2017 मध्ये, मध्य प्रदेशातील असिस्टंट लोको पायलट मीना (नाव बदललंय) यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सोबतच तापही चढला. त्या जवळच्या रेल्वे रुग्णालयात गेल्या तेव्हा त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनी सांगितलं की, त्यांना वाटलं की त्यापूर्वी दोन-तीनदा त्यांना जसा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास झाला होता तसंच हे असेल.
पण यावेळेसचा त्रास वेगळा होता. त्यांच्या किडनीत गळू झालं होतं ज्यात पस साठला होता. त्याच्यावर लगेच उपचार झाले नसते तर त्यामुळे आतील अवयवांना नुकसान पोहोचून त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता. मीना यांनी लगेच त्यावर उपचार सुरू केले. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळेच हा गळू तयार झाला होता. वेळीच उपचार केल्यामुळे पुढचा धोका टळला. 
महिला लोको पायलट्सना ‘युरिनरी इन्फेक्शन’ का होतं…?
मीना लांब पल्ल्याची मालगाडी चालवते. मालगाडी चालवणाऱ्या मीना यांना दीर्घकालीन कामाची सवय आहे, जे कधीकधी 12 तासापर्यंतही चालू शकतं आणि या वेळेत त्यांना बाथरूममध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे त्या कमी पाणी पितात आणि तासनतास आपली लघवी दाबून धरतात. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. मीनासारख्या महिला लोको पायलट्सना अनेकदा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास सामान्यपणे होतच असतो.
देशभरात जवळपास 33 महिला लोको पायलट या त्रासातून गेल्या आहेत. स्वच्छतागृहांची अव्यवस्था आणि कामाचे जास्त तास यामुळे महिला लोको पायलट्स युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, युटेराईन फायब्रॉईड्स, उच्च रक्तदाब, इतकंच नाहीतर काही वेळेस गर्भपातालाही सामोऱ्या गेल्या आहेत. आणि म्हणूनच महिला लोका पायलट्सनी रेल्वे बोर्डाला एक पत्र लिहून कळवलं की बाथरुम नसल्यामुळे कामावर परिणाम होतो, लक्ष लागत नाही आणि सुरक्षा धोक्यात येते.
संबंधित लेख वाचा: 1) ‘’बास झालं कौतुक महिला लोको पायलट असल्याचं, आता आम्हाला हा ‘जॉब’ बदलून द्या…’’ |
फक्त महिलांच नाही तर पुरुष लोको पायलट्सनां देखील अनेक समस्या
देशभरातल्या एकूण दोन हजारच्या आसपास असलेल्या महिला लोको पायलटची ही समस्या… परंतू दुसऱ्या बाजूला पुरुष लोको पायलटदेखील काही सुखी नाहीत. 
'आम्ही ज्या गाड्या चालवतो त्यात आमच्यासाठी शौचालये नाहीत.' कधीकधी गाड्या 3-4 तास सतत धावतात. जर तुम्हाला या काळात शौचालयासाठी जायचे असेल तर ते खूप त्रासदायक होते. पुढचे स्टेशन येईपर्यंत आम्ही लघवी रोखून ठेवतो. अनेक पुरुष लोको पायलट पॉलिथिन आणि बाटल्यांमध्ये लघवी करतात आणि बाहेर फेकतात, पण महिला कर्मचारी काय करतील’’? असे लखनौ विभागाचे लोको पायलट संतोष सिंग सांगतात.
संतोष सिंग यांना रेल्वेमध्ये काम करून जवळजवळ 30 वर्षे झाली आहेत. त्यांना कामाचे तास आणि सुट्ट्यांबद्दल राग येतो. त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे शौचालयात जाण्यासाठी ब्रेक न मिळणे. ते म्हणतात, 'जिथे ट्रेन 5-10 मिनिटे थांबते तिथे आपण पटकन काहीतरी खाण्याचा आणि शौचालयात जाण्याचा प्रयत्न करतो.' मी नियमितपणे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करतो. लघवी रोखून ठेवल्याने किडनीवर वाईट परिणाम होतो. सरकारने आमचे ड्युटीचे तास कमी करावेत.
