(संजना खंडारे),
आज नेमका शनिवार असल्याने शनि शिंगणापूर मंदिरात एकीकडे भाविकांची प्रचंड गर्दी झाली असतानाच दुसऱ्या बाजूला पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणात दिसत होता. मंदिर परिसरात मोठे स्टेज उभारण्याचे काम सुरू झाले होते आणि दर दहा मिनिटांनी तेथे लावण्यात आलेल्या भोंग्यावरून सतत एकच घोषणा केली जात होती…’’हिंदूंच्या मंदिरात मुसलमान कर्मचारी कशाला..? या लांXXना इथून मंदिरातून कायमचे हाकलून लावा. आज सांयकाळच्या सकल हिंदू समाजाच्या मोर्च्यात तुम्ही मोठ्या संख्येने सगळ्यांनी सहभागी व्हा…’’
शनि शिंगणापूर मंदिर परिसरातला तणाव आज खूप वाढला होता आणि त्याला कारण होतं सकल हिंदू समाजाच्या आक्रमक भूमिकेपुढे शनि शिंगणापूर देवस्थानने नमते घेऊन देवस्थानातील 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे.
धर्मस्थळं म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून ती सार्वजनिक ठिकाणे आहेत, जिथे कोणत्याही धर्माची व्यक्ती सेवा देऊ शकते, हे भारताच्या घटनेने मान्य केले आहे. कोणत्याही धर्मीय व्यक्तीवर केवळ त्यांच्या धर्मावरून नोकरीवरून काढून टाकणे हे स्पष्टपणे भारतीय संविधानातील कलम १४ (समानतेचा अधिकार) आणि कलम 16 (समान संधीचा अधिकार) यांचा उल्लंघन आहे. असे असतानाही सकल हिंदू समाजाच्या आक्रमक भूमिकेपुढे शनि शिंगणापूर देवस्थानने नमते घेतले असून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
‘’मशिदींमध्ये हिंदू कर्मचारी नसेल तर मग मंदिरात कशाला हवेत’’
मशिदींच्या व्यवस्थापनात हिंदू कर्मचारी काम करू शकत नसेल तर शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लीम कर्मचारी कशासाठी हवेत, असा सवाल सकल हिंदू समाजाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून केला जात होता. मंदिरातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकताना देवस्थान ट्रस्टने मात्र 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकताना धर्म नव्हे तर अनियमितता आणि शिस्तीचे पालन न केल्याच्या कारणावरून काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. श्री क्षेत्र शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने तिथे काम करणाऱ्या एकूण 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
फोटो : अभिजित तांगडे
देवस्थान ट्रस्टने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून का काढले?
“मंदिर ट्रस्टमध्ये एकूण 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात. परंतु मंदिर परिसरात एकही मुस्लिम कर्मचारी ड्युटीवर नसतो” “हे मुस्लिम कर्मचारी मंदिर ट्रस्टच्या कृषी विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षण विभागात काम करतात” असं ट्रस्टचं म्हणणं होतं. 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांपैकी 99 कर्मचारी मागच्या पाच महिन्यांपासून कामावर येत नाहीयत. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थकवलेले आहेत, असंही ट्रस्टकडून सांगण्यात आलं होतं.
मुस्लिम वस्तीत भयाण शांतता…
मात्र या सगळ्या गोंधळात कामावरून काढून टाकण्यात आलेले मुस्लिम कर्मचारी मात्र कुठेच दिसत नव्हते आणि त्यांचा ठावठिकाणाही कोणी सांगायला तयार नव्हतं. देवस्थानात काम करणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांची माहती घेण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात पोहचल्यानंतर कार्यालयाला भलं मोठं टाळं लावण्यात आलं होतं. शनि शिंगणापूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या सोनई गावात काही मुस्लिम कर्मचारी राहतात अशी कशीतरी माहती मिळाल्यानंतर ‘बाईमाणूस’ची टीम त्या गावात दाखल झाली. वस्तीतले सगळेच घाबरलेल्या अवस्थेत दिसत होते. मीडियाशी बोलायला कोणीही तयार नव्हतं.
‘’कित्येक वर्षांपासून काम करतोय, मग आता कुणाचा दबाव आहे’’
खुप प्रयत्न केल्यावर नाव न छापण्याच्या अटीवर एका मुस्लिम युवकाने प्रतिक्रया दिली. ‘’शनि शिंगणापूर देवस्थानामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. अचानकपणे कुठल्यातरी संघटनेच्या दबावापुढे अशी नोकरी हिरावून घेतली तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल’’, असे शनि शिंगणापूर मंदिरात कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका मुस्लिम युवकाने ‘बाईमाणूस’ बोलताना सांगितले. ‘’हा अतिशय चुकीचा निर्णय आहे, माझ्यासारखे सगळी गरीब लोकं काम करत होते. आम्ही मंदिराच्या आत कधीच काम करत नव्हतो. इथली गोशाळा, बगीचा, कृषि केंद्र, कचरा व्यवस्थापन अशा मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आम्ही काम करत होतो. आता आमची उपासमार कोण दूर करणार, असा सवाल या मुस्लिम कर्मचाऱ्याने विचारला आहे.
फोटो : अभिजित तांगडे
भाविक आणि दुकानदार काय म्हणतात?
