महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मेळघाटची ओळख आहे ती तिथल्या कुपोषणामुळे. मेळघाटमधल्या गरिबीच्या, कुपोषणामुळे होत असणाऱ्या बालमृत्यूंच्या आणि तिथून होत असणाऱ्या हंगामी स्थलांतराच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये कायम येत असतात. मेळघाटमध्ये अनेक स्वयंसेवी संस्था काम करत असल्या, तरी महाराष्ट्राच्या इतर आदिवासी भागांमध्ये ज्या सुधारणा होत असतात तेवढ्याही तिथे होत नाहीत, ही सर्वांचीच कायमची खंत असते. मेळघाटमधील कोरकू आदिवासी समाज सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या बाबतीत कायम पिछाडीवर राहिलेला आहे.
मेळघाटातील कोरकू आदिवासी पिछाडीवर असण्याचे मुख्य कारण आहे अज्ञान, अंधश्रद्धा आणि अडाणीपणा. या भागातील लोकांचा डॉक्टरहूनही जास्त विश्वास 'परिहार' किंवा 'भूमका' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांत्रिकावर असतो. हे परिहार किंवा भूमका कोणत्याही आजारावर मंतरलेले पाणी रुग्णाला पाजतात आणि रुग्णावर डॉक्टरची सावलीसुद्धा नको अशी धमकीदेखील देतात. अन्यथा रुग्ण दगावेल अशी भीतीही घालतात.
मेळघाटातील लहान मुलांच्या पोटावर डागण्या देण्याची अघोरी प्रथा
कोरकू आदिवासींच्या याच अंधश्रद्धेने आता मात्र कळस गाठला आहे. मेळघाटातून एक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहे ती म्हणजे, बाळ आजारी पडल्यावर ‘डंबे’ देण्याचा अघोरी प्रकार… डंबे देणे म्हणजे शेतात तण काढण्यासाठी वापरण्यात येणारे खुरपे लालबुंद तापवून बाळाच्या पोटावर चटके देणे… असे ‘डंबे’ म्हणजे डागण्या देण्याचा अघोरी प्रकार आजही सुरू आहे. यामुळे आजार बरा होतो, या अंधश्रद्धेवर कोरकू आदिवासी समाजाचा विश्वास आहे.
तीन वर्षांपूर्वी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन 8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर 100 चटके दिल्याचा प्रकार घडला असतानाच, अलीकडेच केवळ 26 दिवसांच्या चिमुकलीलाही चटके दिल्याचं उघड झालं आहे. बारुगव्हाण या गावातील 26 दिवसांच्या चिमुकलीला पोटफुगीवरुन पोटाला गरम सळईने चटके दिल्याचा अघोरी प्रकार घडला आहे. यापूर्वी अंधश्रद्धेतून तांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई वडिलांनी आजारी बाळाच्या पोटावर गरम विळ्याने तब्बल 100 चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा धक्कादायक प्रकार बोरदा गावात घडला.
या बालकाला आठ दिवसापासून खोकला आणि पोट फुगत असल्याचा त्रास होता. त्याला दवाखान्यात न नेता भगत भुमका या तांत्रिकाकडे नेले. त्याच्या सांगण्यावरुन मुलाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले. अशा पोटफुगीला आदिवासी फोपसा म्हणतात. या बालकाला ताप होता, त्यामुळे हा गंभीर प्रकार अंधश्रद्धेतून घडला आहे.
संबंधित लेख वाचा: 1) अंधश्रध्दा निर्मूलनासाठी महाराष्ट्र पोलीस ॲक्शन मोडवर! |
आरोग्याच्या सेवा मिळत नसल्याने तांत्रिकाकडे धाव
ही अघोरी प्रथा बंद करण्यासाठी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मेळघाटातमध्ये जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. कुपोषण, बालमृत्यू याचा तिढा न सुटलेल्या मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या मनातील अंधश्रद्धेची ही पाचर दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येथील ७२ गावांमध्ये रात्रंदिवस फिरून प्रबोधन केले. लोकांना अनेक प्रश्न विचारले. आजारी असलेल्या मुलांना डॉक्टरांकडे का नेत नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. पण अनेकांना त्याचे उत्तर देता आले नाही. आरोग्याच्या सेवा मिळत नसल्याने या गावातील लोकांच्या, लेकरांच्या करुण कहाण्या यावेळी पुढे आल्या. गावांतील शाळा, अंगणवाड्या, ग्रामस्थांच्या बैठकांमधून चिमुकल्या मुलांनी हात वरून करून झालेला त्रास सांगितला. पोटावरच्या डागाच्या खुणा दाखवल्या.
‘महाराष्ट्र टाईम्स’ने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले असून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ‘मटा’कडे व्यक्त केलेले अनुभव अतिशय भयावह आहेत. आरोग्याच्या सुविधा काही प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी तिथपर्यंत जाण्यासाठी आजही वाहतुकीच्या दळणवळणाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णालयामध्ये जाऊन प्रसूती करण्यापेक्षा घरीच प्रसूती केली जाते. येथे जाऊन प्रत्यक्ष या मोहिमेमध्ये काम केलेल्या महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी हृदय पिळवटून टाकणारे असे अनेक अनुभव सांगितले.
आरोग्य सुविधांची उपलब्धता नसल्याने अनेक पातळ्यांवर संघर्ष करत असलेला मेळघाट, चिखलदऱ्यातील आदिवासी कोरकू समाजाचा जादूटोणा करून आयुष्य सुरळीत होते, यावरही आजही विश्वास आहे. जादूटोणा प्रतिबंध कायद्याची कडक अंमलबजावणी होत असतानाही या अनिष्ट रुढी सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.
