(किरण गिते)
1) खळखळ वाहतोय गावचा ओढा.. घाई नका करू तुम्ही दमाने धरा थोडा
पाऊस झालाय बरा.. डाव्या हातानं साडी वर करा… उजव्या हातात सामान धरा…
2) शेजारीणबाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या
बाबूला आतमध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या…
3) शिट्टी वाजली, गाडी सुटली अन् पदर गेला न वर
पोरी जरा जपून दांडा धरं, पोरी जरा जपून दांडा धर…
हजारो, लाखों द्विअर्थी अर्थात ‘डबल मिनिंग’ गाण्यांपैकी वर उल्लेख केलेली ही काही गाणी… गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक गल्लीत, प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात, प्रत्येक पार्टीत, प्रत्येक मिरवणूकीत ही ‘डबल मिनिंग’ गाणी वाजतात, गाणी ऐकताच पुरुषवर्ग चेकाळतो, बेफाम होतो आणि गाण्यांतील शब्दांच्या अर्थाप्रमाणे विचित्र अंगविक्षेपासह नाचू लागतो…
अशा आक्षेपार्ह शब्दांनी स्त्रीला संबोधल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे समाजात स्त्रियांविषयी चुकीचा संदेश पसरविला जातो. अश्लील गाणी स्त्रियांच्या लैंगिक शोषणाला दुजोरा देतात, याचं कुणालाच काही वाटत नाही…
पण ही अशी ‘डबल मिनिंग’ गाणी गेल्या कित्येक वर्षांपासून समाजात सुरू असताना आताच यावर आपण का बोलतोय…? असा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जाऊ शकेल. परंतू त्याला निमित्त आहे बिहार या राज्याचे…अशा ‘डबल मिनिंग’ गाण्यांच्या बातीत बिहार राज्य महाराष्ट्राच्या कित्येक पावलं पुढे आहे.
भोजपुरी ‘डबल मिनिंग’ गाण्यांनी त्या राज्यात अनेक वर्षांपासून उच्छाद मांडलायं. भोजपुरी गाणी आणि अश्लिलता हे एक समीकरणंच बनलं आहे. पण, आता या समीकरणाला तोडण्याचं काम बिहार पोलिसांनी काम हाती घेतलं आहे. त्याला कारण आहे बॉलिवूडची बिहारी अभिनेत्री नितू चंद्रा.
नितू चंद्रा मूळची पाटणा बिहारची रहिवासी आहे. नितूने अभिनयासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 2005 मध्ये बॉलिवूडचा ‘गरम मसाला’हा तिचा गाजलेला सिनेमा. यासह तमिळ, इंग्लिश,भोजपुरी अशा अनेक चित्रपटांमध्ये नितूने काम केलं आहे.

बिहारची अभिनेत्री नितू चंद्राने हनी सिंगला डबल मिनिंग गाण्यांवरून कोर्टात खेचलयं
बिहारमध्ये ‘डबल मिनिंग’ गाण्यांवर आता बंदी
जगभरात प्रसिद्ध ‘रॅपर’ म्हणून ओळख असलेला यो यो हनी सिंगचं अलिकडेच एक ‘मेनियाक’ गाणं चांगलंच चर्चेत आलं होतं. बऱ्याच कालावधीनंतर मार्केटमध्ये हनी सिंगचं गाणं आल्यामुळे अर्थातच ‘मेनियाक’ गाण्याने सगळ्यांना वेड लावलं. या गाण्याला एका महिन्यात सात दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. ईशा गुप्ताने त्यात नृत्य केले आहे. तसेच हे गाणं सध्या ट्रेंड करत आहेत.
