(संजना खंडारे)
आज भारत हा तरुणांचा देश आहे.जगातल्या कोणत्याही देशापेक्षा जास्त तरुण वर्ग आज आपल्या देशात नांदतो आहे. पण या देशाची मानसिकता तरुण व्हायला तयार नाही, या देशाच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला तरुणाईची भाषा कळायला तयार नाही. प्रेम हा तरुणाईचा धर्म पण या प्रेमाला होणारा सामाजिक विरोध एवढा दाहक आहे की, तरुणांच्या या देशात दरवर्षी एक हजाराहून अधिक ‘ऑनर किलिंग’ (?) होतात आणि हा देश पाहत राहतो.
या देशात आपलं प्रेम मिळविण्याकरिताच तरुणाईची अवघी ऊर्जा खर्च होते आणि विज्ञान,कला,क्रीडा या क्षेत्रात लावायला ऊर्जाच उरत नाही. अनेकदा हे प्रेम मिळवण्या करिता ऊर्जाच काय, आपलं आयुष्यही काही जणांना गमवावं लागतं आणि मग अंगणात प्रेमच न उमललेली तरुणाई जगण्यातलं काव्य आणि उत्साहच हरवून बसते.
याचं अगदी ताज उदाहरण म्हणजे जळगावमधील ऑनर किलिंगची घटना… एका 22 वर्षाच्या मुलीचं 26 वर्षाच्या मुलावर प्रेम जडतं. दोघेही सुखी आयुष्याची स्वप्न बघतात. घरच्यांचा विरोध पत्करून ते दोघेही लग्न करतात. लग्नाची दोन वर्ष निघूनही जातात, पण मुलीच्या वडिलांना हे नातं काही मान्य नसतं. दोन वर्षानंतर ती मुलगी आणि तिचा नवरा एका कार्यक्रमासाठी गावी येतात. याची माहिती त्या मुलीच्या बापाला मिळते. ऐन हळदीत तो बाप पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडतो.
बाप सीआरपीएफमध्ये सेवानिवृत्त अधिकारी असल्याने त्याच्याकडे एक परवाना असलेलं शस्त्र होतं. त्याच पिस्तूलमधून तो गोळ्या झाडतो. बायकोला वाचवण्यासाठी धावणाऱ्या नवऱ्याला देखील दोन गोळ्या लागतात आणि तो गंभीर जखमी होतो. मुलीचा मात्र जागीच अंत होतो.. कमी शिकलेल्या मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीवर गोळीबार केल्याची ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यातील. 
ज्या मुलीचा खून झाला तिचं नाव आहे तृप्ती. तिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ याच्याशी प्रेम विवाह केला होता. विवाहानंतर तृप्ती आणि अविनाश पुण्यातील कोथरूड येथे राहत होते. तृप्तीच्या पोटात नवीन जीव नेमकाच उमलत होता. ती तिच्या पोटात असलेल्या बाळाला घेऊन हजारो स्वप्न रंगवत असतांनाच डोक्यात सैतान संचारलेल्या बापाने म्हणजेच किरण मंगळेने तिच्याचसोबत एका निष्पाप जीवाचा आणि तिच्या स्वप्नांचा ही एका क्षणात जीव घेतला. हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडल्याने उपस्थित वऱ्हाडींचा संताप अनावर झाल्याने गोळीबार करणाऱ्या किरण मंगळेला मारहाण झाली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांतली जळगाव जिल्ह्यातील अशा प्रकारची ही तिसरी घटना. सन 2022 मध्ये चोपड्यामध्येज राकेश राजपूत आणि वर्षा कोळी या दाम्पत्याला नातेवाइकांनी ठार केले होते; तर चारच महिन्यांपूर्वी जळगावात मुकेश शिरसाट आणि पूजा सोनवणे यांच्यावर हल्ला झाला, त्यात मुकेशला प्राण गमवावे लागले.
राज्यभरच अशा घटना प्रचंड वाढल्या आहेत. घराणे, जात, धर्म, आर्थिक पत या गोष्टींवरून कुटुंबाच्या मनाविरुद्ध तरुण जोडप्यांनी स्वतःच्या आयुष्याचे काही निर्णय घेतले म्हणून त्यांना जीवे मारल्याच्या बातम्या काही वर्षांपूर्वी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणातून यायच्या. त्या वेळी शाहू, फुले आंबेडकरांचे उठता बसता नाव घेऊन स्वतःला पुरोगामी वगैरे म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात असे काही घडू शकत नाही, असा दिलासा असायचा. पण गेल्या काही वर्षांत सामाजिक सुधारणेच्या वाटेवरून आपण वेगाने मध्ययुगाकडे धावत सुटलो आहोत.
