(अक्षय शारदा शरद)
जून 2024 ची गोष्ट. म्हणजे अगदी मागच्या वर्षीचीच! आपल्याकडे लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडालेला होता. उत्कंठा होती ती निकालांची. तशीच उत्कंठा मेक्सिकन नागरिकांनाही लागलेली होती. कारण तिथंही नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या होत्या. निकाल येणं बाकी होतं.
मेक्सिकोतली निवडणूक ऐतिहासिक होती. त्याचं कारणही तसंच होतं. इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या होत्या. निकालाचा दिवस उजाडला. डाव्या विचारांच्या मोरेना पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या. त्यांना 58 टक्के मतं मिळाली. मेक्सिकोच्या आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या आणि जिंकून येणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या.
याच क्लॉडिया शेनबॉम यांचं टाईम मॅगझिनच्या जगातील सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांच्या यादीत नाव आलंय. खरंतर राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून आणि अगदी त्याआधीही महापौर म्हणून क्लॉडिया यांनी निर्णयांचा सपाटा लावलाय. पर्यावरण अनुकूल धोरणं राबवली. त्यामुळे जगभरात त्यांच्या नावाची चर्चा होतेय.
प्राध्यापक ते महापौर
मेक्सिको हा उत्तर अमेरिकेतला एक देश. जगातले सर्वाधिक स्पॅनिशभाषक इथं राहतात. देशाला तसा प्राचीन इतिहास. केंद्रशासित प्रदेश असलेली 'मेक्सिको सिटी' ही देशाची राजधानी. सगळ्यात मोठं शहरही! इथंच क्लॉडिया यांचं बालपण गेलं. त्यांची आई प्राध्यापक होती तर वडील केमिकल इंजिनियर. आई प्राध्यापक असलेल्या 'नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको'त त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळवला. ऊर्जा अभियांत्रिकीत डॉक्टरेट केलं.
1980-1990 चं दशक. क्लॉडिया या विद्यार्थी आंदोलनातून पुढे येत राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्या. सुरुवातीला त्यांनी कोणतंही पद घेतलं नाही. 2000 मध्ये त्यांची 'मेक्सिको सिटी'च्या पर्यावरण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन महापौर आणि नंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी त्यांची नियुक्ती केली होती. पुढे 2014 ला त्यांनी ओब्राडोर यांनी स्थापन केलेल्या मोरेना पक्षात एन्ट्री केली.
2015 मध्ये त्यांना 'मेक्सिको सिटी'तलं सगळ्यात मोठं शहर असलेल्या 'ट्लाल्पन' चं महापौर करण्यात आलं. या जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरण समस्या यांना प्राधान्य दिलं. त्यावर मूलभूत काम केलं. त्यांचं कौतुक होऊ लागलं. दरम्यान राजकीय क्षेत्रात क्लॉडिया या आपलं एक भक्कम स्थान निर्माण करत गेल्या. अशात जुलै 2018 ला त्यांच्याकडे 'मेक्सिको सिटी'चं महापौरपद आलं. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि जू व्यक्ती ठरल्या.
संबंधित लेख वाचा: 1) ब्राह्मण ते अश्वेतः कमला हॅरीस यांचा विलक्षण प्रवास |
धोरणनिर्मितीत पर्यावरणीय कामाचा विचार
2018 ते 2023 या काळात क्लॉडिया यांनी 'मेक्सिको सिटी'चं महापौरपद भूषवलं. कचरा संकलन, पावसाच्या पाण्याचा योग्य वापर, शहराच्या मेट्रो व्यवस्थेत मूलभूत सुधारणा, ट्रेनचं आधुनिकीकरण अशा अनेक बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. मुळात क्लॉडिया हवामान शास्त्रज्ञ. 2006 मध्ये ओब्राडोर यांचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला तेव्हा क्लॉडिया पुन्हा संशोधनाकडे वळल्या होत्या.
'इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज' ( आयपीसीसी ) ही संयुक्त राष्ट्राची एक आंतरशासकीय वैज्ञानिक संस्था. हवामान बदलासंदर्भात वैज्ञानिक माहिती तसेच अहवाल तयार करणं हे या संस्थेचं काम. संस्थेच्या चौथ्या आणि पाचव्या मूल्यांकन अहवालावर क्लॉडिया यांनी काम केलं. या कामासाठी 'आयपीसीसी'ला २००७ला शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. क्लॉडिया त्या गटाचा एक महत्त्वाचा भाग होत्या.
पर्यावरण, ऊर्जा आणि शाश्वत विकास हे क्लॉडिया यांचे अभ्यासाचे विषय राहिलेत. सातत्याने त्यांनी या मुद्यांवर काम केलं. संशोधन आणि धोरणनिर्मिती असं त्याचं स्वरूप राहिलंय. त्यामुळे एक राजकारणी म्हणून राजकीय जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी धोरण आखणी करताना या सगळ्याचा विचार केल्याचं दिसतं.
