- सुरज पी. दहागावकर
आजकाल लग्नाविषयी मित्रमैत्रिणींशी बोलताना, संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लग्न या विषयावर बरीच मंडळी पुढे येत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आणि उत्साह तर दूरच राहिला. कारण कुणी म्हणतो मला लग्न करायचेच नाही तर कुणी म्हणतो मला अजून सेटल व्हायचे आहे. कुणी म्हणतो अजून वेळ नाही झाली तर कुणी म्हणतो मला पुढे शिकायचे, स्वतःला सिद्ध करायचे. काहीजण आधी करिअर, नोकरी यावर लक्ष देतात तर काहींना लग्न या संकल्पनेविषयीच शंका वाटते.
मग मनात सहज प्रश्न उभा राहतो, काय झाले आपल्याला? कारण एकेकाळी लग्न म्हणजे ठराविक वयात होणारी गोष्ट असायची. वयाची पंचविशी झाली की घरच्यांनी लग्नाचे ठरवायचे आणि ते झालेच पाहिजे असेच सगळ्यांना वाटायचे. मुलांनी काही विचार केला किंवा नाही तरी लग्न लावून दिले जात होते. आणि आता? आता लग्नाचे नाव जरी घेतले तरी पोरं-पोरी घाबरतात.
त्यामुळे आजकाल लग्न या विषयावर बोलणे म्हणजे काहीसे अवघड झाले. कारण पूर्वी लग्नाचे नाव ऐकले की चेहरे खुलायचे, आज मात्र चेहऱ्यावर चिंता उमटते. लग्न करावे की नाही? योग्य वेळ कोणती? साथीदारावर विश्वास कसा ठेवायचा?, स्वातंत्र्य गमावणार का? असे अनेक प्रश्न तरुणांच्या मनात पिंगा घालत आहेत. मग हे प्रश्न कुठून आले? आपण एवढे साशंक का झालो? या प्रश्नांची उत्तरे शोधायचा हा एक प्रयत्न.
नुकतीच डॉक्टर झालेल्या एका मैत्रिणीशी एके दिवशी सहज गप्पा मारताना लग्नाचा विषय निघाला. तेव्हा ती फार गंभीर आवाजात म्हणाली, मला लग्नाची भीती वाटते रे! मी थोडा आश्चर्यचकित झालो आणि तिला विचारले, का गं? तुझ्यासारखी समजूतदार, डॉक्टर असलेली मुलगी अशी का म्हणते? तेव्हा ती म्हणाली, बघ ना, आजूबाजूला काय चाललयं? नात्यांमध्ये प्रामाणिकपणा उरलेलाच नाही. सर्वच मुले सारखीच वाटतात. कुणावर विश्वास ठेवावा असे वाटत नाही. चांगला मुलगा खरंच भेटेल का? कारण आजच्या काळात कुणी खरं बोलतोय की फसवतोय हे ओळखणे अवघड झाले आहे आणि एकदा लग्न झाले की मग मागे वळून पाहता येत नाही. आणि म्हणूनच मी घाबरते.
तिचे बोलणे ऐकून काही क्षण मी शांत झालो. कारण तिची भीती खोटी नव्हती आणि ती उगाच नकारात्मक बोलत नव्हती. तिचे म्हणणे खरेच होते. आणि हे फक्त तिचे नाही तर आज अनेक मुलींच्या मनातील खदखद आहे. कारण शिकलेली, कणखर, स्वबळावर उभी असलेली ही मुलगी जेव्हा अशा शब्दांत भीती व्यक्त करते तेव्हा हा विषय सोडून देण्यासारखा नाही. लग्नासारख्या गोष्टीबद्दल इतका गोंधळ, इतके अविश्वासाचे वातावरण का तयार झाले हा खरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
लग्नाच्या बाबतीत तरुणाई इतकी साशंक का झालीये?