त्यामुळेच की काय, एके काळी अशा बातम्यांनी हादरून जाणाऱ्या, पेटून उठणाऱ्या महाराष्ट्रात या घटनांकडे 'आणखी एक बातमी' अशाच पद्धतीने पाहिले जाते. या अमानुष कृत्यांमध्ये त्या जोडप्याचे आई, वडील, भाऊ, चुलते अशी कुटुंबातली माणसे ज्या क्रूरपणे सहभागी असतात, त्यावरून ही रक्ताची नाती प्रतिष्ठेपायी पाण्याहून पातळ कशी होऊ शकतात, असा हैराण करणारा प्रश्न पडतो.
ऑनर किलिंगच्या काही दर्दनाक कहाण्या..
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या परिचित युवकाच्या प्रेमात पडली होती. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांची समजूत काढली. इतकंच नाही तर संबंधित युवकाच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन त्याच्यावर मुलीशी संबंध तोडण्यासाठी दबाव आणला. तर मुलाच्या कुटुंबीयांनादेखील तशी ताकीद देण्यात आली. मात्र, त्यानंतर मुलगी घर सोडून गेली. कुटुंबीयांनी सर्वत्र तपास घेतला. मात्र, ती आढळून आली नाही.
घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली होती. तब्बल दहा ते पंधरा दिवसांनी ती घरी परतली. त्यावेळी तिची समजूत काढण्यासाठी तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज येथे तिच्या काकांकडे पाठवण्यात आलं. तिच्या चुलत भावाने तिला गोड बोलून खावडा डोंगरावर नेले. तिथं तिच्याशी बोलता-बोलता त्यानं तिला 200 फूट डोंगरावरून खाली ढकलून दिलं. सुरुवातीला मुलीनं आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी या घटनेसंदर्भात माहिती दिली असता हा खून असल्याचं निष्पन्न झालं.
दुसरी घटनाही छ.संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील गोयगावमधील आहे. किशोरी आणि अविनाश हे दोन तरुण एकाच महाविद्यालयात शिकायला होते. महाविद्यालयात असताना या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. मात्र किशोरीच्या कुटुंबीयांचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता. या नात्याला विरोध असण्यामागचं प्रमुख कारण हे सामाजिक प्रतिष्ठा किंवा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये असलेली तफावत हे होतं.
मोटे कुटुंबाच्या विरोधानंतरही किशोरी आणि अविनाश यांनी त्यांच्या नात्याला पुढे नेत आळंदीमध्ये जाऊन लग्न केलं.. लग्नानंतर अविनाश थोरे पत्नी किशोरीला घेऊन घरी आला. काही दिवसानंतर किशोरीची आई तिला भेटायला गेली. आईने मुलीची भेट घेतल्यानंतर पुन्हा आठवडाभरानं म्हणजे 5 डिसेंबर 2021 रोजी मुलीची आई शोभा आणि भाऊ संजय मोटे हे दोघं पुन्हा तिच्या सासरच्या घरी तिला भेटण्यासाठी आले.
संबंधित लेख वाचा: 1) प्रणय-अमृता ‘हॉरर किलिंग’ची घटना आठवतेय…? आज त्या नराधमांना अखेर फाशी झालीच! |
त्यांना पाणी वगैरे देऊन किशोरी चहा करत होत्या, त्याचवेळी शोभा आणि संजय म्हणजे आई आणि भावानं त्यांची निर्घृणपणे हत्या केली. धारदार शस्त्रानं संजय मोटे यांनी किशोरी यांच्या गळ्यावर सपासप वार केले आणि त्यांचं शीर धडापासून वेगळं केलं. या संपूर्ण प्रकारादरम्यान आई शोभा मोटे यांनी किशोरीचे पाय धरून ठेवले होते, असं पोलिसांनी प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे. धडावेगळं केलेलं शीर संजय मोटे यांनी बाहेर आणून त्याठिकाणी असलेल्या लोकांना दाखवलं आणि त्यानंतर ते शीर अंगणामध्ये ठेवून ते त्याठिकाणाहून निघून गेले.
ही आणखी एक ऑनर किलिंगची घटना... प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी पाच वर्षांनंतर जावई असलेल्या मुकेश शिरसाठ या 26 वर्ष तरुणाची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागात घडला. मुकेशच्या गर्भवती पत्नीवर म्हणजेच हल्ला करणाऱ्यांनी त्यांच्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहर हादरले होते. आपल्याच घरच्यांनी पतीचा खून केला त्यामुळे मुकेशची पत्नी आजही धक्क्यात आहे. 3 वर्षाचं मुल तिच्या पदरात आहे. शिवाय ती आता दुसऱ्या वेळी गर्भवती आहे. याचाही तिच्या घरच्यांनी विचार न करता मुकेशचा खून केला. 
