“माझी पाळी सुरू झाली तेव्हा मी गर्दीने भरलेल्या निवाऱ्यात होते. माझ्याकडे फक्त एकच पॅड होतं, तो टिकवण्यासाठी मी त्याभोवती टॉयलेट पेपर गुंडाळला, मी ते पॅड धुऊ शकले नाही, वेदना असह्य होत्या. संपूर्ण दिवस मी शांत बसून रडत राहिले.”
- गाझातील विस्थापित किशोरी
“कधी कधी मला अन्नापेक्षा सॅनिटरी पॅड आणि साबण अधिक गरजेचं वाटतं…”
- आयशा, गाझा
इस्रायलच्या दीर्घकालीन वेढ्यात आणि भीषण बाँबहल्ल्यांमध्ये सध्या गाझामध्ये सुमारे 7 लाख महिलांचा आणि मुलींचा मासिक पाळीच्या वयात समावेश होतो. यामध्ये हजारो मुली अशा आहेत ज्या पहिल्यांदाच पाळी अनुभवत आहेत, तेही बॉम्बस्फोटांच्या सावटाखाली, घाणेरड्या आणि गजबजलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये, जिथे बदलायलाही जागा नाही.
2 मार्च 2025 पासून इस्रायलने गाझावर संपूर्ण मदत बंदी लागू केली असून त्यामुळे स्वच्छता साहित्य पूर्णतः संपुष्टात आलं आहे. त्यात पाळी दरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅड्सचाही समावेश आहे. गाझामधील जवळपास ९० टक्के पाणी आणि स्वच्छता संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाणी पंप आणि वितरणासाठी लागणारे इंधनही आता संपले आहे. जेव्हा दहा पैकी नऊ घरांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे, तेव्हा महिलांना आणि मुलींना पाणी आणि साबणाशिवाय, तसेच कोणत्याही खाजगी जागेशिवायही आपली मासिक पाळी हाताळावी लागते. आज इथल्या अनेक महिलांसाठी मासिक पाळी म्हणजे वेदनेचा आणि एकटेपणाचा काळ झाला आहे.
संबंधित लेख वाचा: 1) गाझातील 14 हजार चिमुकल्यांच्या बाबतीत इस्त्रायलचे नेतन्याहू ‘हिटलर’सारखे का वागत आहेत? |
खाजगीपणाचा, संरक्षणाचा आणि सॅनिटरी पॅड्सचा अभाव
गाझामधील एका डॉक्टरने युएनएफपीए (UNFPA) या संयुक्त राष्ट्रांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य संस्थेला सांगितले की, “दररोज मी महिलांना मासिक पाळी, गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या यातनांतून जाताना पाहते. एक स्त्री म्हणून, मला त्यांचा संघर्ष मनापासून जाणवतो. ही सगळी नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण इथे ती वेदनेचा आणि अपमानाचा स्रोत बनली आहे. मात्र तरीही मला स्त्रियांच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ताकद दिसते, पण त्याचबरोबर खोल वेदना आणि सन्मान हिरावल्याची भावना देखील जाणवते. आपत्कालीन परिस्थितीत महिला आणि मुली सर्वात असुरक्षित असतात. मासिक पाळीवेळी सॅनिटरी पॅड्स न मिळणं काय यातना निर्माण करतं, याची मला पूर्ण जाणीव आहे.”
गाझामध्ये दर महिन्याला 1 कोटींपेक्षा अधिक सॅनिटरी पॅड्सची गरज असते. पण सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत त्यापैकी केवळ 25 टक्केच पॅड्स उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक महिलांना जुने कपडे, फाटक्या चादरी किंवा स्पंज वापरण्याची वेळ येते. ही सामग्री ते योग्य रीतीने धुण्याचीही सोय नसते, त्यामुळे याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
“माझ्या चार मुलींसाठी मी माझा एकमेव शर्ट फाडून त्याचे तुकडे केले,” असं जबालिया येथून विस्थापित झालेल्या एका वडिलांनी सांगितलं.