पण याच गाण्यावरून अभिनेत्री नितू चंद्राने हनी सिंगला कोर्टात खेचलंं. ‘मेनियाक’ गाण्यात हनी सिंगने काही भोजपुरी भाषेतील अश्लील शब्दांचा वापर केला. त्यावर आक्षेप घेत अभिनेत्री नितू चंद्राने पाटणा हायकोर्टात याचिका दाखल केली. मेनियाक या गाण्यात द्विअर्थाच्या शब्दांचा वापर करण्यात आला असून महिलांचही चित्रिकरण वाईट पद्धतीने करण्यात आलं आहे. त्यामुळे गाण्यावर आणि गाणं तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी नितू चंद्राने याचिकेत मागणी केली आहे
नितू चंद्राने भोजपुरी गाण्यांमधील अश्लिलतेविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आणि लगेचच पोलिस खातेही पुढे आले. पोलिसांनी एक आदेशच काढला ज्यामध्ये सबंध बिहारमध्ये सार्वजनिक ठिकाणी दुहेरी अर्थ असलेल्या गाणी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
नितू चंद्रा यांच्या याचिकेमुळे महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा बाहेर आला आहे. दुहेरी अर्थ असलेल्या गाण्यांबद्दल 11 वर्षांची आई असलेली गृहिणी अल्पना शरण सांगतात, "त्यांचा असा विश्वास आहे की, अशी गाणी निश्चितच असुरक्षित वातावरण निर्माण करतात. अश्लील चित्रपट आणि गाण्यांवर बंदी घातल्याने महिलांवरील गुन्हे काही प्रमाणात कमी होऊ शकतात. पण, त्यासाठी वेळ लागेल."
नितू चंद्राच्या पुढाकाराने बिहार पोलिसांनी डबल मिनिंग गाण्याविरुद्ध कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे
बिहारच्या या घटनेनंतर आता आपण पुन्हा वळू या महाराष्ट्राकडे…! बिहार पोलिसांनी ज्या पद्धतीने अश्लिल आणि दुहेरी गाणी सार्वजनिक ठिकाणी वाजवण्यावर बंदी घातली आहे, तशी कारवाई महाराष्ट्रात होऊ शकते का? हाच प्रश्न घेऊन ‘बाईमाणूस’ने डबल मिनिंग गाणी गाणारे गायक, लावणी नर्तिका, तमाशा फड मालक आणि लोककलेचे अभ्यासक यांच्याशी संपर्क साधला.
डबल मिनिंग गाण्याचा तुम्ही घ्याल तसा अर्थ निघतो - आनंद शिंदे
38 वर्षांपूर्वी तुफान लोकप्रिय झालेल्या ‘जवा नवीन पोपट हा’ या गाण्यांपासून ते आताच्या ‘हलवून दांडा, भरावा हंडा’ या गाण्यांपर्यंत… गेल्या तीन दशकांपासून शिंदे घराण्यानेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात डबल मिनिंग गाणी जन्माला घातली असेच म्हणावे लागेल. बिहार राज्यात दुहेरी गाण्यांवर बंदी घातल्याने महाराष्ट्रातही अशा गाण्यांवर कायदेशीर आक्षेप घेतला जाऊ शकतो का…? अशा गाण्यांमागे नेमका काय हेतू असतो..? या प्रश्नांवर बोलताना लोकप्रिय गायक आनंद शिंदे म्हणाले,
“डबल मिनिंग गाण्याचा तुम्ही घ्याल तसा अर्थ निघतो. चांगला अर्थ देखील त्या गाण्यांमधून निघतात, पण लोकांना घ्यायचा तोच अर्थ लोक घेतात. “डोकं उठलं म्हणून म्हंटलं आता निवांत लोळायचं… आता मजेत लावून तेल तुझ्या हाताने चोळायचं…’ आणि ‘’बाबूला आतमध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहु द्या” या सगळ्या गाण्यांवर लोक ठेका धरतात. हीच गाणी मार्केटमध्ये चालतात. गाण्यांचा अर्थ कसा घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.”
गायक आनंद शिंदे
महाराष्ट्राचा बिहार व्हायला काही वेळ लागणार नाही - सुरेखा पुणेकर
तमाशा -लावणी ही महाराष्ट्राची एक ओळख आहे. पण याच लावणीवर अश्लीलतेचा शिक्का मारण्यात आला आहे. तमाशा, लावणी ‘सो कॉल्ड’ चांगल्या घरातली माणसं बघत नाहीत, कारण, लावणी आणि तमाशाला समाजाने अश्लिल गाण्याचा आणि नाचण्याचा धंदा असलेलं ठिकाण असं संबोधलेलं आहे. लावणी आपली पारंपारिक नृत्यकला आहे, लावणीचा इतका गौरवशाली इतिहास आहे, असे असतानाही मग लावणी बदनाम का…?
नुकतीच ‘नटरंगी नार’ फेम लावणी नर्तिका सुरेखा पुणेकरांनी लावणी केंद्रात सुरू असलेल्या अश्लीलतेविरुद्ध मोहीम सुरू केली होती. सुरेखा पुणेकर यांनी नव्या नृत्यांगणांनी अश्लीलपणा करू नये, असं सांगितलं. अश्लीलपणा दाखविल्यास महाराष्ट्राचा बिहार व्हायला काही वेळ लागणार नाही, असेही पुणेकर म्हणाल्या होत्या.
