(प्रा. नारायण भोसले)
भटक्यांच्या मुख्य 42 जमाती व त्याच्या पोटशाखा इंगळीच्या पायासारख्या 250 पेक्षा जास्त वाढल्या आहेत आणि वाढतच आहेत. इंग्रजी अमलाचे भारतीय समाजावर अनेक बरे-वाईट परिणाम झाले. त्यातला सर्वाधिक विघातक सामाजिक परिणाम याच भटक्या समाजावर झाला. भटकंती करत जीवन जगणाऱ्या या जमातींचे पारंपरिक व्यवसाय व कला यांचे खच्चीकरण होत गेले. स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती बदलायला हवी होती, परंतु तसे घडले नाही. भटक्या विमुक्तांची कहाणी फारच थोड्या प्रमाणात ज्ञात आहे.
आज भटक्या समाजाच्या नाथपंथी डवरी गोसावी जमातीची महाराष्ट्रातील लोकसंख्या तीन ते चार लाख असावी. भटक्या-विमुक्तांची महाराष्ट्रातील लोकसंख्या सव्वा कोटीपेक्षा जास्त असावी. यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनीअर, काही पोलीस खात्यामध्ये, प्रशासनात आहेत. त्यापैकीच एक आहेत तुरुंगाधिकारी मीरा भोसले-बाबर…
तसे मीराचे सांगायचे गाव बामणी, ता. सांगोला जि. सोलापुर. भटक्या जमातीत सर्वात मागास असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी जमातीत त्यांचा जन्म झाला. या जमातीचा मुख्य व्यवसाय भीक मागणे हाच राहिलेला आहे. या अशा सतत भिक्षेकरी असलेल्या व भारतभर आयुष्यभर भटकणाऱ्या कुटुंबात शिक्षण घेणे तसे मोठे अवघड आणि अशक्य काम. पण शिक्षणावर प्रेम करणाऱ्या वडिलांच्या मदतीने आणि परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या भावाच्या मदतीने त्या इथवर येऊन पोहचल्या. पण हे इतके सहज घडले नाही, त्यासाठी मीराला स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागले. मुलगी असल्याने तर जास्तच... सिद्धतेच्या परीक्षा द्याव्या लागल्या. फार गंभीर स्वरुपाची कहाणी मीराच्या वाट्याला आली.
मीराचा जन्म झाला अन् तिथेच मिळेल त्या साधनाने नाळ तोडली…
मीराचे वडील रामचंद्र बाबाजी भोसले यांचे बिऱ्हाडाचे अन्य बिऱ्हाडाशी तंटा झाल्याने फुटून उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या रस्त्याने चालले होते. या इलाख्यात बारा कोसाला वस्ती होती. सोबत दुसरीही काही बिऱ्हाडं होती. रोज दहा-पंधरा किलोमीटरचा प्रवास होई.
इतक्या भल्या मोठया ओझ्याला एकच गाढव होते. तिची आई सखुबाई नऊ महिन्यांची गरोदर होती. कधीही बाळंतीण होऊ शकते अशी शक्यता असताना बिऱ्हाड थांबायचे नाव घेत नव्हते. असेच एका सकाळी बिऱ्हाड उठले. आईला रस्त्यातच बाळंत कळा सुरू झाल्या. काही बिऱ्हाडकरणी बायांनी लुगड्याचा आडोसा केला. विनासायास आईचे बाळंतपण झाले आणि मीराचा जन्म झाला. तिथेच मिळेल त्या साधनाने नाळ तोडली.
संबंधित लेख वाचा: 1) पोटासाठी नाचणारी जेव्हा PSI होते! |
गाढवावर बसलेल्या चार वर्षाच्या मीराचा वाघाशी मुकाबला
बिऱ्हाडासोबत भटकताना अनेक जिवावरच्या प्रसंगांना सामोरे जाणे आले. मीराच्या वडिलांचे बिऱ्हाड ओडिशापासून बिहारला चाललं होतं. मध्ये सरगुजाचे कित्येक किलोमीटरचे भयाण जंगल होते. तीन बिऱ्हाडं, पाच-सात गाई, गाढवावर पाल, काठी, पाण्याची फुटकी घागर आणि चार-पाच वर्षाची मीरा असा हा काबिला होता. खांद्यावर घेऊन-घेऊन थकल्याने वडिलांने तिला गाढवावर बांधली. भयाण श्वापदाचा जंगलचा रस्ता. आता तर अंधारही पडला होता. चोहोबाजूंनी जंगलाची काळी-काळी छाया भीती दाखवत होती.
