- अनिल जायभाये
मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्रात सहायक प्राध्यापक म्हणून 2012 मध्ये रुजू झालो. नव्या ठिकाणी रुजू होताना उत्साहात होतो. खूप काम करण्याची अभिलाषा मनात बाळगून होतो. पण समोर बसलेल्या विद्यार्थिनींना पाहून मन खिन्न व्हायचं. इथे उच्च शिक्षण घेणार्या बहुतेक मुलींची ती पहिली पिढी.
त्यांनी सोसलेले कष्ट, सहन केलेल्या वेदना त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसायच्या. परिस्थितीमुळे अपुरे शारीरिक भरण-पोषण बघता क्षणीच जाणवायचं. शिबिरात रक्तदान करण्याची अनुमती त्यांना मिळत नसे. कारण वजन आणि रक्ताचं प्रमाण किमान पातळीच्या खाली असायचं.
या मुली लांबच्या गावावरून यायच्या. त्यांचा रोजचा प्रवास अत्यंत खडतर असायचा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आणि गैरसोयीची होती. शिकायला प्रोत्साहन मिळेल असं वातावरण बहुसंख्य कुटुंबात नव्हतं. अनेक अडथळे पार करत त्या इथपर्यंत पोहोचलेल्या होत्या. कोणत्याही कारणाने कधी अचानक शिक्षण थांबेल या भीतीने त्या धास्तावलेल्या असायच्या.
बहुतेक मुलींची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. उच्च शिक्षणाच्या पायरीपर्यंत त्यांनी पोहोचणं हीच मोठी गोष्ट होती. ज्या मुलींची कौटुंबिक परिस्थिती जरा बरी होती त्यांच्या शिक्षणाबाबतीतसुद्धा घरादारात उदासिनताच होती.
दहावी-बारावी शिकली म्हणजे खूप शिकली. काय करायचं पुढे शिकून? शेवटी, लग्न करून संसार तर करायचा आहे. लवकरात लवकर मुलीचं लग्न उरकून जबाबदारीतून मुक्त होण्याची भावना कुटुंबात असायची. समाजशास्त्र शिकविताना हळूहळू या मुलींच्या जीवनाचं समाजशास्त्र उलगडू लागलं होतं.
वर्गात विषय शिकवताना असाइनमेंट दिल्या जायच्या. चर्चेत अनेक संदर्भ यायचे. चौफेर ज्ञान मिळावे म्हणून त्यांना विविध पुस्तके वाचण्याबद्दल सुचवू लागलो. शक्य असतील ती जास्तीतजास्त पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करायचो. त्यातून त्यांना नवी दृष्टी मिळत होती.
समाजशास्त्र हे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे. वास्तव जीवनाशी त्याचा संबंध आहेच. शिकत असलेल्या प्रत्येक बाबीला स्वतःच्या जीवनाशी निगडीत करून बघितलं गेलं पाहिजे. तरच ते खरं शिक्षण ठरेल या उद्देशाने त्यांच्याशी संवाद घडू लागला. त्यामुळे त्या स्वतःच्या जीवनाचा विचार करू लागल्या.
दरम्यान 2018 मध्ये अशी कल्पना पुढे आली, की उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर पोहचेपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास नेमका काय स्वरूपाचा होता हे त्यांनी स्वतःच कागदावर उतरवावं. त्यासाठी मी सतत प्रोत्साहन देत राहिलो.
लेखनप्रक्रियेच्या काळात मी यांना मुक्ता या विद्यार्थिनीबद्दल माहिती दिली. जोतिबा-सावित्रीच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मांग जातीतील मुक्ता या मुलीने लिहिलेल्या निबंधाचे सामुहिक वाचन आम्ही केले. सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत घटकातील मुक्ताने समाजाला किती धारदार प्रश्न विचारले होते, याचं दर्शन आमच्या विद्यार्थिनींना घडलं.
मुक्ताने समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं, इतकी ताकद लिहिलेल्या शब्दात असते. फुलेंच्या शाळेत शिकून हे आत्मभान मुक्तानं मिळवलं होतं. ही चिकित्सक दृष्टी तिला शिक्षणामुळे मिळाली.
या विद्यार्थिंनींसोबत स्वतःच्या लिखाणासंदर्भात दीर्घ संवाद होत असे. पण जीवनप्रवास लिहिण्यास जेव्हा प्रत्यक्ष सांगितलं तेव्हा सुरवातीला त्यांनी थंड प्रतिसाद दिला. सर्वसाधारण सूर असा होता की, आम्ही आजपर्यंत असं काहीही लिहिलेलं नाही.
