आपल्या जगण्यात कथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कथा सांगणं-ऐकणं यावर आपला पिंड पोसला गेलाय. आई-आजींनी सांगितलेल्या धर्मग्रंथातील, पुराणातील, इतिहासातील गोष्टी ऐकत ऐकत आपण वाढलो. आपल्या आयुष्यात आलेल्या पहिल्या दास्तांगो (म्हणजे गोष्ट सांगणारी व्यक्ती) महिलाच होत्या. एखादी कथा रचणे आणि आपल्या अंतरंगीच्या रंगात रंगवून ती रंगवून सांगणे हे सृजनात्मक काम आहे.
आपल्यासारखाच हाडामांसाचा एक जीव आपल्यातून निर्माण करणारी स्त्री ही सृजनशीलतेची स्वामीनी असल्याने, मराठीतल्या दास्तांगोईत स्त्रीचा आवर्जून समावेश करण्यात आलेला आहे. ‘दास्तांए’ हा शब्द आपण अनेक हिंदी गीतांतून ऐकला आहे. याचा अर्थ होतो ‘गोष्टी’, ‘कथा’, ‘किस्से’. आणि ‘गोई’ म्हणजे त्या ‘सांगणे’ किंवा ‘सादर करणे’. जो गोष्ट सांगतो किंवा सादर करतो, त्याला ‘दास्तांगो’ म्हणतात.
‘दास्तांगोई’ म्हणजे कथा सांगणे किंवा सादर करणे. दास्तांगोई म्हणजे लांबलचक कथा सांगणे/सादर करणे. किस्से थांबतात, संपतात. दास्तांगोई मात्र सुरूच राहते. तीत स्वल्पविराम येतो, पूर्णविराम नाही.
‘दास्तांगोई’ म्हणजे काय आणि महिलांना सादर करायला मनाई का होती?
हा कलाप्रकार पर्शियातून भारतात आला. भारतात मुघल सत्ता असताना हा कलाप्रकार बहरला, वाढला. अकबराच्या काळात ही कला भरभराटीला आली. दास्तांगोई हा दरबारी कलाप्रकार. नवाब, राजे, सम्राट यांच्यासाठी प्रामुख्याने तो खेळला जाई. अर्थातच दास्तांगो पुरुषच असत. महिलांना दास्तांगोई सादर करायला मनाई होती. म्हणूनच हा कलाप्रकार पुरुषी होता. परंपरागत उर्दू दास्तांगोई मधे जरी स्त्रियांचा समावेश नव्हता.
(पर्शियातून भारतात आलेला आणि मुघलांच्या काळात बहरलेला दास्तांगोई हा कलाप्रकार.)
उर्दूत अलिफ़ लैला, हातीमताई वगैरे दास्तान सादर केल्या जात. परंतु, ‘दास्तान-ए-अमीर हम्जा’ ही सर्वांत लोकप्रिय दास्तान होती. अजूनही आहे. ज्यात हज़रत मुहम्मद काका ‘अमीर हम्जा’ यांच्या पराक्रमांची वर्णनं आहेत. भारतातील शेवटचे प्रसिद्ध दास्तांगो मीर बाकर अली यांचं 1928 मध्ये दिल्लीत निधन झाल्यानंतर दास्तांगोई खेळण्याची परंपरा संपूर्णपणे खंडीत झाली. 2005 मध्ये महमूद फ़ारूखी यांनी प्रसिद्ध उर्दू शायर, कादंबरीकार, समीक्षक शम्सुर्रहमान फ़ारूखी यांच्याकडून दास्तांगोईची तालीम घेत उर्दूत त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि दास्तांगोईचा लुप्त झालेला प्रवाह पुन्हा वाहता केला. ही आधुनिक दास्तांगोई आहे. नंतर अनेक कलावंत/सादरकर्ते दास्तांगोईशी जोडले गेले.
दास्तांगोई उर्दूसोबतच आता मराठी, गुजराती, बंगालीमध्येही...
