- भागा वरखडे
चित्रपट क्षेत्राचा तसेच भोवतीला घडणाऱ्या घटनांचा चांगला परिणाम किती होतो, हा संशोधनाचा भाग असला, तरी त्यातील वाईट घटनांचे लगेच अनुकरण केले जाते. विशेषतः तरुण पिढीवर त्याचा लवकर परिणाम होतो. व्यवसाय, नोकरीच्या व्यापात अडकलेले पालक आणि शिक्षणात काही साध्य करण्यासाठी घर सोडलेल्या मुलांमध्ये संवाद कमी झाला आहे.
मुलांचा वावर पालकांसोबत कमी आणि मित्रांसोबत जास्त असतो. मित्रांची निवड करणे आपल्या हाती असले, तरी ते कसे मिळतील, याचा भरवसा नसतो. एका प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने मला मुलगा दाखवू नका, त्याचे मित्र सांगा त्यावरून मी तुमच्या मुलाचे वागणे सांगू शकतो, असे म्हटले होते. याचा अर्थ मित्रांचा मुलांवर किती परिणाम होतो, हे स्पष्ट होते. असंगासी संग कायम नडत असतो.
अलिकडच्या काळात घरापासून दूर राहावे लागल्याने कुणाच्या तरी संगतीची गरज लागते. त्यातून मित्र-मैत्रणी मिळतात. मित्रांमध्ये राहूनही त्यांच्या अवगुणाचा परिणाम होऊ न देणारे अपवादात्मकच असतात. पालकांनी मुलांशी मित्रांप्रमाणे वागले, तर मुलांना समजून घेणे सोपे होते; परंतु मुले आणि पालकांत संवाद हरवल्याने मुले आता बहकत चालली आहेत. मित्रांच्या संगतीत त्यांना मग वेगवेगळ्या व्यसनांची सवय लागते. कधी कधी मित्र नवख्या मित्राला व्यसनांचे महत्त्व पटवून देतात. त्याने व्यसन केले नाही, तर त्याला अगदीच ‘हे’ समजतात. त्याचे मानसिक खच्चीकरण केले जाते. कधी कधी व्यसनासाठी त्याच्यावर रॅगिंग केले जाते. दबावाखाली मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात.
अमली पदार्थांसाठी मोबाइल मेसेजमध्ये विशिष्ट इमोजींचा वापर
आता व्यसनांचे प्रकार वाढले आहेत. पुडी, पावडर, म्याऊ म्याऊ हे विशिष्ट अमली पदार्थांसाठी वापरले जाणारे शब्द आता मागे पडले असून, निरनिराळ्या प्रकारच्या अमली पदार्थांसाठी मोबाइल मेसेजमध्ये विशिष्ट इमोजींचा वापर अलीकडच्या काळात सर्रास झाला आहे. अफू, गांजा, चरस, ब्राउन शुगर, हेरॉइन, एलएसडी अशा अमली पदार्थांच्या व्यसनांचा विळखा घट्ट होत असताना उगवत्या पिढीच्या पालकांनी त्याबाबत सतर्क राहायला हवे.
मुलांचे मोबाइल वेळोवेळी तपासून सांकेतिक इमोजींच्या मेसेजची देवाणघेवाण होते आहे. जे पुणे यापूर्वी विद्येचे माहेरघर आणि संस्कृती नगरी म्हणून ओळखले जात होते. त्याच पुण्याची वाटचाल आता पंजाबच्या दिशेने सुरू झाली आहे. पंजाब कसा अमली पदार्थांच्या आहारी गेला, यावर‘उडता पंजाब’नावाचा चित्रपट आला होता. तत्कालीन सरकारने अशी परिस्थिती नाकारली होती; परंतु परिस्थिती तशीच होती आणि तिथे सत्तांतर घडण्यात अमली पदार्थांचा विळखा हे एक मोठे कारण होते.
पुण्यात गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांचे मोठमोठे साठे सापडत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच वेगवेगळ्या अमली पदार्थाचे अवैध कारखाने सापडले आहेत. सांस्कृतिकच्या गप्पा मारणाऱ्या पुण्याला अमली पदार्थांचा विळखा बसल्याने आता हा चिंतेचा विषय झाला आहे. पुणे शहरात दहा वर्षांपूर्वी कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरात आणि कासेवाडी, पाटील इस्टेट, हरकानगर, लोहियानगर डायसप्लॉट अशा श्रमिकांच्या वस्त्यांमध्ये अफू, गांजा, चरस, बंटा, ब्राउन शुगर असे अमली पदार्थ सर्रास उपलब्ध व्हायचे.
केसांमध्ये छोट्या पुड्या लपवून त्याची विक्री केली जायची. अलिकडच्या काळात खराडी, कल्याणीनगर, कोंढवा, वडगाव धायरी, विमाननगर अशा संपूर्ण शहरभर त्याची व्याप्ती वाढली आहे. महागड्या मोटारीमधून इलेक्ट्रॉनिक वजनकाटे घेऊन फिरणारे विक्रेते सांकेतिक संदेशांद्वारे या पदार्थांची देवघेव करतात. त्यामध्ये अलीकडच्या काळात शब्दांऐवजी ‘सोशल मीडिया’वर चॅटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या इमोजींचा वापर केला जात आहे. अफू, गांजा, चरस, एलएसडी, एमडी अशा विविध अमली पदार्थासाठी निरनिराळ्या इमोजी व सांकेतिक चिन्हांचा वापर केला जातो.
