- हेरंब कुलकर्णी
‘बालविवाह’ या दाहक समस्येचे वास्तव मांडणारे माझे पुस्तक नुकतेच मधुश्री पब्लिकेशनकडून प्रकाशित झाले. मी गेली अनेक वर्षे या प्रश्नावर लिहितो आहे व काम करतो आहे..अनेकाना बालविवाह हा मागच्या शतकातला विषय वाटतो पण आजही महाराष्ट्रात 22 टक्के विवाह हे बालविवाह असतात म्हणजेचार लग्नातील एक लग्न हे बालविवाह आहे...मराठीत या विषयावर स्वतंत्र्य पुस्तक माझ्या बघण्यात नव्हते. त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि वास्तव असे दोन्हीही या पुस्तकात मी मांडले.
जगातील बालविवाह,भारतातील बालविवाह अशी आकडेवारी मांडली. या अभ्यासासाठी मी राजस्थान, बिहार आणि तेलंगणा या राज्यात फिरलो. राजस्थानातील अनेक जिल्ह्यात फिरून तिथले वास्तव अभ्यासले. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात फिरून मुलाखती घेतल्या, कार्यकर्ते अधिकारी गावकरी यांना भेटून तेथील वस्तुस्थिती मांडली. आसाम, पश्चिम बंगाल येथील वस्तुस्थिती मांडली आहे.
त्याचबरोबर बालविवाह कारणे, इतिहास, बालविवाह आणि शिक्षण यावरही सविस्तर लिहिले आहे. बालविवाहाचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ही मांडून बालविवाह थांबवण्यासाठी काय करायला हवे ? हे मांडून यात काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ही दिला आहे.. या विषयावर जागरूकता निर्माण व्हावी या भावनेने हे पुस्तक लिहिले आहे. मधुश्री पब्लिकेशन कडे व अमेझॉन वर पुस्तक उपलब्ध आहे..
‘’जेव्हा मी पहिला बालविवाह थांबवला तेव्हा…’’
बालविवाह हा विषय मी शिक्षक झाल्यावर माझ्या समोर आला... त्यातून या प्रश्नाची भीषणता माझ्या समोर आली.. तेव्हा एक विवाह मी थांबवला होता.. साल होते 2003. मी आजच्या इतका धाडशी नव्हतो. माझ्या वर्गातील एक विद्यार्थिनी 3/4 दिवस गैरहजर होती.मुलीनी सांगितले सर तिचे लग्न आहे रविवारी. 6वी च्या वर्गातील मुलगी आणि तिचे लग्न. वय फक्त 12 वर्षांचे. मी अस्वस्थ झालो पण धाडस काहीच नव्हते..पण प्रत्येक विषयावर फक्त हळहळ व्यक्त करायची नाही.. कृती करायची हा स्वभाव पहिल्यापासून माझा आहे...खूप विचार केला. पोस्टात गेलो. 3 पोस्ट कार्ड विकत आणली. गावचे सरपंच,पोलिस निरीक्षक, तहसीलदार यांना मी पत्र लिहिले... मुलीचे नाव पत्ता लिहिला...
पुढील आठवड्यात त्या मुलीची आई मुलीला शाळेत घेऊन आली..चेहरा उतरलेला. गरीब कुटुंबातील ती महिला.. मी साळसूदपणे विचारले " अहो, हिचे लग्न होते ना..?"
ती बाई म्हणाली : अहो,सगळी तयारी झाली होती पण, कुणीतरी मूडद्याने तक्रार केली आणि लग्न थांबले " मी मनात म्हणालो ....की बाई कसे सांगू..? तो मुडदा तुमच्यासमोर उभा आहे....
भारतात आजही 47 टक्के, तर महाराष्ट्रात 26 टक्के बालविवाहाचे प्रमाण
महाराष्ट्र हे 'पुरोगामी' राज्य असल्याने जणू इथे बालविवाह नसतीलच, असाच सार्वत्रिक समज आहे. या समजामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण आणि बालविवाहाच्या प्रश्नाची दाहकता किती आहे. याची चर्चा कोणीच करत नाही. यामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचा प्रश्न जणू संपला आहे, असे सर्वसाधारण समजले जाते. पण भारतात आजही 47 टक्के, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 26 टक्के इतके आहे, हे लक्षात घेतल्यावर धक्काच बसतो. बालविवाह थांबणे हे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व आरोग्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण बालविवाह होणाऱ्या मुलीचे वय केवळ 12 ते 17 वर्षाचे म्हणजे सातवी ते बारावी मध्ये शिकण्याचे असते.
या मुलींचे लग्न झाले की या मुली शिक्षणातून गळती होतात व इतक्या मोठ्या संख्येने मुली गळती होत असतील तर शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण यशस्वी होणार नाही.
