डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या ब्राह्मण शिक्षकाने आपले ‘आंबेडकर’ हे आडनाव दिले, त्या कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची तिसरी पिढी आज कार्यरत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करून आपल्या पणजोबाचा सामाजिक वसा आंबेडकर कुटुंब आजही पुढं नेत आहे. त्याबरोबरच गुरू-शिष्याच्या साताऱ्यातील ‘त्या’ ऐतिहासिक आठवणींचा अनमोल ठेवाही या कुटुंबाने मौखिक पद्धतीने दर पिढीगणिक अभिमानाने जपला आहे.
1894 मध्ये सुभेदार रामजी संकपाळ कोकणातून साताऱ्यात स्थायिक झाले. छोट्या भिवाला म्हणजे बाबासाहेबांना त्यांनी कॅम्प स्कूलमध्ये दाखल केले. तेथे कृष्णा केशव आंबेडकर बाबासाहेबांना शिकवत. त्या वेळी कोकणातील लोक गावाची नावे आडनावे म्हणून लावत. बाबासाहेबांच्या गावाचे नाव ‘आंबडवे’ असे अडनिडे होते. हे आडनाव उच्चारायला अवघड, म्हणून गुरुजींनी आपलेच आंबेडकर आडनाव बाबासाहेबांच्या हजेरी बुकात नोंदवले.
तो पर्याय योग्य वाटल्याने शाळेतील दाखल खारीज रजिस्टर मध्ये 1914 क्रमांकावर तसे नोंदवण्यात आले. शाळेत येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांचे काही शिक्षण घरीच घेतले होते. त्यामुळे बाबासाहेब शाळेच्या त्या रजिस्टरमध्ये मोडी लिपीमधील स्वाक्षरी करू शकले. लहानपणी त्यांचे नाव भीमा/भिवा असे होते. “भिवा रामजी आंबेडकर” अशी स्वाक्षरी असलेले ते रजिस्टर शाळेने प्राणपणाने जपून व लॅमिनेशन करुन ठेवले आहे. अभ्यागतांसाठी झेरॉक्स केलेल्या स्वरूपातील प्रत तयार केलेली आहे. आंबेडकर गुरुजी मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहत.
(कृष्णाजी आंबेडकर गुरुजी आणि त्यांची तिसरी पिढी)
कृष्णाजी गुरुजींची तिसरी पिढी जपत आहे बाबासाहेबांचा वारसा
कृष्णाजी गुरुजींची आज तिसरी पिढी पुणे, सातारा आणि मुंबईत विखुरली आहे. त्यातील थोरली पाती मुंबईत आहेत. राजीव आंबेडकर आयडीबीआयमधून निवृत्त झाले. एड. संजय आणि एड. विनायक यांची मुंबईत ‘आंबेडकर असोसिएट्स’ ही लाॅ फर्म आहे. मुंबईतील आंबेडकर कुटुंब दरवर्षी काही आदिवासी मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. महालक्ष्मी ट्रस्टवर एड. विनायक आंबेडकर काम करतात. गरजूंना वैद्यकीय मदत निधीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. मुंबई लघुवाद न्यायालयाच्या बार रूममध्ये बाबासाहेबांचे 12 फुटी तैलचित्र एड विनायक आंबेडकरांनी लावले आहे.
कृष्णाजी गुरुजी 85 वर्षे जगले. हयात आंबेडकर कुटुंबातील कुणीही गुरुजींना पाहिलेले नाही; पण त्यांच्या आठवणी मौखिक परंपरेने या कुटुंबानं कायम जिंवत ठेवल्या आहेत. आंबेडकर कुटुंबाकडे कृष्णाजी गुरुजींचा छायाचित्रं आणि पत्रांचा जो ऐतिहासिक ठेवा होता, तो त्यांनी पुण्यातील सिम्बाॅयसिस वस्तुसंग्रहास दान करून टाकला.
(राजीव, संजय आणि विनायक आंबेडकर…)
आजही आंबेडकरांची एक शाखा गुरुजी राहायचे त्या मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहते. बाबासाहेब 1948 मध्ये मजूर मंत्री झाले. तेव्हा गुरुजींना भेटण्यासाठी साताऱ्याला व्यंकटपुरातील घरी आले होते, अशी आठवण एड. विनायक आंबेडकर यांनी सांगितली.
संबंधित लेख वाचा: 1) ‘बाबासाहेब’ फक्त दलितांचे कसे? आंबेडकरी अनुयायांनी नेमकं काय करायला हवं…? |
सकपाळ ते आंबेडकर असे हे आडनाव कसे बदलत गेले?
सकपाळ ते आंबेडकर असे हे आडनाव कसे बदलत गेले याचा इतिहास आंबडवे येथील ज्येष्ठ नागरिक सुदाम सकपाळ आजही उलगडून सांगतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्यानंतरदेखील भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना महत्त्वपूर्ण ठरली. आज सर्वत्र डॉ. आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना बाबासाहेबांच्या आडनावाची ही रंजक माहिती सकपाळ यांनी उलगडून सांगितली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वजांचे मूळ गाव आंबडवे हे होय. हा शोधदेखील एका ब्रिटिश अभ्यासकाने लावला. तोपर्यंत हे गावदेखील दुर्लक्षितच होते. आंबडवे येथील सकपाळ कुटुंबात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.
(बाबासाहेब सातारा येथील ज्या शाळेत शिकले ती प्रतापसिंह हायस्कूल.)
