‘’काही कंपन्या तुम्हाला सरबत विकतात आणि त्यातून मिळणारा पैसा मशीद आणि मदरसे उभारण्यासाठी दिला जातो. तुम्ही जर त्यांचे सरबत विकत घेत असाल तर मशीद आणि मदरसे बनविण्यासाठी मदत करत आहात. जर तुम्ही ही (पतंजली) उत्पादने विकत घेतलीत तर गुरुकूल, आचार्य कुलम विकसित केले जाईल, पतंजली विद्यापीठाचा विस्तार होईल आणि भारतीय शिक्षा मंडळाची भरभराट होईल”, असे विधान बाबा रामदेव यांनी अलीकडेच केले होते.
बाबा रामदेव यांनी जरी कंपनीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा सरळसरळ ‘हमदर्द’च्या ‘रुह अफजा’ शरबताकडे होता. बाबा रामदेव केवळ इतकीच टिपण्णी करून थांबले नाहीत तर त्यांनी त्याला ‘सरबत जिहाद’ अशी उपमा दिली. त्यांच्या या विधानानंतर हमदर्द कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा प्रकार अप्रतिष्ठा करणारा आहे, यातून जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप हमदर्दकडून युक्तिवाद करताना करण्यात आला.
हमदर्द’च्या रुह अफ्जा सरबताचा उल्लेख बाबा रामदेव यांनी सरबत जिहाद असा करण्याचा प्रकार सद्सद्विवेकबुद्धीला धक्का देणारा असल्याची टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केली. मी या चित्रफिती पाहिल्या तेव्हा माझे डोळे तसेच कानावर विश्वास बसत नाही. तसेच प्रतिवादी क्रमांक 2 असलेल्या रामदेव यांनी प्रतिस्पर्ध्याच्या उत्पादनाबाबत अशी वक्तव्ये किंवा समाजमाध्यमावर मजकूर वा जाहिराती पुन्हा करणार नाहीत याची खात्री द्यावी असे न्यायालयाने बजावले. त्यानंतर रामदेव बाबा यांनी समाजमाध्यमावरील याच्या संबंधित मजकूर तातडीने मागे घेण्याचे आश्वासन दिले. 
मी रुह अफजा नाही तर गोमूत्र पितो - नितेश राणे
‘रुह अफजा’वरून हा वाद सुरू असतानाच मंत्री नितेश राणे यांनी एका मुलाखतीत ‘तुम्ही रूह अफजा पितात की, गुलाब शरबत’? या प्रश्नाला अत्यंत वेगळे उत्तर दिले. नितेश राणे म्हणाले की, मी गोमूत्र खूप पितो आणि ते आरोग्यासाठीही चांगले असते. पुढे ते म्हणाले की, मला सांगा मला रूह अफजा कोण देणार? याच्यावर बरेच काही अवलंबून आहे. मुळात म्हणजे मी रूह अफजा वगैरे काही पित नाही. मला रूह अफजा कोणीही चांगल्या भावनेने पाजणार नाही. तो फार जास्त गोड असतो आणि मला आवडत पण नाही. तुम्ही विचार करा ना नितेश राणेंना रूह अफजा कोण प्रेमाने पाजणार नाही.
बाबा रामदेव आणि नितेश राणे यांनी जो ‘सरबत जिहाद’चा ‘वाद सुरू केलाय तो अर्थातच हमदर्द कंपनीच्या ‘रुह अफजा’च्या बाबतीत आहे आणि याचे कारण म्हणजे या सरबताचे कनेक्शन मुस्लिम आणि पाकिस्तानशी जोडले जात आहे. रुह अफजा शरबत बाजारात कधी आले. भारत आणि पाकिस्तानचा फाळणीशी काय संबंध आहे हे हे जाणून घेऊया.
काय आहे रुह अफजाची गोष्ट…?
