- विनीता परमार
मेघालय, भारताच्या ईशान्य भागात वसलेलं असे राज्य… जिथे मेघ जमिनीला स्पर्श करतात आणि पाऊस एखाद्या संगीतासारखा बरसतो. शिलाॅंग शहर या राज्याची राजधानी, प्रत्येक प्रवाशाच्या स्वप्नांच्या सुरुवातीचा बिंदू आहे.
पण खरी जादू तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही शहराची चमकधमक मागे सोडून पूर्व खासी डोंगरांच्या अंतरंगात जाण्यास निघता.माझा हा प्रवास असाच एका गावाच्या दिशेने सुरु होता. काँगथोंग, ज्याला लोक “शिट्टीवालं गाव” म्हणतात. हे नावच इतकं रहस्यमयी होतं की मन अपार उत्साह आणि कुतूहलानं भरून गेलं.
शिलाॅंगची सकाळ आणि काँगथोंगचा प्रवास
शिलाॅंगमधली सकाळ एखाद्या कवीकल्पनेपेक्षा कमी सुंदर नव्हती. धुक्यात हरवलेले रस्ते, पाइनच्या झाडांवरून ठिबकणारे दवबिंदू आणि चहाच्या टपरींमधून येणारा वाफांचा घमघमाट, हे सगळं माझ्या हॉटेलच्या खिडकीतून दिसत होतं. सकाळी सात वाजता मी माझ्या गाडीचा चालक खरबुदान याच्यासोबत काँगथोंगकडे निघाले.रस्त्यावर गजबज कमी होती, पण पक्ष्यांचा किलबिलाट, धुक्यात घुमणाऱ्या घंटा आणि दूरवरुन ऐकू येणारा चर्चमधील प्रार्थनेचा ध्वनी या प्रवासाची ही एक आत्मीय सुरुवात होती.
खरबुदानने जेव्हा गाडी मुख्य रस्त्यावर वळवली, तेव्हा शिलाॅंग मागे पडत गेले आणि समोर हिरवेगार डोंगर खुलत गेले. रस्ता पक्का,थोडा अरुंद,वळणावळणाचा पण अप्रतिम होता. प्रत्येक वळण एक नवीन दृश्य घेऊन येत होते,कधी खोऱ्यांमध्ये खोलवर दिसणारी गावे, कधी ढगांमध्ये लपलेली पाइनची झाडे, तर कधी दुरून वाहणाऱ्या झऱ्यांचा मंद आवाज. पायर्यांसारख्या शेतांमधील बटाट्याच्या फुलांनी थांबायला भाग पाडले.
पांढरी, गुलाबी आणि हलकी नारंगी रंगाची फुले आणि आजूबाजूला पाइनची झाडे,काश्मीरसारखेच चित्र दिसत होते.
जसजसे आम्ही चेरापूंजीकडे निघालो, तसतसे पावसाचे थेंब हळूहळू गाडीच्या खिडक्यांवर आदळू लागले. खरबुदानने सांगितले की इथे पाऊस एक कथा सांगायला येतो. आणि खरंच, त्या थेंबांच्या आवाजात एखाद्या अनोख्या लोकगीताचा गोडवा होता. रस्त्यात एका ठिकाणी चहासाठी थांबलो. तिथल्या दुकानात एका खासी महिलेने काळा चहा दिला,तेव्हा चकाकणाऱ्या भांड्यांनी क्षणभर मला थांबवले.
आम्ही अनेक छोटी गावे पार केली. साधे घर, झाडू (Broom Grass) आणि बटाट्याची शेतं त्यांचा संघर्ष कथन करत होती. माझे डोळे गुरे-ढोरे शोधत होती, पण रस्त्यांवर गायी वगैरे दिसल्या नाहीत. या गावातल्या लोकांना पर्यटकांची सवय नाही,तरीही प्रत्येकजण हसतमुखाने स्वागत करीत होता. मुलांच्या डोळ्यांत कुतूहल आणि वृद्धांच्या डोळ्यांत आपुलकी होती.