आता केवळ अमीर हम्जाचीच दास्तान न सांगता समकालीन विषयांवर दास्तान बांधल्या आणि सादर होऊ लागल्या. दास्तांगोईतून केवळ करमणूक न साधता त्यातून थेट सामाजिक-राजकीय विधान दास्तांगोंकडून केलं जाऊ लागलं. दास्तांगोई पूर्वी रात्रभर खेळल्या जायच्या आता आधुनिक अवतारात त्या काही तासांवर आल्या, पण परिणाम न उणावता. आधुनिक दास्तांगोई उर्दूसोबतच गुजराती, बंगाली आणि मराठी या भाषांतही पोचली. दास्तांगोईची क्रेझ पुन्हा जरी वाढली असली तरी ती पुरुषांचीच मक्तेदारी राहिलेली आहे. ही दास्तांगोईची मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न भारताच्या काही महिला दास्तांगोंनी केला आहे.
भारताची पहिली महिला दास्तांगो… फौजिया
भारतात पहिल्या महिला दास्तांगोचा मान जातो फौजियाला… पुरुषांच्या एकाधिकारशाहीला मोडीत काढणाऱ्या फौजियाला साहजिकच त्यामुळे त्रास सहन करावा लागलाच, परंतू एकदा या दास्तांगोईमध्ये जम बसवल्यानंतर फौजियाने जेव्हा रामायण आणि महाभारताची कथा दास्तांगोईमध्ये सांगण्यास सुरूवात केली तेव्हा मात्र तिला अधिकच त्रास झाला. अलीकडे घडलेला एक प्रसंग दिल्लीत राहणाऱ्या फौजिया सांगतात…’’ त्यादिवशी स्टेजवर चढताना मी खुपच घाबरलेली होती. मी जी दास्तांगोई सादर करणार होती त्याचं प्रचंड दडपण आलं होतं. असं नव्हतं की यापूर्वी मी अशाप्रकारची दास्तांगोई सादर केली नव्हती, परंतू तो दिवस वेगळा होता.
(भारताची पहिली महिला दास्तांगो… फौजिया. मुस्लिमधर्मीय असूनही फौजिया दास्तान-ए-महाभारत आणि दास्तान-ए-राम ही दास्तांगोई उर्दूत सादर करतात.)
दास्तांगोईचा विषय होता ‘दास्तान-ए-राम’... आणि कार्यक्रम सादर करण्याचं ठिकाण होतं अयोध्या… म्हणजे तुम्ही विचार करा की एक मुस्लिम महिला अयोध्यामध्ये रामायण सांगणार आणि तेदेखील उर्दूमध्ये, टेन्शन नाही येणार तर काय होणार…?’’ फौजियांनी हळूहळू ‘दास्तान-ए-राम’ सादर करायला सुरूवात केली. काही वेळातच त्यांचे दडपण दूर झाले जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रेक्षक त्यांच्या दास्तांगोईमध्ये रमून गेले आहेत.
फौजिया सांगतात, कार्यक्रम संपल्यानंतर एक हिंदू वृद्ध महिला त्यांच्याजवळ आली आणि हात पकडत म्हणाली की, ज्या पद्धतीने तुम्ही मला रामलल्लाचे दर्शन घडवलं तसं आजपर्यंत कुणीच घडवलं नाही. इतकं सुंगर रामायण मी आजपर्यंत कदी ऐकल नव्हतं…’’ त्या महिलेचे डोळे भरून आले होते.
मुस्लिम महिला असूनही उर्दूत दास्तान-ए-महाभारत आणि दास्तान-ए-राम…
2006 पासून फौजिया यांनी देशभरात आणि विदेशात पाचशेपैक्षा जास्त दास्तांगोईचे कार्यक्रम सादर केले आहेत. दिल्लीच्या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्या प्राध्यापकाची नोकरी करत होत्या. परंतू दास्तांगोईचे वेड भिनल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ या कलेवर लक्ष केंद्रित केले. दास्तान-ए-आणि दास्तान-ए-मधुबाला अशा अनेक विषयांवर फौजिया दास्तांगोई सादर करतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दास्तान-ए-महाभारत आणि दास्तान-ए-राम…
‘’मला दास्तांगोई हा कला प्रकार अगदी लहानपणापासूनच आवडायचा. सुरुवातीला मला सादर करायला संधी मिळत नव्हती, तेव्हा मी घरी दास्तांगोईची प्रॅक्टिस करायची. लहानपणापासूनच मी अभ्यासात हुशार होती आणि पुस्तक वाचन हे माझं वेड आहे,’’असे 30 वर्षांची फौजिया सांगते.