संबंधित लेख वाचा: 1) 12 बालविवाह रोखणाऱ्या वर्गमित्र-मैत्रिणींची ही कहाणी |
शासन 'सर्वांसाठी आरोग्य' ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ज्या मुलीचा बालविवाह होतो. ती मुलगी माता झाल्यावर रक्तस्राव खूप होतो मुलीचे शरीर बाळंतपणासाठी पक्वं झालेले नसते. शरीरांतर्गत असलेले अवयव पक्व न झाल्याने मातेच्या मृत्यूचा धोका उद्भवतो. या बालवधू गर्भवती राहिल्यास त्या अॅनिमिक असतात आणि त्यामुळे अधिकच अशक्त बनतात. अशा बालिकांचे वारंवार गर्भपातही होतात.
बालविवाह आणि प्रसूती…
युनिसेफच्या प्रतिनिधी कारीन हौल्शीफ यांच्या मते... वयाच्या 20 वर्षांच्या आत प्रसूती झाल्यास माता मृत्यूचा धोका पाच पटीने वाढतो. मातेच्या शिक्षणाचाही अर्भकमृत्यू व बालमृत्यूंवर परिणाम होतो. शिकलेली माता स्वत:ची व बालकाची योग्य ती काळजी घेऊ शकते. त्यामुळे लग्नापूर्वी प्रत्येक मुलीचे पुरेसे शिक्षण होणे गरजेचे आहे, हा केवळ शैक्षणिक मुद्दा नाही, तर त्या मुलीच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याशी आणि जीवनमरणाशी जोडलेला आहे. माता मृत्यू होण्याचे प्रमाण या मातांच्या बाबत जास्त असते. ही मुले कुपोषित व कमी वजनाची होतात. यातून या मुलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न तयार होतात. बालविवाहानंतर बालमाता ज्या मुलांना जन्म देते ती संततीही सुदृढ नसते, असेही आढळले आहे.
अर्भकमृत्यूचा दर व पाच वर्षांच्या आतील बालकांच्या मृत्यूचा दर भारतात अजूनही चिंताजनक असाच आहे. त्याच्या कारणांचा जो अभ्यास झाला. त्यात अनेक कारणांपैकी महत्त्वाचे कारण हे त्या बालकांची माता ही अल्पवयीन असणे हेच आहे. तिच्याच शरीराची वाढ पुरेशी न झाल्याने बालके सशक्त नसतात. गर्भपात होणे, कमी वजनाची मुले, अॅनिमिया, अर्भकमृत्यू व मातामृत्यू ही जणू बालविवाहाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणावी. इतपत अनेक सर्वेक्षण यातील सहसंबंध स्पष्ट करतात.
जी मुलं जन्माला येतात त्यांना 'राष्ट्राची संपत्ती' म्हटले जाते, परंतु ही संपत्ती राष्ट्राला संपन्न करणारी नाही, तर कुपोषित आहे. कुपोषणाचे राष्ट्रीय प्रमाण 42 टक्के आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग त्याला 'नॅशनल शेम' म्हणाले होते. कुपोषणातील मुलांच्या मातेच्या वयाचा तपशील जेव्हा अभ्यासला जातो. तेव्हा त्या माता बहुसंख्येने बालमाताच आढळतात. आदिवासी भागातले बालविवाह व कुपोषण हा तर सहसंबंध स्पष्टच दिसतो. 'युनिसेफ'च्या अभ्यासात जगातल्या अर्भकमृत्यूचा दर वयाच्या 20 पेक्षा कमी वयात गर्भधारणा होणाऱ्या मातांमध्ये 50 टक्क्यांनी जास्त आढळला. इतक्या लहान वयात लग्न आणि बंधने लादली गेलेली ही मुलगी स्वतःचे कोणतेच करिअर करू शकत नाही.
उलट सतत भीती खाली राहते व तिच्यात सतत न्यूनगंड राहतो त्यामुळे स्त्री सक्षमीकरणाचे उद्दिष्टही साध्य होत नाही. इतका हा गंभीर व महत्त्वपूर्ण विषय असताना बालविवाह कायद्याने ज्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित केली ते दाखल व बेफिकीर आहेत ते त्यांची जबाबदारी निभावत नाहीत. गावातील राजकारणी या प्रश्नावर गंभीर नाहीत उलट सामील आहेत. अशा स्थितीत त्या गावातील संवेदनशील तरुणांना आक्रमक करणे व विचारी वर्गाने शासनावर दडपण निर्माण करणे इतकेच फक्त आपल्या हातात आहे.