काँगथोंगच्या जवळ सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर जेव्हा आम्ही मुख्य रस्त्यापासून एका अरुंद रस्त्यावर खाली उतरू लागलो, तेव्हा खरबुदान हसत म्हणाला, “आता खरा मेघालय सुरू होतो.” हा रस्ता आधी माती आणि दगडांचा होता, दोन्ही बाजूंना दाट जंगल होते.
आता खासदार राकेश सिन्हा यांनी हे गाव दत्तक घेतल्यामुळे प्रवाशांना हा रस्ता मिळाला आहे. रस्त्याच्या एका बाजूला नुकतेच कापलेले भुंडे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, ठिकठिकाणी लिहिलेले “लँडस्लाइड एरिया” चे फलक, भीती आणि रोमांच दोन्ही निर्माण करत होते.
आम्ही सुमारे 1200 मीटर खाली उतरत होतो, रस्त्यावर दुसरी कोणतेही चारचाकी वाहन नव्हते. गावात पोहोचण्यासाठी मन अतिशय उताविळ झाले होते.
जेव्हा आम्ही काँगथोंगच्या जवळ पोहोचलो, तेव्हा हवेत एक वेगळ्याच प्रकारचा आवाज जाणवला. आम्ही ‘काँगथोंग’ लिहिलेल्या गेटजवळ पोहोचलो जणू एका स्वप्नलोकातच होतो. मुले बागडत होती, आणि एका सायकल चालवणाऱ्या मुलाला मी थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्याकडे कोणतेही शब्द नव्हते, ना संगीत, ना आवाज…ती एक शिट्टी होती. मधुर, लयबद्ध आणि काहीतरी सांगणारी. मी अक्षरशः थक्क झाले.
“जिंगरबाई”... प्रेमाने बोलावणारी धून
काँगथोंग एखाद्या जादुई लोकासारखे दिसते. डोंगराच्या उतारांवर वसलेली बांबू आणि लाकडाची छोटी-छोटी घरे, सभोवताली हिरवळ आणि मधून जाणारा विटांचा रस्ता. गावाच्या मध्यभागी एक छोटेसा चौक होता, जिथे काही मुले खेळत होती. तेवढ्यात एक मूल धावत आले आणि शिट्टी वाजवून त्याने कोणाला तरी बोलावले. मग दुरून एका महिलेने तशीच सूरात शिट्टी वाजवून त्याला उत्तर दिले. मी खरबुदानकडे पाहिले, मग त्याने हसत समजावले,“इथे प्रत्येक व्यक्तीचे नाव एक सूर आहे.”
काँगथोंगमध्ये लोक एकमेकांना बोलावण्यासाठी शिट्टी वाजवतात. या आगळ्यावेगळ्या परंपरेला “जिंगरबाई” म्हणतात, ज्याचा अर्थ “प्रेमाने बोलावणारी धून”. हे नाव एक आई आपल्या मुलाला जन्माच्या वेळी देते... फक्त त्याचे पारंपरिक नावच नाही, तर एक वैयक्तिक ध्वनी, एक संगीताची रचना जी फक्त त्याचीच असते. या गावात नऊशे लोकांचे असे वेगवेगळे सूर आहेत.
संबंधित लेख वाचा: 1) सोंग्या… प्रथा, परंपरा, अभिमान! |
‘’शिट्टी ही आमच्या भावनांची अभिव्यक्ती आहे’’
ज्या कुटुंबाने मला राहायला जागा दिली, ते अगदी एखाद्या लोककथेतील कुटुंबासारखे होते. साधे, प्रेमळ आणि आपुलकीने तुडूंबलेले. बांबू आणि लाकडांपासून बनलेल्या त्यांच्या घरात प्रवेश करताच एक प्रकारची उब जाणवली, जणू या अनोळखी भूमीने मला मिठीत घेतले. त्यांची मुलगी लिडिया, एक लाजरी पण उत्सुक मुलगी होती. तिने माझ्यासाठी पाणी आणले, मग हळूहळू माझ्याशी ती बोलू लागली. जेव्हा मी तिला “जिंगरवाई लॉबी” शिट्टीशी संबंधित नावांबद्दल विचारले, तेव्हा तिचे डोळे चमकले.