शौचालय आणि जेवणाच्या सुट्ट्यांसाठी भारतीय रेल्वेचे लोको पायलट संपावर
एकीकडे महिला लोको पायलट्सने आम्हाला ड्युटी बदलून देण्याची मागणी केली असतानाच आता भारतीय रेल्वेचे लोको पायलट झारखंडची राजधानी रांची येथे 4 एप्रिलपासून ते संपावर आहेत. ते गेल्या काही काळापासून ड्युटी दरम्यान शौचालय आणि जेवणाच्या सुट्ट्यांची मागणी करत आहेत. लोको पायलटच्या मागण्यांवर रेल्वेने 26 जुलै 2024 रोजी एक समिती स्थापन केली होती. समितीला एका महिन्यात आपला अहवाल सादर करायचा होता, परंतु आता 9 महिन्यांनंतर तिच्या शिफारशी समोर आल्या आहेत.
समितीने लोको पायलटच्या मागण्या नाकारल्या आहेत. सुरक्षितता आणि वेळेमुळे ब्रेक देणे शक्य नसल्याचे सांगितले. इंजिनमध्ये कॅमेरे बसवण्याचे प्रकरणही घडले. गोपनीयतेचे कारण देत लोको पायलट याला विरोध करत होते. समितीने याला गोपनीयतेचे उल्लंघन मानले नाही.समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने 4 एप्रिल रोजी सर्व झोनल व्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. हे पत्र पाहताच लोको पायलट संतापले आहेत.
रेल्वे बोर्डाने लोको पायलट्सच्या सगळ्या मागण्या धुडकावल्या
रेल्वे बोर्डाच्या पत्रावर बिलासपूर विभाग, छत्तीसगडचे लोको पायलट बीके तिवारी म्हणतात, '11-12 तासांची ड्युटी सहज करता येते. लोकोमोटिव्हमधील सीट्स अशा आहेत की त्यावर सतत बसल्याने नसा ताणल्या जातात. सामान्य लोकांसाठी ८ तास काम, 8 तास विश्रांती आणि कुटुंबासाठी 8 तास असे निश्चित नियम आहेत. आम्हाला आठवड्यातून फक्त ३० तास विश्रांती मिळते. आम्हाला सांगण्यात आले आहे की हे सुरक्षिततेच्या श्रेणीत आहेत आणि त्यांना अधिक विश्रांतीची आवश्यकता आहे. 
30 तासांची नियतकालिक विश्रांती देखील सर्वत्र चार दिवसांऐवजी फक्त अडीच ते तीन दिवसांसाठी दिली जात आहे. लोको पायलटची कमतरता आहे, त्यामुळे कामाचा ताण आमच्यावर आहे. आम्हाला नीट झोपही येत नाही. लोको पायलट 15 ते 17 तास काम करत असतात. समजा कोणी दिल्लीहून ट्रेन पकडली आणि 8-9 तासांत जम्मूला पोहोचला. जम्मू हे एक आउट स्टेशन आहे, त्यामुळे त्याला फक्त ८ तास विश्रांती मिळेल. मग 8 तासांनी तो ट्रेन परत आणेल. म्हणजे ट्रेन पुन्हा 8-9 तास धावेल. अशाप्रकारे तो 24 तासांत दोनदा ड्युटी करत आहे.’’
गरोदरपणातही ड्युटीवर तैनात केले जाते
अंजली 12 वर्षांपासून ट्रेन चालवत आहेत. त्या रांचीमध्ये सुरू असलेल्या लोको पायलटच्या संपात सामील झाल्या आहेत. अंजली म्हणतात, 'जर तुम्हाला ड्युटी दरम्यान शौचालयात जावे लागले तर तिथे कोणतीही सुविधा नाही.' जर तुम्ही ट्रेन थांबवली तर व्यवस्थापन म्हणते की तुम्ही वेळ वाया घालवत आहात. 'गरोदरपणातही महिला लोको पायलटना ड्युटीवर तैनात केले जात आहे. रांची विभागातील दोन लोको पायलटनी त्यांच्या गरोदरपणात ऑफिस ड्युटी मागितली होती, पण त्यांना ती मिळाली नाही. गरोदरपणाच्या 4-5 महिन्यांपर्यंत महिला रनिंग स्टाफ म्हणून ड्युटी करत असतात.
