(किरण गिते)
मिशा अग्रवाल… एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर! विनोद, वैयक्तिक अनुभव यावर मिशा कंटेंट बनवायची. प्रचंड फॉलोअर्स लाभल्यामुळे इन्फ्लुएन्सर म्हणून नावारुपाला आल्यानंतर मिशाने केसांसाठी एक स्वत:चा ब्रँड मार्केटमध्ये आणला. ‘मिश कॉस्मेटिक्स’ असं त्याचं नाव... एक बुद्धिमान, महत्वाकांक्षी मुलगी. कायद्याची पदवी घेतलेली, न्यायाधीश व्हायचं स्वप्न उराशी बाळगणारी एक तरूणी…
मिशाच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. प्रचंड पैसा, नाव, कौतुक… अन् 24 एप्रिल 2025 रोजी एक धक्कादायक बातमी आली… मिशा अग्रवालची आत्महत्या…! ही घटना तिच्या घरच्यांसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होती. 26 एप्रिल रोजी मिशाच्या इंस्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यात, ‘मिशा अग्रवाल 26 एप्रिल 2000 ते 24 एप्रिल 2025’ एवढंच पोस्ट करण्यात आलं होत.
यात मृत्यूचं कारण मात्र सांगण्यात आलं नव्हतं. मिशाने आत्महत्या का केली? या प्रश्नाचं उत्तर मात्र समोर आलं नव्हतं. प्रेमभंग, कौंटुबिक कलह, आर्थिक नुकसान मिशाच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट होत नव्हतं, मात्र तिच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी जेव्हा तिच्या कुटुंबियांनी मिशाच्या आत्महत्येमागचं खरं कारण जेव्हा उघड केलं तेव्हा अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. 
(मिशा अग्रवाल)
1 मिलियन फॉलोअर्स न मिळाल्याने मिशाने केली आत्महत्या
1 मिलियन फॉलोअर्सचा पल्ला गाठता येत नसल्यामुळे मिशाने आपलं आयुष्य संपवलं… मिशाच्या मृत्यूचे हे कारण धक्कादायक होतं. मिशाच्या बहिणीने मिशाच्याच अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मिशाच्या मानसिक स्थितीबद्दल तिच्या बहिणीने सांगितलं.
"माझ्या लहान बहिणीने इंस्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्सभोवती तिचे जग निर्माण केलं होतं. ज्याचे एकमेव ध्येय 1 मिलियन फॉलोअर्सपर्यंत पोहोचणं आणि चाहत्यांकडून प्रेम मिळवणं हे होतं. जेव्हा तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले तेव्हा ती अस्वस्थ झाली आणि तिला स्वत: निरूपयोगी असल्याचं वाटू लागलं. एप्रिलपासून ती नैराश्यात होती. ती अनेकदा मला मिठी मारून रडायची आणि म्हणायची, जिज्जा माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन? माझं करिअर संपेल." 
इन्फ्लुएन्सर्ससाठी सोशल मीडिया हा फक्त शौक नाही, तर पूर्ण वेळ नोकरी आहे
आज इन्फ्लुएन्सर्ससाठी सोशल मीडिया हा फक्त शौक नाही, तर ही पूर्ण वेळ नोकरी आहे. फॉलोअर्सच्या आकड्यावरच त्यांचं ब्रँडिंग, स्पॉन्सरशिप डील्स आणि कमाई अवलंबून असते. म्हणजेच, जर कंटेंट चालला नाही, व्ह्यूज कमी आले, तर याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो. हे दडपण, अनेकवेळा अति होतं. दररोज नवं काहीतरी पोस्ट करायचं, इतरांपेक्षा हटके राहायचं, ट्रेंडिंगमध्ये यायचं आणि हे सगळं करताना स्वतःच्या भावना, थकवा, नैराश्य, एकाकीपण यांना गप्प बसवायचं. यातून असले विचार आणि टोकाची भावना या तरूणांमध्ये दिसून येते.
संबंधित लेख वाचा: 1) ‘ब्रेकअप’ झाल्यानंतर अधिक त्रास कुणाला होतो…? पुरुषाला की स्त्रीला…? |
इतके लाख व्ह्यूज् किंवा लाइक्स मिळाले, की आपण प्रसिद्ध, आणि त्या प्रसिद्धीसाठी काहीही... मग ते वाईट असो चांगले, आदर्श असो वा बंडखोर... मुळात सोशल मीडियावर वावरताना काय चांगले आणि काय वाईट याचेच भान सध्या आपण हरवत चाललो आहे.