शाळेमध्ये डॉ. आंबेडकरांचे नाव आणि नोंद केलेले रजिस्टरदेखील
बाबासाहेबांच्या आडनावाचा हा इतिहास सांगताना सकपाळ म्हणाले, सातारा येथील प्रतापसिंह शाळेत बाबासाहेबांचे आडनाव 'आंबावडेकर' असे 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदविण्यात आले. त्यामुळेच हा दिवस आज शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा केला जात आहे. येथील शाळेमध्ये डॉ. आंबेडकरांचे नाव आणि नोंद केलेले रजिस्टरदेखील आजही पाहायला मिळते.
आपल्या आंबडवे या गावाच्या नावावरून 'आंबावडेकर' असे आडनाव ते सांगत असत. त्यामुळे हेच नाव शाळेत प्रवेश घेताना नोंदविण्यात आले. कालांतराने सातारा येथे शिक्षण सुरू असतानाच बुद्धिमत्ता व प्रतिभेवर प्रेम करणाऱ्या शिक्षकांना त्यांचे 'आंबावडेकर' हे आडनाव काहीसे खटकत होते. त्यानंतर त्यांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी पुढच्या काळात डॉ. बाबासाहेब यांचे आडनाव 'आंबेडकर' असे नोंदविले आणि तेच पुढच्या कालावधीत प्रसिद्ध झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी सकपाळ, आंबावडेकर या आडनावांपेक्षा आंबेडकर हेच नाव कायम ठेवले.
ते मंडणगडमधील आपल्या आंबडवे या मूळ गावी चुलत भावाच्या विवाहानिमित्त लहानपणी कुटुंबासमवेत एकदा आल्याची माहिती उपलब्ध होते. आंबडवे येथे डॉ. आंबेडकर यांचे जुने झोपडीवजा घर होते. ते पाडून आता शासनाने या ठिकाणी स्मारक बांधले आहे. या ठिकाणी सकपाळ कुटुंबीयांची अनेक घरे आहेत. त्यांच्याकडून सकपाळ... आंबावडेकर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा आडनावाचा प्रवास येथे येणाऱ्याला सांगितला जातो.
बाबासाहेब ज्या शाळेत शिकले त्या ‘प्रतापसिंह हायस्कूल’ची काय परिस्थिती आहे?
7 नोव्हेंबर 1900 साली सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतला होता. आज ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल म्हणून ओळखली जाते. ही शाळा त्यावेळी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होती. चौथीपर्यंत डॉ. आंबेडकर या शाळेत शिकले. सातारा सरकारी शाळा राजवाडा परिसरात एका वाड्यात भरवली जात असे. आजही हा वाडा इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा वाडा 1824 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार प्रतापसिंहराजे भोसले यांनी बांधला. त्यावेळी राजघराण्यातल्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था या वाड्यात केली जायची.
(शाळेच्या रजिस्टरमध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे.)
1851 साली हा वाडा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्यात आला. शाळेला शंभर वर्षं झाली तेव्हा 1951 साली या शाळेचं नामकरण छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असं करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी शाळा धोकादायक असल्याने ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावी असं पत्र दिलंय. हा जुना राजवाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद करण्यात आला आहे. आज प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेची एकूण विद्यार्थी संख्या फक्त 120 इतकी आहे.
याच शाळेत दहावीत शिकणारी पल्लवी रामचंद्र पवार म्हणते, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी शिकत आहे, याचा मला अभिमान आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शाळाप्रवेश दिन असे कार्यक्रम शाळेत साजरे होतात. त्यावेळी वक्ते बाबासाहेब किती कष्टातून शिकले याविषयी सांगतात त्यावेळी मलाही गहिवरून येतं. माझी आई घरकाम करते, तर वडील रंगकाम करतात. मला मोठेपणी कलेक्टर व्हायचं आहे."
विराज महिपती सोनावाले हा विद्यार्थी सांगतो की, "मी सकाळी वर्तमानपत्र विकून शाळेत शिकण्यासाठी येतो. त्यावेळी मला बाबासाहेबांचे कष्ट डोळ्यासमोर दिसतात आणि मी मनात म्हणतो की माझे हे कष्ट काहीच नाहीत. मी बाबासाहेबांच्या शाळेत शिकतोय याचा मला आनंद आहे. बाबासाहेबांसारखंच मलाही समाजासाठी काम करायचं आहे."
कोण होते कृष्णाजी केशव आंबेडकर?
- कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी मूळचे रत्नागिरी जवळील ‘वांद्री’ गावचे. त्यांना पेशव्यांनी ‘आंबेड’ गावाचे वतन दिल्याने त्यांना ‘आंबेडकर’ आडनाव पडले.
- आंबेडकर कुटुंब देवरुखे ब्राह्मण. मिशनरीबरोबर कृष्णाजी गुरुजी काम करत. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल होता.
- चांगदेव खैरमोडे आणि धनंजय कीर लिखित बाबासाहेबांची चरित्रं प्रमाण मानली जातात. पण या ग्रंथांत बाबासाहेबांच्या मूळ गावाचे नाव ‘आंबावडे’ असे छापले आहे. ती माहिती चूक आहे. बाबासाहेबांच्या गावाचे नाव ‘आंबडवे’ होते. त्या वेळच्या रीतीने बाबासाहेबांचे आडनाव ‘आंबडवेकर’ असे झाले असते. म्हणूनच कृष्णाजी गुरुजींनी ते बदलवले.