लग्नाची भीती वाटते यामागे अनेक सामाजिक, मानसिक आणि आर्थिक कारणे दडलेली आहेत. यातील महत्वाचे कारण आजचे तरुण-तरुणी डिजिटल युगातील आहे. आजूबाजूला काय चालले? याची सर्व खबर त्यांच्याकडे असते. त्यामुळे लग्नासारखा निर्णय खूप विचार करून घेताना दिसतात. आधीच्या पिढ्यांमध्ये वय झाले की लग्न करायचे ही मानसिकता होती पण आता ती संकल्पना खूप बदलली आहे. सध्याच्या पिढीला वाटते की, लग्नाच्या आधी स्वतःचे करिअर घडवावे, चांगली नोकरी मिळवावी, आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम करावे. कारण लग्नानंतर फक्त भावनिक नव्हे तर आर्थिक जबाबदाऱ्या देखील खूप वाढतात.
घर, संसार, सणवार, मुलांची जबाबदारी, अचानक येणारे खर्च, भविष्यातील नियोजन या सगळ्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आजच्या तरुणांना आवश्यक वाटते. कारण जर आर्थिक स्थैर्य नसेल तर लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळताना अडचणी येऊ शकतात. काही वेळा नात्यात तणाव निर्माण होतो, गैरसमज वाढतात आणि मनःशांती बिघडते. हीच शक्यता डोळ्यांसमोर ठेवून अनेक तरुण सेटल झाल्यावरच लग्न ही भूमिका घेतात.
विश्वासाच्या नात्यालाच सध्या ग्रहण लागलयं…
दुसरे कारण आजच्या तरुण पिढीसमोर विवाहाच्या निर्णयात सर्वात मोठी अडचण निर्माण होते ती म्हणजे विश्वास ठेवण्याची भीती. यामागे अनेक सामाजिक, मानसिक आणि भावनिक कारणे आहेत. हल्लीच्या काळात वाढत चाललेले घटस्फोटाचे प्रमाण, विभक्त कुटुंबसंस्था, सतत कानावर येणाऱ्या नात्यातील फसवणुकीच्या घटना, विश्वासघात, मानसिक छळ, हे सगळे पाहून आजचा तरुण किंवा तरुणी गोंधळून जातो. माझा जोडीदार खरंच विश्वास ठेवणारा असेल का? आपण मनापासून प्रेम करतोय, पण तो/तीही तितक्याच निष्ठेने वागेल का? असे प्रश्न अनेक तरुणांच्या मनात सतत घोळत असतात.
मुलींच्या दृष्टीने विचार केला तर ही शंका आणि भीती अधिक तीव्रतेने जाणवते. कारण समाजात अजूनही अनेक अशा घटना घडताना दिसतात जिथे वरवर शिक्षण घेतलेल्या मुलांनी आपल्या जोडीदाराशी असंवेदनशील वर्तन केले आहे, त्यांच्यावर अन्याय केला आहे, किंवा त्यांचे मानसिक शोषण केले आहे. कारण मुलगा शिक्षित असणे ही एक बाजू असली तरी तो संवेदनशील, समजूतदार, प्रामाणिक आणि नात्यांमध्ये पारदर्शक वागणारा असेलच याची काहीच खात्री आजच्या जनरेशनमध्ये तरी देता येत नाही.
कागदोपत्री शैक्षणिक पात्रता म्हणजे आयुष्य जगण्याची समज असतेच असे नाही. एखादा मुलगा एमबीए, इंजिनिअर, डॉक्टर असू शकतो पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात नात्यांच्या बारकाव्यांची जाण असेल किंवा त्याच्या वागणुकीत प्रामाणिकपणा आणि समजूतदारी दिसेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावर अनेक मुली आणि त्यांचे पालक देखील विवाहाच्या निर्णयात जरा अधिक काळजीपूर्वक विचार करतात. केवळ नोकरी, पगार किंवा डिग्री पाहून जोडीदार निवडणे म्हणजे स्वतःच्या भविष्याची जोखीम पत्करण्यासारखे वाटते.
संबंधित लेख वाचा: 1) बँड, बाजा, बारात सोबत आता ‘Gen Z’ पिढीला ‘प्री-मॅरेज कौन्सिलिंग’ची गरज का वाटू लागलीये…? |
माझ्या आवडीनिवडी लग्नानंतर मला जपता येतील का?