ऑक्टोबर 2024 मध्ये अंजलींनी लोको पायलट्ससोबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. अंजली म्हणतात, 'मी त्यांना सांगितले की आम्हाला इंजिनखाली शौचालय करावे लागते कारण आम्ही ट्रेन जास्त वेळ थांबवू शकत नाही आणि निघून जाऊ शकत नाही. आमच्यावर खूप दबाव आहे. वाहन किती वेळ थांबले याच्या आधारे वेळ मोजला जातो. गरोदरपणात महिला चार-पाच महिने ड्युटी करत असतात. यावर ते म्हणाले, 'बहिणी, कृपया माझ्यावर विश्वास ठेव, मी सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन.'
4 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, रेल्वेमध्ये 2037 महिला लोको पायलट काम करत आहेत. ही संख्या 31 मार्च 2024 पर्यंतची होती. रेल्वेमध्ये एकूण महिला कर्मचाऱ्यांची संख्या 99,809 आहे. 1990 च्या दशकापासून भारतीय रेल्वेने लोको पायलटसाठी क्रू केबिनमध्ये टॉयलेटची व्यवस्था सुरू केली. पण त्यांची संख्या अजूनही फारच कमी आहे.
केबिनमध्ये चढण्यासाठी असणारी शिडी इतकी उंच असते की…?
उत्तर प्रदेशच्या लोको पायलट समीरा सांगतात की, केवळ रेल्वेतच टॉयलेट्स नाहीत असं नाही. स्टेशनवरही लॉबी रुममध्ये स्त्रियांसाठी वेगळी टॉयलेट्स नसतात. स्टेशन प्लॅटफॉर्मवरील किंवा रनिंग रुममधील टॉयलेटचा वापर करायचा म्हटलं तर जाण्यायेण्यासाठी दहा-पंधरा मिनिटं लागतात. रेल्वे बोर्डाला पाठवलेल्या पत्रात महिला लोको पायलट्सनी लिहिलंय की, आरोग्याच्या प्रश्नासोबतच त्यांना आपल्या जीविताचीही काळजी वाटते. दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझंही त्यांच्यावर असतं.
पुरुष लोको पायलट्सच्या प्रश्नांकडे यामुळे लोकांचं लक्ष गेलं खरं पण स्त्रियांना याहून जास्त त्रास सोसावा लागतो. मीना सांगतात की रेल्वेच्या हे लक्षातच येत नाहीये की महिला लोको पायलट्ससाठी नियम आणि सुविधा यांच्यात काही बदल करण्याची गरज आहे म्हणून. उदा. रेल्वे इंजिनच्या केबिनमध्ये चढण्यासाठी असणारी शिडी इतकी उंच असते की त्यावर चढण्यासाठी त्यांना उडी घेऊन चढावं लागतं.
मालगाड्यांमध्ये ही अडचण जास्त जाणवते कारण त्या प्लॅटफॉर्मवर सहसा थांबत नाहीत. भारतीय महिलांची सरासरी उंची पाच फुट असते. त्यांची उंची लक्षात घेऊन या शिड्या तयार करण्यात आलेल्या नाहीत, असं समीरा सांगतात.
जुही सांगतात की, इंजिनमधून उतरताना आम्हाला सरळ खाली उडी तरी मारावी लागते किंवा मग हातांनी लोंबकळावं लागतं. जून 2023 मध्ये त्या खाली उडी मारत असताना त्यांचा अंदाज चुकला आणि त्यांचा खांदा दुखावला. त्यांना महिनाभर आराम करावा लागला आणि कामावर परतल्यावरही महिनाभर त्यांनी ऑफिसमध्येच काम केलं. त्यांचा खांदा या वेळेतही पूर्णपणे बरा झाला नाही. त्यांनी काही दिवस ऑफिसचं काम वाढवून मागितलं.
त्यांना काही दिवसांची वाढ मिळालीही पण शेवटी त्यांना पुन्हा मालगाडी चालवण्याच्या कामावर रुजू व्हावं लागलं. काही दिवसांतच त्यांचं दुखणं बळावलं आणि त्यांना पुन्हा सुट्टी घ्यावी लागली. पण त्यांना हव्या तेवढ्या सुट्ट्या मिळू शकल्या नाहीत कारण रेल्वे हॉस्पिटलने त्या त्यांच्या कामासाठी योग्य असल्याचं घोषित केलं होतं.
