(कृष्ण मुरारी)
सहा वर्षांचा एक मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत लाल किल्ल्याच्या विशाल दारातून आत आला आणि त्यानं मान उंचावून सम्राट विक्रमादित्याची विशाल, शक्तीशाली मुर्ती पाहिली. आई-वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलानं त्या प्राचीन हिंदू सम्राटाविषयी जाणून घ्यावं ज्याच्या विषयी शालेय पुस्तकात फार काही शिकवलं जात नाही. विक्रमादित्यावर आधारीत एक महानाट्य त्यांच्यासाठी एक आदर्श वर्ग होता.
मध्य प्रदेश सरकारकडून प्राचीन हिंदू गौरव पुन्हा जीवंत करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग आहे हे नाटक. सध्याच्या राष्ट्रीय भावनेतून हे होत आहे ज्यात शिकवलं जात आहे की भारतीय इतिहास लेखनात मुघल शासकांना प्राधान्य दिलं गेलं आणि हिंदू राजा व राण्या यांचा इतिहास मागे ठेवला गेला. पण यातला उपहास असा की मध्य प्रदेश सरकारनं तीन दिवसांच्या विक्रमोत्सव कार्यक्रमासाठी दिल्लीच्या मुघलांच्याच लाल किल्ल्याची निवड केली. उत्सवाचं उद्घाटन 12 एप्रिलला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही यावेळी उपस्थित होते. आता तो लहान मुलगा विकास सिंह, महानाट्य घडताना बघत होता. विक्रमादित्य पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येतो. शकांसोबत उज्जैन इथं झालेली लढाई स्टेजवर लढण्यात येते. विक्रमादित्य केवळ एक योद्धा राजा नसून, तो ज्ञान आणि विद्येचा संरक्षक म्हणूनही यात दाखवला गेला आहे. 
(राजा विक्रमादित्यावर आधारित महानाट्य बघताना तल्लीन झालेला सहा वर्षाचा विकास सिंह.)
पंतप्रधान मोदीच्या सत्तेत अनेक हिंदू राजांना नवजीवन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दशकभराच्या सत्तेत अनेक हिंदू राजांना नवजीवन मिळालं आहे. त्यांच्या लोककथा, आख्यायिका शोधल्या जात आहेत. लोकांसमोर आणल्या जात आहेत. यात विक्रमादित्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराज अग्रसेन, हेमू, राणा सांगा, अनंगपाल तोमर इत्यादींचा समावेश आहे. त्यांचे पुतळे उभारले जात आहेत, रस्त्यांची नावं बदलली जात आहेत, जुना इतिहास बाहेर आणला जात आहे. ज्यामुळे हिंदूंचा गौरव वाढत आहे.
“आम्ही मुघल इतिहासासोबत वाढलो आणि शाळेतही आम्हाला त्यांच्याविषयीच शिकवण्यात आलं. हिंदू राजे आणि त्यांच्या शौर्याची काहीच माहिती दिली गेली नाही. मी जो इतिहास हरवून बसलो तीच परिस्थिती माझ्या मुलाची होऊ नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून त्याला हे नाटक दाखवायला आणलं,” विजय सिंह सांगतात, जे आपल्या मुलाला व बायकोला घेऊन नोयडाहून दिल्लीला आले होते.
सम्राट विक्रमादित्य खरंच इ.पू. 57 मध्ये राज्य करत होता की नाही, त्याचं अस्तित्व होतं की नाही यावर इतिहासतज्ञांमध्ये वाद आहेत, पण या लहान मुलाला त्याच्याशी घेणंदेणं नाही. “असे कार्यक्रमच आपला इतिहास, वारसा आणि हिंदू गौरव याविषयी जाणून घेण्याचा मार्ग आहेत. हे नाटक बघूनच मला समजलं की विक्रमादित्य हा सिकंदरपेक्षा मोठा राजा होता. आता हिंदू इतिहास मुख्यधारेत आणण्याची वेळ आली आहे,” विजय सिंह सांगतो. 
(उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये असलेली राणा सांगाचा पुतळा.)
