- हेरंब कुलकर्णी
जगात 2011 पासून 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त विधवांच्या प्रश्नावर चर्चा होते, संवेदना व्यक्त होते. जगात 26 कोटी तर भारतात 4 कोटी विधवा आहे. महिलांच्या एकूण लोकसंख्येत विधवांची संख्या 10 टक्के असते असे मानले जाते. जगातल्या सर्वच धर्मात आणि प्राचीन समाजात विधवांना हीन वागवले गेले.
पतीच्या मृत्युनंतर पतीच्या कबरीत तिला पुरण्यापासून चितेत ढकलण्यापर्यंत विविध चालीरीती जगातल्या विविध देशात होत्या. त्यात धर्मग्रंथांनी विधवांचा संबंध पतीच्या पारलौकिक आयुष्याशी जोडून तिला अधिक बंधनात टाकले आणि त्याची अंमलबजावणी अधिकच क्रूरपणे समाजाने केली. वृंदावन येथील विधवा ज्याप्रकारे हलाखीचे जगतात त्यावरून धर्म परंपरा आणि समाजाने विधवांच्या आयुष्याचे कसे मातेरे केले आहे हे लक्षात येईल.
महाराष्ट्रात व देशात विधवांच्या प्रश्नावर 1855 पासून सतत चळवळी प्रबोधन होत आहे. 160 वर्षापूर्वी ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, सावित्रीबाई, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई यासारख्या महापुरुषांनी काम करूनसुद्धा आजही विधवांचा प्रश्न बिकट आहे. या महापुरुषांनी त्याकाळात विधवा पुनर्विवाहासाठी विरोध सहन केला.
रूढी परंपरा मोडून काढल्या तरीही विधवा प्रथा मोडण्यासाठी 160 वर्षानंतर प्रयत्न करावे लागतात.थोडक्यात या महापुरुषांनी चालवलेला वारसा पुढे चालवण्यात आपण कमी पडलो आहोत. त्यामुळे या महापुरुषांनी केलेय कामाचे पुन्हा जागरण करण्याची आवश्यकता आहे. पंडिता रमाबाई यांनी त्याकाळात निराधार विधवांचा सांभाळ करत महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले. हेरवाडच्या ठरावानंतर समाजात झालेली जागृती नक्कीच आश्वासक आहे. 
ग्रामीण महाराष्ट्रात विधवांची संख्या वाढतेय, कारण…?
महाराष्ट्रासारख्या राज्यात विविध कारणांनी होणाऱ्या विधवांची संख्या वाढतेच आहे. गेल्या काही वर्षात 75 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या विधवांची संख्या खूप मोठी आहे. दारूने दरवर्षी देशात 3 लाख मृत्यू होतात. महाराष्ट्रातही ती संख्या मोठी आहे. रस्ते अपघातात मरणारे तरुण, आत्महत्या व दुर्धर आजाराने मरणारे तरुण हे विविध मृत्यू विधवांची संख्या वाढवते. त्यात भर यावर्षी कोरोनाची पडली. सरकारी आकडेवारीनुसार दीड लाख मृत्यू झाले तरी शासकीय मदतीसाठी आलेले अर्ज बघता हे मृत्यू अडीच लाख झाले असावेत.
एकूण मृत्यूत 60 टक्के मृत्यू पुरुषांचे असल्याने विधवांची संख्या दीड लाख असू शकते. त्यातही 22 टक्के पुरुष हे 50 वर्षाच्या आतील असल्याने तरुण विधवांची संख्या 55 हजारापेक्षा जास्त आहे. या सर्व प्रकारांची जर बेरीज केली तर महाराष्ट्रात विधवा महिलांची संख्या ही लक्षणीय आहे व त्यातही शेतकरी आत्महत्या, अपघात, दारूचे मृत्यू व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यू हे तरुणाचे असल्याने तरुण विधवांची संख्या खूप मोठी आहे.
ग्रामीण भागातील विधवा महिलेचे प्रश्न अधिक बिकट आहे. कमी शिक्षण झालेल्या विधवांना इतक्या कमी शिक्षणात कोणतीही नोकरीही मिळू शकत नाही. शहरात जशा नोकरीच्या अनेक संधी असतात त्या प्रकारच्या छोट्या नोकऱ्या ग्रामीण भागात उपलब्ध नसतात. शेतात मजुरीला जाणे एवढा एकच पर्याय उरतो. यातून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागातल्या मुलींची जडणघडण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याच्या दृष्टीने केली जाते.
संबंधित लेख वाचा: 1) वाराणसीच्या विधवांचा आक्रोश पंतप्रधान मोदींना ऐकू का येत नाही…? |
अशा स्थितीत या मुलींपुढे मोठे आव्हान विधवा झाल्या नंतर उभे राहते. त्यांना शासकीय कार्यालयात जाणे, समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणे अशी कौशल्ये नसतात. कोणीतरी सोबत असल्याची सतत गरज भासते. यातून साधे रेशन कार्ड सारखे प्रश्न सुद्धा त्या सोडवू शकत नाही. त्या अधिकच एकट्या होतात अधिकच दुःखी होतात व त्यांच्यात असलेला न्यूनगंड अधिकच वाढू लागतो.