मात्र लिखाण कसं करावं, त्याची पूर्वतयारी कशी करावी, छोट्या-छोट्या अनुभवांना किती महत्त्व असतं, त्यांची गुंफण करत आपला प्रवास कसा लिहिता येईल याबाबत सातत्याने आम्ही बोलत राहिलो. वेगवेगळी पुस्तकं त्यांना वाचण्यासाठी दिली.
मग हळूहळू त्या लिहू लागल्या. एक वेगळं जग, वेगळं जीवन कागदावर आकार घेऊ लागलं. सर्व विद्यार्थिनींनी स्वतःचे प्रवास लिहून आणले. तब्बल 30 विद्यार्थिनींचा सुमारे 400 पानांचा मजकूर हातात होता. एक अपवाद सोडता हे सर्व अनुभव 2018 ते 2023 या काळात लिहिले गेले.
हा प्रवास वाचल्यावर मला स्वतःला खूप शिकायला मिळालं. ज्यांना आपण वर्गात शिकवतो त्या विद्यार्थिनींचे संघर्षशील प्रवास नवी दृष्टी देणारे होते. शिक्षक म्हणून आपणास हे तपशील माहित नसणं अशी स्वतःची मर्यादा जाणवली. या लिखाणाच्या आधारे अनेकांना संशोधनासाठी विषय सुचविता आले.
मुलींच्या या लेखनातून काही महत्त्वाच्या बाबी पुढे आल्या. शिक्षण कोणत्या शाखेत घ्यावं? कधीपर्यंत घ्यावं? सोबत कोण असावं, नसावं? अशा पुरुषी दबावतंत्राला या मुलींना सतत सामोरं जावं लागलेलं आहे. शहरातील किंवा गावातील आधुनिक संस्था, सुविधा, शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत, सार्वजनिक विहिरी, हातपंप यांची बांधणीसुद्धा सत्ताधारी जात-वर्गास केंद्रस्थानी ठेवून केलेली दिसते.
सार्वजनिक जीवनातील विषमव्यवस्था अनेक पातळीवर पुढे येते. मात्र काही मुलींचे सुखद अनुभव पण अधोरेखित होतात. काही प्रकरणात भाऊ, आई किंवा वडील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसतात. शिक्षणात सर्व प्रकारचे सहकार्य करताना दिसतात.
नात्यांमध्ये आधुनिक व्यवहार घडताना दिसतो. म्हणजे आपल्या समाजात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही व्यवहार घडताना दिसून येतात. यातून असं लक्षात येतं की आपला समाज पूर्ण आधुनिक किंवा पूर्ण पारंपारिक नाही. मराठवाड्यातील विद्यार्थिनींचे हे प्रवास या द्वैताला मोडणारे आहेत. म्हणून हे लेखन एक महत्वाचा दस्तऐवज ठरू शकते.
वर्गात शिकविताना विद्यार्थिनींसोबत माझा संवाद अधिकाधिक वाढत गेला. आपण जे शिकवतो ते त्यांच्या जगण्याशी, रोजच्या प्रश्नांशी, त्यांच्या विचारविश्वाशी जोडणं आवश्यक वाटलं. तसं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी प्रश्न मांडायला सुरुवात केली.
त्यातून संवाद प्रगल्भ बनला. त्यांच्या अडचणी व्यक्तीगत नसून त्याचा संबंध एका व्यापक व्यवस्थेशी आहे. या निष्कर्षाला सामूहिक चर्चेतून आम्ही पोहोचलो. त्यांच्या प्रश्नांचे धागेदोरे एका व्यापक समाजाच्या संरचनेशी जोडले गेले आहेत, हे अधोरेखित करत राहिलो. त्यांच्या विचारविश्वातील व जगण्यातील अडचणी लक्षात येत गेल्या.
प्रश्न समजत गेले. त्या प्रश्नांचा शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत सहभाग करून घेतला. कौटुंबिक हिंसा, स्त्रीला दुय्यम वागणूक किंवा घटस्फोट हे व्यक्तिगत प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहेत. समाजात अनेक कारणांनी असंख्य स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात ह्या बाबी घडत असतात. त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नये. संशोधनाचा एक मुद्दा म्हणून त्याचा अभ्यास करावा, अशा टप्प्याला आमची विचारप्रक्रिया पोहोचली.
संबंधित लेख वाचा: 1) आठवड्याचं पुस्तक : एका ‘सेक्स वर्कर’ची आत्मकथा ‘बेस्ट सेलर’ का ठरली? |
जीवनप्रवास लिहिण्याची प्रक्रिया विद्यार्थिंनींचा आत्मविश्वास वाढविणारी होती. हा आत्मविश्वास येणार्या काळात त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडेल, हे निश्चित. काही विद्यार्थिनीं म्हणाल्या, आम्ही किती मोठा प्रवास केलाय हे लिहिल्यानंतर लक्षात आलं. लेखनामुळे आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळाली.
