भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी 10:07 वाजता वाराणसीला पोहोचले आणि विमानतळावर उतरताच त्यांनी पोलिस आयुक्तांवर एका विद्यार्थिनीवरील झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. पंतप्रधानांनी आयुक्तांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
थेट पंतप्रधानांना इतक्या गांभीर्याने या बलात्कार प्रकरणाची दखल का घ्यावी लागली…? पंतप्रधानांच्या मतदारसंघातच इतकी धक्कादायक घटना कशी काय घडू शकते…? बंदी असतानाही अशा बलात्कारांना जिथून खतपाणी मिळते ते हुक्का पार्लर वाराणसीत कसे काय सुरू राहतात…? जिथे बलात्कार झाला त्या वाराणसीमध्ये पिशाच्च मोचन नावाच्या परिसरात नेमकं काय चालतं…? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
वाराणसीत बारावीत शिकणाऱ्या मुलीवर 23 मुलांनी केला गँगरेप
उत्तर प्रदेशातील वाराणसी इथे एका भयंकर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. 12 वीत शिकणाऱ्या 19 वर्षीय एका विद्यार्थिनीचं अपहरण करत तिच्यावर सतत सात दिवस अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत या विद्यार्थिनीवर 23 जणांनी अत्याचार केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, आरोपींपैकी अनेक जण हे पीडितेच्या ओळखीचे होते. यामध्ये काही तिच्या ओळखीचे चेहरे होते, तर काही माजी वर्गमित्र आणि इन्स्टाग्रामवरील संवादातून ओळख झालेल्या काही जणांचा सहभाग होता. पोलिसांनी सर्व 23 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करत सहा जणांना ताब्यात घेतलं आहे, तसंच 11 जणांची अद्याप ओळख पटलेली नाही; तर उर्वरित आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
हुक्का बारमध्ये गेली आणि तिथूनच गायब झाली…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्चला बारावीत शिकणारी ही पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसह वाराणसीतील हुक्का बारमध्ये गेली होती, त्यानंतर ती बेपत्ता झाली. 4 एप्रिल रोजी ती घरी परतली तेव्हा तिने तिच्या कुटुंबीयांना अत्याचाराविषयी सांगत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ती एका मैत्रिणीच्या घरी गेली होती आणि त्यानंतर ती परतली नव्हती.
|
|
या पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, 29 मार्चला तिची एक मैत्रीण तिला पिशाच मोचन भागातील एका हुक्का बारमध्ये घेऊन गेली. त्या तिथे पोहोचल्यानंतर इतर काही जणही त्यांच्यासोबत आले. त्यानंतर काही जणांनी तिला शीतपेय प्यायला दिले आणि सिगरा परिसरातील काही हॉटेल्समध्ये तिला घेऊन गेले. इथे वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉटेल्समध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.
29 मार्चला सामूहिक अत्याचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 30 मार्चला रस्त्याने चालत असताना तिला पुन्हा त्यातीलच एक आरोपी आणि तिचा मित्र असणारा दुसरा आरोपी भेटला. त्यांनी तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून महामार्गाजवळ अज्ञातस्थळी नेले आणि तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. अत्याचारानंतर तिला आरोपींनी नादेसरमध्ये सोडून दिले.
अमली पदार्थाच्या नशेत असल्यामुळे अनेकांनी घेतला फायदा
अमली पदार्थाच्या नशेत असल्यामुळे ही तरूणी दोन दिवसांनंतरही घरी पोहोचू शकली नाही. तिसऱ्या दिवशी 31 मार्चला आणखी पाच पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केला. या पाच जणांनी तिला मालदहिया इथल्या हॉटेलमध्ये नेऊन तिला अमली पदार्थ देत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला असे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिले आहे. त्यानंतर 1 एप्रिलला दुसरा एक आरोपी त्याच्या मित्रासह तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे आणखी तीन जण आधीपासून उपस्थित होते.
तिथेही तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला गेला. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर आणखी एकाने तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची ही साखळी इथेच संपली नाही तर एका आरोपीने तिला औरंगाबादमधील एका वेअरहाऊसमध्ये नेत तिच्यावर इतर दोन जणांच्या साथीने सामूहिक अत्याचार केला.
एका क्षणी तिला पळून जाण्यात यश मिळाले आणि सिगरा इथल्या एका मॉलबाहेर ती येऊन बसली. मात्र, तिथेही हा प्रकार काही थांबला नाही. तिथे दोन जणांनी तिला अमली पदार्थ मिसळलेले नूडल्स खायला देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिला अस्सी घाटावर सोडून दिले. दरमजल करत ती 3 एप्रिलला एका मैत्रिणीच्या घरी पोहोचली, मात्र तरीही अमली पदार्थाची गुंगी असल्याने तिची शुद्ध हरपली. त्याच संध्याकाळी ती पुन्हा काही मित्रांच्या संपर्कात आली. त्यांनीही तिला हॉटेलमध्ये नेऊन तिला अमली पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केले आणि चौकघाटावर तिला सोडून दिले. 4 एप्रिलला आणखी एका मैत्रिणीच्या घरी पोहोचल्यावर सुदैवाने तिने पीडितेला घरी सोडले.