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
'मेक्सिको सिटी'च्या महापौर म्हणून काम करताना एक मोठी जबाबदारी क्लॉडिया यांच्या खांद्यावर होती. अशात 12 जून 2023 मध्ये त्यांनी होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकरता आपली उमेदवारी जाहीर केली. त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याविरोधात उजव्या विचारांचा पक्ष 'पीएएन'च्या जोचिटल गॅल्व्हस उभ्या होत्या. दोन्हीही महिलाच! महिलांसाठी पारंपरिक चौकट असलेल्या मेक्सिकोच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं.
निवडणूक ऐतिहासिक असली तरी सोप्पी नक्कीच नव्हती. 1988 मध्ये मेक्सिकोत पहिल्यांदा निवडणुका झाल्या. पण आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक रक्तरंजित हिंसाचार या निवडणुकीने पाहिला. अनेक राजकीय उमेदवारांच्या हत्याही करण्यात आल्या. संघटित गुन्हेगारी हे मोठं आव्हान होतं. किंबहुना आहेच. पण मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत नेहमीप्रमाणे सुरक्षा आणि स्थलांतर हे मुद्दे महत्वपूर्ण राहिले.
निवडणूक काळात मात्र क्लॉडिया यांनी आरोग्य, शिक्षण, नोकरी अशा मूलभूत गोष्टींवर प्रचार केला. त्यांना प्राधान्य दिलं. तर गॅल्व्हस यांनीही मध्यम आणि निम्न वर्गाला आकर्षित करणाऱ्या योजना, वरिष्ठ नागरिकांसाठी पेन्शन, सुरक्षा अशा अनेक मुद्यांवरून मतदारांवर प्रभाव पाडायचा प्रयत्न केला. अखेर 2 जून 2024 ला निकाल लागला. क्लॉडिया निवडणूक जिंकल्या. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
घराणेशाहीविरोधात कायदा
क्लॉडिया यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष ओब्राडोर यांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. त्यावरून त्यांच्यावर टीकाही होते. पण ओब्राडोर यांच्या अनेक धोरणांना क्लॉडिया यांची असहमती असल्याचे दाखवून दिले. विशेषतः ओब्राडोर मेक्सिकोतील पेट्रोलियम उद्योगाला पाठबळ देण्याचा विचार मांडत असताना क्लॉडिया यांनी अक्षय ऊर्जेचा ठामपणे पुरस्कार केला. हवामान बदल आणि रोजगार या मुद्यांवरही त्यांची पक्षापेक्षा वेगळी मतं असल्याचं वारंवार दाखवून दिलं.
मेक्सिको-अमेरिका सीमेवरील अमली पदार्थांची तस्करी, देशातली संघटित गुन्हेगारी, वर्णभेद असे अनेक प्रश्न मेक्सिकोत आहोत. निवडून आल्यानंतर क्लॉडिया यांनी त्यावर काम करायला सुरुवात केली. क्लॉडिया यांनी नुकताच राजकारणातल्या घराणेशाहीला वचक बसावा म्हणून थेट कायदाच आणला. जी नेतेमंडळी राजकारणात आहेत अशांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी पदांवर नियुक्ती द्यायला हा कायदा प्रतिबंधित करतो.
2027 पासून हा कायदा लागू करण्याचा मानस क्लॉडिया यांचा होता. मात्र हा कायदा लागू करण्यासाठी राज्य विधिमंडळांचं बहुमत आवश्यक आहे. या कायद्याद्वारे एखाद्या राजकीय नेत्याचा कार्यकाळ संपला की, त्याला पुन्हा निवडणुकीला उभं राहता येणार नाही. शिवाय त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही निवडणूक लढवता येणार नाही.
ट्रम्प यांना थेट आव्हान
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी लादलेल्या करालाही क्लॉडिया यांनी तत्काळ विरोध केला. तसेच ट्रम्प यांच्याशी चर्चेची भूमिका घेतली. ट्रम्प यांनी निर्णयाला स्थगिती दिली. आता मेक्सिकोसाठी नव्याने आयातशुल्क लागू केले जाईल. क्लॉडिया यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे हे शक्य झालं.
मेक्सिको- अमेरिका सीमेवरील अमली पदार्थांची तस्करी, देशातली संघटित गुन्हेगारी, वर्णभेद असे अनेक प्रश्न आहे. याविरोधात त्या सातत्याने भूमिका घेतायत. अतिशय निर्भिड आणि ठाम भूमिका घेणाऱ्या राष्ट्राध्यक्ष म्हणून जग त्यांच्याकडे पाहतंय. 1 ऑक्टोबर 2024 ला त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या क्लॉडिया यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जग त्यांच्याकडे आशेनं, उत्स्कुतेनं पाहतंय.
त्यांच्या कामाची दखल घेत 2018 ला बीबीसीच्या 100 महिलांच्या यादीत त्यांचं नाव आलं. 2024ला 'टाईम 100 क्लायमेट', फोर्ब्सच्या 2024 च्या. सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही त्यांची नोंद झाली. तर टाईम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही त्यांचं नाव आहे. थेट ट्रम्पना आव्हान देत ठाम भूमिका घेणारी राष्ट्राध्यक्ष म्हणून क्लॉडिया यांची दखल जगभरात घेतली जातेय.