'खटियावाला बाबा'च्या दहशतीने मृत्यूशी गाठ
येथील गावात खटियावाला बाबा येतो. तो गावात खटिया म्हणजे विणलेली खाट घेऊन फिरवतो. गावातल्या एखाद्या व्यक्तीच्या घरापाशी थांबून ही व्यक्ती करणी करतो, असे तो म्हणतो. त्या व्यक्तीला बाबा खटियाने मारतो. मंतरलेले पाणी प्यायला देतो. आता याने जादूटोणा केला तरी कोणावर परिणाम होणार नाही, असेही सांगतो. ही व्यक्ती एक वर्षात मरेल अशी भीती निर्माण करतो. दोन ठिकाणी अशाप्रकारे जादूटोण्याचे आरोप केलेल्या व्यक्ती भीतीने मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे स्थानिकांना या खटियावाल्या बाबाकडे शक्ती आहे, असे वाटते.
त्यांचा विश्वास अधिक दृढ होतो. भीतीने तो माणूस खंगून मेला हे त्यांच्या लक्षात येत नाही. हा बाबा जे काही सांगतो, त्यावर भोळे भाबडे आदिवासी लोक विश्वास ठेवतात. 'अशा संशय घेतलेल्या व्यक्तीची धिंड काढणे, चपलचा हार घालणे, प्राण्यांची विष्ठा तोंडात घालणे, मिरचीची धुरी देणे, तापलेल्या सळईचे चटके देणे असे प्रकार आजही सुरू आहेत. अशाप्रकारची प्रकरणे करणे पोलिसांकडे तत्काळ नोंदवली जाणे गरजेचे आहे. त्यासाठी खूप वेळ जातो', अशी खंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी व्यक्त केली. 
सर्पदंशावेळीही जिवाशी खेळ
सर्पदंश झाल्यानंतरही भगताकडे साप चावलेल्या व्यक्तीला नेण्यात येते. भगत तांदूळ फेकतो. त्यात तांदळाची संख्या विषम असेल, तर आजार बरा होतो, असे मानले जाते. सम असेल, तर ती व्यक्ती वाचणार नाही, असे सांगितले जाते. प्रबोधनाच्या वेळी विज्ञाननिष्ठ प्रयोग पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना यात हातचालाखी असल्याचे लक्षात आले.
वैद्यकीय तंत्रज्ञानाचे शेकडो आविष्कार दिसत असताना शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावांमध्ये मात्र संशय घेऊन एखाद्या व्यक्तीची धिंड काढणे, त्या व्यक्तीला बांधून ठेवणे, चटके देणे हे प्रकार घडतात. त्याच समर्थनही केले जाते. आरोग्याची सेवा तळाच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न होतात, तेव्हा या गोष्टी पुढे का येत नाही, असा प्रश्न या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येथे केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
मंतरलेले पाणी आणि आत्महत्या
शारीरिक आणि मानसिक आजार असलेल्या रुग्णांनाही याचप्रकारे बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. मानसिक आजार असलेल्या एका तरुण मुलांवर वैद्यकीय उपचार सुरू होते. ते बंद करून कुटुंबीयांनी भगताकडे नेले. तिथे त्याची औषधे बंद करा, असा सल्ला देण्यात आला. मंतरलेल्या पाण्याने आजार बरा झाला नाही, उलट तो बळावला. अखेर त्या तरुणाने विहिरीमध्ये उडी मारली. हे प्रकार वरचेवर होतात.
‘डागण्या (डंबा नको) औषधोपचार देऊ या’
यासंबंधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले की, मेळघाटातील लोकांवर भुमका म्हणजे भगत किंवा मांत्रिकाचा प्रभाव आहे. आरोग्याच्या समस्यांसाठी लोक भुमकाकडे जातात. लहान मुले आजारी पडल्यावर कुटुंबीय जेव्हा त्यांना भुमकाकडे घेऊन जातात तेव्हा भुमका स्वतः त्यांच्या पोटावर डागण्या देण्याचा अघोरी उपचार करतात किंवा अशा डागण्या देण्याचा सल्ला देतात व त्यानुसार बाळाची आई, आजी किंवा घरातील इतर व्यक्ती आजारी बाळाच्या पोटावर डागण्या देतात. याला डंबे देणे, असे म्हणतात. या उपचाराला कोणताही शास्त्रीय आधार नाही. आरोग्य व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचण्यातील अडचणी, गरीबी या सोबतच अज्ञान, अंधश्रद्धा आणि भुमकाचे लोकांच्या मनावरील अधिराज्य यामुळे डंबा देण्याचा हा अघोरी उपचार आजही सर्रास चालू आहे.
दरवर्षी डंबा देणे या अघोरी उपचाराने एखाद्या बाळाचा मृत्यू झाल्याचे प्रसारमाध्यमांमधून समोर येते, तेव्हा त्याबद्दल चर्चा होते व कालांतराने ती विरून जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी या अघोरी प्रथेविरुद्ध सातत्याने प्रबोधन करण्याचा व आवश्यक तेथे कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्याचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला आहे. त्यासाठी अंनिसने ‘डागण्या(डंबा नको) औषधोपचार देऊया’ ही मोहीम हाती घेतली आहे.