ती मला पटकन बाहेर घेऊन गेली आणि ओठाने एक मधुर, लयबद्ध शिट्टी वाजवली. “हे माझे नाव आहे,” ती हसत म्हणाली. “तुम्हाला ऐकून विचित्र वाटेल, पण आमच्यासाठी ही आमची ओळख आहे.” मग ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, “पण ही फक्त ओळख नाही. ही आमच्या भावनांची अभिव्यक्ती आहे. मी रागावलेली असते तेव्हा माझी शिट्टी तीव्र आणि तिखट होते. दु:खी असते तेव्हा मंद आणि जड. जसा आईचा आवाज मुलाच्या मूडनुसार बदलतो, तशीच आमची शिट्टी आमच्या मनःस्थितीची भाषा आहे.”
एकदा का एखादी व्यक्ती मृत झाली की त्याची शिट्टीही मृत होते…
थोड्या वेळाने गावातील काही वृद्धांशी भेट झाली. एका वृद्ध व्यक्तीने...ज्यांचे पांढरे केस आणि सुरकुत्यांनी मढलेला चेहरा एखाद्या पहाडी ग्रंथासारखा होता...त्यांनी सांगितले की जेव्हा ते जंगलात जातात, तेव्हा साथीदाराला बोलावण्यासाठी शिट्टीचाच वापर करतात.
“ माणसांच्या शब्दांनी,बोलण्या-ओरडण्याने प्राणी दचकतात, घाबरतात. पण शिट्टी... ती पक्षांसारखी असते. जंगलाला ही शीळ परिचीत आहे. ”लोकांनी सांगितले की जवळून बोलावण्याची शीळ छोटीशी असते,पण शेतात किंवा दूर गेल्यावर ही शीळ दीर्घ असते.’’
मी थक्क झाले... ही फक्त संवादाची रीत,पद्धत वा तर्हा नव्हती, तर ही एक जिवंत संस्कृती होती! मग त्यांनी हळू आवाजात आणखी एक रहस्य सांगितले, “जेव्हा इथे कोणी मरतो, तेव्हा त्याची शिट्टी, शीळ...त्याचे नाव... त्याच्यासोबतच जाते. नंतर इतर कुणीही ती शिट्टी पुन्हा वाजवत नाही. ती लय त्या व्यक्तीची स्मृती बनते. काहीही नाही राहिले,तरी तो विशिष्ट सूर आम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव देतो.” शब्द गळ्यात अडकले.
या परंपरेत किती सखोलता,सघनता आहे... जिथे एक धून ओळख, भाव, स्मृती आणि सन्मान... सर्वकाही बनते. थोड्या वेळाने चहा आला. लाकडी फळीवर बसून मी काळा चहा आणि कच्च्या सुपारीच्या पानाचा स्वाद घेतला... तो स्वाद कोणत्याही पंचतारांकीत हॉटेलच्या ताटात मिळू शकत नाही.त्यात मातीचा स्वाद, आणि अतिथींबद्दलचे निःस्वार्थ प्रेम मिसळले होते.
तिथे बसलेल्या शिदाप खांगशित नावाच्या महिलेने, जिच्या चेहऱ्यावर अनुभवांची चमक होती,हसत हसत सांगितले, “मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात गेलेली होती, आमची परंपरा दाखवायला.” तिच्या डोळ्यांत अभिमान चमकत होता आणि चेहऱ्यावर त्या गावाची प्रतिमा होती,ज्याने आता स्वतःला बाह्य जगाशी जोडले आहे, तरीही आपली अस्सलता गमावलेली नाही.
या दरम्यान गावातील काही लोकांशी बोलताना कळले की काँगथोंगला आता विशेष दर्जा मिळाला आहे, “शिट्टीवाले गाव” म्हणून. हे खासी संस्कृतीचे जिवंत प्रतीक बनले आहे, जिथे पर्यटक येत आहेत….मोठमोठ्या गाड्या, हातात कॅमेरे, मोबाइल आणि असंख्य प्रश्न घेऊन!
ते लोक येतात आणि विचारतात: “तुम्ही कसे बोलता?” “तुमच्याकडे मोबाइल नाही का?”
“कोणते तरी गाणे ऐकवा ना, शिट्टीवाले!”