(मराठीमध्ये दास्तांगोईची सुरूवात करणारे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी.)
‘’गोष्ट कुणा एकाची नसते… ती सगळ्यांचीच असते. नेहमी म्हटलं जातं की राम हा सगळ्यांचा आहे, मग रामाची कथादखील सगळ्यांचीच असली पाहिजे’’ असे फौजिया म्हणते. 2018 साली महिला आणि बालविकास खात्यातर्फे फौजिया यांना ‘भारताची पहिली महिला दास्तांगो’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. भारताच्या ‘112 प्रथम महिला’ या कर्तबगार महिलांच्या यादीतही फौजिया यांचा समावेश केला गेला.
एकाबाजूला दास्तांगोईला जरी लोकप्रियता मिळत असली तरी दुसऱ्या बाजूला आपल्या समाजाचे पूर्वग्रहदेखील तितकेच जोर धरत आहे असे सांगून फौजिया म्हणतात की, दास्तान-ए-महाभारत आणि दास्तान-ए-राम या कार्यक्रमामुळे मला अनेकवेळा विरोध सहन करावा लागला आहे. मुस्लिम असल्यामुळे अनेकदा माझे कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाले आहेत. परंतू मला त्याचे वाईट वाटत नाही. चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टीही येतच असतात.
समाजातल्या या तणावाबद्दल फौजिया एक शेर ऐकवतात… “मेरे जूनून का नतीजा ज़रूर निकलेगा, इसी सियाह समंदर से नूर निकलेगा.”
नेहा कुलकर्णी - धनश्री खंडकर मराठीतल्या पहिल्या ‘दास्तांगो’...
अक्षय शिंपी या कवी-नाटककार-अभिनेत्याने दास्तांगोई मराठीत सुरू केली आहे. दास्तांगोईचं मूळ रूप तसंच ठेवत मराठी साहित्य, गाणी यांचा आधार घेत तो दास्तांगोई सादर करतो. मात्र अक्षय शिंपीला या दास्तांगोईमध्ये साथ देतात धनश्री खंडकर आणि नेहा कुलकर्णी या महिला दास्तांगो… मराठीत अक्षय शिंपीसोबत धनश्री खंडकर ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ ही दास्तांगोई आणि नेहा कुलकर्णी यांच्यासोबत ‘दास्तान-ए-रामजी’ ही दास्तांगोई सादर करते.
समोर केवळ एक पाण्याच छोटे भांडे आणि दोन टाळ. बसायला एक छोटी पांढरी गादी. त्या गादीवर गुडघ्यावर बसलेले, पांढऱ्या लखनवी वेषातले अक्षय आणि नेहा किंवा अक्षय-धनश्री हे दोन दास्तांगो आपल्या आवाजातील चढउतारातून, देहबोलीतून, बसण्याच्या बदलातून, लकबीतून, हावभावातून, ओढणीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून या कथेतील पात्रे आपल्या समोर जिवंत उभी करतात आणि तासभर आपल्याला खिळवून ठेवतात.
मराठीतली पहिली दास्तांगोई ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ ही मुंबई शहरावरील दास्तांगोई आहे. मुंबईची विविध रूपं, मुंबईची गती, मुंबईतलं जगणं, माणसांचं जगणं तीतून उलगडलं जातं. तर ‘दास्तान-ए-रामजी’मधून जन्म-मृत्यू या दोन शाश्वत घटनांबद्दल बोललं जातं.
(अक्षय शिंपीसोबत ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ सादर करणारी धनश्री खंडकर.)
