- टीम बाईमाणूस
लिंगसमभाव, महिला सक्षमीकरण आणि समाजातील वंचित घटकांच्या आवाजाला मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणाऱ्या माध्यमांमध्ये ‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन’ने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. सलग दोन वर्ष पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा ‘लाडली मीडिया अवॉर्ड’ जिंकलेल्या ‘बाईमाणूस’ने यंदा एकाच नव्हे तर दोन पुरस्कार मिळवून हॅटट्रिक साजरी केली आहे. 'युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीस' (UNFPA) आणि 'पॉप्युलेशन फर्स्ट' या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार देशातील 'जेंडर सेन्सिटिव्ह जर्नालिझम' ला प्रोत्साहन देणारा मानाचा पुरस्कार मानला जातो.
2023 ते 2025 - अशी झाली ‘बाईमाणूस’ची पुरस्कार हॅटट्रिक
2023 ते 2025 या तीन वर्षांत ‘बाईमाणूस’ने सलग हॅटट्रिक साधत लाडली मीडिया पुरस्कारावर नाव कोरले आहे. 2023 मध्ये सातपुड्यातील सुमित्रा वसावे, 2024मध्ये चंद्रपूरच्या वर्षा कोडापे आणि 2025 मध्ये पुण्याच्या अप्सरा आगा तसेच छ. संभाजीनगरच्या ऋषिकेश मोरे यांनी हा सन्मान मिळवला. ग्रामीण, आदिवासी, भटक्या-विमुक्त आणि वंचित घटकातील पत्रकारांना घडवण्याच्या बाईमाणूसच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेली ही दाद या यादीतून स्पष्ट दिसून येते.
अप्सरा आगा यांचा हृदय पिळवटून टाकणारा ग्राऊंड रिपोर्ट...
पुण्यातील धडाडीची तरुण पत्रकार अप्सरा आगा हिला यंदाच्या वर्षीच्या प्रादेशिक विभागातील ‘लाडली मीडिया अवॉर्ड’ मिळाला आहे. तिच्या “पाणी कमरेच्या वरपर्यंत आलं अन् अपंग असल्याची पहिल्यांदाच प्रकर्षाने जाणीव झाली” या ग्राऊंड रिपोर्टने हवामान बदल आणि अपंग स्त्रियांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचे गंभीर प्रश्न उपस्थित केले. या रिपोर्टमधून तिने सांगली–कोल्हापूर पुरस्थितीत अडकलेल्या अपंग महिलांचे भीषण अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी, बचावाच्या वेळी आलेल्या मर्यादा, आणि आपत्ती व्यवस्थापनात अपंगांचा विचार केला जातो का, असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. क्लायमेट चेंजच्या चर्चांमध्ये अपंग व्यक्तींच्या गरजा दुर्लक्षित राहतात. हे वास्तव अप्सराने अत्यंत संवेदनशीलतेने समोर आणले. हवामान बदल हा फक्त पर्यावरणीय विषय नसून, सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे हे तिच्या रिपोर्टने अधोरेखित केले. 
ऋषिकेश मोरे यांच्या व्हिडिओ रिपोर्टला लाडली सन्मान...
दुसरा ‘लाडली मीडिया अवॉर्ड’ मिळाला आहे फिचर व्हिडिओ कॅटेगरीतून ऋषिकेश मोरे यांना. “आमची सोनी मॅडम वाघीणेय, वाघीण! अख्खं जंगल सांभाळते” या व्हिडिओ स्टोरीने प्रेक्षकांच्या आणि परीक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. गेल्या 13 वर्षांपासून ताडोबाच्या जंगलात वनपाल म्हणून काम करणारी सोनी पंधारे एक धाडसी आदिवासी तरुणी आहे. रात्रीची गस्त, जंगलात लागणारे वणवे रोखणे, आग लागल्यास जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न… ही एका स्त्री वनपालाची रोजची लढाई. ही जीवनकहाणी ऋषिकेशने अत्यंत प्रभावीपणे, जिवंत तपशीलांसह रिपोर्टमध्ये मांडली. जंगल, हवामान बदल, वनसंवर्धन आणि आदिवासी समुदायातील महिलांची भूमिका या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार करणारी ही व्हिडिओ स्टोरी ‘लाडली मीडिया अवॉर्ड’च्या मूल्यांशी पूर्णपणे सुसंगत ठरली.