डोंगराच्या कडा-कपारी स्थितप्रज्ञ राहिल्या नव्हत्या, त्यांचे बिऱ्हाडाच्या खुजेपणाला वाकुल्या दाखवणं चालूच होतं. अशात अचानक वाघाच्या डरकाळीचा आवाज आला, तसे गाढव उधळले. बुजलेल्या गाढवावर बसलेल्या चार-पाच वर्षाच्या मीराचा तोल गेला व गाढवावर बांधलेल्या फुटक्या पत्र्याच्या घागरीत तिचा पाय अडकला. मीरा गाढवापेक्षा जास्त घाबरली. मीरा पडली नाही, प्रसंगावधान साधून ती तशीच गोणीला धरून लोंबकळत राहिली. धीराची मीरा मदतीसाठी "अण्णाव' म्हणून आर्त किंकाळी देऊन ओरडली. तिच्या आर्त किंकाळीने झाडावरील पक्षी फडफडले. बिऱ्हाडकऱ्यांच्या कानावर आदळलेला हा आवाज एका मोठ्या संकटाची जाणीव करून देणारा होता.
वडिलांनी प्रसंगावधनाने गाढव धरले. मीरा चिरचिर ओरडत होती. तिच्या पिंडरीच्या मांसाचा गोळा लटकू लागला होता. रक्त चिळकांड्या मारत होते. वडिलाने लगोलग तिला गाढवावरुन खाली उतरविले. गोळा पिंडरी बरोबर दाबला. डोक्याचे मुंडासे सोडून पायाच्या पिंडरीला बांधला. भळभळ रक्त वाहत होते. मिरा रडत होती. बिऱ्हाडं जीव मुठीत धरून तो रात्रीचा जंगल प्रवास करत होतं. रस्ता संपत नव्हता. भीत-भीत, देवाचा धाया करत, नवस करत बिऱ्हाडाने नेहमीप्रमाणे जंगली इलाखा कसाबसा पार करत आणला.
सर्वत्र भीतीने व्यापलेल्या त्या वर्तमानाला मीराने वेळीच आवरले. अशा समजदार असतात भटक्यांच्या मुली. ..असाच प्रवास करतात ही बिऱ्हाडं... जंगली जनावरांना घाबरत एकमेकांसोबत राहतात ही बिऱ्हाडं... कधीकधी झाडी-जंगल यांच्या सावलीत शूद्र प्राण्याची शिकार बनतात ही बिऱ्हाडं... बिऱ्हाड संपत नाहीत ना दुःख संपत नाही, जगण्याची आसही संपत नाही. कशी संपतील ही बिऱ्हाड? माणसं संपली तरी संपत नाहीत... काय असतात ही बिऱ्हाड? त्यात माणसं असतात का?
मीराच्या शिक्षणासाठी वडिलांनीही कधीही केला नाही विरोध...
शिक्षणाची परंपरा नसतानाही मीराने शिकण्याचा चंग बांधला. सर्व प्रकारच्या अडचणींवर मत करत गावी आंधळ्या आजीजवळ राहून प्राथमिक शिक्षण त्या वयात मीराने हाताने स्वयंपाक करत या पूर्ण केले. पुढचे शिक्षण अप-डाऊन करत तालुक्याच्या गावाला केले. पुढे सोलापूरच्या बोर्डिंगमध्ये शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. काही काळ भावांच्या मदतीने पुण्याला शिक्षण घेतले.
बारावी सायन्स पास केले. फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताची पदवी मिळवली. या जमातीत एवढं शिकलेली ती पहिलीच मुलगी असावी. एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न तिने आधीच ठेवले होते. तशात वय वाढत चालले होते. इतकं शिक्षण घेतलेल्या व एवढ्या वयाच्या मुलीचे लग्न करणे आवश्यक वाटल्याने पालकांनी तिचे लग्न लाऊन दिले.
मुलं पोटात असताना परीक्षा दिली, जेलर पदाच्या परीक्षेत यश मिळवलं
लग्नानंतरही मीराने अभ्यासात खंड पडू दिला नाही. स्पर्धा परीक्षा देतच राहिली आणि तलाठी पदाची माळ तिच्या गळ्यात पडली. अवघ्या दहा दिवसाचं बाळ घेऊन मीरा तलाठी म्हणून एका खेड्यात रुजू झाली. अभ्यासात खंड पडू दिला नाही. जेलर पदाच्या जाहिरातीला सकारात्मक घेत सर्व परीक्षा पास केल्या पण त्याचा निकाल अजून लागला नव्हता. सासरचे घरकाम सांभाळत रात्र-रात्र अभ्यास सुरूच ठेवला आणि एके दिवशी जेलरपदाची ऑर्डर तिच्या हाती पडली. नाथपंथी डवरी गोसावी जमातीची पहिली तुरुंगाधिकारी... तेथेही त्यांनी वेगवेगळ्या जबादाऱ्या सांभाळल्या.
‘कष्टकऱ्यांना नियतीही विजयाच्या माळा घालते, फक्त तिच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवा’, असे मीरा आपल्या भाषणात कायम सांगत आल्या आहेत. कोण्या शाहिराने म्हटले आहे, कौन कहता है आकाश में छेद नही गिरता? एक पत्थर तो तबियत से उछालो यारों’...