काही विद्यार्थिंनी म्हणाल्या, लिहून झाल्यावर खूप मोकळं वाटलं. आम्हाला स्वतःचा शोध घेता आला. वाटचालीचं मूल्यमापन करता आलं. मनातील न्यूनगंड दूर झाला. हताश भावनेवर विजय मिळवता आला. भोगलेल्या वेदनेतून नवी ताकद मिळवली. स्वतःबद्दल छान वाटलं. एकूण काय तर भरपूर ऊर्जा मिळाली.
एखाद्या स्त्रीने एक व्यक्ती म्हणून आयुष्यात उभं राहण्याचा व स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास सुलभ नसतो. समाजात पूर्वापार याची अनेक उदाहरणं सापडतात. कुमुद पावडे या दलित लेखिकेचा अनुभव विलक्षण आहे. ‘अंत:स्फोट’ या आत्मकथनात त्यांनी मांडले आहे की, संस्कृत भाषा त्यांनी अवगत केली होती.
ती भाषा त्या शिकवतही होत्या. मात्र त्यांना तेव्हा दोन प्रकारच्या विरुद्ध प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं. तसे पाहता कुमुद पावडे कायद्याने कोणताही विषय शिकू शकत किंवा शिकवू शकत होत्या. तो त्यांचा अधिकार आहे. परंतु व्यवहारात त्यांना प्रतिकात्मक हिंसेला सामोरं जावं लागलं. विशेषतः भाषेच्या राजकारणामधून त्यांची मानखंडना होताना दिसते.
ज्या जातीतून कुमुद पावडे येऊन संस्कृत शिकवित त्या बहुजन समाजाकडून सुद्धा त्यांना प्रतिकात्मक हिंसेला सामोरं जावं लागलं. थोडक्यात, बहुजन समाजातदेखील पुरुषसत्ताक व्यवस्थेचा व्यवहार घडताना दिसतो. वसाहतीक काळात आणि नंतर भारतातील आधुनिकता कोणत्या प्रकारे निर्माण झाली? म्हणजे जातिव्यवस्था आणि पाश्चात्यांनी आणलेल्या आधुनिकतेचा संघर्ष-संवाद भारतीय समाजात कसा होत गेला, याचे चित्र या उदाहरणातून स्पष्ट होते.
स्वतःच्या प्रवासापासून व अनुभवांपासून या मुलींच्या लिखाणाला सुरुवात झाली आहे. हे अनुभव तपासत एका व्यापक व्यवस्थात्मक आकलनापर्यंत जाण्याची प्रक्रिया मौलिक होती. यातून आमच्या विद्यार्थिनींनी नवा आत्मविश्वास मिळवला. समाजाबद्दल त्यांना नव्याने आकलन झालं.
या लेखनप्रवासात असं जाणवलं की, संशोधन, शिक्षक, शिक्षणपद्धती, शिकण्या-शिकवण्याची पद्धत यात आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. हे जीवनप्रवास शिक्षकांना शिकण्या-शिकवण्याविषयक महत्त्वाची दृष्टी देणारे ठरतील असं वाटतं.
शैक्षणिक धोरण ठरविताना धोरणनिर्मात्यांनी याचा विचार नक्की करायला हवा. आपल्या धोरणांच्या केंद्रस्थानी कोण असावं याचं उत्तर मुलींच्या या जीवनप्रवासात मिळतं. विद्यार्थिनींनी जगण्याविषयीचे विविध पदर आपल्यासमोर उलगडले आहेत. त्याचं विश्लेषण होणं अत्यंत आवश्यक आहे.
परिघावरील स्त्रियांचे हे अनुभव एकविसाव्या शतकातील शिक्षण विषयक धोरणांना नवी दिशा दाखवू शकतात. या विद्यार्थिंनी विद्यापीठापर्यंत पोहोचल्या, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली, एवढं पुरेसं नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण, मार्गदर्शन मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करून ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन रचण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची त्यांना गरज आहे. त्यांना आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या सबळपणे उभं राहता येईल, असं दर्जेदार शिक्षण त्यांना मिळायला हवं. त्यामुळे त्यांच्या जीवनाची कवाडं उघडू शकतात.
