- प्रज्वल ढगे
माणसाला माणसापासून वेगळं पाडणाऱ्या वर्णव्यस्थेत शूद्रांचं स्थान सर्वांत खाली. या वर्गावर अन्वनित अत्याचार झाले. आज अत्याचाराची पद्धत बदलून त्याने नवे रुप धारण केले आहे. पण वर्णव्यवस्थेत स्थान नसलेल्या आणि शूद्रांपेक्षाही उपेक्षित असलेला घटक म्हणजे स्त्रीवर्ग. आजपर्यंत स्त्रीला सामाजिक, आर्थिक आणि पारिवारिक पातळीवर अन्याय, अत्याचारच सहन करावा लागला. त्यांच्या या दुखण्याला कमी लेखता येणार नाहीच.
मात्र स्त्रीपेक्षाही दारुण स्थिती असलेला त्यांच्यातलाच आणखी एक घटक आहे, तो म्हणजे वेश्या! वेश्या म्हणजे समाजव्यवस्थेच्या रचनेत कुठेही स्थान नसलेला पण हवं त्या मार्गाने कुस्करलं जाणारं एक मोठं दु:ख आहे. त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेण्याची कुणी तसदीही घेत नाही. पण आज याच बायका बोलू लागल्या आहेत. अशाच एका अरण्यरुदनाची कहाणी म्हणजे नलिनी जमिला यांचं ‘सेक्स वर्कर’ हे पुस्तक...
सेक्स वर्कर पुस्तक वेगळं का आहे?
अवघ्या सव्वाशे पानांचं हे पुस्तक. मूळ मल्याळी भाषेत ‘ओरू लैंगितोळिळालियुडे आत्मकथा’ या नावाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. 2005 साली लिहिलेल्या या पुस्तकाच्या अवघ्या 100 दिवसांत तब्बल सहा आवृत्त्या निघाल्या आणि 13 हजार प्रति विकल्या गेल्या होत्या, एवढी ताकद या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केलाय. या पुस्तकातली प्रत्येक ओळ आणि वाक्य तुम्हाला खडबडून जागं करतं.
वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या बायकांची स्थिती काय असते? त्यांना काय हाल सोसावे लागतात हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक एक चांगला संदर्भ ठरतं. सेक्स वर्कर हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिकेचं नाव काहीसं वेगळं भासतं. नलिनी जमिला असं नाव कानी पडताच वाटतं की त्यात काहीतरी गडबड आहे. ‘सामान्य’ लोकांप्रमाणे हे नाव नाही. पण ‘सेक्स वर्कर’ हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर हे नाव असामान्य का आहे? त्याच्यात नेमका काय गर्भितार्थ दडलाय हे समजतं. हे नाव म्हणजे देहविक्रय आणि या कामातून झालेल्या हेळसांडीच्या जखमेचं प्रतिक म्हणता येईल.
नलिनी जमिला यांच्या पुस्तकात नेमकं काय आहे?
हे पुस्तक तसं आत्मचरित्र आहे. एका देहविक्रय करणाऱ्या महिलेचं चरित्र अवघ्या सव्वाशे पानांत बसवणं तसं फारच अवघड. पण लेखिकेने तसा प्रयत्न केलाय. हे आत्मचरित्र अनेक अर्थांनी वेगळं ठरतं. मराठीतल्या सरळधोपट असणाऱ्या इतर आत्मचरित्रांच्या पंक्तीत ते बसत नाही. रम्य बालपण, बापलपणीची जडणघड, आजूबाजूची हिरवळ, जगण्यातला दरवळ, शिक्षणाचा संघर्ष आणि नंतर यशाचं उत्तुंग शिखर गाठल्याचा रटाळ प्रवास जमिला यांच्या पुस्तकात नाही.
हे पुस्तक कधी तुम्हाला नलिनी यांच्या बालपणीच्या कथा सांगतं तर कधी लगेच वेश्यांचा उपभोग घेण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकाचं अंतरंग उघडं पाडतं. सेक्सच्या नावाखाली वेश्येच्या बाईपणावर कसा बलात्कार केला जातो याचं जळजळीत सत्य या पुस्तकात मांडण्यात आलंय. कदाचित याच कारणांमुळे हे आत्मचरित्र काहीसं वेगळं आहे.
संबंधित लेख वाचा: 1) सेक्स वर्कर महिलांनी सुरू केलं स्वत:चे मीडिया हाऊस…‘जुगनू’ |
वेश्यांची हेळसांड जाणून घ्यायची असेल तर….