तिसरे कारण आजचा तरुण व तरुणी स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण, करिअर, छंद, वैयक्तिक वेळ, फिरणे प्रवास, मित्रमैत्रिणी आणि स्वतःच्या आवडीनिवडी यामध्ये त्यांना एक विशिष्ट मोकळेपणा वाटतो. पण लग्नानंतर अनेकदा हे सगळे कुटुंबाच्या चौकटीत बसवावे लागते. त्यामुळे मी माझ्या आयुष्याला हवे तसे वळण देऊ शकेन का? माझ्या आवडीनिवडी मला जपता येतील का? लग्नानंतर मला कोणत्याही निर्णयासाठी दुसऱ्याच्या परवानगीची गरज भासेल का? असे प्रश्न त्यांच्या मनात घर करू लागतात.
मुलींच्या बाबतीत तर ही भीती अधिक तीव्र असते. कारण पारंपरिक समाजरचना अजूनही स्त्रीकडून त्याग, समर्पण, समजूतदारपणा आणि अनेकवेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबासाठी वागण्याची अपेक्षा करते. म्हणूनच अनेक सुशिक्षित, स्वतंत्र विचारांच्या तरुणींना ही कल्पनाच अस्वस्थ करते की लग्नानंतर त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागेल. तसेच तरुणांच्याही बाबतीत काही वेळा असेच असते. स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य टिकून राहील का? हा प्रश्न त्यांनाही सतावतो.
जबाबदाऱ्या, समर्पण, सहकार्य, सहनशीलता यांची आवश्यकता
चौथे कारण पूर्वीच्या काळात विवाह ही फक्त कुटुंबाची गोष्ट असायची. मुलगा किंवा मुलगी कोणाशी लग्न करणार हे ठरवण्याचा अधिकार पालकांजवळ असायचा. नात्यांची निवड ही कधी वय, कधी धर्म, जात किंवा आर्थिक परिस्थिती पाहून केली जायची. त्या काळात तरुणांच्या मताला फारसे स्थान नसायचे. पण आजच्या तरुण पिढीचे जगणे बदलले आहे. विचारसरणी बदलली आहे. स्वतः निर्णय घेण्याची जाणीव आणि क्षमताही विकसित झाली आहे.
आता तरुण स्वतःच्या आवडीनिवडीनुसार जोडीदार निवडू पाहतात. ते फक्त लग्न करायचे या विचारावर अडकत नाहीत तर कोणाशी, कधी आणि का करायचे? हे प्रश्न त्यांना अधिक महत्वाचे वाटू लागले आहेत. त्यामुळेच पारंपरिक समाजाच्या जुन्या चौकटी आणि आजच्या पिढीच्या नव्या अपेक्षा यामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. याशिवाय आजच्या पिढीला नात्यांचे फक्त प्रेमसंबंध म्हणून न बघता त्यामागच्या जबाबदाऱ्या, समर्पण, सहकार्य, सहनशीलता यांचेही भान असते.
त्यांना हे माहीत आहे की नाते टिकवणे म्हणजे फक्त प्रेमात पडणे नाही तर त्या प्रेमाला जपणे, एकमेकांच्या चुका समजून घेणे, वेळ देणे आणि अडचणीच्या वेळी साथ देणे हे सगळे असते. पण अनेकदा या सगळ्या गोष्टी जपणे, जोडीदाराला समर्पित राहणे व सतत समजूतदारपणाने वागणे हे कठीण वाटू लागते. त्यामुळेच तरुणांच्या मनात एक भीती असते लग्न केल्यानंतर हे नातं टिकेल का? आम्ही दोघे एकत्र राहू शकेल का? ज्या प्रेमात आज आनंद वाटतो, त्याच नात्यात उद्या ओझे वाटायला लागेल का? या शंका, हे प्रश्न त्यांच्या मनात खोलवर रुजतात आणि त्यामुळे विवाहाचा निर्णय घेणे अधिकाधिक गुंतागुंतीचे होते. याच कारणामुळे आज अनेक तरुण विवाह टाळतात, लांबवतात किंवा अत्यंत विचारपूर्वक आणि उशिराने निर्णय घेतात.