गावातील महिला आधी संकोचाने हसतात, मग हळूच त्यांची शिट्टी वाजवतात. जणू कोणी आपला गुप्त खजिनाच एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे सुपूर्द करत आहे! त्यांच्यासाठी हे केवळ मनोरंजन नाही,तर जीवनातला गूढ, रहस्यमय भाग आहे.त्या थोड्या मागे सरकतात, जणू त्यांनी आपल्या आत्म्याचा एक हिस्सा दाखवला आहे, जो त्या वाईट नजरांपासून वाचवू इच्छितात.
त्या क्षणी मला कळले की हे गाव फक्त ‘अनोखे’ नाही, तर संवेदनशीलही आहे. हे फक्त संस्कृतीचे जतन करत नाही, तर तिला बाह्य दृष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्नही करत आहे. ती दृष्टी जी पाहते, पण कदाचित ऐकू शकत नाही. काँगथोंगच्या महिला, मुले आणि वृद्ध... सर्वजण अशा परंपरेत जगत आहेत जिथे मौनही संवाद करते, आणि संवादही मौन होऊ शकतो.
निरोपाची शीळ
जेव्हा निघण्याची वेळ आली, तेव्हा माझ्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. लिडियाची आई शिदाप खांगशित यांच्याकडे मी माझ्या नावासाठीही एक शीळ,शिट्टी बनवण्याची विनंती केली,तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, “मी तुम्हाला जन्म दिलेला नाही, किंवा तुमच्याशी नात्याची नाळ जुळलेली नाही.”
मग त्यांनी निरोपासाठी माझ्यासाठी एक शीळ वाजवली, आणि मी थांबून ती रेकॉर्ड केली.त्या हसत म्हणाल्या, “आता जेव्हा आठवण येईल तेव्हा ऐकून घ्या.”
गाडी जशी गावातून बाहेर पडली,तशी त्या खोऱ्यामध्ये ती शिट्टी हळूहळू निनादत राहिली, जणू काही एक सूर माझ्यासोबत चालत होता!
काँगथोंग हे फक्त भौगोलिक स्थान नाही, तर एक जिवंत, सळसळती अनुभूती आहे... असे ठिकाण जिथे निसर्ग, संस्कृती आणि आत्मा यांच्यामध्ये कुठलीही भिंत नाही. हे त्या विश्वाची आठवण करून देते, जिथे भाषा फक्त शब्दांतच नाही, तर सुरांमधून वाहते; जिथे प्रत्येक संवादात भावनेचा ध्वनी असतो,आणि प्रत्येक मौनामागे एक गीत दडलेले असते.
शिलॉंगहून काँगथोंगचा हा प्रवास, जो नकाशावर फक्त ६० किलोमीटर लांबीचा दिसतो, पण खरेतर तो एक काळीज प्रवास होता... आत्म्याच्या त्या भागापर्यंत, जिथल्या अजूनही काही सूरावटी ऐकायच्या राहून गेल्यात.हे अफाट अंतर फक्त डोंगर, खोरे आणि रस्त्यांमधले नाही, हे दोन जीवनदृष्टींमधले अंतर आहे—त्या आधुनिक शहरी जीवनापासून जे वेगवान, अधिक वेगवान आणि सर्वात वेगवान होण्याच्या शर्यतीत सर्व काही विसरत चालले आहे; भाषेचे सौंदर्य, मौनाची प्रतिष्ठा आणि ध्वनीची आत्मीयता.
काँगथोंगमध्ये वेळ थांबत,थबकत नाही, तर तो अल्लदपणे आपल्यासोबत चालायला लागतो. इथे घड्याळांची टिकटिक ऐकू येणार नाही, पण हृदयाची धडधड आणि धरित्रीचा श्वास ऐकता येऊ शकतो. आणि कदाचित याच कारणामुळे जेव्हा कोणी प्रवासी या गावातून परततो,तेव्हा त्याच्या आत काहीतरी बदल घडतो...एक नवीन संवेदना जागी होते,एक विसरलेली शिट्टी,शीळ आठवते,आणि मन पुन्हा पुन्हा पूर्वोत्तरातील त्या गावाकडे धाव घेऊ लागते, जिथे मानवी जीवन अजूनही सुरेल सुरांमध्ये वाहते!
(मराठी अनुवाद : भरत यादव)