सुरुवातीला लेखिकेने आपल्या बालपणीची कहाणी सांगितली आहे. लहाणपणापासून संघर्ष नशिबात आल्यानंतर कामाच्या ठिकाणीही कसं शोषण केलं जातं? बायकांना कसं वापरून घेतलं जातं, याचे अनेक प्रसंग जमिला यांनी प्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे मांडले आहेत. कुठेही रंगवून, प्रसंग रसभरीत न करता आणि विशेष म्हणजे कुठल्याही दयेची अपेक्षा न करता तुम्हाला वेश्येच्या अंगावरचे ओरखडे, त्यांचं आर्थिक, सामाजिक पातळीवरचं झगडणं समजावं, असा रोखठोक हेतू समोर ठेवूनच लेखिकेने या पुस्तकाची रचना केली आहे.
वेश्या व्यवसायात उतरण्याची तशी चार प्रमुख कारणं आहेत. धोकाधडी, मानवी तस्करी, तथाकथित सभ्य समाजात परत येण्यासाठी बंद झालेली दारं ही त्यातली तीन प्रमुख कारणं. पण यातही सर्वाधिक महत्त्वाचं चौथं कारण म्हणजे आर्थिक चणचण. पैशांअभावी निर्माण होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी अनेक महिला हा पेशा पत्करतात. एकदा का या पेशात आलं की नंतर मात्र काय होतं? या महिलांचं मानसिक, शारीरिक दुख: काय असतं? त्यातून बाहेर पडताना त्यांची कशी हेळसांड होते याची प्रचिती हे पुस्तक वाचून येते.
नलिनी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या आजूबाजूच्या अनेक लोकांनी आत्महत्या केल्याचं त्या सहज सांगतात. यात बऱ्याच वेश्यांचाही समावेश आहे. लेखिकेने सहज केलेल्या या उल्लेखांना समाजाचं वास्तव सांगणाऱ्या अनेक दर्दभऱ्या कहाण्यांचे झालर आहे. नलिनी यांनी या कहाण्यांचा पुसटचा उल्लेख केलेला असला तरी त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या घटनांचा संदर्भ घेऊन देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या दु:खाची खोली वाचकांनी स्वत:हून समजून घेतली पाहिजे. तरंच हे पुस्तक वाचण्याला अर्थ आहे.
(नलिनी जमिला)
समाजरक्षकच वेश्यांचे भक्षक!
आपला पुरषप्रधान संस्कृती असलेला समाज महिलांना हवं तसं वापरून घेतो. चमचमीत जगणं आणि आलिशान बंगल्यात राहणाऱ्या एखाद्या ‘मॅडम’पासून ते झोपडपट्टीत दारुड्या नवऱ्याची बायको म्हणून जीवन कंठणाऱ्या मळमळीत बाईपर्यंत अशा सर्वांचा शोषण होतंच असतं. फक्त या शोषणाची पद्धत, प्रक्रिया तेवढी वेगळी असते. वर उल्लेखलेल्या दोन्ही प्रकारच्या महिलांच्या शोषणाचा हिशोबतरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ठेवला जातो. पण शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचा हिशोब ठेवणारा असा कोणताच मुनीम नसतो.
खरं तर हा हिशोब ठेवणारे समाजरक्षकच वेश्यांचा भक्षक होण्यासाठी गुंडासारखे तयार होऊन बसलेले असतात. आजघडीला त्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण पैसे देऊन शरीराचे लचके तोडणाऱ्या खाकी वर्दीतल्या अनेक राक्षसांची उदाहरणं जमिला यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहेत. पोलिसांची अरेरावी, वेश्यांना गृहित धरणं आणि यातून वेश्यांच्या आयुष्याची होणारी राखरांगोळी नलिनी यांनी त्यांच्या पुस्तकात नेमकेपणानं मांडलीय.
वेश्यांचा भाव अन् मूल्यहीन जगणं
वेश्या हा घटक फक्त शरीरवक्रयापर्यंतच सीमित नसतो. वेश्येच्या मागे आपसूकच गुन्हेगारी विश्वाचं लचांड लागतं. खून, दरोडे, पाशवी बलात्कार करणारे लोक त्यांची गिऱ्हाईकं असतात. परिणामी वेश्या अशा मवाल्यांची शिकार हमखास बनतात. काही सेक्स वर्कर्सना तर भोगल्यानंतर कोणताही मोबदला न देता तसंच हाकलून दिलं जातं. तर काही दुर्दैवी वेश्यांना ज्या ठिकाणी भोगलं त्याच ठिकाणी संपवलं जातं.