शनि शिंगणापूरच्या दर्शनासाठी आष्टी तालुक्यातून काही भाविक आले होते. त्यापैकी एकाने सांगितले की ‘’इथे आम्ही तिघेजण आलो आहोत आणि त्यापैकी एक आहे शेर अली जमादार शेख… 2004 पासून हा आमचा मुस्लिम मित्रच आम्हाला दरवर्षी इथे दर्शनाला घेऊन येत असतो. आमच्या मैत्रीत कधीच हिंदू-मु्स्लिम वाद झाला नाही. इथे येणाऱ्या भाविकांना देवस्थानात हिंदू काम करतो की मुस्लिम याने काहीच फरक पडत नाही, पोट भरण्यासाठी लोकं इथे काम करतात.’’
शनि शिंगणापूर येथील अनेक दुकानदार हिंदू सकल समाजाच्या या निर्णयाचे समर्थन करताना दिसले. शनि शिंगणापूर येथे रामभाऊ मुळे यांचे पूजेच्या सामानाचे दुकान आहे. देवस्थान ट्रस्टने मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयाचे मुळे यांनी स्वागत केले. ‘बाईमाणूस’शी बोलताना ते म्हणाले की, "शनि शिंगणापूर गावातील लोकसंख्या 3000 च्या घरात आहे आणि त्यात एकही मुस्लिम व्यक्ती नाही. मंदिरात जे मुस्लिम कर्मचारी काम करतात ते सगळे बाहेरच्या गावातील आहेत त्यामुळे आमच्या मंदिरामध्ये मुस्लिम लोकांनी का काम करावे? हा जो मोर्चा वगैरे सुरू आहे ते बरोबरच आहे. उलट त्यांनी हे आधीच हे करायला हवं होतं.. आमच्या सगळ्या गावकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे.."
वाद कधीपासून सुरू झाला?
या वादाची सुरूवात शनि देवाच्या चौथऱ्यावरून झाली होती. गेल्या महिन्यात चौथऱ्याच्या भोवती लोखंडी जाळ्या आणि रंगरंगोटीचे काम मुस्लिम लोकांकडून करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यावेळी आंदोलन करण्यात आले होते आणि शनि शिंगणापूर मंदिरातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना त्वरित काढून टाका अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा त्यांनी देवस्थान ट्रस्टला दिला होता. आता देवस्थान ट्रस्टने मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय दरी घेतला अशला तरी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आज सायंकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने शनि शिंगणापूर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला.
मे महिन्यापासून हा मुद्दा पेटला होता. शनिशिंगणापूरमधील शनीचौथऱ्याचे रंगरंगोटीचे काम करणाऱ्या काही मुस्लिम कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. हिंदूंच्या मंदिरात मुस्लिम कर्मचारी कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महाराष्ट्र मंदिर महासंघाने यावर आक्रमक भूमिका घेत त्या कर्मचाऱ्यांना हटविण्याची मागणी केली. त्यानंतर सकल हिंदू समाजातर्फे 14 जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, नगरचे आमदार संग्राम जगताप हेही यामध्ये सहभागी होते. त्याआधीच देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला.
याबाबत माहिती देताना आचार्य तुषार भोसले म्हणाले, शनी शिंगणापूर देवस्थानात मुस्लीम कर्मचारी नियुक्त केल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. पण या मोर्च्याचा दबाव इतका वाढला कि या मंदिर विश्वस्तांना झुकावे लागले.. हिंदू समाजाच्या एकजूटीचा हा विजय आहे. राज्यातील इतर देवस्थानांना आग्रह करतो की अशा पद्धतीने हिंदू देवस्थानांमध्ये अन्य धर्मियांचे लाड खपवून घेतले जाणार नाहीत.
आचार्य तुषार भोसले
धर्मादाय देवस्थानाला असे करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का?
या प्रकरणावर आक्षेप घेताना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी म्हणतात की, याविषयी गांभीर्याने प्रतिक्रिया नोंदवायला हवी...नोंदणी असलेले धर्मादाय देवस्थान असे कसे करू शकते याबाबत कायदेशीर व सार्वजनिक विचारणा व्हायला हवी... अन्यथा खूप वाईट पायंडा पडेल. उद्या हिंदू मालक असलेल्या कंपनी संस्था आणि आस्थापनातून काढून टाकण्याची मागणी होईल.. हे समाज म्हणून अत्यंत घातक आहे...अहिल्यानगर सारख्या एकेकाळी डाव्या चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात मढी मधील प्रकारानंतर असे घडणे चिंताजनक आहे...राज्यभरात हा अन्याय विषय गांभीर्याने घ्यायला हवा. शनी शिंगणापूर ला नियमित जाणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आता यावर बोलायला हवे...ही एका फॅसिझम लक्षणाची सुरुवात आहे.. धार्मिक ठिकाणे सार्वजनिक संस्थाच असतात, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या या संस्थांमध्ये धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी अधिक महत्त्वाची असते. एखाद्या धर्माचा मालकी हक्क सांगत, इतर धर्मीय लोकांना तेथून काढून टाकणे, ही फॅसिस्ट मानसिकतेची सुरुवात आहे, हे गांभीर्य ओळखायला हवे.
जितेंद्र आव्हाड
शनि शिंगणापूर देवस्थानने घेतलेल्या निर्णयावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शनिशिंगणापूरला जे घडले आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारे आहे. असले प्रकार थांबवले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे हे थांबवा. सरकारने त्वरित यांना कामावरती घेण्याचे आदेश द्यावेत. धर्माच्या नावावरून कामावरून काढणे चुकीचे आहे. सरकारने डोळे उघडे ठेवून कारवाई करावी.”