तशी तर रुह अफजाची गोष्ट खूप रंजक आहे. ती 118 वर्षे जुनी आहे. हे शरबत 1907 मध्ये सुरू झाले. हकीम अब्दुल मजीद हे यूनानी चिकित्सा पद्धतीने लोकांवर उपचार करत होते. त्यांनी जुन्या दिल्लीतील त्यांच्या दवाखान्यात एक खास प्रकाराचे पेय तयार केले. त्याचे नाव रूह अफजा ठेवले. विशेष म्हणजे औषध म्हणून बनवलेल्या रूह अफजा सिरपचा उद्देश लोकांना उष्माघातापासून वाचवणे हा होता. ‘रूह अफजा’ चा मराठीत अर्थ ‘आत्म्याचे पुनरुज्जीवन’ असे होते. म्हणजेच शरीर आणि मनाला तृप्त करणारे पेय.
त्या काळात दिल्लीतील लोकांना हे सरबत खूप आवडले. उष्णता घालविण्यासाठी लोक ते खरेदी करण्यासाठी घरातून भांडी घेऊन जाऊ लागले. वाढती लोकप्रियता पाहून, रूह अफजाची मागणी वाढली.देशाच्या कानाकोपऱ्यात रूह अफजा उपलब्ध करून देण्यासाठी, हकीम अब्दुल मजीद यांनी त्याचे ब्रँडिंग सुरू केले. विशेष म्हणजे त्या काळात रूह अफजाचा लोगो मुंबईच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनविण्यात आला होता.
तर बाटलीचे डिझाइन जर्मनीमध्ये बनविली गेली. 1940 मध्ये जुन्या दिल्लीत रूह अफजा तयार करण्यासाठी एक कारखाना उभारण्यात आला. अशा प्रकारे रूह अफजा देशभरातील घराघरात पोहोचला. रुह अफजा बनवणारी हमदर्द कंपनी सध्या 25 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करते. ही कंपनी सहाशे अधिक उत्पादने बनवते.
देशाची फाळणी अन् कंपनीचीही फाळणी
देशाची फाळणी झाली तशी हकमी अब्दुल मजीद यांच्या कुटुंबाची फाळणी झाली. मजीद यांची दोन्ही अब्दुल हमीद आणि मोहम्मद सईद या सरबत व्यवसायात होते. पण, 1947 मध्ये फाळणीनंतर त्यांचा मोठा मुलगा अब्दुल हमीद भारतातच राहिला, तर लहान मुलगा मोहम्मद सईद पाकिस्तानला गेला. त्याने कराचीमध्ये रूह अफजा विकायला सुरुवात केली. या सरबतला पाकिस्तानातही प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर सईदने पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजेच बांगलादेशमध्ये कंपनीची शाखा उघडली. बांगलादेशच्या निर्मितीनंतर मोहम्मद सईदने रुह अफझाचा बांगलादेश व्यवसाय त्याच्या मित्राकडे सोपवला.
हमदर्द कंपनीचे अनेक उत्पादने
हमदर्द कंपनीचे अनेक उत्पादने आहेत. सिंकारा, रोगन, बाबाद, शिरीन, साफी, जोशीना, स्वालीन हेही उत्पादने आहे. ही कंपनी खाद्यपदार्थाबरोबर औषधी उत्पादने निर्माण करते. 2022-23 मध्ये भारतामधील हमदर्द कंपनीने 565 कोटींची कमाई केली होती. त्यातील 500 कोटी रुपये फक्त रूह अफजा एक उत्पादनापासून मिळाले होते. या कंपनीने एक हजार कोटीचे टार्गेट ठेवले आहे. तर दुसरीकडे रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीने येत्या काही वर्षात मोठी झेप घेतलीय.
2023-24 या वर्षात पंतजली कंपनीचे खप 23 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण उत्पन्न तब्बल 9 हजार 335 कोटी इतके झाले आहे. एकप्रकारे रामदेव बाबांची कंपनीचे मल्टिनॅशनल कंपनी इतके उत्पन्न आहे. त्या तुलनेत सव्वाशे वर्षांपासून असलेले हमदर्द कंपनीचे उत्पन्न पतंजलीपेक्षा पाच ते सहा टक्केच आहे. तसं पाहिले तर हमदर्द कंपनी पतंजलीची स्पर्धेकही नाही. तरी रामदेवबाबांनी वाद निर्माण केला. नेमकी वादाचे पुढे काय होते ते कळेच.