वरील तिन्ही घटना या मन सुन्न करणाऱ्या आहेत... महाराष्ट्रामध्ये आळंदीसारख्या ठिकाणी प्रेमीयुगलांचे सुरक्षितपणे विवाह लावून दिले जातात. अनेक संस्था आहे ज्या प्रेमविवाह केलेल्यांना मदत करतात. सुरक्षा पोहचवतात. प्रेमीयुगलांसाठी सेफ होम देखील आपल्या महाराष्ट्रात आहेत. मग या अशा घटना का थांबत नाहीत? असे बरेच प्रश्न आहेत..
मुलांच्या आयुष्याचं स्टेअरिंग तुमच्या हातात कशाला?
‘अडीच अक्षरांची गोष्ट’ या पुस्तकाचे लेखक डॉ. प्रदीप आवटे ‘बाईमाणूस’शी बोलताना म्हणतात, "मुळात प्रेम ही संकल्पनाच आपल्याला अजून व्यवस्थित समजलेली नाही. आपल्याला असं वाटतं एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणज त्या माणसावर आपला मालकी हक्क गाजवणं असा होत नाही. तुमच्या मालकीचं एखादं कुत्र असू शकतं. किंवा तुमच्या मालकीचं एखादी गाय किंवा एखादा बैल असू शकतो तसं एखादा माणूस तुमच्या मालकीचा असू शकत नाही. आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रेम हे निरपेक्ष असावं निरपेक्ष या अर्थाने की तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती तुमच्या अपेक्षेसारखी नाही वागली तरी तुमच्या प्रेमाला धक्का बसता काम नये. तुम्ही समोरच्यावर निरपेक्ष प्रेम करावं. ज्याक्षणी ती व्यक्ती तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं वागते तेव्हा त्या व्यक्तीला प्रेमानं ते स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर प्रेमामध्ये चुकीला सुद्धा अवकाश आहे."
प्रदीप आवटे पुढे सांगतात,"आपल्याकडे होतं काय आई-वडिलांचं मुलावर प्रेम असतं. त्यांना काळजी असते म्हणून ते म्हणतात मी सांगेल त्याच मुलाशी तू लग्न केलं पाहिजे. तरच तू माझा आज्ञाधारक मुलगा किंवा मुलगी. तरच तुझं माझ्यावर प्रेम आहे, हे सिद्ध होतं. पालकांना हे मान्य होतंच नाही की त्यांची मुलं आता मोठी झालेली आहे. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून काही चुका ही होतील पण ते त्या मुलांचं आयुष्य आहे. मुलांच्या आयुष्याच्या गाडीचं स्टेरिंग किती दिवस आई-वडिलांनी त्यांच्या हातात ठेवावं? ते ठरवतील ना त्यांना कुठे जायचं आहे? कोणत्या दिशेने किती वेगानं जायचं आहे? असं असतांना आईवडील मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात हे चुकीचं आहे. मुलांना जन्म दिला म्हणून त्यांच्यावर कोणी उपकार करत नाही. ह्या निसर्गाच्या गोष्टी आहे त्या घडतात. यामध्ये उपकार वगैरे काही नसतं. मुलांनी आई-वडिलांचा आदर केला पाहिजे हे बरोबर आहे. मात्र, त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचा अवकाश आहे हे आई-वडिलांना समजणं गरजेचं आहे. जर सगळीच मुलं आई-वडील जसं म्हणतात तशी वागत गेली तर, या जगात बदलच घडणार नाही. जग पुढेच जाणार नाही. आपल्या सर्वांची मूलभूत चूक हीच आहे की, आपल्याला आपल्या मुलांवर खरं-खुरं प्रेम करता येत नाही. आपणमुलांना त्यांचे निर्णय घेऊ देत नाही आणि मग त्यात जात,मान-सन्मान प्रतिष्ठेच्या गोष्टी येतात आणि यामधून हे असे प्रकार घडतात जे मानवतेला आणि प्रेमाला लाजवणारे आहे."
"प्रेम करण्याचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क आहे.’’