मानसिक तणाव, चिंता, नैराश्य, मानसिक थकवा
पाचवे कारण म्हणजे लग्नासाठी घरच्यांकडून येणारा दबाव. अनेकदा पालकांना फक्त इतकेच वाटते की मुलगा-मुलगी योग्य वयात लग्न करावे. त्यांची घाई ही सामाजिक भीतीतून किंवा परंपरेतून येते. समाज काय म्हणेल, इतरांचे होते मग आपल्या मुलाचे का नाही पण यामध्ये मुलाचे व मुलीचे काय चालले? त्यांच्या मनात काय आहे? ते तयार आहेत का? हे विचारले जात नाही. उलट त्यांच्या मनात असलेल्या शंका, भावना, काळजी याला महत्त्व न देता केवळ लग्नाचे योग्य वय गाठण्यावर भर दिला जातो.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांच्यावर ताण येतो. काहीजण शांतपणे मान्य करतात. काहीजण विरोध करतात. पण मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. त्यातच आजच्या काळात मानसिक तणाव, चिंता, नैराश्य, मानसिक थकवा या गोष्टी वाढल्या आहेत. अनेक तरुण-तरुणी मानसिकदृष्ट्या स्थिर नसतात. त्यांना अजून स्वतःचे आयुष्य समजून घ्यायचे असते. अशा अवस्थेत एखादा मोठा निर्णय घेणे, लग्नासारखी जबाबदारी स्वीकारणे हे खरंच कठीण वाटते. मनात गोंधळ असतो, आणि त्यातूनही लग्नासाठी सक्ती केली गेली तर नातं सुरू होण्याआधीच कोसळण्याची भीती वाटू लागते.
सोशल मिडियावर दिसतं तसं प्रत्येकाचं आयुष्य नसतं…
सहावे कारण आजचा तरुण वर्ग सोशल मिडियाच्या सतत संपर्कात आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब, स्नॅपचॅट आणि आता रील्स-शॉर्ट्सच्या दुनियेत दर काही सेकंदांनी नवनवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. यात सर्वात जास्त ठळकपणे दिसते ती म्हणजे लोकांच्या खासगी आयुष्यातली परिपूर्णता, सुंदर जोडपी, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जोडीदार, परदेशातील सहली, गिफ्ट्स, वर्षगाठचे खास सेलिब्रेशन, प्रपोजल्सच्या व्हायरल व्हिडिओज. हे सगळं पाहून आपल्या नात्याच्या वास्तवाकडे बघताना निराशा येते. आपल्या नात्यात हे सगळे असेल की नाही? किंवा आपणच काहीतरी कमी पडणार का? अशा विचारांनी मन पोखरले जाते. काही वेळेस आपले नाते चांगले असतानाही दुसऱ्याच्या नात्याची बाह्य चमक आपल्याला खटकते. इथेच खरी अडचण सुरू होते.
कारण सोशल मिडियावर जसे दिसते तसे प्रत्येकाचे आयुष्य नसते. पण ही जाणीव खूप उशिरा होते. ही सततची तुलना फक्त नात्यांपुरती मर्यादित राहत नाही तर ती स्वतःच्या प्रेमपात्राबद्दलच्या अपेक्षांवर, प्रेमाच्या परिभाषेवर आणि स्वतःच्या 'लग्नासाठी पात्रतेवर'ही प्रश्नचिन्ह निर्माण करते. यामुळे आजच्या तरुण पिढीत एक मानसिक दडपण निर्माण झाले आहे, परिपूर्ण नात्याची, परिपूर्ण विवाहाची, परिपूर्ण प्रेमाची. आणि जेव्हा त्यांना वाटते की, आपण अशा अपेक्षांना पूर्ण करू शकत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून हे मिळणार नाही. तेव्हा ते नात्यांकडे व विवाहाकडे सरळ पाठ फिरवतात.
प्रेमात चुकलं तर ब्रेकअप घेता येतं पण लग्नात चुकलं तर…?
