- डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
मध्यंतरी एक वयस्क महिला सर्दीखोकल्यासाठी ओपिडीत आली होती.. केसटेकिंग दरम्यान ‘पाळी’ चुकल्याचं कळलं, हे त्यांची ‘रजोनिवृत्ती’ जवळ आल्यानं असं झालं असावं, असं क्षणभर वाटलं पण गटफिलिंग मात्र वेगळंच सांगत होती.. ‘माहिती’ घेतल्यानंतर त्यांची कुटूंब नियोजनाची शस्रक्रिया झाली नसल्याचंही समजलं आणि मी त्यांना तत्काळ ‘UPT’ अर्थात ‘युरिन प्रेग्नन्सी टेस्ट’ सुचवली तर “छे छे” म्हणत त्या चक्क लाजल्या..
निसर्ग मोठा मजेशीर असतो, तो कधीच कुणासाठी थांबत नाही. कधी सरळसोट चालतो पण कधी चकवेल सांगता येणार नाही त्यामुळं ‘बेसिक’ प्रोटोकॅाल्स हे पाळावेच लागतात..
“तुम्ही सर्दी खोकल्याचं औषध द्या, बाकी नंतर बघू…” त्या अडून बसल्या तर “असं मोघम देता येत नाही, 0.1% शक्यता असेल, पण काही असलं तर साध्या खोकल्याच्या औषधानंही गर्भपात होऊ शकतो” मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला..
“झालं तर झालं,मला कुठं या वयात हवंय” त्यांनी हसत प्रतिक्रिया दिली. ”जोक्सअपार्ट पण हवं नसेल तरीही ही त्याची पद्धत नव्हे, त्याचा ‘इलाज’ वेगळ्या पद्धतीनं करावा लागेल” मी पुनःश्च एकवार त्यांना समजावलं.. सरतेशेवटी ‘प्रतिजैवक’ टाळत त्यातल्या त्यात सुरक्षित औषध लिहून देत कोपऱ्यात सोनोग्राफी करावी असा सल्लाही लिहून दिला.. दोन दिवसांनी त्या परतल्या ते थेट युपिटी पॅाजिटिवचं ट्युलिप घेऊनच;तत्काळ पुढच्या उपाययोजना करता आल्या.
जगभरात कुटुंबनियोजनाची सुरुवात कशी झाली?
‘कुटुंबनियोजन’ ही संकल्पना आज आपल्याला सहज साधी वाटत असली तरी तिचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंत मानवानं ‘गर्भधारणा’ नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग शोधले पण या प्रवासात क्रांती मात्र एका गर्भनिरोधक गोळीनं घडवली..,
कुटुंबनियोजनाची सुरुवात खरंतर प्राचीन सभ्यतेत झाली. इजिप्तमध्ये 1850 इ.स.पू. महिलांनी मध आणि खजुराच्या रसाचा मिश्रण योनीत वापरला ज्यामुळं शुक्राणूंची गती मंदावते असं मानलं जायचं. प्राचीन भारतात काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे ज्यात गर्भनिरोधक म्हणून गाजराच्या किंवा पपईच्या बिया गर्भधारणा टाळण्यासाठी वापरल्या जायच्या.
रोमन साम्राज्यात ‘सिल्फियम’ नावाची एक वनस्पती इतकी लोकप्रिय होती की वापरून वापरून ती जवळपास नष्टच झाली. या वनस्पतीला ‘गर्भनिरोधक जादू’ मानलं जायचं पण यातील बहुतांश पद्धती या अंधश्रद्धा,जादूटोणा आणि थोड्याफार वैज्ञानिक आधारावर अवलंबून होत्या त्यामुळं तिचं यशही संमिश्र होतं..
संबंधित लेख वाचा: आनंदाची बातमी, पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक इंजेक्शनची चाचणी यशस्वी…! |
मध्ययुगात गर्भनिरोधक पद्धतींबाबत फार प्रगती झाली नाही किंबहुना धार्मिक आणि सामाजिक बंधनांमुळं कुटुंबनियोजनावर चर्चा करणंही अवघड होतं. पण 16व्या शतकात युरोपात प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवलेले कंडोम वापरात येऊ लागलं; हे कंडोम गर्भनिरोधापेक्षा गुप्तरोगांपासून संरक्षणासाठी जास्त वापरलं जायचं. 19व्या शतकात रबराचे कंडोम आणि डायाफ्राम्स यांसारख्या पद्धती आल्या पण त्या महागड्या आणि वापरण्यास अवघड होत्या. या काळात कुटुंबनियोजनाचा विचार पाश्चिमात्य देशांमध्ये हळूहळू पुढं येत होता पण कायदे कठोर होते जसं अमेरिकेतला 1873 च्या ‘कॉमस्टॉक कायदा’ या कायद्यांतर्गत गर्भनिरोधक साहित्य पाठवणं किंवा त्याबद्दल माहिती देणं थेट गुन्हा मानला जायचा..
आणि मग एंट्री झाली ‘मार्गारेट सँगर’ची…
मार्गारेट सँगर एक अमेरिकन परिचारिका होती. तिनं 1910 च्या दशकात कुटुंबनियोजनाचा झेंडा उंचावला. तिनं गरीब कुटुंबांमधील महिलांना अनियोजित - अकाली गर्भधारणेमुळं होणारा त्रास बघितला होता. मार्गारेटनं 1914 मध्ये ‘वुमन रिबेल’ नावाचं एक मासिक सुरू केलं, ज्यात गर्भनिरोधकांबद्दल माहिती दिली गेली आणि यामुळं तिला अटक झाली. तिनं हार मानली नाही, सुटकेनंतर 1916 साली तिनं अमेरिकेतलं पहिलं ‘जन्म नियंत्रण’ क्लिनिक उघडलं. तिचं एक स्वप्न होतं,”एक अशी गोळी जी सहज उपलब्ध असेल आणि महिलांना गर्भधारणेवर नियंत्रण देईल.”