लोकसंख्यावाढीची जी अनेक कारणे आहेत. त्यात बाळंतपणाचे वय किती लांबते किंवा लवकर येते. याचा परिणाम तपासला जातो. ज्या प्रमाणात बाळंतपण पुढे ढकलले जाते. त्या प्रमाणात पुढची पिढी पुन्हा जननक्षम होण्याचा कालावधीही लांबला जातो. पाश्चात्त्य देशांत व आपल्याही उच्चभू वर्गात मुलींमध्ये नोकरी, करिअर करण्यामुळे लग्नच उशिरा करण्याचे वय लांबते आहे. त्याचा चांगला परिणाम लोकसंख्या नियंत्रणावर होतो आहे. परंतु हा परिणाम पुसून टाकण्याचे काम बालविवाह करतात. जगात तीनपैकी एका मुलीचे लग्न वयाच्या 18 वर्षांपूर्वी होते, तर नऊपैकी एका मुलीचे लग्न वयाच्या 15व्या वर्षांच्या आत होते.
भटक्या व आदिवासी जमातींत मासिक पाळी येणे हेच बालविवाहाचे वय
जगातील एकूण बालविवाहांपैकी 40 टक्के बालविवाह भारतात होतात. त्याचबरोबर अफ्रिका, अफगाणिस्तान, मोझंबिका, बांगलादेश, नेपाळ यांसारख्या देशांत बालविवाह जास्त होतात. भारतातील एकूण विवाहांपैकी 47 टक्के बालविवाह असतात. त्यात वधूचे वय हे सरासरी 12 ते 17 आढळते. अनेक भटक्या व आदिवासी जमातींत मासिक पाळी येणे हेच बालविवाहाचे वय मानले जाते. त्याला 'शहाणी झाली' असे म्हटले जाते व लगेच तिचे लग्न लावले जाते. कायदा कितीही कडक असला तरीही आजही अक्षय्यतृतीयेला राजस्थानात, मध्य प्रदेशात हजारो बालविवाह लागतात.
या बालविवाहांच्या इतर परिणामांबरोबर महत्त्वाचा परिणाम हा लोकसंख्यावाढीचा असतो. शिवाय बालविवाह हे मागास, निरक्षर, अल्पशिक्षित जाती-जमातींत होत असल्याने संततिनियमनाची साधने वापरण्याइतपतही जागृती नसते व जरी तिला ही संततिनियमनाची साधने माहीत असली तरी ती वयाने लहान असल्याने नवऱ्याच्या दादागिरीपुढे ते वापरण्याचे स्वातंत्र्य तिला नसते. तेव्हा बालविवाहानंतर एक वर्षांतच बाळंतपण लादले जाऊन बाळंतपणांची मालिका सुरू होते. याचा परिणाम म्हणून त्यांची पुढची पिढीही लगोलग 20 वर्षांत पुन्हा प्रजननक्षम होण्याची क्षमता निर्माण होऊन लोकसंख्यावाढीच्या चक्राला गती मिळते.
भारतात अभ्यासकांनी वेगवेगळ्या जनगणनेचा स्वतंत्र अभ्यास केला तेव्हा 15 ते 19 वर्षांच्या मातांच्या संख्येची टक्केवारी लक्षणीय म्हणजे 10 टक्क्यांपेक्षा जास्त आढळली. तेव्हा मुलींच्या लग्नाचे वय वाढवत किमान 21 वर्षांपर्यंत नेणे हे स्त्री शिक्षणासाठी, सक्षमीकरणाबरोबरच देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठीही महत्त्वाचे आहे.
महिला अत्याचारात वाढ होताना हे लक्षात घेतले पाहिजे की घटस्फोट न घेता हाकलून देणे, मारहाण व छळ होणे, कुटुंबातल्याच इतरांकडून लैंगिक अत्याचार या गुन्ह्यांच्या बळी मोठय़ा संख्येने या बालविवाह झालेल्या मुली असतात. इतकेच नव्हे तर वेश्याव्यवसायात विकल्या गेलेल्या मुलींच्या अभ्यासात पश्चिम बंगालमध्ये लहान मुलींना लग्नाचे आमिष दाखवून लग्न करायचे व त्यांची विक्री करायची, असेही आढळले आहे.
एचआयव्हीची शक्यता अधिक
जागतिक अभ्यासात एतआयव्हीचा प्रसार, गुप्तरोगांची लागण याचाही संबंध बालविवाहांच्या परिणामांशी जोडलेला आढळला आहे. बालवधूचा विवाह अनेकदा प्रौढांशी लावला जात असल्याने एचआयव्हीची शक्यता 15 ते 19 वयोगटातील बालवधूंत 2 ते 6 पटीने जास्त असते. बालविवाहामुळे मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकासच खुंटतो आणि शिक्षण, करिअर त्या काहीच करू शकत नाहीत. बालविवाहाचा कायदा इतका कडक असूनही त्याची अंमलबजावणी फारशी गंभीरपणे झाली नाही.