सुरेखा पुणेकर सांगतात, “राज्यात डान्सबारवर बंदी आहे. पण, राज्यात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने डान्सबार चालवले जातात. डान्सबारमुळे अनेक संगीतकार, कलाकार यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. डीजे बंद करून वाद्य चालू करा, यासाठी शासनाने मदत केली तर हे बंद होईल आणि आमच्या कलावंतांना कुठे तरी काम मिळेल. संगीतबारी ही वेगळी, थेटर, सभागृहातील कार्यक्रम वेगळे आहेत. संगीतबारीच्या कलावंतांना हेच काम केल्याशिवाय कुटुबांचा उदरनिर्वाह होऊच शकत नाही.”
लावणी नर्तिका सुरेखा पुणेकर
हे लेख पण वाचा :
२) बहुजनांचा ‘चमकीला’ आणि लावणी-तमाशा यांच्यात काय साम्य आहे…?
रघुवीर खेडकर यांच्या तमाशाचे बदललेले स्वरूप
‘जर समाजच नागडा झाला तर आम्ही कलावंतांनी काय करायचं? - खेडकर
फक्त लावणीच नव्हे तर पारंपारिक तमाशाचे सादरीकरणही आता अश्लीलतेकडे झुकले आहे. तोकड्या स्कर्टमध्ये अश्लील गाण्यांवर नाचणे हा नवा ट्रेंड तमाशामध्ये सुरू झालायं. ज्यांनी आपले सबंध आयुष्य तमाशासाठी वेचलं ते राज्याचे आघाडीचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर याबद्दल खंत व्यक्त करतात.
खेडकर म्हणतात की, “आजकालचा तरूण वर्ग हा पूर्णपणे अश्लिलतेकडे झुकलेला आहे.तरूणांच्या हाती असलेला मोबईल त्यांना हव्या त्या नागड्या गोष्टी दाखवत आहे. त्यामुळेच मार्केटमध्ये आलेली अश्लील गाणी प्रसिद्ध होतात. नृत्य करताना मुली अश्लिल डान्सच्या स्टेप करतात आणि एका झटक्यात त्या सेलिब्रिटी होतात. आम्ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला मात्र कोणीच सेलिब्रिटी म्हणत नाही. आज लोकांना तुमचा सोज्वळपणा नकोय, चाबरेपणा हवा आहे. आम्ही आमच्या तमाशात गुडघ्यांवर लुगडं नेसून मुलींना कधीच नाचवत नव्हतो, परंतू लोकांच्या मागण्या इतक्या वाढल्या की आमच्या बहिणींना उघड्या मांड्या करत आता नाचावं लागतं.. हे माझ्या नजरेसमोर होतं पण मी काहीच करू शकत नाही. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे समाजच नागडा झाला आहे. जर समाजच नागडा झाला तर आम्ही कलावंतांनी काय करायचं? इतर गायक साधी सरळ गाणी गातात तेव्हा ते गाणं चालत नाही. त्यामुळे जशी मागणी तशी पुरवणी. त्यामुळे त्यांनाही नाईलाज आहे. समाजानेच मुळात वस्त्र घालण्याची घरज आहे.”
तमाशा सम्राट रघुवीर खेडकर
बहुजनांचं जगण्याशी जोडलेलं सौंदर्यशास्त्र ब्राह्मणी व्यवस्थेनं होऊ दिलं नाही
डबल मिनिंग, श्लील-अश्लील, द्विअर्थी गाणी, हे कोण ठरवतं…? अशा गाण्यांची मुळात निर्मिती कधी आणि का झाली…? त्यामागे काही सामाजिक आणि जातीय संदर्भ आहेत का…? असे प्रश्न या विषयाच्या निमित्ताने लोककला अभ्यासक प्रा. मिलिंद कसबे यांनी विचारले आहेत.