जागतिकीकरणानंतर जी व्यक्तिकेंद्रितता वाढली तो परिणाम थेट खेड्यापर्यंत आज बघायला मिळतो. पूर्वी एखादी महिला विधवा झाली तर कुटुंब व्यवस्था नातेसंबंध भाऊ बंद हे सारे जण तिला आधार द्यायचे, तिची व्यवस्था लावायचे व तिलाही या सर्वांमध्ये एकटेपणा वाटायचं नाही पण आज खेड्यापाड्यापर्यंत ही व्यक्तिकेंद्रितता पोहोचल्यामुळे वेगळे राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून शेतीचे तुकडे होत गेले. मी व माझे या वृत्तीमुळे अगदी घरातील सासू सासरे दीर यांनीही या महिलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. किंबहुना तिचा वाटा तिला मिळू नाही.
यासाठी भांडणे सुरू झाली आहेत. भाऊ सुद्धा एका मर्यादेतच बहिणीच्या पाठीशी उभे राहतात असे दिसून येते. त्यातून या महिलांचे एकटेपण वाढले आहे व कोणीच पाठीशी नसल्याने मालमत्ताविषयक अन्याय होऊन सुद्धा त्या फार संघर्ष करू शकत नाहीत अशीच स्थिती आहे. मालमत्तेविषयक कायदे अपुरे आहेत. सासऱ्याच्या नावावर असलेल्या संपत्तीचा वाटा तिला सहज मिळत नाही. ‘मी जिवंत असेपर्यंत वाटप करायचे नाही.’ असे एक वाक्य बोलून सासरचे लोक मालमत्तेचा विषय संपवतात.
शहरी भागातील विधवांचे प्रश्न अधिक बिकट
शहरी भागातील महिलांचे प्रश्न तर वेगळेच आहेत. शहरी भागात या महिला अधिक कर्जबाजारी दिसून आल्या. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील कोरोना विधवा सुद्धा फ्लॅटच्या कर्जाने त्रस्त आहे. त्यांच्या पतीने घेतलेल्या रकमातर काही लाखात असतात व आज बँका त्याचा पाठपुरावा करत आहेत.
कल्याणमधील एका कोरोनात विधवा झालेल्या महिलेने सोळा लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी घरातील सामान विकले व फक्त गरजेचे सामान मुलीकडे नेऊन ठेवले व ती वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहून तो फ्लॅट भाड्याने देते आहे. त्या भाड्यातून कर्जफेड ते आहे. एवढे एकच उदाहरण या समस्येचे वर्णन करायला पुरेसे आहे आहे.शहरी भागातील एकटेपणा तर अधिक विषण्ण करणारा विषय आहे.
मागच्या शतकात पुनर्विवाहाचा विषय खूप महत्त्वाचा ठरला परंतु पारंपरिक समाज मानसिकता त्या महिलेला पुन्हा लग्न करायला परवानगी देत नाही.मुल असेल तर लग्न करायचे नाही अशी समाजाची भूमिका आहे पण आपल्याकडे बालविवाह होत असल्यामुळे कमी वयात लग्न झालेल्या मुलींची मुले मोठी पण त्यांचे वय कमी अशी स्थिती आहे. नवऱ्यासोबत काढलेली वर्षे कमी आणि नवऱ्याशिवाय उरलेले वैराण आयुष्य किती तरी मोठे अशा स्थितीत या महिलांनी कसे जगावे असा प्रश्न पडतो.
पुन्हा लग्न करताना पुरुषांच्या अटी, या मुलांना माहेरी सोडून एकटीने यावे अशा असतात. तिच्या मुलांना तिच्या माहेरच्या लोकांनी सांभाळावे म्हणजे इस्टेटीचा वाटा देण्याची गरज पडणार नाही. इतका क्रूर हेतू आई आणि मुलाची ताटातूट करण्यामागे असतो.समाज म्हणून आपल्याला पुनर्विवाह चळवळीला गती द्यावी लागेल. त्यासाठी मुले असलेल्या विधवांशी लग्न केले तर अशा मुलांच्या नावावर सरकारने विशिष्ट रक्कम ठेव स्वरूपात ठेवणे असे करायला हवे.यातून या विवाहांना गती मिळेल.
विधवांच्या पुनर्विवाह चळवळीला गती द्यावी लागेल
प्रत्येक ग्रामपंचायत नगरपालिका स्तरावर विधवा महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी धोरण आणायला हवे. विधवांच्या रोजगारासाठी एक स्वतंत्र्य योजना बनवण्याची गरज आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाने त्यात पुढाकार घ्यावा व किमान तीन लाख रुपयेपर्यंतचे बिनव्याजी व विनातारण कर्ज या महिलांना जर दिले व त्यासाठी रोजगार मार्गदर्शनाचे प्रशिक्षण आयोजन केले तर अनेक महिला स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतात.
याबाबत सरकारने पुढाकार घ्यावा. रोजगाराला जोडून कौशल्यविकास विभागाचे प्रशिक्षण देणे शक्य आहे. त्याचबरोबर या महिलांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीबाबत स्वतंत्र्य विचार करायला हवा आहे. ज्या शेतकरी महिला आहेत.त्यांना शेतीत विविध सवलती मिळवून देणे. शेतीपूरक व्यवसायाला मदत करणे. पशुपालन योजनेअंतर्गत शेळी व दुधाळ जनावरे उपलब्ध करून द्यायचे असे करायला हवे.
शारीरिक भावनिक भुका मारून विधवा मुलांना मोठे करते.मुले संसाराला लागतात आणि रमतात त्यानंतरच्या आयुष्यात तिचे कुटुंबात असूनही मृत्युपर्यंत असणारे भावनिक एकटेपण हा सर्वात विषण्ण करणारा विषय आहे. त्यावर कधीच चर्चा होत नाही. आपल्या परिसरातील विधवा महिलांना मदत कारणे आधार देणे एवढे तर आपण नक्कीच करायला हवे.