सातवे कारण पूर्वी विवाह ही एक सामाजिक जबाबदारी मानली जात होती. घरच्यांनी ठरवलेले स्थळ, ठरवलेला मुहूर्त आणि ठरवलेले नाते यात व्यक्तीचा वैयक्तिक विचार फारसा महत्त्वाचा मानला जात नसे. पण आजच्या तरुण पिढीसाठी विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील प्रेम किंवा सामाजिक औपचारिकता नाही तर तो एक दीर्घकालीन, कायदेशीर, आर्थिक आणि मानसिक गुंतवणूक आहे. या नात्यात एकदा गुंतले की, त्यातून सहजपणे बाहेर पडता येत नाही. प्रेमात चुकले तर ब्रेकअप घेता येते पण लग्नात चुकले तर घटस्फोटच घ्यावा लागतो. कारण एकदा लग्न झाले की, ते कायदेशीरदृष्ट्या मान्यताप्राप्त असते.
त्यामुळे जर नाते मोडले तर त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. जी अनेकदा वेळखाऊ, खर्चिक आणि मानसिकदृष्ट्या क्लेषदायक ठरते. न्यायालयात तासन्तास बसणे, वकिलांशी बोलणे, वैयक्तिक गोष्टी उघड करणे या सगळ्या गोष्टी तरुणांना खचवून टाकतात. काही प्रकरणांत घटस्फोटाच्या वेळी पोटगी, मुलांच्या कस्टडीची लढाई, मालमत्तेचा वाद, इत्यादींचा सामना करावा लागतो. त्यामुळे एक चुकीचा निर्णय आपले संपूर्ण आयुष्य गडगडवू शकतो ही भावना त्यांना लग्नाच्या वाटेपासून दूर ठेवते.
भारतीय समाज अजूनही घटस्फोट किंवा विभक्त झालेल्या जोडप्यांकडे सहानुभूतीने न पाहता, संशयाने पाहतो. तिच्यात काही तरी दोष असेल, त्याने चुक केलेच असणार, हेच तर प्रेमविवाहाचे फळ अशा टिकांनी मनात अपमान आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. विशेषतः स्त्रियांना या टोकाच्या सामाजिक प्रतिक्रियांचा अधिक सामना करावा लागतो. तरुण-तरुणींना वाटते की, जर लग्न यशस्वी ठरले नाही तर समाजात आपली ओळख, आपली प्रतिष्ठा, आपल्या कुटुंबाची इज्जत सगळे काही धोक्यात येईल. त्यामुळे ते लग्न करण्याआधी शंभरदा विचार करतात.
एखाद्या असफल वैवाहिक नात्यानंतर येणारी एकटेपणाची भावना, आत्मविश्वास ढासळणे, पुन्हा नाते जोडण्याविषयी भीती निर्माण होणे हे सगळे परिणाम दीर्घकालीन ठरू शकतात. काहीजण तर या अनुभवाने इतके खचतात की, पुन्हा आयुष्यात कधीच नात्याच्या वाटेला जात नाहीत. या सगळ्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, विवाहाच्या निर्णयासाठी लागणारी मानसिक तयारी, स्थैर्य ही सध्या अनेक तरुणांच्या आयुष्यात नसते. लग्न करायचे, पण ते योग्य व्यक्तीशी, योग्य वेळेला आणि योग्य कारणासाठीच ही धारणा वाढत चालली आहे.
आणखी एक मोठी भीती म्हणजे पालकत्व…
आजच्या तरुणाईसमोर असलेली आणखी एक मोठी भीती म्हणजे पालकत्व. एकदा लग्न झाले की, लगेच मूल होणार, त्याची जबाबदारी येणार आणि त्यामुळे आयुष्य पूर्णपणे बदलणार असा एक सर्वसामान्य समज समाजात आहे. भारतात अजूनही लग्नानंतर लवकरच पालक होण्याची अपेक्षा घरच्यांकडून आणि समाजाकडून असते. पण ही अपेक्षा अनेक तरुणांना धास्तावून सोडते. आजच्या पिढीने लहानपणापासून स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आहे. त्यांनी करिअर, आयुष्याचा प्रवास, व्यक्तिमत्व विकास अशा अनेक गोष्टींना प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे मूल म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन असे त्यांना वाटते. रात्रभर जागरण, आर्थिक खर्च, वेळेची कमतरता, स्वतःसाठी वेळ न मिळणे याचे चित्र त्यांच्यासमोर उभे राहते. म्हणूनच ते या जबाबदारीपासून पळ काढत नाहीत पण ती उचलण्याची तयारी मानसिक दृष्ट्या लगेचच करत नाहीत. स्त्रियांच्या बाबतीत ही धाकधूक अधिक तीव्र असते. मुल झाल्यावर करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागेल, ऑफिसऐवजी बाळासोबत वेळ घालवावा लागेल, काहीतरी गमवावे लागेल ही भीती त्यांच्या मनात खोलवर रुजलेली असते. एकीकडे सामाजिक अपेक्षा असतात. आई म्हणून आदर्श ठरावे तर दुसरीकडे स्वतःच्या आकांक्षा असतात.