पूर्वी सेल्फी किंवा ग्रुफ्पीची क्रेझ होती. त्यासाठी कुठेही जाण्याची तयारी असायची, मग जीव धोक्यात जात असला तरी बेहत्तर. आता फॅड वाढतेय ते स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून घेण्याची. ही अत्यंत चांगली संकल्पना आहे. हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोण असतात? त्यांना ही पदवी कुणी बहाल करते, की ते स्वयंघोषित असतात? खरे तर, समोरच्याला प्रभावित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे इन्फ्लुएन्सर. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण किंवा कोणत्याही वयाच्या लोकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची संख्या सध्या वेगाने वाढते आहे.
मग त्यात नोकरी-व्यवसायात मदत करणाऱ्यांपासून, लाइफस्टाइलशी संबंधित मार्गदर्शन करणाऱ्यापर्यंत, नीटनेटके कसे राहायचे हे सांगण्यापासून ते आत्मविश्वास वाढवणाऱ्यांपर्यंत 'चॉइस' आहे. एखादी चांगली गोष्ट वापरण्याबाबत सांगणारे किंवा त्याचे फायदे-तोटे समजावरे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतात. या सर्वांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सही असतात. चांगल्या अर्थाने हे लोक काम करतात आणि युझर्स यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. ते म्हणतील ती पूर्व दिशा. 
इन्फ्लुएन्सर राहुल दराडे म्हणतो, ‘’रील आणि रिअलचं आयुष्य फार वेगळं आहे…’’
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं विश्व नेमकं काय असतं यावर ‘बाईमाणूस’ने काही इन्फ्लुएन्सर्सना बोलते केले. इन्फ्लुएन्सर आणि अभिनेता राहुल दराडे म्हणतो, “कॉलेजला होतो तेव्हा टाईमपास म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. टिकटॉकवर ते व्हिडिओ मी पोस्ट करायचो, नंतर मी व्हायरल झालो. तेव्हा सोशल मीडियाच्या आर्थिक बाजूबद्दल मला कसलीच कल्पना नव्हती. काही काळानंतर माझ्या टिकटॉकवर 1 मिलियन म्हणजे 10 लाख फॉलोअर्स तयार झाले आणि भारतात चिनी ऍप बंद झाल्यानंतर माझं अकाऊंटही बंद झालं. तेव्हाचा तो बसलेला फटका फार वाईट होता. मिलियन्समध्येच सगळं काही असल्यामुळे मी टॉपवर होतो. खूप भारी कमाई होत होती आणि ती अचानक शुन्यावर आली. तो अनुभव फार भयानक होता. सगळे मला चिडवायला लागले. “लई उडत व्हतास आता कुठं गेल तुझं फेम” अशा शब्दात मला डिवचायचे. ही लोकांना सवयच असते.
पण, मी कोणाचं ऐकलं नाही कोणाचं मत मनाला लाऊन घेतलं नाही. पुन्हा दुसऱ्या एका ऍपवरही मी व्हायरल झालो, पैसे कमवायला लागलो आणि पुन्हा ते तेही बंद पडलं. पुन्हा शुन्यावर आलो. मग इन्स्टाग्राम रील्स आले. मी रील्स मार्केटमध्ये आल्यानंतर 1 वर्षाने मी पुन्हा कामाला लागलो, परत व्हायरलं झालो आणि पुन्हा माझी आयडी सस्पेंड झाली. पुन्हा ब्रेक घेतला. या सगळ्यामुळे मी व्हिडिओ बनवणं सोडलं आणि माझ्या अभिनयाकडे वळलो. त्यानंतर पुन्हा सुरू केलं काम आणि नंतर मी आता 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडिया हे फार डिस्टर्बिंग प्लॅटफॉर्म आहे. रील आणि रीअलचं आयुष्य फार वेगळं आहे. हे समजलं तर जीवन सोपं होईल. इन्फ्लुएन्सर्सनी या गोष्टींना मनाला लावून टेन्शन घेणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं योग्य नाही. तुमच्या एका टोकाच्या निर्णयामुळे तुमचं सगळं कुटुंबाला सामोरं जावं लागतं त्याचा त्रास त्यांना होतो. यावर सर्वस्वी अवलंबून असून चालत नाही. यात संयमी राहणंही गरजेचं आहे. मिशा अग्रवालने घेतलेलं पाऊल चुकीचं आहे. तिने वाट बघायला हवी होती.” असे राहुल दराडेने सांगितलं.
5 एप्रिल 2025 रोजी गुजरातच्या सुरतमधील ओलपाड भागातील कुडियाना गावातील 21 वर्षीय प्रतीक पटेलला सुद्धा सुपरस्टार बनण्याचे स्वप्न साकार करायचं होतं. प्रतीक एक बॉडी बिल्डर होता. त्यासंदर्भातील तो व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असे. मात्र, सोबतचे सगळे पुढे निघून जात आहेत ही गोष्टी त्याला कायम त्रास देत होती. त्यामुळे त्याने क्रिकेट मैदानावर विष प्राशन करून जीवन संपवलं. प्रसिद्धी मिळत नसल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं.
