माणसाच्या उत्क्रांतीनंतर पहिली नवलाई ही शेतीची होती. माणसाच्या भविष्यातली मुळं तिथेच प्रथम घट्ट रुजली. पुराणात बळीराजा सशक्त आणि सहस्त्रभूजांचा दाखवला गेला. अर्थात या सहस्त्रभूजा त्याच्या हातातील शेती मशागतीची अवजारं होती. ज्या अवजारांच्या साथीने भारतातली शेती हळूहळू सुसह्य होत गेली. बदलत्या जमान्यातील बदलत्या शेतीकडे पाहताना तो सहस्रभुजांचा बळीराजा आता बोडका दिसू लागला आहे.
त्याच्या हातातील त्यावेळची जादू करणारी अवजारं आता हळूहळू गळून पडू लागली आहेत. बदलत्या यांत्रिक शेतीने नांगर गिळल्यानंतर आता गेल्या दोन हजार वर्षातली भारतीय शेतीमधील एकेक अवजारं इतिहास जमा होऊ लागले आहेत. इरलं...हे एक त्यातीलच अल्पमोली आणि बहुगुणी असं अवजार होतं. पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या अंगावर आता रेनकोट दिसू लागले आहेत, मात्र बेधुंद पावसात रानावनातल्या शेतीत बाया बापड्यांचा संरक्षक, रक्षक, विसावा आणि थोडीशी प्रायव्हसी अशी अनेक महत्त्वाची कामं करणारं हे ‘इरले’ ऐंशीच्या दशकात वाऱ्यासारख्या घोंगावलेल्या प्लास्टिकने मारलं…
आज घराघरात बनणाऱ्या या इको फ्रेंडली इरल्याचं देखील प्लास्टिक पेटंट आहे. थेट हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक नावानं अनेक पद्धतीने वापरलं जाणारे इरले आता चक्क प्लास्टिक आणि फायबरच्या स्वरूपात दिसू लागला आहे.
बांबूच्या काट्यांनी तयार केलेल्या नैसर्गिक ‘इरलं’ ऐवजी आता प्लास्टिकचे इरल…
पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील राजन वैद्य यांनी इरलेबद्दल विस्तृत माहिती दिली. ते सांगतात की, प्लास्टिक म्हटलं की रंगीबेरंगी थोडेसे डिझाईनेबल आकर्षक मात्र तरीही दोन हजार वर्ष भारताच्या शेतीची इमाने इतबारे सेवा केलेलं बांबूच्या काट्या आणि पानांचं नैसर्गिक इरलं मात्र आजही स्मरणात आहे. त्या इरल्याची सर प्लास्टिकच्या इरल्याला येणं कठीण.
पेरणी, दुसरी नांगरणी, चिखल करणे, भात लावणी, बेणनी, खुरपणी, नंतरची लाणी म्हणजे भात कापणी, मळणी म्हणजे भात झोडणे आणि काही ठिकाणी कापणी नंतर ची लगेचच होणारी मशागत म्हणजे पुन:नांगरणी तर कोकण किनारपट्टीत होणारी मार्च महिन्यातली भाजणी म्हणजे शेतामध्ये राब तयार करून तो जाळणे जेणेकरून कोकण किनारपट्टीत वाढणारे बेसुमार गवताचं तण वाढणार नाही यासाठी होणारी शेताची भाजणी असा एकंदरीत भाजणी ते भात झोडणी म्हणजे मळणी इथपर्यंतचा शेतीचा सात महिन्याचा प्रवास ठळकपणे दिसतो.
यातला शेतीचा खराखुरा हंगाम म्हणजे भात लावणी आणि कष्टाचा हंगाम म्हणजे बेणनी. शेतात उगवलेलं इतर जंगली गवत उपटून काढणे या काळात एक तर जुलै मधला धडाकेबाज पाऊस की जो पाऊस असल्याशिवाय भात लावणी सुरू करत नाहीत. आणि हस्ताच्या नक्षत्रातलं तण उपटण्याचे काम की जे पाऊस असो नसो करावंच लागतं. या काळात बाया बापड्यांच्या डोक्यावरती पावसापासून संरक्षण देणारं उबदार पानांचे आणि बांबूच्या काट्यांचे बनलेले हे अवजार अनेक वर्ष शेताशिवारात, बांधावर, खळ्यांमध्ये, मळ्यांमध्ये हमखास दिसायचं. कोकण किनारपट्टीत अर्थात महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी हे इरलं वापरलं गेलं.
इरलं हे नाव कसं पडलं…?
इरलं म्हणजे पावसातली शेतकऱ्यांची छत्री. मात्र छत्री हातात धरावी लागते इरले एकदा डोक्यावर घेतलं की तुम्ही दोन्ही पायांनी दोन्ही हाताने काम करू शकता. ते वजनदार असल्यामुळे उडून जात नाही. मात्र इरलं हा शब्द प्रयोग का आला त्याची फारशी माहिती उपलब्ध नाही, मात्र इरली स्त्री लिंगी असून मराठी शब्दकोशात पावसापासून संरक्षणाचे आच्छादन असा उल्लेख असून त्याचा सर्वाधिक वापरही महिला करतात.
