- संजना खंडारे
तिला शिकायचं होतं, पुढे जायचं होतं.. पण डोक्यावर बसलेलं इंग्रजी भाषेचं भुत आणि सततचच्या अपयशाचा ताण तिच्यासाठी असह्य ठरला. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील एका 17 वर्षीय दलित विद्यार्थिनीने आत्महत्या केली असून, तिच्या मृत्यूने शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर टाकल्या जाणाऱ्या मानसिक दबावाचे विदारक वास्तव समोर आले आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी आंध्रप्रदेशातील कुरनूलजवळील बी. तांड्रपाडु येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे घडली. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी याच संस्थेत शिक्षण घेत होती. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीने कॉलेजच्या ‘सिक रूम’मध्ये स्वतःला कोंडून घेत टोकाचे पाऊल उचलले.
मित्र-मैत्रिणी बाहेर गेल्या आणि…?
शाळेतील विद्यार्थिनींच्या माहितीनुसार , संबंधित विद्यार्थिनी तिच्या काही मैत्रिणींसोबत सिक रूममध्ये होती. काही वेळासाठी मैत्रिणी बाहेर गेल्या असताना तिने हे पाऊल उचलले. मैत्रिणी परत आल्यावर दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. दरवाजा उघडल्यावर विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
इंग्रजी भाषेमुळे मानसिक तणाव...
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्यामुळे तीव्र मानसिक तणावाखाली होती. ग्रामीण पार्श्वभूमी आणि मातृभाषेव्यतिरिक्त थेट इंग्रजी माध्यमात शिक्षण घेताना तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अभ्यासात मागे पडत असल्याची भीती आणि सतत अपयशाची भावना तिच्या मनावर खोलवर परिणाम करत होती.
पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थिनीने आपल्या वडिलांशी याबाबत अनेकदा संवाद साधला होता. तिने इंग्रजी समजत नसल्यामुळे होणारा त्रास स्पष्टपणे व्यक्त केला होता. तपासादरम्यान एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये तिने, “इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणे सोपे आहे,” असे लिहिल्याचे समोर आले आहे. हे शब्द तिच्या मानसिक अवस्थेचे भयावह चित्र उभे करतात.
पालकांचा दबाव आणि असहायता...
विद्यार्थिनीने मानसिक ताण स्पष्ट करूनही तिच्या पालकांनी तिला पुन्हा कॉलेजला पाठवले होते. शिक्षण पूर्ण व्हावे, चांगले भविष्य मिळावे या अपेक्षेने पालकांनी तिला समजावले असले, तरी प्रत्यक्षात त्यामुळे तिच्यावरचा मानसिक दबाव अधिकच वाढल्याचे पोलिस तपासातून दिसून येत आहे. समाजातील अनेक कुटुंबांप्रमाणेच येथेही शिक्षणाला सामाजिक उन्नतीचे एकमेव साधन मानले जाते, मात्र त्याची किंमत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या रूपाने चुकवावी लागत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.
आरोग्याच्या समस्यांनी वाढवला ताण...
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर आला आहे. विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले की, तिला मासिक पाळीशी संबंधित गंभीर समस्या होत्या. शारीरिक वेदना, कमजोरी आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक त्रास यामुळे तिची अवस्था अधिकच बिकट झाली होती. सततचा शैक्षणिक ताण आणि शारीरिक वेदना यांचा एकत्रित परिणाम तिच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्थानिक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 194 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कॉलेज प्रशासन, पालक, मित्रमैत्रिणी यांचे जबाब नोंदवले जात आहेत. विद्यार्थिनीला कोणत्याही प्रकारचा छळ झाला होता का, याचाही तपास केला जात आहे.
ही घटना केवळ एका विद्यार्थिनीचा मृत्यू नसून, देशातील शिक्षणव्यवस्थेतील अनेक त्रुटींवर प्रकाश टाकणारी आहे. इंग्रजी भाषेचे अधिक महत्त्व, ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि शैक्षणिक मदत नसणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या सगळ्याचा पुनर्विचार करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.