“माझी पाळी सुरू झाली की मी मनोमन विचार करते, ‘मी मुलगीच का झाले?”
हे तात्पुरते उपाय केवळ वेदनादायकच नाहीत, तर आरोग्यदृष्ट्याही धोकादायक आहेत. यामुळे प्रजननसंस्थेच्या, लैंगिक संक्रमणाच्या आणि लघवीच्या इन्फेक्शन्सचा धोका वाढतो . त्यावर वेळेत उपचार न झाल्यास दीर्घकालीन गुंतागुंत उद्भवू शकते. सध्या हजारो महिलांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे, पण गाझामधील आरोग्य यंत्रणेच्या कोसळल्यामुळे अनेकांना उपचारही मिळत नाहीत.
इथल्या रेफ्युजी कॅम्पच्या गर्दीच्या निवाऱ्यांमध्ये खाजगीपणा अस्तित्वातच नाही. “ पॅड केवळ बदलण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी इथल्या बाथरूमसाठी मला तासनतास रांगेत थांबावं लागतं,,” असं एका मुलीने सांगितलं. दुसरी म्हणाली, “मी सॅनिटरी पॅडऐवजी कपड्याचे तुकडे वापरते… आणि त्यामुळे मला इन्फेक्शन झालं.”
याचा मानसिक परिणामही प्रचंड गंभीर आहे. मासिक पाळीत महिलांना आणि मुलींना सतत लाज वाटते, गळतीची भीती वाटते आणि मनात असुरक्षिततेचा खोल ठसठशीत भाव असतो. एका किशोरवयीन मुलीने स्पष्ट शब्दांत तिचं दु:ख व्यक्त केलं: “माझी पाळी सुरू झाली की मी मनोमन विचार करते, ‘मी मुलगीच का झाले?’”
UNFPA च्या अंदाजानुसार, सध्या गाझामध्ये अन्नटंचाईचे संकट इतके गडद आहे की पाचपैकी एक व्यक्ती उपाशी आहे. सुमारे 55,000 गरोदर महिलांसाठी रोजचं चुकलेलं जेवण म्हणजे गर्भपात, मृत बालकाचा जन्म किंवा कमी वजनाच्या बाळांचं प्रमाण वाढण्याचा धोका. UN ने नमूद केलं आहे की, सध्या गाझामधील सुमारे 17,000 गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांना कुपोषणासाठी तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. आणखी वाईट म्हणजे, रुग्णालयांवर झालेल्या सातत्याच्या बॉम्बहल्ल्यांमुळे आरोग्य यंत्रणा अक्षरशः कोसळली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडे आवश्यक औषधं आणि साधनंही शिल्लक नाहीत.
गाझा पट्टीतील महिलांना होत असलेल्या आरोग्य समस्या
- प्रजनन तंत्राच्या समस्या
- लघवीचे आणि यौनसंबंधातून पसरणारे आजार
- जंतुसंसर्ग, फोड, फंगल इन्फेक्शन्स
- उपचार न मिळाल्यामुळे दीर्घकालीन शारीरिक त्रास
काय करत आहे UNFPA?
- 3 लाखांहून अधिक महिलांना दोन महिन्यांचा सॅनिटरी पॅड्सचा पुरवठा
- 12,000 पेक्षा अधिक महिलांना प्रसवोत्तर किट्स
- 1.5 लाख महिलांना हायजीन किट्स + कॅश व्हाउचर्स
- 6,200 तरुणींना शालेय वयातील हायजीन किट्स
- 16 सुरक्षित केंद्रांमधून लैंगिक हिंसा प्रतिबंध व मानसिक आधार
- 6 मोबाइल मॅटरनिटी युनिट्स आरोग्य केंद्रांमध्ये पाठवण्यात आल्या