मुख्य आरोपीसह 9 जणांना पकडले
पीडित मुलगी घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांसह लालपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. पीडित मुलगी गेलेल्या हुक्का बारमधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली. तपासासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. तपासाला सुरुवात केल्यानंतर लगेचच सहा आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी काही जण हुकुलगंज आणि लल्लापुरा भागातील रहिवासी आहेत आणि त्यांना त्याच रात्री ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, काही संशयित हे अल्पवयीनदेखील असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. अटक झालेल्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
या घटनेस अनेक पैलू आहेत. यातला एक पैलू केवळ उत्तर प्रदेश सरकारचा नसून उत्तरेकडील समग्र राज्यांचा आहे. कथित साधू संन्यासी जोगे फकीर ही मंडळी इकडे सर्रास चिलीम फुकताना दिसून येतात. यांच्या व्यसनांना आळा घालायचा म्हणजे धार्मिक भावना, अस्मिता आदींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सरकारची पंचाईत आहे.
वाराणसीच्या पिशाच्च मोचन परिसरात नेमकं काय चालतं…?
वाराणसीमध्ये पिशाच्च मोचन नावाचा एक भाग आहे. इथे एक कुंड आहे जिथे काही विधी केले तर पिशाच्च बाधा दूर होते अशी धारणा आहे. इथे काही लोंक पिंपळाच्या झाडाला नाणी चिटकवतात आणि आपल्यात बाधा आहे की नाही हे जाणून घेतात. अर्थातच हा सगळा श्रद्धा अंधश्रद्धा यांचा बाजार. तर रात्री या भागात नशेडीच अधिक आढळतात. मुलीवर पहिला बलात्कार याच भागात झालाय. 
इथून काही अंतर दक्षिणेकडे पुढे गेले की वाराणसीचे विख्यात घाट लागतात. यातील पवित्र मानल्या गेलेल्या अस्सी घाटावरही या मुलीवर रात्रीच्या वेळी बलात्कार झालाय. पिशाच्च मोचन कुंड हे वाराणसीच्या सिगरा भागात आहे. तर इथं पंचाईत अशी आहे की दर पंधरवडयाला इथे नवे हुक्का बार पोलिसी कारवाईत आढळून येतात.
बंदी असतानाही युपीत हुक्का पार्लरचे पेव फुटले
उत्तरप्रदेशमध्ये हुक्का पार्लर्सना बंदी आहे, मात्र तिथल्या सर्व प्रमुख शहरात अगदी खुले आम हुक्का बार सुरु आहेत. हे पुरते बंद करणे सरकारच्या आवाक्याबाहेरचे नाही, चिलीम फुकत बसणाऱ्या जटाधारी मंडळींना आवरायचे की हे पार्लर बंद करायचे ही समस्या नसावी. कच्चा माल पुरवणारे एकच असतात ही समस्या असू शकते! त्यामुळे दंडुका कसा उगारणार? मात्र याचे गंभीर परिणाम अलीकडे समोर येताना दिसताहेत. या मुलीच्या बलात्काराची घटना त्यातलीच.
पंतप्रधान मोदी यांचा हा मतदारसंघ असूनही इथे इतकी ढिलाई कशी काय असू शकते याचे उत्तर मिळत नाही. वाराणसीमधील लंका, रथयात्रा, भेलूपूर, गुरुधाम, सिगरा, लक्सा, सारनाथ आणि महमूरगंज या भागात कधीही गेलं तर हुक्का पार्लर नजरेस पडतात. जी गोष्ट रिक्षावाले, सायकलरिक्षा वाले, ओला उबेरच्या टॅक्सीवाल्यांना ठाऊक असते ती पोलिसांना ठाऊक नसेल यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही.
सिगरी भागातून ककरमतामार्गे गेलं की शिवदासपूर हा वाराणसीचा रेडलाइट एरिया लागतो. इथली अनेक नशेडी पोरं या बायकांकडे जाऊन त्यांनाच मारझोड करतात. असो. या सर्व घटनाक्रमात सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या गोळ्या, गांजा, अफू आणि हुक्का यांची मुबलकता कुठे तरी ट्रिगर होतेय. हे सर्व वाराणसीच्या प्रतिष्ठेस, लौकिकास साजेसे नाही.
अनेकदा हुक्का पार्लरची माहिती दिली की पोलीस तिथे तत्काळ कारवाई करतात कारण या ठिकाणी गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारी मानसिकता वाढते हे आपले पोलीस जाणून आहेत. देशातले प्रमुख धार्मिक स्थळ आणि पंतप्रधानांचा मतदारसंघ असूनही ही अनास्था असेल तर हे काही बरे चित्र नाही. इथे सर्वच अवैध धंद्यावर अत्यंत कठोर कारवाई अपेक्षित आहे.