स्वतंत्र आणि आत्मनिर्भर राहावे. या दोन टोकांच्या ओढाताणीमुळे विवाह आणि पालकत्व या संकल्पनांबद्दल त्यांचे मन दुभंगलेले असते. शिवाय आजच्या काळात मुले वाढवणे हे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्याही खूप आव्हानात्मक झाले आहे. चांगले शिक्षण, आरोग्य, छंद, डिजिटल सुरक्षेपासून सामाजिक समज वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या सगळ्याचा विचार करता तरुणांना वाटते, मी ही जबाबदारी निभावू शकेन का? आणि त्या अनिश्चिततेपोटी ते विवाहाच्या निर्णयालाच टाळतात.
कदाचित आजच्या तरुणांना लग्नाची भीती वाटते कारण त्यांनी आजूबाजूला बघितलेली नाती फारशी टिकलेली नाहीत. त्यांनी प्रेमात फसवणूक पाहिली आहे, घटस्फोटाचे लढे पाहिले आहेत, लग्नाच्या नावाखाली स्वातंत्र्य गमावलेली माणसं पाहिली आहेत. आणि म्हणूनच त्यांना आता नात्यांमध्ये गुंतण्याआधी शंभरदा विचार करावा वाटतो. आपलं आयुष्य कुणाच्यातरी चुकीच्या निर्णयाची किंमत का ठरावे? असा प्रश्न त्यांना सतावत असतो. एखाद्या चुकीच्या जोडीदारामुळे आयुष्यभर दुःखाचे ओझे वाहण्यापेक्षा एकटे राहणे त्यांना सुरक्षित वाटू लागले आहे. यामध्ये त्यांची चूक नाही, वेळच तशी आली आहे.
परंतु या सगळ्या कारणांमुळे लग्नाचा संपूर्ण विचारच नकारात्मक पद्धतीने करणे योग्य नाही. प्रत्येक नात्यात थोडे चढ-उतार असतात, पण नात्यांना नीट समजून घेतल्यास व योग्य माणूस निवडल्यास लग्न आयुष्याचा आधारस्तंभ ठरू शकतो. विश्वास हा कुठल्याही नात्यात महत्वाचा असतो आणि तो एका दिवसात तयार होत नाही. पण सतत संवाद, पारदर्शकता आणि समजूतदारपणातून तो हळूहळू तयार करता येतो. एकमेकांच्या भूतकाळापेक्षा वर्तमान व भविष्य महत्त्वाचे मानून जर नाते सुरू झाले तर ते अधिक दृढ होऊ शकते.
याशिवाय लग्न म्हणजे फक्त सामाजिक जबाबदारी नव्हे तर दोन व्यक्तींचा परस्पर सहवासही आहे. जर आपल्या स्वप्नांना, विचारांना व स्वातंत्र्याला समजून घेणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य आणखी सुंदर वाटू शकते. त्यामुळे लग्न करायची भीती वाटणे हे स्वाभाविक असले तरी योग्य संवाद, स्वतःची स्पष्टता व नात्याविषयी सकारात्मक दृष्टी ठेवली तर ही भीती दूर करता येते. कारण आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर धोक्याची शक्यता असते पण भीतीपायी आपण सुंदर अनुभवांना नकार देतो का ? हाही विचार करायला हवा.