गर्भनिरोधक गोळीचा शोध हा वैज्ञानिक संशोधन आणि सामाजिक गरजेचा संगम होता. 1930 च्या दशकात शास्त्रज्ञांना इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचा गर्भधारणेवर परिणाम होतो हे समजलं. प्रोजेस्टेरॉनमुळे अंड्यांचं उत्पादन अर्थात ‘ovulation’ थांबतं हे लक्षात आलं पण नैसर्गिक प्रोजेस्टेरॉन गोळीच्या स्वरूपात टिकत नव्हतं. आता मैदानात ‘कार्ल जेरासी’ नावाचा रसायनशास्त्रज्ञ उतरला. 1951 मध्ये मेक्सिकोमधील ‘याम’ नावाच्या वनस्पतीपासून त्यांनी कृत्रिम प्रोजेस्टेरॉन म्हणजेच ‘प्रोजेस्टिन’ तयार केली. ही प्रोजेस्टिन गोळीच्या स्वरूपात स्थिर होती. दुसरीकडं डॉ. ग्रेगरी पिन्कस आणि डॉ. जॉन रॉक यांनी या हार्मोन्सचा गर्भनिरोधासाठी उपयोग कसा करता येईल यावर संशोधन केलं..
गर्भनिरोधक गोळीचा शोध
पन्नासच्या दशकात पिन्कस आणि त्यांच्या टीमनं गोळीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या. अमेरिकेत कायद्यांमुळं अडचणी आल्यानं त्यांनी प्युर्टोरिको आणि हैती येथे चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमध्ये अनेक गरीब महिलांचा सहभाग होता ज्यांना काही वेळा संशोधनाचे पूर्ण स्वरूप समजले नव्हते यामुळं नंतर नैतिकतेच्या प्रश्नांवर वाद झाले पण या चाचण्यांनी सिद्ध केले की,”प्रोजेस्टिन आणि इस्ट्रोजेन यांचे मिश्रण गर्भधारणा रोखण्यात 99% यशस्वी आहे.”
1957 साली ‘एनोविड’ नावाची पहिली गोळी मासिक पाळीच्या समस्यांसाठी मंजूर झाली आणि 1960 मध्ये अमेरिकेच्या FDA नं तिला गर्भनिरोधक म्हणून मंजुरी दिली आणि ही होती जगातील पहिली गर्भनिरोधक गोळी. गर्भनिरोधक गोळीनं समाजात भूकंप आणला; प्रथमच महिलांना त्यांच्या प्रजननक्षमतेवर पूर्ण नियंत्रण मिळाले. यामुळं लैंगिक स्वातंत्र्य,करिअरच्या संधी आणि कुटुंबनियोजन यात क्रांती घडली..
साठच्या दशकात गोळीचा वापर झपाट्यानं वाढला पण याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक विरोधही वाढला. काहींना वाटलं की ही गोळी निसर्गाच्या तद्वतच नैतिकतेच्या विरोधात आहे तरीही महिलांनी ती स्वीकारली आणि समाज बदलला. 1960 मध्ये एनोविडची किंमत $10 प्रति महिना होती जी त्या काळात मोठी रक्कम होती.
आज अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या आणि कमी दुष्परिणामांसह उपलब्ध आहेत याशिवाय कंडोम, IUD, इम्प्लांट्स आणि इंजेक्शन्स यांसारख्या अनेक कुटुंबनियोजन पद्धतीही उपलब्ध आहेत. भारतात सरकारनं कुटुंबनियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘माला-डी’ सारख्या गोळ्या आणि इतर साधनं मोफत किंवा कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत.
गर्भनिरोधक गोळीचा शोध हा केवळ वैद्यकीय नव्हता तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचा टप्पा होता यामुळं महिलांना स्वातंत्र्य मिळालं,शिक्षण आणि करिअरच्या संधी वाढल्या आणि कुटुंबांचे आकार नियंत्रित झाले पण याचबरोबर नैतिकता-सुरक्षितता-कायदा या मुद्द्यांवर आजही चर्चा सुरूये. विशेषतः ग्रामीण भागात आणि विकसनशील देशांमध्ये आजही कुटुंबनियोजनाबद्दल जागरूकता आणि साधनांचा अभाव ही मोठी आव्हान आहेत.
कुटुंबनियोजनाचा इतिहास हा मानवाच्या बुद्धिमत्तेचा आणि सामाजिक प्रगतीचा दस्तऐवज आहे. प्राचीन जडीबुटींपासून ते गर्भनिरोधक गोळीपर्यंतचा हा प्रवास विज्ञान,धैर्य आणि सामाजिक बदलांचा संगम आहे. मार्गारेट सँगरच्या स्वप्नापासून ते कार्ल जेरासीच्या प्रयोगशाळेपर्यंत आणि प्युर्टोरिकोच्या चाचण्यांपासून ते आजच्या आधुनिक पद्धतींपर्यंत ही कहाणी प्रत्येक महिलेच्या स्वातंत्र्याची आणि सशक्तीकरणाची गाथा आहे. ही गोळी फक्त औषध नव्हे तर एक क्रांती आहे. नुकताच मार्गारेट सॅंगरचा वाढदिवस झाला, त्यानिमित्ताने सहजच !
(साभार - डॉ. प्रज्ञावंत देवळेकर यांच्या फेसबुक वॉलवरून)