नारायणगाव येथे राहणारे मिलिंद कसबे म्हणतात,“आपली समाजव्यवस्था नवं रूप धारण करतेय. ते रोप धर्म, जात आणि वेगवेगळ्या विषारी नखांनी उभं राहत आहे. समाजातील अभिव्यक्ती नावाचा वापर प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने घेतोय. शासनाला अभिव्यक्तीचा अर्थ समजलेला नाही. लोकसाहित्यात गाण्यांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग करण्यात आलेले आहेत. आज आपण ज्याला अश्लील म्हणतो ते पूर्वीदेखील होते. कारण, ते जगण्याशी जोडलेलं होतं. पूर्वी कोणीच यावर आक्षेप घेत नव्हतं. अश्लीलता ही समाजाला पोषक ठरेल इथपर्यंत ठीक आहे. भांडवलशाही, धर्माधिष्टित राजकारण आणि जातीने विखारी बनलेला लोकसमूह हे सगळं निर्माण करत आहे. दादा कोंडकेंनी आपली मनोरंजनाच्या माध्यामातून आपली सेवा केलेली आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दात दुहेरी अर्थ निघतात. ती सेवा नाकारणार आहात का? हा प्रश्न आहे. जर दुहेरी अर्थाच्या बाबींवर तुमचा आक्षेप असेल तर तमाशा, विनोद, लोक परंपरा, लोकसाहित्य, रूढी परंपरा नाकाराव्या लागतील. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे फार महत्त्वाचं आहे. अभिनेत्री नितू चंद्राने हनी सिंगच्या गाण्यावर घेतलेला आक्षेप चुकीचा आहे, असे मिलिंद कसबे म्हणतात. सामुहिक कृती करताना नैतिकता आणि अनैतिकता कशाला म्हणतात याचा विवेक माणसाच्या समूह भावनेत असतो. आज आपल्या कल्पना आणि भावनेचं स्वरूपही बदललेलं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अ़डकून आणि कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपण आपल्या कलेची अभिव्यक्ती संकुचित करत आहोत.” असे स्पष्टीकरण कसबे यांनी दिले.
लोककला अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे
…मग नामदेव ढसाळांच्या कवितांबद्दल काय म्हणाल?
“शासनाने पद्मश्री दिलेले नामदेव ढसाळ हे जगभरातल्या बंडखोर कवींचे नायक आहेत. त्यांनी आपल्या समाजात शिव्यांनी भरलेली कविता आणली ती काय विनाकारण आणली नाही, तो एक क्रांतीचा एल्गार आहे. अशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. भारतीय साहित्य आणि कलेच्या वरच्या मजल्यावर ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र, ब्राह्मणी साहित्यशास्त्र आणि ब्राह्मणी कलाशास्त्र उभे आहे. त्याच्या म्होरक्यांना जर आवडीचं आणि सोईचं नसेल तर ते अश्लील आणि देशद्रोही म्हणतात. बहुजनांचं जगण्याशी जोडलेलं एक स्वतंत्र सौंदर्यशास्त्र उभं करायला हवं होतं, जे ब्राह्मणी व्यवस्थेनं होऊ दिलं नाही. त्यामुळे बहुजनांनी विकसित केलेल्या कलासुद्धा आजही ब्राह्मणी सौंदर्याच्या निकषांवर उभ्या आहेत हा विरोधाभास आहे. नामदेव ढसाळांच्या कवितांचं मुल्यमापन करण्यासाठी तुमचं पारंपारिक साहित्याशास्त्र उपयोगी नाही, दादा कोंडकेंच्या गाण्यांचं मुल्यमापन करण्यासाठी ते उपयोगी नाही. त्यामुळे प्रचलित समाजव्यवस्थेत दबलेल्या, नाडलेल्या आणि उपेक्षित माणसाच्या आवाजातलं पर्यायी सौंदर्य आणि कलाशास्त्र उभं राहिलं असतं तर नैतिक-अनैतिक आणि अश्लील कशाला म्हणायचं असे वाद आज आपल्याला झेलावे लागले नसते.” अशी खणखणीत भूमिका मिलिंद कसबे घेतात.
सामाजिक, सांस्कृतिक, लोककला, लोकसाहित्य हा आपला अमुल्य ठेवा प्रत्येकाने जपला पाहिजे. या सगळ्यांमधून आपली व्यापकतेची प्रकर्षाने ओळख राहते. महिला आणि त्यांचे समाजात ज्वलंत प्रश्न असताना जाणूनबुजून लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा आगापिछा सामाजिक मुल्यांवर करायला हवा. आपल्या समाजाचा मूळ प्रश्न काय आहे तर, ‘शिशा टुटा है इसका गम नहीं है, सवाल ये हैं की पत्थर आया कहाँ से? हे सगळं धर्मशास्त्र, पारंपारिक शास्त्राशी आणि रूढी परंपरेनी ग्रासलेल्या व्यवस्थेशी जोडलेलं आहे.