सध्या शिक्षणाचं व्यापारीकरण जोरात सुरू आहे. त्यात परिघावरील स्त्रियांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही. मुख्यप्रवाही शिक्षणव्यवस्था सामाजिक-सांस्कृतिक भांडवल पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. शालेय शिक्षणाचा धोरण म्हणून आपल्या शिक्षण व्यवस्थेत किमान काही एक विचार दिसतो.
पण स्त्रियांच्या महाविद्यालयीन तसेच उच्च शिक्षणाबाबत मात्र उदासिनता दिसून येते. ही उदासिनता जशी धोरणात्मक पातळीवर आहे तशीच ती कौटुंबिक पातळीवरसुद्धा आहे. दुसर्या बाजूला नवउदारमतवादी विचारसरणी यश–अपयश हे व्यक्तिगत जबाबदारी ठरवून व्यक्तीला निकालात काढते. मात्र या विद्यार्थिनींचे लिखाण असे सूचित करते की त्यांचे अनुभव वैयक्तिक नसून ते व्यवस्थेच्या यशापयाशी निगडीत आहेत.
अत्यंत अभावग्रस्त परिस्थितीत या मुलींनी घरदार सांभाळत, नोकरी करत शिक्षण पूर्ण केलं आहे. आजही अनेक आघाड्यांवर त्यांचा संघर्ष सुरु आहे. शिक्षणासारखी मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनींना असा संघर्ष करावा लागतो हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे.
स्त्रियांचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे आता ग्रामीण भागातील पुरुषांना लक्षात येत आहे. या विद्यार्थिनींनी अनेक पातळीवर स्वतःला सिद्ध केलं आहे. कुटुंबियांचा विश्वास जिंकला आहे. अर्थात खडतर वाटेवरून चालत त्यांनी हे मिळवलं आहे. कुटुंब, घरदार या पातळ्यांवर त्यांचं स्थान निर्माण झालं आहे.
आर्थिक निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला आहे. आई, वडील, भाऊ यांची जबाबदारी घेताना त्या दिसतात. स्वतःच्या कमाईतून कुटुंबासाठी काही खर्च करताना त्या दिसतात. अर्थात अनेकांसाठी कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंध तुरुंगासारखी आहेत. पारंपरिक कुटुंबव्यवस्था आणि राजकीय-आर्थिक धोरणे त्यांच्या समोर आव्हान बनून उभी आहेत.
अर्थात, या प्रवासात त्यांना संघर्षाची सवय झाली. परिस्थितीला शरण न जाण्याची वृत्ती निर्माण झाली. आव्हानांना भिडण्याची मानसिकता बनली. उपलब्ध अवकाशाचा उपयोग करून स्वतःच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची सम्यक दृष्टी आली.
समाजाचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व्यवहार स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितला गेला पाहिजे. तसे केल्यास व्यवस्थेतील अनेक विषमता आणि विसंगती दिसून येतील. त्यांच्या या लेखनाच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, जात-वर्गीय वास्तव स्त्रियांच्या दृष्टिकोनातून समजून घेता येईल.
आपण एकविसाव्या शतकात आहोत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मुलींची आत्मकथनं वेगळं वास्तव समोर आणू शकतात, असं वाटलं. इथल्या स्त्रियांचे प्रश्न, संघर्ष, कर्तृत्व, श्रम-विभाजन, ताणतणाव या लेखनामार्फत अधोरेखित होऊ शकतात. या लेखनातून सामाजिक-सांस्कृतिक इतिहाससुद्धा उलगडला जाऊ शकतो, याची जाणीव झाली. 
शहरी भागातील स्त्रियांच्या विकासाचे निकष ग्रामीण भागाला लावून चालणार नाही. इथली परिस्थिती खूप भिन्न आहे. म्हणून परिघावरील स्त्रियांचे अनुभव शब्दबद्ध होणे खूप आवश्यक आहे. त्याशिवाय नेमकं चित्र स्पष्ट होणार नाही.
मुलींच्या या लेखनातून कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, विवाहसंस्था, सार्वजनिक संरचना, शिक्षण व्यवस्था, आरोग्यव्यवस्था इत्यादींमध्ये दडलेले अधिसत्तेचे सूक्ष्म धागे समोर येतात. हे गुंते उकलण्यासाठी त्यांचा दैनंदिन जीवनप्रवास कागदावर उतरणं महत्त्वाचं ठरलं. स्त्री-पुरुषांची जडणघडण यातून स्पष्ट होते.
लिंगभावाचे प्रस्तुतीकरण उलगडते. परिघावरच्या घटकांमधील स्त्रिया जेव्हा उच्च शिक्षणात येतात तेव्हा त्यांना कुटुंबासोबतच नातीगोती व समाजाच्या प्रतिकात्मक हिंसेला सामोरं जावं लागतं. जास्त शिकून काय करणार? लग्नाचं वय निघून जाईल! जास्त शिकून तू कुठे कलेक्टर होणार आहेस? अशा मानखंडनेचे अनुभव त्यांना पदोपदी येतात.