भारताचा इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रकार अनेकांना चिंतेत टाकतोय
भारताचा इतिहास पुन्हा लिहिण्याचा हा प्रकार अनेकांना चिंतेतही टाकत आहे. इतिहासाला आता राजकीय व धार्मिक प्रोजेक्टप्रमाणे वापरण्यात येईल अशी त्यांना भीती आहे, ज्यात सत्य व त्याची व्याख्या, पुरावे व मिथकं यांच्या सीमारेखा धूसर होत असतात. जामिया मिलीया इस्लामियाचे माजी प्राध्यापक व इतिहासकार नारायणी गुप्ता सांगतात, “माझा बिचारा देश! इथं इतिहास लेखनात राजकीय पैलू आणला जातो. संस्कृती, अर्थव्यवस्था यात नसतेच. हिंदू, जैन, मुस्लिम राजांनी यात उल्लेखनीय योगदान दिलं आहे त्यावर संशोधन व्हायला हवं. शौर्यापेक्षा सैनिक तंत्रावर जास्त लक्ष दिलं तर त्याचा जास्त उपयोग होईल. मुलांना पुस्तकांतून इतिहास शिकवला जात आहे तर मोठ्यांना चित्रपट, नाटकं पुस्तकं, नवे उत्सव, कार्यक्रम यांतून शिकवला जात आहे. या दोन्हींतून इतिहासाला न्याय मिळत नाही. विज्ञानाला ज्या गांभीर्यानं घेतलं जातं त्या गांभीर्यानं इतिहासाला घेतलं का जात नाही?”
शैक्षणिक जगात आता हे प्रश्न विचारले जात आहे जेव्हापासून सातवीच्या एनसीईआरटी पुस्तकातून मुघल व दिल्ली सुलतानांची माहिती काढून त्यांच्या जागी हिंदू राजांची माहिती घेतली गेली आहे. त्याआधीच तुघलक, खिलजी, मामलुक, लोधी वंशांची माहिती काढण्यात आली होती. आग्रा येथील इतिहासकार राज किशोर शर्मा म्हणतात, “यातून ऐतिहासिक सत्य विकृत होऊ शकतं. भारतीय ओळख संकुचित पद्धतीने समोर येऊ शकते. इतिहासाला घेऊन मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात. इतिहासाला संदर्भासहीत समजून घेणं गरजेचं असतं, पण राजकीय पक्ष त्याचा राजकारणासाठी उपयोग करत आहेत.”
काही इतिहासकार म्हणतात की याचा विरोध करण्याची वेळ आली आहे. मागच्या महिन्यात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कार्यक्रमात इतिहासकार व एएमयूचे प्राध्यापक इरफान हबीब यांनी आपल्या सहकाऱ्यांना आवाहन केलं. “आम्ही खोट्या धारणांचं समर्थन करू शकत नाही. पण त्या ऐतिहासिक तथ्यांचा बचाव नक्कीच करू शकतो ज्यांना आजवर तज्ञ इतिहासकारांनी शोधून काढलं आहे,” हबीब सांगतात. 
(जाट, राजपूत, गुर्जर हे सगळेच आता राजा अनंगपाल तोमर यांच्या विरासतीवर दावा करत आहेत.)
अशापद्धतीने हिंदू वारसा शोधून पुढे आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत
भारतात हिंदू वारसा शोधून पुढे आणण्यासाठीचे प्रयत्न वाढत आहेत. मार्चमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या एका प्रतिनिधी मंडळानं दिल्लीच्या हुमायूँच्या कबरीचं ‘निरीक्षण’ केलं. महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलनं झाली. विहिंपची इच्छा आहे की दिल्लीच्या परिसरात हिंदू राजांचा इतिहासही दिसावा. दिल्ली विहिंप अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता सांगतात, “हेमू विक्रमादित्य पंधराव्या शतकातील शूर राजा होता. पण त्याची माहिती दिल्लीत कुठेच मिळत नाही. दिल्ली फक्त मुघलांचा इतिहास नाही. इथं हजारो वर्षँ हिंदूंनीही राज्य केलं आहे.”
दिल्लीचा संस्थापक समजला जाणारा तोमर वंशाचा राजा अनंगपाल द्वितीय याचा वारसा शोधून प्रस्थापित केला जात आहे. त्यासाठी भारतीय पुरातत्त्व खातं जुन्या किल्ल्यात खोदकाम करत आहे जेणेकरून इंद्रप्रस्थच्या पांडव राज्याचे पुरावे मिळू शकतील. रस्त्यांची नावं बदलली जात आहेत. अनंग ताल (मेहरोलीचा तलाव जो अनंगपालने बांधला होता) याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं गेलं आहे.
तिकडे राजस्थानात राणा सांगा, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, मध्य प्रदेशात विक्रमादित्य, हरियाणात महाराज अग्रसेन व उत्तर प्रदेशात सुहेलदेव यांचा वारसा पुन्हा समोर आणला जात आहे. 2021 मध्ये पंतप्रधानांनी अकराव्या शतकातील सुहेलदेवच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं. लोकांची उत्सुकता वाढवण्यात चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उदा. सम्राट पृथ्वीराज, ज्यात अक्षय कुमारनं अभिनय केला, त्याला अनेक राज्यांत करमुक्त करण्यात आलं होतं. विसरले गेलेले राजे परत येत आहेत आणि त्यांच्यावरून वर्तमानात विचारांची लढाई सुरू झाली आहे. 