संबंधित लेख वाचा: 1) अवघ्या 2 रुपयांच्या या ‘कुत्ता गोळी’मुळे तरुणाई होतेय नशेखोर! |
जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त पुणे शहर पोलिसांनी ट्विटरद्वारे या इमोजींची माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विक्रेते वेळोवेळी या इमोजी बदलत राहतात. विश्वासू वर्तुळात हे सांकेतिक संदेश पाठवले जातात. त्यांच्या माध्यमातून व्यसनाधीन युवकांना त्याची माहिती मिळते. या सांकेतिक इमोजी जुळल्या, तरच त्याला संबंधित अमली पदार्थाचा पुरवठा केला जातो.
कारवाया केवळ तात्पुरत्या मालमपट्ट्या ठरत आहेत
मुलांच्या मोबाइलमधील संदेश तपासून आपली मुले अशा कुठल्या व्यसनाच्या जाळ्यात तर अडकली नाहीत ना, हे पालकांनी तपासून घ्यायला हवे. अमली पदार्थांच्या उच्चस्तरीय साखळीमध्ये राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमधील तस्करांचा हात असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर नोकरी, व्यवसाय व टुरिस्ट व्हिसावर आलेले अनेक नायजेरियन नागरिकही त्वामध्ये सामील आहेत. पोलिस व अन्य यंत्रणांनी अमली पदार्थ विक्रीबाबत व्यापक मोहीम उघडली असली, तरी या साखळीतील उच्चपदस्थ एजंटांपर्यंत पोहोचणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या कारवाया केवळ तात्पुरत्या मालमपट्ट्या ठरत आहेत.
प्रत्यक्षात, संपूर्ण शहरभर किशोरवयीन पिढीभोवती अमली पदार्थांचा विळखा घट्ट होत असल्याचे निरनिराळ्या खून, खुनी हल्ले, लुटमारी व तत्सम गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुलांचा टक्का वाढला आहे. त्याचबरोबर अगदी विशीतले युवक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे दररोज निरनिराळ्या घटनांवरून विशेष म्हणजे गुन्हा करत असताना त्यातील बहुतांश मुले अमली पदार्थाच्या नशेत आहेत. 
संसदेत सरकारने अलिकडेच दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे, की 2019 ते 2023 दरम्यान बेकायदेशीर ड्रग्ज जप्त करण्याचे 3.75 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यात 86 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 60 लाख किलोपेक्षा जास्त बेकायदेशीर ड्रग्ज जप्त करण्यात आले. बंदरांवर 17 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यात 11,193 कोटी रुपयांचे 5,093 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. 2021 मध्ये सर्वाधिक जप्ती नोंदवण्यात आल्या. एकीकडे पोलिस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग अटकेचे आणि जप्तीचे मोठमोठे आकडे तोंडावर फेकले जात असले, तरी या प्रकरणात पुराव्याची साखळी जोडण्याचे आणि गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने एकूणच तपास आणि पोलिसांच्या वागणुकीवर संशय घ्यायला जागा राहते. 2019 ते 2023 दरम्यान, बेकायदेशीर ड्रग्ज प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
अंमली पदार्थांच्या व्यापाराला छुपे संरक्षण
आता अंमली पदार्थांच्या व्यापाराला छुपे संरक्षण दिल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. पोलिसांना आता या पैशाची सवय लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कोणत्याही प्रकरणातील आरोपींची नावे न्यायालयात आरोपपत्र दाखल होईपर्यंत उघड करू नयेत, असे म्हटले आहे. पुण्यात एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अटकेपासूनची फोटो, व्हिडीओसह माहिती अवघ्या काही मिनिटांत माध्यमांना मिळते आणि पोलिस आयुक्तही त्याचे समर्थन करतात, हे गंभीर आहे. आरोप सिद्ध झाल्याशिवाय कुणालाही आरोपी म्हणता येत नाही. संबंधितांनी अंमली पदार्थ सेवन केल्याचे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट होते. वैद्यकीय चाचणीचा अहवाल येण्याअगोदर अंमली पदार्थाच्या सेवनाचा आणि ते बाळगल्याचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, याचे उत्तर मिळत नाही.
मुंबईत शाहरूख खान यांच्या मुलाच्या बाबतीतही अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठमोठे दावे केले आणि नंतर त्यांना तोंडघशी पडावे लागले. आर्यन खानची सुटका करावी लागली; परंतु बरेच दिवस तो तुरुंगात पडावे लागले. मुंबईत तर एका पोलिस अधिकाऱ्याचेच अंमली पदार्थांच्या व्यवहाराला संरक्षण होते. नंतर त्याला निलंबित करण्यात आले हा भाग वेगळा; परंतु पोलिसांसारख्या अन्य सर्वंच यंत्रणांची गुन्हेगारी जगताशी मिलीभगत हे आता उघड गुपित आहे.
त्यामुळेच तर सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसारच 2019 मध्ये भारतात ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत अटक झालेल्यांची एकूण संख्या 74,620 होती. ती 2023 पर्यंत 78 टक्क्यांनी वाढून 1,32,954 झाली. तथापि, वाढत्या संख्येने प्रकरणे असूनही, या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण चिंताजनकपणे कमी आहे. 2019 मध्ये शिक्षा झालेल्या एकूण प्रकरणांची संख्या 89 होती, जी 2020, 2021 आणि 2022 मध्ये आणखी घसरली. 2023 मध्ये, 104 प्रकरणांमध्ये शिक्षा झाल्याची नोंद झाली.






