(पी. विठ्ठल)
पहिला नायक… बिरदेव डोणे
बिरदेव डोणे या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाने यूपीएससी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत मिळवलेल्या यशाची (IPS) मागच्या काही दिवसांपासून देशभर जोरदार चर्चा सुरू आहे. बिरदेवच्या कित्येक मुलाखती, रिल्स, व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांसमोर येत आहेत. सर्वसाधारण कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या बिरदेवच्या यशाने कित्येक तरुणांना भारावून टाकले आहे. त्याचे साधे राहणीमान आणि त्याची तितकीच प्रांजळ भाषा आणि प्रगल्भ विचार ऐकून अनेक जण प्रभावित होत आहेत. ‘आपल्या मुलांनीही असेच घवघवीत यश मिळवावे’ असे वाटणाऱ्या कित्येक पालकांनी हा व्हिडिओ आपापल्या पाल्यांना ऐकवला असण्याची शक्यता आहे.
प्रचंड परिश्रम आणि नियोजनपूर्वक अभ्यास केला तर असे यश मिळते, हे बिरदेवने दाखवून दिले आहे. खेड्यातल्या मुलाचे हे यश नक्कीच डोळ्यात भरणारे आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण ‘तो धनगर आहे’, ‘मेंढपाळाचा मुलगा आहे’ या गोष्टी माध्यमांतून वारंवार अधोरेखित केल्या जात आहेत. मुळात बिरदेव हा अभियांत्रिकीचा पदवीधर आहे आणि त्याने दिल्लीत दोन वर्ष राहून उत्तम तयारी केली आहे, ही गोष्ट फारशी लक्षात घेतली जात नाहीय. तो अमुकतमुक जातीचा आहे, म्हणून त्याला हे यश मिळालेले नाही. 
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी बिरदेवचा आदर्श जरूर घ्यावा; पण कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. त्याला यश मिळाले म्हणजे ही परीक्षा खूप ‘सोपी’ आहे, असा याचा अर्थ होत नाही. बिरदेवने यूपीएससी क्रॅक केली यामागे त्याचे अभ्यासातील सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय त्याला कुटुंबाने दिलेला आधार आणि मित्रांनी, शिक्षकांनी केलेली मदत ही गोष्टही दुर्लक्षित करता येत नाही.
संबंधित लेख वाचा: 1) नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या मीरा भोसले-बाबर ‘तुरुंगाधिकारी’ बनतात ही अजिबात साधी गोष्ट नाही…! |
दुसरा नायक… वैभव सूर्यवंशी
मंगळवारी आयपीएलच्या (IPL) सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी या चौदा वर्षीय खेळाडूने अक्षरक्ष: मैदान गाजवले. जेमतेम पस्तीस चेंडूत त्याने शतक झळकावून एक इतिहास रचला. 2017 साली वडिलांच्या खांद्यावर बसून IPL चे सामने बघायला आलेल्या या मुलाने अवघ्या आठ वर्षातच देश पातळीवरील एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले.
वैभवच्या यशात त्याच्या वडिलांचा संजीव सूर्यवंशींचा मोठा संघर्ष आहे. बिहारमधल्या समस्तीपूर शहराजवळ ताजपूर नावाचं त्यांच गाव. पोट भरायला म्हणून ते मुंबईत आले. पोट भरायचं पण हातात कौशल्य नाही. पण काही वर्षे त्यांनी मुंबईत काढली, पडेल ते कामं केलं. हाॅटेलमध्ये बाऊन्सर ते अगदी शौचालयं धुण्याचंही काम केलं. मात्र सुटी असेल त्यादिवशी ते मुंबईतल्या मैदानांवर क्रिकेट पहायचे. क्रिकेट त्यांना प्रचंड आवडायचं. पुढे लग्न झालं. मुलंही झाली. संजीव गावी परत गेले. तिथं शेती करु लागले.
बिहारमध्ये क्रिकेटला तसा काही स्कोप नव्हता आणि मोठ्या मुलाला लहानपणी बॅटबॉलमध्ये रस नव्हता. पण धाकटा पोरगा वैभव मात्र वयाच्या चौथ्या वर्षापासून बॅटबॉलच्याच नादी लागला. संजीवच्या मनातलं क्रिकेटवेड पुन्हा जागं झालं. त्यांनी घराच्या मागच्या बाजूलाच नेट लावलं. आणि पोराच्या क्रिकेट खेळण्याची सोय करुन टाकली. समस्तीपूरला जाऊन क्रिकेट अकॅडमी शोधली आणि लेकाला घेऊन समस्तीपूरच्या वाऱ्या नी ट्रेनिंग सुरु झालं.