बहुजन समाजात ठाण मांडून असलेल्या पितृसत्तेचा हा व्यवहार असतो. असंख्य मुली या दृश्य-अदृश्य सत्तेच्या अन्यायाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बळी पडत असतात.
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ ही घोषणा ऐकायला छान वाटते. पण ती केवळ घोषणाच राहते. त्याचे राजकीय लाभ सत्ताधाऱ्यांना मिळाले तरी प्रत्यक्षात मात्र लाखो मुली अंधारकोठडी सदृश्य जीवन जगत असतात. राजकीय मंचावरून मुलींच्या शिक्षणासाठी घोषणाबाजी होते.
परंतु त्यासाठी पुरेशी संसाधने नसतात. किमान सोयी सुद्धा उपलब्ध नसतात. ग्रामीण भागातील गरीब आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलींना शिक्षण मिळणे आजही दुरापास्त आहे. उदाहरणार्थ, बसप्रवास मुलींना मोफत आहे; मात्र त्यासाठी पुरेशा बसेस, सुयोग्य मार्ग आणि उपयुक्त थांबे नसतात. किमान सुविधांची नीट अंमलबजावणीदेखील होत नाही.
आपल्या सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थेत खूप असमानता आहे. मुली शिकल्या तरी समान संधी मिळत नाही. त्यांना एका मर्यादेपर्यंत शिकण्याची मुभा दिली जाते. परंतु नोकरी करणं, करियर घडवणं, स्वतःची मतं मांडणं किंवा आयुष्याबद्दल स्वतः निर्णय घेणं हे स्वातंत्र्य त्यांना दिलं जात नाही. लिंगभेद खूप आहे.
विवाह हेच त्यांच्या जीवनाचं अंतिम धेय्य मानलं जातं. स्वयंपूर्ण व स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठी नव्हे, तर केवळ प्रतिष्ठेच्या भावनेनं त्यांना शिक्षण दिलं जातं. सासरी गेल्यावर ‘सेविका’ म्हणून तिच्याकडून अपेक्षित असलेल्या भूमिकेला पोषक ठरेल इतकंच शिक्षण तिला दिलं जातं. त्यामुळे ग्रामीण भागात सर्व स्तरांवर मुलींच्या शिक्षणाची कोंडी आढळते. वास्तव असे आहे की, मुलींना शिकविण्याची राजकीय घोषणा केवळ आभासी वक्तव्य ठरते.
हे पुस्तक एकप्रकारे मराठवाड्यातील सामाजिक-सांस्कृतिक व्यवहाराचं एक छोटं दस्तऐवजीकरण आहे. वेगवेगळ्या जात, धर्म व वर्गांतून आलेल्या स्त्रियांच्या अनुभवातून सामाजिक-सांस्कृतिक इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणून हे जीवनप्रवास महत्त्वाचे ठरतात.
स्त्री म्हणजे शोषित, केवळ असं चित्र यातून उभं रहात नाही. तर आव्हानांना सामोरं जाणार्या, परिस्थितीशी झुंजणार्या, जीवन घडविणार्या तीस विद्यार्थिनीच्या जीवनाचे दर्शन या पुस्तकात घडतं. यात विद्यार्थिनींचा शैक्षणिक-सांस्कृतिक कर्तेपणाचा सामाजिक इतिहास अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिसतो.
थोडक्यात, ज्या जात पितृसत्तेच्या कोंदणात भारतीय समाजातील मानवी नातेसंबंधांची व स्त्री-पुरुष संबंधांची वीण गुंफली गेली आहे त्यातील गुंतागुंत, सूक्ष्म कंगोरे समजून घ्यावयाचे असल्यास वेगवेगळ्या जात-वर्गांतील स्त्रियांचे जीवनप्रवास जाणून घेणे हा एक प्रभावशाली मार्ग आहे.
तसेच भारतातील स्त्रीप्रश्नाचे एकजिनसी आकलन टाळून स्त्रीप्रश्नाच्या जडणघडणीचे आंतरछेदी वास्तव अधोरेखित करत त्याचे विविध संदर्भांतील जात-वर्गीय पदर उलगडण्याची प्रक्रिया या निमित्ताने घडत आहे.
'संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास'
संपादक - अनिल जायभाये / पंचशील डावकर
प्रकाशक - हरिती प्रकाशन, लातूर
मूल्य: 400 रु.