हवामान बदलाच्या प्रश्नांना ‘प्रोजेक्ट धरित्री'ने दिला राष्ट्रीय आवाज...
'असर सोशल इम्पॅक्ट ऍडव्हायझर' यांच्या सहकार्याने बाईमाणूसने ‘क्लायमेट चेंज अँड जेंडर’ या विषयावर आधारित ‘प्रोजेक्ट धरित्री’ अंतर्गत रिपोर्ट केले आहे. .या दोन्ही पुरस्कारप्राप्त स्टोरीज ही याच प्रोजेक्ट धरित्रीचा भाग आहेत. हवामान बदलाच्या चर्चेत स्त्रियांचे, विशेषतः अपंग, आदिवासी किंवा वंचित घटकातील स्त्रियांचे अनुभव क्वचितच ऐकू येतात. प्रोजेक्ट धरित्रीने या न ऐकलेल्या आवाजांना राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे मोठे कार्य केले आहे.
ग्राउंडवरून राष्ट्रीय प्लॅटफॉर्मपर्यंत - ‘बाईमाणूस’चा प्रवास
फक्त तीन वर्षांपूर्वी एमजीएम विद्यापीठाच्या पाठिंब्याने सुरू झालेलं ‘बाईमाणूस’ आज राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारी माध्यमातील सामाजिक चळवळ ठरली आहे. वंचित समुदायातील प्रतिभावान आणि धाडसी महिलांना बोलते करणे हा या उपक्रमाचा मूळ हेतू असून, पत्रकारिता शिकणे अवघड असले तरी वास्तव मांडण्यासाठी अनुभव आणि हिम्मत पुरेशी असते या तत्त्वावर बाईमाणूसने काम केले. डिजिटल आणि मोबाईल पत्रकारितेच्या प्रशिक्षणातून या महिलांना व्हिडिओ स्टोरी बनवणे, रिपोर्टिंग, स्क्रिप्ट लेखन, संपादन आणि फील्डवर्कचा आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे त्यांच्या कथा फक्त बाईमाणूसपुरत्याच न राहता Mongabay India, 101 Reporters, BBC, IDR आणि इतर मोठ्या मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचल्या आहेत. हे यश या महिला पत्रकारांचेच नव्हे तर संपूर्ण वंचित समाजाचे प्रतिनिधित्व आज मुख्य प्रवाहात पोहोचू लागल्याचे चिन्ह आहे.
‘आमच्या कहाण्या… आमच्याच भाषेत'
‘बाईमाणूस’ची संकल्पना ही वंचित समाजातील तरुणींना स्वतःच्या भाषेत आणि दृष्टिकोनातून आपले वास्तव मांडण्याची संधी देत लोकशाही अधिक सक्षम करणारा आदर्श प्रयोग ठरली आहे. मोठ्या माध्यमांतून दुर्लक्षित राहणाऱ्या ग्रामीण, आदिवासी आणि भटक्या-विमुक्त समुदायांच्या कहाण्या मुख्य प्रवाहात आणत “आमच्या कहाण्या… आमच्याच भाषेत” हा मंत्र अधिक विश्वासार्हतेने समोर येतो. हवामान बदलाचे परिणाम, महिलांची संघर्षकथा आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे या दृष्टिकोनातून अधिक स्पष्टपणे उभे राहतात. सलग तीन वर्षे मिळालेल्या ‘लाडली मीडिया अवॉर्ड’मुळे बाईमाणूसने हॅटट्रिक साधत केवळ गौरवच नाही तर उत्तरदायित्वही स्वीकारले असून, या पुरस्कारांनी संस्थेच्या महिला पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा दिली आहे.