म्हणता म्हणता ते लहानसं पोरं क्रिकेट अकॅडमीत मोठमोठ्या पोरांना भारी पडू लागलं. चेंडू उचलून मारु लागलं. त्याच्या प्रशिक्षकांनाही वाटू लागलं की हे पोरगं वेगळ्याच तयारीचं आहे. स्थानिक स्पर्धांत त्याची गुणवत्ता सिध्द होऊ लागली तशी बापलेकांना पैशाची कमतरता भासली नाही. स्थानिक क्रिकेट-स्पॉन्सर्स यांच्यामुळे जेमतेम १३ वर्षांचा होता होता वैभवची मालमत्ता दिड करोडच्या घरात पोहोचली आहे.
5 जानेवारी 2024 मध्ये वैभवने रणजी स्पर्धेत पदार्पण केलं. ज्या शहरात वडिलांनी केवळ उन्हात बसून क्रिकेट खेळणारी मुलं पाहिली, त्याच शहराच्या मातब्बर संघाविरुद्ध त्यांच्या लेकाने पदार्पण केलं. पुढे अण्डर 19 संघात निवड झाली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वैभवने फक्त 58 चेंडूत 104 धावा केल्या. वैभव आयपीएल लिलावासाठी नोंदवला गेलेला सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला गेला.
अर्थात आयपीएल हा श्रीमंत भांडवलदारांनी सुरू केलेला क्रीडा क्षेत्रातील एक जुगाराचा विश्वव्यापी अड्डा आहे. देश-विदेशातल्या सर्वोत्तम खेळाडूंना बोली लावून विकत घेतले जाते आणि त्याला झुंजायला सिद्ध केले जाते. T-20 चा उदय झाल्यापासून क्रिकेटची क्रेझ भलेही वाढली असेल, पण या खेळाचे आकर्षण मात्र संपले आहे.
कधीकाळी क्रिकेट खेळणे किंवा बघणे ही खूप अनोखी आणि आनंददायी गोष्ट होती. स्पर्धा असली तरी ती ‘निकोप’ होती. कारण खेळभावना महत्त्वाची होती. आता या खेळाचेही व्यावसायिकरण झाल्यामुळे खेळाचा आत्मा हरवला आहे. अर्थात असे असले तरी जगभरात T-20 लोकप्रिय होत आहेच. या खेळाने कधीकाळी भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्व (?) बळकट केले आहे.
आज विजयाचे, जल्लोषाचे, खेळाचे संदर्भ बदलले आहेत. खेळाडूंच्या नैसर्गिक अंगभूत कौशल्यापेक्षा आणि खेळण्याच्या विशिष्ट तंत्रापेक्षा ‘दे दणादण’ या सूत्राला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत ‘हीरो’ होणारा खेळाडू पुढे कधी ‘झीरो’ होईल, हे सांगता येत नाही. वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे या दोन तरुणांनी यंदाची आयपीएल गाजवली हे मात्र खरे; पण यांच्याकडे बघून ‘आपल्या मुलानेही वैभव सूर्यवंशी व्हावे’ अशी अपेक्षा मात्र पालकांनी बाळगू नये. अशा अपवादात्मक यशाची भुरळ मध्यमवर्गीय माणसांना लगेच पडते.
असो, बिरदेव आणि वैभव यांचे यश निर्विवाद श्रेष्ठ दर्जाचे आहे. पण या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला संघर्षही तितकाच मोठा आहे. अर्थात उपजत क्षमतेला नीट आकार दिला तर हे अशक्य नसते. बिरदेव- वैभव ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. दर एक-दोन वर्षात ही नावे बदलत जातात आणि दरवेळी नवनवे ‘आदर्श’ प्रस्थापित होतात. त्यांच्या यशाचा आनंद आपण आपल्या पाल्यात पाहण्याचा प्रयत्न करतो. आपला 'पाल्य' ‘करीयर’च्या दृष्टिने ‘यशस्वी’ ठरला नाही, तर अकारण ताण येतो. या ताणाचा मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. (करीयरच्या नादात संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेली आणि नंतर भ्रमिष्ट झालेली कितीतरी मुले मी पाहिली आहेत.)
या निमित्ताने सांगायचे एवढेच की, आपल्या मुलांची नैसर्गिक क्षमता ओळखून त्याला संधी द्या. त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्या. आनंद घेवू द्या. उगीच त्याच्यावर आपली स्वप्ने लादू नका. दुर्दैवाने भ्रमनिरास झालाच तर त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते.
... तसे घडू नये म्हणून हा अनाहूत सल्ला.