परंतु ते फक्त महाराष्ट्रात आहे असे नाही कर्नाटका ते कन्याकुमारी दक्षिण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भाताची शेती आहे. तर हिमालयातील सिक्कीम, मेघालय, अरुणाचलसारख्या भागातही थोडसं डिझाईन वेगळं असलेलं हे इरलं भुरभुरता बर्फ पडतो तेव्हा आणि शेतात काम करताना विशेषत: इथल्या महिलांच्या डोक्यावरती तो हमखास दिसतो. अनेकदा प्रवासात शेतांच्या बांधांवरती ही इरली ठेवलेली दिसतात.
आता मात्र ती इतिहास जमा होत आहेत. आता या ऐतिहासिक इरल्याची जागा अर्थातच प्लास्टिकने घेतली आहे. पारदर्शी जाड प्लास्टिकची त्रिकोणी खोल जशी डोक्यावरती अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली घोंगडी घेतली जायची तशीच हे रेडिमेड प्लास्टिक मेनकापडाची असलेली खोल तर अगदी दऱ्या खोऱ्यात बसलेल्या तळ कोकणातही आता रंगीबेरंगी प्लास्टिकचा तुकडा तर मुंबईशी कनेक्टेड असलेल्या एका वर्गाकडे चक्क भात लावताना बायांच्या अंगावरती इरल्याऐवजी रेनकोट दिसू लागला आहे.
याचाच अर्थ दोन हजार वर्ष चालू असेलेली उबदार इरल्याची संस्कृती आता लोप पावली आहे. तिचं अखेरचे दर्शन आता कश्मीर टू कन्याकुमारी या खंडप्राय देशाच्या शेताशिवारात अगदी शेवटच उरलं आहे. त्याची पुढची साखळी म्हणून काही ठिकाणी जाड फायबर, प्लास्टिकचे इरलं, अगदी ब्रॅण्डेड कंपन्यांचे इरले आता शेताशिवारात दिसत आहे. वजनाने काट्या पानांच्या इको फ्रेंडली इरल्या एवढेच किंवा त्यापेक्षाही थोडसं कमी वजनाचं हे इरले शेतीपासून अगोदरच चार हात राखून असलेली नवी पिढी कशी स्वीकारते यावरतीच हे प्लास्टिकचे इरले तग धरेल. की तेही अल्पकाळातच नामशेष होईल हे नजीकच्या काळात दिसणार आहे.
इरलं बनवण्याची पद्धत कशी असते?
इरलं कशा पद्धतीने बनवलं जात हे सांगताना राजन वैद्य म्हणाले की, बांबूची काठी ओढ्यात, नदीत, डोहात किंवा एखाद्या मोठ्या पिंपात दोन दिवस बुडवून ठेवायची. ती थोडीशी नरम झाली की तिचे मध्ये उभे चिरून दोन तुकडे करायचे ( कामठी ). ते कमानी सारखे वरच्या बाजूस घोंगडी सारखी खोल करून खालच्या बाजूस सुपासारखे पसरट करून बांधायचे ( सांगाडा ).
त्यात त्या त्या ग्रामीण भागात उपलब्ध असलेले टिकाऊ मोठी झाडाची पानं निवडले जाई आणि ते पहिल्या पानावरती दुसरे पान अर्ध या पद्धतीने डोक्याच्या भागाकडून पायाच्या भागाकडे उतरतं पसरट पद्धतीने एक दोन थरांमध्ये बांधले जाई. हे बांधत असताना पुन्हा एक बांबूची आडवी सर कामठी किंवा उभी आडवी एक सर तिला सपोर्ट म्हणून गुंतली जाई. जेणेकरून ही पानं एकावर एक घट्ट बसत.
पानं बांधून झाली की तिचे पायाकडचे दोन्ही भाग बांबूच्या बंधाने ( दोर ) किंवा एखाद्या टिकाऊ वेळीच्या तुकड्याने किंवा मजबूत दोरीने बांधले जाई. काट्या आणि पानांचे हे इरले चार-पाच दिवसातच पूर्ण सुकून रंग बदलून झाले की ते पुन्हा तपासले जाते. पाण्याची एखादी धार कुठून आत येते आहे का हे बघितले जाते. अर्थात जून महिन्यातलाच हा पेरणीपूर्व इरली बनवण्याचा हंगाम.
फक्त इरलीच नव्हे तर नांगर, त्याचे लाकडाचे इतर स्पेअर पार्ट, लोहाराकडचा फाल, टोपल्या, हारे म्हणजे एक मोठी टोपली ज्यात मोठ्या प्रमाणात धान्य साठवले जाते आणि त्यापेक्षाही मोठं एक कंपाऊंड अवजार म्हणजे तट्टे आणि कनंगी अर्थात या सगळ्या बांबूपासून बनवलेल्या प्राचीन काळापासून च्या गोष्टी. शेतकऱ्याची सारीच अवजारे बनवण्याचा मुख्य हंगाम हा मे आणि जूनमध्ये होतो.