आज हे प्रमाण कमी झालं असेलही. काही वेश्या आज अशा वृत्तींशी सामना करत असतीलही. पण नलिनी जमिला यांच्यावरही तसे काही प्रसंग बेतले होते. दैव बलवत्तर म्हणून त्या तिथून सुटल्या. वेश्यांचं हे रुदण समाजासमोर यावं, हा एकमवे उद्देश समोर ठेवून जमिला यांनी या थरारक कहण्याही बिनदिक्कतपणे या पुस्तकात मांडल्या आहेत.
वेश्येचं प्रेम, बिनबापाचं लेकरू अन् आबाळ
वेश्या जेव्हा आर्थिक पातळीवर हतबल होते, तेव्हा तिला मदत करणारे हात संपून जातात. त्यामुळंच काही वेश्या पुढे अक्षरश: भीक मागून जगतात. जमिला यांनी हेही दिवस पाहिले, भोगले. त्यांनी पोटच्या लेकीला घेऊन मशिदीसमोर भीक मागून काढलेल्या दिवसांची हादरवून टाकणारे दिवस या पुस्तकात कोरलेले आहेत. वेश्याला पती नसतो. तो असला तरी त्याची स्वत:ची शरीराची भूक भागवण्यापुरता, सोय म्हणून आपल्या वेश्या बायकोला जमेल तसं तो वापरून घेतो.
गरज संपली की सोडून देतो. असे अनेक नवरे, प्रियकर म्हणणारे पुरुष देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात येतात. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलाही शेवटी माणूस आहेत. त्यांचेही कधीतरी एखाद्या पुरुषाशी भावनिक बंध जुळतातच. काही पुरूषांना त्या भाळतात. पण यातून बाप नसलेल्या अनेक संतती जन्माला येतात. एकदा का वेश्यांना मूल झालं की त्यांची होणारी आबाळ कैक पटींनी वाढते. स्वत:चं गुजराण करण्याबरोबरच पोटच्या गोळ्याचंही पोट भरण्यासाठी तिला झगडावं लागतं. ज्याच्यापासून ते मूल जन्मलं तो मात्र यापासून नामनिराळा असतो. याच दिव्यातून नलिनी जमिला यांनाही जावं लागलं.
स्त्री म्हणून स्वत:चा जपावा लागणारा देह, त्यातही सोबत असणारी तारुण्यातली कोवळी पोर आणि पैशांची चणचण अशा तिन्ही आव्हानांना त्यांनी तोंड दिलं. माझ्या लेकीनेही वेश्याव्यवसाय करावा, असं कोणत्याच देहविक्रेत्या महिलेला वाटत नाही. पण वेश्येची मुलगी वेश्याच होणार असा थेट अर्थ समाज काढून टाकतो. किंबहूना वेश्येच्या मुलीने वेश्याच झालं पाहिजे यासाठी तिथली व्यवस्था जोमाने काम करत असते. पण या चक्रव्यूहातून आपल्या लेकीला बाहेर काढण्यासाठी जमिला यांनी काय संघर्ष केला? लेकीची वैचारिक जडणघडण कशी केली? याचेही संदर्भ या पुस्तकात आहेत.
…म्हणून हे पुस्तक वाचलं पाहिजे
नलिनी जमिला या सर्वाधिक वाईट आणि प्रतिष्ठाहीन असलेल्या व्यवसायात पडल्या. पण जमेची बाब म्हणजे त्यांनी या क्षेत्रातल्या महिलांच्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहिलं. याच जाणीव-नेणिवेच्या जोरावर त्या फक्त भारतच नव्हे तर परदेशातही देहविक्रय करण्याऱ्या महिलांच्या समस्या मांडू शकल्या. आज नलिनी जमिला वेश्यांचं जीवनमान उंचावाण्यासाठी प्रयत्न करतात, झगडतात. त्यांनी या महिलांसाठी आतापर्यंत अनेक पातळ्यांवर लढाई लढली आहे. पण बरेच काम बाकी आहे. एक माणूस म्हणून त्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठीतरी हे पुस्तक एकदा वाचलं पाहिजे!
(साभार - प्रज्वल ढगे यांच्या ब्लॉगवरून)