याविषयी ‘राईट टू लव्ह - अनहद सोशल फाऊंडेशन’चे संचालक के.अभिजीत ‘बाईमाणूस’शी बोलताना म्हणाले, "प्रेम करण्याचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क आहे. जळगावच्या तृप्ती आणि अविनाश यांच्या प्रेमविवाहावरून झालेली ही क्रूर घटना म्हणजे ऑनर किलिंगच्या नावाखाली झालेला निर्घृण हिंसाचार आहे. प्रेमात जाती, धर्म, घराणं यांचं बंधन नसतं. मुलीच्या वडिलांनी रागाच्या भरात या जोडप्यांवर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणं हे भयानक आहे.. स्वतःच्या लेकीचं आयुष्य संपवणं आणि तिच्या जोडीदारावर प्राणघातक हल्ला करणं हे केवळ अमानवी आणि समाजात चुकीचे संकेत देणारं आहे.
कोणाच्याही आयुष्यावर असा हिंसक हक्क कोणीही गाजवू शकत नाही. आम्ही ‘राईट टू लव्ह’ कार्यकर्ते या भयंकर घटनेचा तीव्र निषेध करतो आणि समाजाला आवाहन करतो की प्रेमाला मान्यता द्या, मान राखा. प्रेमात आडवे येणाऱ्या अशा नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, तरच प्रेम करणाऱ्यांना मुक्तपणे जगण्याचं, स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल.
कायदा पुरेसा नाही, सामाजिक प्रबोधन अधिक ताकदीने करावे लागेल
आंतरजातीय विवाहामुळे होणारे ऑनर किलिंगचे प्रकार रोखण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने पावले उचलली आहेत. मात्र याला आळा घालणे केवळ कायद्याने किंवा गृह खात्याच्या आदेशानेच शक्य नाही. मतांचे राजकारण पुढे करून आखलेली सरकारी धोरणेही त्या रोखू शकणार नाहीत. त्यासाठी गरज आहे ती सामाजिक प्रबोधनाची, खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा फाडण्याची, ऑनर किलिंग रोखण्यासाठी खोट्या ‘ऑनर’ला ‘कील’ करावे लागेल.
हे काम पोलिसांच्या दंडुक्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ते अधिक प्रभावीपणे करू शकतात. त्यासाठी समाजप्रबोधनाशिवाय पर्याय नाही. हे काम राजकारण्यांपेक्षा सामाजिक कार्यकर्ते उत्तमरीत्या करू शकतील. शिवाय अशा घटना रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांना सरकारने संरक्षण द्यायला हवे. आंतरजातीय विवाह करणारी जोडपी आर्थिकदृष्ठ्या सक्षम होतील, असे कार्यक्रम आखायला हवेत.
जातीय मानसिकता कमी करणार्यांसाठी कल्याणकारी योजना सुरू करायला हव्यात. आंतरजातीय विवाहांबाबत सर्व स्तरावर प्रबोधन व्हायला हवे. याशिवाय पोलीस यंत्रणेनं यासंबंधीच्या तक्रारींची वेळीच दखल घेतली आणि कारवाई केली, तर अशा प्रकरणांना चाप बसू शकतो. हरियाणा राज्याने कायदा बनवून आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणांसाठी ‘प्रोटेक्शन होम’ तयार केले आहेत. इतकेच नाही तर या प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना केली आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेतली आणि हस्तक्षेप केला, तर ऑनर किलिंगला चाप बसू शकतो.
जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मांत समानता यावी, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सुरू करण्यात आली. आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास आर्थिक मदत देण्याची ही योजना आहे. बाबासाहेबांच्या नावाने नुसत्या योजना जाहीर होतात, पण त्यांच्या विचारांचे मात्र सोयीस्करपणे विस्मरण होते. 'जातिप्रथेचे निर्मूलन' या पुस्तकात बाबासाहेब आंतरजातीय विवाह आणि जातनिर्मूलनाबद्दल म्हणतात. 'जात मोडण्यासाठी आंतरजातीय विवाह खरा उपाय आहे.
जातीपासून सुटका करण्यास दुसऱ्या कशाचाच उपयोग होणार नाही. सहभोजने व आंतरजातीय विवाह यांच्यासाठी चळवळ करणे व ती आयोजित करणे हे कार्य कृत्रिम साधनांद्वारे जबरदस्तीने अन्न भरवण्यासारखे कार्य आहे.' म्हणूनच जातिभेद संपवण्याच्या पोकळ बाता मारून दुसरीकडे मुलींच्या आयुष्याच्या दोऱ्या हातात ठेवू पाहणाऱ्या व्यवस्थेने यापुढे हे पक्के ध्यानात ठेवावे की मुली म्हणजे त्यांची मालमत्ता नव्हे. त्यांना स्वतंत्रपणे जगू द्या, श्वास घेऊ द्या!






