त्यानंतर तिने Expressed Breast पद्धतीने हे दूध काढलं पाहिजे.
असे आहेत उपाय …
- अंगावरील दूध काढून ते फ्रिजमध्ये ठेवावे. ते दूध घरातील सदस्याने स्वच्छ व निर्जंतूक केलेल्या बाटलीतून बाळाला पाजावे.
- बाळंतपणाची अधिकाधिक रजा किती आहे, याची माहिती घ्यावी. त्यामुळे प्रसुतीनंतर 4 ते 6 महिने बाळाला अंगावरचे दूध देता येईल.
- रजा संपल्यानंतर वर्क फॉम होम, पार्टटाईमची सुविधा आहे का, याचीदेखील माहिती घ्यावी.
- कामाच्या ठिकाणी एखादी स्वतंत्र खोली, खुर्ची, टेबल, प्रायव्हसी आणि स्वच्छता पाळता येईल, अशा सोयी आहेत का याची पाहणी करावी.
- कामाच्या ठिकाणी पाळणाघर आहे का, याची चौकशी करा.
- दूध काढून देण्यासाठी किती ब्रेक्स दिले जातात, याची माहिती घ्यावी.