“I tried being everything they wanted. Now I want to be nothing. Goodbye.”

(राहुल दराडे)
पुण्यातही अशीच एक घटना घडली. सिया जोशी (नाव बदललं आहे) हिच्यासोबत. तिच्या जवळच्या मैत्रिणीशी सेजलशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधला तेव्हा रडू न आवरू शकणारी सेजल म्हणाली, “आमची मैत्री पहिलीपासूनची. सिया फार चुलबुली आणि कायम हसरी मुलगी होती. पण अचानक सोशल मीडियावर एवढा वेळ गुंतून राहायची की तिला तिचे मित्र मैत्रिणींची काही किंमतच राहिली नव्हती. आम्ही तिच्यापासून काही काळाने दुरावलो होतो. ती सतत फॉलोअर्सबद्दलच बोलत असे. एक दिवस सकाळी अचानक तिची पोस्टी पाहिली. त्यात तिने लिहिलं की, “I tried being everything they wanted. Now I want to be nothing. Goodbye.”
ही पोस्ट केल्याच्या 2 तासांनंतर मी पाहिली. मला छातीत धडकी भरली. मी कॉल केले. कोणीच कॉल घेत नव्हतं. मग मी तिचं थेट घर गाठलं तर माझ्या पुढ्यात हतबल झालेले आणि ढसाढसा रडणारे तिचे आईबाबा होते. मला काही क्षण समजलंच नाही काय झालंय. तिची अचानक डेड बॉडी माझ्या समोर आली आणि मी स्वत:ला सावरू शकले नाही. मी सुन्न पडले होते.
पोलिसांनी तिच्या रूमची झडती घेतल्यानंतर लक्षात आलं की, तिने एक नोट लिहून ठेवली आहे ज्यात ती म्हणते. “मी कधी नव्हते स्टार, मी फक्त दिवा होते, लोकांसाठी जळणारा. आणि शेवटी राख झाले, मला माफ करा आई बाबा. तुमची लेक तुम्हाला आता कधीच भेटणार नाहीये. मी खूप प्रयत्न केले पण शेवटी अपयशच हाती आलं आणि हे मी पचवू शकत नाहीये म्हणून टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या फॉलोअर्ससाठी मी नको ते केलं पण पदरी नेहमी निराशाच पडली. मला हे सहन होत नाहीये. गुड बाय सगळ्यांना.”
इन्फ्लुएन्सर्सना किती पैसा मिळतो?
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होण्याचे अनेक फायदे आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांना प्रभावित करू शकतो. एखादी वस्तू घ्या, एखादी घेऊ नका इथपासून तर अगदी एखाद्याला आर्थिक मदत करा, यासाठीही ते समोरच्याला प्रभावित करू शकतात, त्यांचे मत, सूचना ग्राह्य धरली जाते. त्यांच्यावर यूझर्सचा इतका विश्वास असतो, की त्यांनी एखादा 'हॅशटॅग' चालवला, की तो कमालीचा व्हायरल होतो. मग त्यामागे हेतू चांगला असो वा वाईट. अनेकदा या गोष्टीचा राजकीय पक्षही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग करून घेतात. या सगळ्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला चांगली रक्कम मिळतेच; शिवाय काही भेटवस्तूही मिळतात. ही रक्कम अगदी पाच हजार पासून 10 लाख रुपयांपर्यंत असते, हे विशेष.
या इन्फ्लुएन्सरला होणारा आर्थिक फायदा आणि मिळणारी प्रसिद्धी यासाठी अनेक स्वयंघोषित तयार होतात. आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलेल्या पोस्टला लागतात भरपूर लाइक्स आणि प्रचंड फॉलोअर्स. खरोखर मेहनत करून, चांगले व्हिडिओ टाकून खरे फॉलोवर मिळवणारे अनेक लोक आहे; पण फॉलोअर विकत घेऊन रातोरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनणारे असतात स्वयंघोषित. पाच ते 10 लाख फॉलोअर्स झाले, की यांना रान मोकळे होऊन जाते.
विविध कंपन्या आपले ब्रँड्स घेऊन यांच्याकडे येतात; कारण यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचणे सोपे जाते आणि मग लोकांना प्रभावित करण्याचे चक्र सुरू होते. मात्र, आज काल कंपन्याही हुशार झाल्या आहेत. तो / ती खरोखर इन्फ्लुएन्सर आहे का याची ते तपासणी करतात; तसेच त्यांचे फॉलोअर खरे आहेत का, याचीही तपासणी करतात. त्यामुळे स्वयंघोषितांच्या अस्तित्वावर गदा आली आहे.