दास्तांगोई शैली मराठीत आणताना उर्दू कलाप्रकार आणि मराठी लोकपरंपरा व साहित्य यांचं ‘फ्युजन’ केलं गेलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातील साम्यस्थळं दाखवायची झाली, तर साहित्य आणि संगीत यांचा उल्लेख करता येईल. दास्तांगोईचे हे मूलभूत घटक. मराठी परंपरेत ओवी, साकी, दिंडी आणि अन्य वृत्त-छंदातल्या रचना, लोककथा मुबलक मौजूद आहेत. उर्दू दास्तांगोईत विषयानुरूप शेरोशायरी दास्तांगोंकडून ऐकवली जाते.
मराठीत आम्ही विषयानुसार लोकपरंपरेतील गीतं, कविता सादर करतो. तद्वतच मराठी परंपरेला महिलांनी गोष्टी सांगणं नवं नाही. आपला पिंड पोसला गेला, तो आई-आजींकडून ऐकल्या गेलेल्या गोष्टींवर. त्यामुळे मराठी दास्तांगोईत महिला दास्तांगो असणं हे नवं नाही. परंतु, इथं महिला दास्तांगो केवळ महिलांचंच पात्र वठवते असं नाही. ती पुरुष आणि तृतीय लिंगाचंही पात्रं बेमालूमपणे वठवते. दोन दास्तांगो असले तरी अंतिमत: एकच दास्तांगो सादरीकरण करतो आहे, हा परिणाम साधला जाणं अपेक्षित आहे.
दास्तांगोई लिंग ओलांडून पलीकडे जाते. ‘जेंडर बायसनेस’ला इथं थारा नाही, असे नेहा कुलकर्णी ही महिला दास्तांगो सांगते.
’दास्तान ए बुद्धा’’ आणि 'दास्तान-ए-आंबेडकर' सादर करणारी पूनम गिरधानी
महिला दास्तांगोच्या यादीत आणखी एक नाव म्हणजे पूनम गिरधानी… त्या एक लेखिका आणि रेडिओ कलाकार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या दास्तांगोई सादर करतात. फौजियासोबतदेखील त्यांनी अनेक कार्यक्रम एकत्रितपणे सादर केले आहेत. त्यांच्या दास्तांगोईचा विषय आहे ‘’दास्तान ए इरफ़ान ए बुद्धा’’ आणि 'दास्तान-ए-आंबेडकर'... ज्या लोकांना हिंदी आणि उर्दू कळत नाही, तेदेखील माझा कार्यक्रम बघायला येतात, असं पूनम सांगते. दास्तांगोईचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना दुसऱ्या जगात घेऊन जाणं. जिथे फक्त तुम्हाला शब्दांच्या आधारे तुमची कहाणी खुलवता आली पाहिजे. फक्त आवाजाच्या चढ-उतारांसह.
(’दास्तान ए बुद्धा’’ आणि 'दास्तान-ए-आंबेडकर' सादर करणारी पूनम गिरधानी)
दास्तांगोईत बाह्य साधनांच्या वापराला मनाई आहे. उदाहरणार्थ कुठल्याही पद्धतीची विशेष रंगभूषा, वाद्य, विशेष प्रकाशयोजना वापरता येत नाही. अगदी रंगमंचाचीही अट नाही. दास्तांगो आपला ‘आवाज’ आणि ‘शरीर’ ही हत्यारं वापरून प्रेक्षकांसमोर अवकाश निर्माण करतो. गायली जाणारी गाणी हे टाळ्या, चुटक्या आदींच्याच तालावर गायली जातात. चित्रपट-नाटक बघत असता त्यातल्या इतर अनेक घटकांकडे आपली नजर स्वाभाविकपणे जाते.
नेपथ्य, वेशभूषा, संगीत, छायालेखन, अभिनय, यांत गुंतून एकत्रित परिणाम हरवण्याची शक्यता अधिक असते. दास्तांगोईत नखशिखान्त पांढरे कपडे घालून, वज्रासनात बसून दास्तांगो सादरीकरण करत असतात. इथं अन्य कुठल्याही रंगाला मज्जाव आहे. कमीत कमी (जवळपास शून्य) साधनाच्या साहाय्यानं हा कलाप्रकार सादर केला जातो. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची शतप्रतिशत जिम्मेदारी ही दास्तांगोंची असते. इथं त्यांच्या अभिनयकौशल्याचा कस लागतो, असे पूनम सांगते.