खात्री पटल्यानंतर हे इरलं भिंतीवरच्या खुंटीला जशी डोक्यावरची टोपी अडकवून ठेवली जाते तसं ठेवलं जाई. बांबूची काठी कुजू नये किंवा आकर्षक दिसावी म्हणून काही हौशी मंडळी त्याला रंगही लावत. नंतरच्या काळात इरले बनवताना जसे अनेक मोठे सूट ( कोट ) शिवताना शिंपी त्याला आतून एक अस्तराचं कापड लावतो त्या पद्धतीने इरल्यामध्ये देखील आतल्या बाजूस एक कापड किंवा बारदान स्वच्छ नव्या बारदानाचा पातळ तुकडा अस्तर म्हणून लावला जातो.
धडाकेबाज पावसात पानातून पाजरणारे पाण्याचे तुषार शेतकऱ्यांच्या अंगापर्यंत येत नाहीत आणि थंडगार पावसात एक वेगळीच उब या इरल्यामुळे मिळते.
बुरुड समाजातील अनेकांनी इरलं बनवायचं काम आता बंद केलं…
गाव गाड्यात बलुत किंवा बलुतदारी हा गावाचा आणि गाव गाड्याचा आत्मा होता. चातुवर्णाच्या संस्कृतीमुळे शेकडो वर्ष ज्याची कामं वंश परंपरागत तेच करत होते त्यामुळे प्रत्येक बलुताला एक निश्चित असं हक्काचं काम होतं, जे आता राहिले नाही. आता ब्राह्मणांची देखील सलून आहेत आणि मराठ्यांची चपलांची दुकाने आहेत. व्यवसाय म्हणून कोणीही काहीही आता करू शकतं, मात्र बलुतदारीत लोहार, सुतार, चांभार, बुरुड, वडार, बेलदार अशा व्यवसायानुसार कामानुसार वर्ग पडले होते.
त्यात शेतकऱ्यांशी जवळीक असणारा कृषी मित्र बुरुड हा बलूत शेतीचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा पहिला मित्र म्हणता येईल. शेतीला लागणाऱ्या सुपांपासून टोपल्या, हारे, कनंगी, तट्टे, चटया आणि इरली इथपर्यंतची अनेक अवजारे ही बुरुड देत असे. 1960 नंतर बुरुड समाजातील अनेकांनी हे काम बंद केलं. बऱ्याच ठिकाणी मग हे काम विशेषतः कैकाडी समाज करू लागला आणि आता तर बांबू ची महती कळल्यानंतर बांबूवर जगणाऱ्यांचा एक वेगळा व्यावसायिक धर्म सुरू झाला आहे.
तो जातीपातींच्या पलीकडे आहे. परप्रांतीयातील अनेक लोक या टोपल्या आणि बांबूपासूनच्या वस्तू बनवताना दिसतात. तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण पट्ट्यात अनेक ठिकाणी इरली बनवणारी माहितगारांची साखळी संपली. त्यामुळे आता सहज सोपा प्लास्टिक शेतकऱ्यांनी जवळ केला आहे. मात्र तळ कोकणा सारख्या दऱ्याखोऱ्यातील, नद्या, खाड्या आणि समुद्राच्या पल्याड च्या दुर्गम गावांमध्ये आजही घराघरात कुठे सागाची पाने, कुठे पळसाची पाने, कुठे जाडजुड मोठी रुंद वडाची, कुंभाची किंवा केतकीची पाने उपलब्ध असलेलं त्यातल्या त्यात टिकाऊ मोठं पान आणि बांबूच्या काट्या ( कामठ्या ) पासून हे इरले आजही बनवलं जातं.
आजीकडून, आईकडून, सून, आजोबा, बाबा आणि मुलगा असं पिढी दर पिढी इरलं बनवण्याची कला काही ठिकाणी आजही पाझरते आहे, झिरपते आहे. भारतीय शेतीच्या पावसाळी लागवडीत भारतीय महिलांनी या इरल्याला इतकी वर्ष, इतकी शतकं पसंती दिली त्याचं कारण ही ऊब आहे, एक संरक्षण आहे आणि त्याहीपेक्षा काही क्षण उघड्यावरील शेतीत विसाव्यासाठी एक प्रायव्हसी देणाराही आडोसा म्हणून इरलं हे एकमात्र साधन होतं.
इरल्याशी बाया बापड्यांचा पिढ्यानपिढ्यातील जोडलेली ही भावनिक नाल इतक्या चुटकीसरशी तुटणारी नाही. बदलत्या काळानुसार शेतीची अवजारं बदलत गेली, अजूनही बदलत जातील मात्र इरले स्मरणातून जाणार नाही.