(जीवन आघाव)
स्पर्धा परीक्षा ते इन्फ्लुएन्सर… जीवन आघावची काय आहे स्टोरी?
पुणे,मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी दरवर्षी हजारो विद्यार्थी दाखल होत असतात. तिथे परीक्षा देऊन यश मिळालं नाही की दुसरे अनेक पर्याय निवडायला बघतात. या विद्यार्थ्यांपैकी जास्त प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. असंच उराशी मोठं स्वप्न बघून मूळ हिंगोली जिल्ह्यातील सावळी नावाच्या छोट्याशा खेड्यातून पुण्यात स्थलांतरीत झालेला जीवन आघाव याचा अभिनेता आणि इन्फ्लुएन्सर बनण्यापर्यंतच्या प्रवासातील आलेला अनुभव ‘बाईमाणूस’ने जाणून घेतला.
जीवन सांगतो, “राज्यसेवेच्या अनेकवेळा परीक्षा दिल्या पण यश मिळालं नाही. त्यावेळी मी काही डबिंगचे व्हिडिओ बघायचो. मला त्याची बरीच आवड होती. मग मी डबिंग केलेले व्हिडिओ पोस्ट करायला सुरूवात केली. 7, 8 महिन्यांंनंतर मग मला युट्यूबवरून पैसे मिळायला सुरूवात झाली. त्यानंतर मी अभ्यास सोडून व्हिडिओसाठी काम करायला लागलो. अनेक चढ उतार आले. लोकांनी ट्रोल केलं नावं ठेवली पण मी खचून गेलो नाही. मी खंबीर सामोरे गेलो. मध्यंतरी कोणत्या विषयाला घेऊन काय पोस्ट करावं ही मोठी अडचण माझ्यासमोर होता. पण, मी त्यातूनही मार्ग काढला. मिशा अग्रवालसारखे काही हलक्या काळजाते इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे सोशल मीडिया हाताळण्यात कमजोर पडतात. अडचण समोर आली आहे म्हणून आत्महत्या करून जीवन संपवणं हा पर्याय असू शकत नाही हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. अशा लोकांनी मला तरी वाटतं की काऊंसिलिंगची गरज आहे.”
(मेघा पवार)
‘टिपिकल इंडियन गर्ल’ मेघा पवार काय म्हणते…?
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातली मेघा पवार जी ‘टिपिकल इंडियन गर्ल’ नावाने प्रसिद्ध आहे तिने ‘बाईमाणूस’सोबत बोलताना सांगितलं की, “व्हिडिओ चालत नाही, जास्त लोक व्हिडिओ बघत नाहीत ही गोष्ट तर कायम होतच राहते. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यासाठी सोशल मीडिया आपलं सर्वस्वी आयुष्य तर नाहीये हे लोकांना समजलं पाहिजे. मिशाने घेतलेला टोकाचा निर्णय हा पूर्णत: चुकीचाच आहे. यामुळे आपल्या कुटुंबातील नागरिकांना त्रास होतो आपल्या चाहत्यांना त्रास होतो. आपले फॉलोअर्स वाढत नाहीत म्हणून आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. प्रत्येक अडचणीला पर्याय असतो. जर तुमचे व्हिडिओ चालत नसतील तर वेगवेगळ्या ट्रिक वापरा जेणेकरून तुमच्या व्हिडिओला बूस्ट मिळेल आणि ते व्हायरल होतील. कामाशी प्रामाणिक राहा आणि कष्ट घेत राहा तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला कधीतरी मिळेलच. त्यासाठी तुम्ही संयमी असणं खूप गरजेचं आहे. अपयश आलं म्हणून आत्महत्या हा पर्याय निवडणं मुळीच चुकीचं आहे. इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या कामात सातत्य आणि संयम ठेवला की गोष्टी बरोबर तुमच्या बाजूनेच घडतील”
मिशा गेली. तिच्यासारखे अजून किती मिशा, प्रतीक, सिया आपल्याला कळत नकळत हरवत आहेत, त्यांचा आवाज ‘अनफॉलो’ किंवा ‘व्यूज ड्रॉप’ या गोंगाटात हरवतो आहे. सोशल मीडियाच्या या झगमगाटात, आपलं मानसिक आरोग्य किती नाजूक झालं आहे हे आपल्याला वेळेवर समजत नाही. आपल्याला कदाचित शिकवण्यात आलंच नाही की लोकप्रिय होणं म्हणजे पूर्णपणे आपली ओळख असू शकत नाही.फॉलोवर्स कमी होणं हे आयुष्य संपवायचं कारण होऊ शकत नाही. पण खरी मदत, संवाद, समजूत, स्वीकार हे मात्र कोणाचं आयुष्य वाचवू शकतात.