या कायद्यातील इतक्या गंभीर तरतुदी करूनही दुर्दैवाने या कायद्याचा वापर खूपच कमी झाला आहे. संपूर्ण देशात 2011 साली फक्त 113 गुन्हे दाखल झाले आहेत. शिक्षा होणे हे दूरच. त्यातही महाराष्ट्रात फक्त 19 गुन्हे आहेत. देशातील 18 राज्यांत तर एकही गुन्हा दाखल झाला नाही. ही आकडेवारी बघितली की कायदा किती केविलवाणा ठरलाय हे लक्षात येते. ज्या देशात 23 टक्के विवाह आजही बालविवाह आहेत. अशा देशात दरवर्षी केवळ 113 गुन्हे दाखल व्हावेत हे दुर्दैवी आहे. 
बालविवाह व शिक्षणाचा अन्योन्यसंबंध आहे. असे स्पष्टपणे आढळते की, मुलीच्या शिक्षणातील गळतीचा परिणाम हा अपरिहार्यपणे थेट बालविवाहात होताना दिसतो. मुलगी जर शिकत राहिली तर बालविवाहाची शक्यता काहीशी कमी होते, असाच निष्कर्ष अनेक पाहण्यांमधून दिसून येतो. 15 ते 19 वयातील बालविवाह झालेल्या 59 टक्के विवाहित महिला निरक्षर आढळल्या.
तेव्हा लोकसंख्या नियंत्रणासाठी आपल्याला जे अनेक उपाय करावे लागतील त्यात बालविवाह थांबवून लग्नाचे वय लांबविणे यासाठी प्रयत्न करायला हवेत. 18 वर्षांची मुलगी फारतर 12 वीपर्यंत शिकते. त्यामुळे पदवीधर झाल्याशिवाय म्हणजे 21 वयाच्या पुढेच मुलींच्या विवाहाची मर्यादा न्यायला हवी. तरच लोकसंख्या नियंत्रण व स्त्रीसक्षमीकरण प्रभावीपणे होऊ शकेल.
बालविवाह टाळण्यासाठी काय केले पाहिजे?
लोकसंख्या, शिक्षण आणि आरोग्याशी बालविवाह हा मुद्दा जोडलेला असूनही शासकीय रेकॉर्डमध्ये बालविवाह नोंदविलेच जात नाहीत, असे आढळून आले आहे. आमच्या 'स्पार्क' संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून आम्ही बालविवाहाची आकडेवारी मागवली तेव्हा अनेक जिल्ह्यांनी शून्य, तर काहींनी अत्यल्प संख्या दिली. प्रत्यक्षात आरोग्य केंद्रांना भेटी दिल्यावर असे लक्षात आले की, बाळंतपण रुग्णालयात केल्यावर जननी सुरक्षा योजनेत त्यांचे नाव दिले जाते. पण त्याची अट मातेचे वय 18 वर्ष असावे अशी आहे. तेव्हा गर्भवतीची नोंदणी करतानाच वय कमी असले तरी 18 पूर्ण दाखविले जाते. यामुळे वास्तवच पुढे येत नाही. हे खूपच गंभीर आहे..
यावर उपाय म्हणून बालविवाह थांबवण्यासाठी लग्नाची परवानगी देण्याचा कायदा होण्याची गरज आहे.. वधू वर यांचे जन्म दाखले सादर करावेत आणि त्या आधारे मान्यता प्रमाणपत्र दिले जाईल.. ते प्रमाणपत्र हे रेशनकार्डात नाव टाकण्यापासून अनेक ठिकाणी मागितले पाहिजे,अशी सक्ती व्हायला हवी.. त्यामुळे किमान पालक बालविवाह करणे टाळतील.. त्याचवेळी गावातील सरपंच व पोलिस पाटील यांच्यावर जबाबदारी नक्की करायला हवी.. पोलिस पाटील यांना मानधन असते व ते स्वतः गावातील पोलिस असतात.
ते जर याप्रकारचे काम करत नसतील तर तर त्यांचे मानधन थांबवून पुन्हा नियुक्ती दिली जाणार नाही व सरपंच यांचे पद रद्द करावे का ? यावरही चर्चा व्हायला हवी... माध्यमिक शिक्षण विभाग यांचेकडे प्रबोधनाची जबाबदारी द्यायला हवी. शाळेत गैरहजर व गळती झालेल्या मुली हजर करणे याकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला हवे... त्या मुलींचा बालविवाह होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. त्यामुळे या मुली हजर करण्यासाठी शाळांना आदेशित करायला हवे.
बालविवाह
लेखक - हेरंब कुलकर्णी
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन
किंमत - 250 रु