त्या सांगतात, “मला माझ्या कामावर पुन्हा रूजू व्हावं लागलं. पण मी जेव्हा खासगी दवाखान्यात गेले तेव्हा त्यांनी मला एमआरआय करण्याचा सल्ला दिला.” त्यांना जास्तीच्या आजारपणाच्या सुट्ट्या मिळाल्या नाहीत. त्याऐवजी मातृत्त्व काळातल्या सुट्ट्या घेण्यास त्यांना सांगण्यात आलं.
महिला लोको पायलट्सना गरोदरपणात जास्त त्रास सोसावा लागतो. ऑक्टोबर 2021 मध्ये समीरा जेव्हा कामावर बाहेर होत्या तेव्हा त्यांना समजलं की त्यांची मासिक पाळी सुरू झालीय. त्यात अडथळे येत आहेत हे लक्षात आल्यावर त्या डॉक्टरांकडे गेल्या. तिथे त्यांना समजलं की त्या गरोदर होत्या आणि त्यांचा गर्भपात झालाय. तिशीतल्या समीरांना बाळ हवं होतं त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता.
त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न केले. 2023 मध्ये तिसऱ्या महिन्याच्या गरोदरपणात पुन्हा त्यांचा गर्भपात झाला. त्या सैरभैर झाल्या. त्या म्हणतात, “मी सर्व काळजी घेत होते. भारी काम करणं टाळत होते. पण तुम्ही गरोदर असताना तुमचं काम करणं अवघडच जातं.” त्यांनी पुन्हा एकदा गरोदर होण्याचा निर्णय घेण्याआधी रेल्वेकडे ऑफिस वर्कची मागणी केली, जी धुडकावण्यात आली. निराश होऊन त्यांनी वर्षभर बिनपगारी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणतात, “मला पुन्हा एकदा गर्भपात नको होता. जर रेल्वेला खरंच स्त्रियांचा सहभाग हवा आहे तर त्यांनी त्यांच्या अशा नाजूक गरजेच्या वेळी सुलभ कामे देण्याची सोयही करायला हवी.” 
गरोदर महिला लोको पायलट्सच्या समस्या अधिक गंभीर
रेल्वेला पाठवण्यात आलेल्या पत्रातही हा मुद्दा उठवण्यात आला होता. कामाचं स्वरूप जड असल्यामुळे अनेक महिला लोको पायलट्स त्यांच्या गरोदरपणात गर्भपाताला सामोऱ्या जातात. कोणतीही विश्रांती न घेता सतत 6-11 तास काम करणं कोणत्याही गरोदर बाईला शक्य नाही. कारण गरोदरपणात त्यांच्यात कमी शक्ती असते, त्यांना चक्कर येतात, त्यांची चीडचीड वाढते, त्या आजारी पडतात.
अशा अवस्थेत इंजिनमध्ये चढणं-उतरणं, तपासणी करणं, अशा गोष्टी एका गरोदर बाईला सोप्या जात नाहीत. अनेकींना आपल्या शिल्लक सुट्ट्या वापराव्या लागतात किंवा मग बिनपगारी सुट्ट्या घ्याव्या लागतात. हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे.
समीरा सध्या त्यांच्या तिसऱ्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात आहेत. त्यांना सुरूवातीला ऑफिस काम सोपवण्यात आलं. त्यानंतर चालक कामावर जायला सांगण्यात आलं. त्यांनी याला हरकत घेतली तेव्हा रेल्वे रुग्णालयाने आणि प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. त्या आपल्या त्रासाचा विनाकारण बाऊ करत आहेत असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांना आत्ताच मातृत्त्व काळातील सुट्ट्या घ्यवा लागल्या आहेत. या जानेवारीत संपतील. त्यानंतर आपल्या बाळाची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
कारण त्यांची सासूबाई आजारी असते. समीराचे पती सैन्यात आहेत त्यामुळे क्वचितच घरी येऊ शकतात. मुलाची काळजी घेण्यासाठी मी कोणालातरी ठेवू शकते पण लहानग्या बाळाला आपल्या आईची जास्त गरज असते आणि काम करत असताना मला दिवसेंदिवस बाहेरच राहावं लागतं, असं त्या सांगतात. समीरा सांगतात की त्यांना अशा महिला लोको पायलट माहिती आहेत ज्यांचे तीन किंवा चार गर्भपात झाले आहेत. याचा आमच्यावर मानसिक परिणाम होतो असं त्या म्हणतात. त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. त्यासाठी रेल्वेकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही असं त्या सांगतात.