(पैंगोंग त्सो येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे गेल्या वर्षी अनावरण करण्यात आले.)
राजा राणा सांगा वरून गदारोळ
समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी सोळाव्या शतकातील राजपूत राजा राणा सांगा याला गद्दार म्हटलं. कारण त्यानं बाबराला आमंत्रण देऊन इब्राहीम लोधीचा पराभव करण्यात मदत केली होती. त्यानंतर आग्रातील त्यांचं घर जाळण्यात आलं आणि 27 मार्च रोजी अलीगढ मध्ये राजपूतांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की राणा सांगा हा राष्ट्रीय नायक होता. राजस्थानातील भाजप आमदार व राणा सांगाचे वंशज, विश्वराज सिंह मेवाड यांनी म्हटलं, “राणा सांगाने बाबरला भारतात बोलावलं असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांनी उलट बाबरशी लढाई केली होती.”
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक्सवर लिहिलं- “राणा सांगा यांची देशभक्ती व बलिदान इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे. त्यांचं शौर्य येणाऱ्या पिढ्यांमध्ये भारताविषयीचा गर्व जागृत करेल.”
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याबाहेर नेण्याच्या मागे लागले आहे. आग्रा इथे शिवाजी महाराजांवर आधारित स्मारक व संग्रहालय बांधण्यात येणार आहे. केंद्र सरकारही दिल्ली-पुणे-रायगढ-नाशिक-शिर्डी-छत्रपती संभाजी नगर अशी विशेष छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे यात्रा सुरू करण्याची योजना आखत आहे. काही इतिहासकार सांगतात की मुघलांचं महत्त्व कमी केलं तर हिंदू राजांचंही महत्त्व कमी होऊ शकतं. राज किशोर शर्मा सांगतात, “इतिहासात अनेक गोष्टी जोडण्याची गरज आहेच पण औरंगजेबाचा इतिहास काढला तर शिवाजी महाराजांचं सारं आयुष्य निरर्थक ठरेल.”
याच महिन्याच्या सुरूवातीला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बहराईच येथील राजा सुहेलदेव याच्या स्मारकाला भारताचा विजय व विदेशी आक्रमकांनी दिलेले आव्हान याचे प्रतीक म्हटले होते. असं म्हणतात की श्रावस्तीचा राजा सुहेलदेव यानं गझनीचा सेनापती गाजी सैय्यद सालार मसूद याला हरवलं होतं. हरियाणात भारतीय पुरातत्त्व खात्यानं हिंदू इतिहास शोधून काढण्याची जबाबदारी उचलली आहे. खात्यानं अग्रोहात, जी अग्रसेन राजाची प्राचीन राजधानी समजली जाते तिथं उत्खनन केलं.
(मध्यप्रदेश सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सम्राट विक्रमादित्य महानाट्याच्या प्रयोगाची तयारी.)
त्यात काही नाणी आणि महाभारतात उल्लेखित याचं जुनं नाव ‘अग्रडोका’ याचे पुरावे मिळाल्याचं म्हटलं जातं. अग्रसेन राजाच्या विशाल प्रतिमेचं अमित शाह यांनी उद्घाटन केलं. शाह सांगतात, “महाराज अग्रसेन विलक्षण राजा होते. असं म्हणतात की अग्रोहात तेव्हा एक लाख लोक राहायचे. कोणी नवीन माणूस रहायला आला की प्रत्येकजण त्याला एक वीट आणि एक रुपया द्यायचा ज्यातून तो आपलं घर बांधू शकेल. अग्रसेन राजानं राज्यावर ओझं न टाकता प्रत्येक माणसाच्या समृद्धीचा मार्ग शोधला होता.”
इतिहास की मिथक…?
लाल किल्ल्यातील विक्रमादित्य महानाट्यात दाखवलंय की त्यानं भारतातून शक नावाच्या इंडो-स्किथियन लोकांना हाकललं होतं आणि इराण, चीन, सुमेर, मिस्त्र व तुर्कस्थान पर्यंतचं शासन सांभाळलं होतं. विक्रमादित्याचा काळ भारतीय भावना व देशभक्ती यांचं प्रतीक म्हणून सादर करण्यात आला आहे. यातील एक गीत आहेः “कथा सुनाये विक्रमादित्य की, जो थे वीर, ज्ञान की गंगा कला की धारा जिसके राज में बहती.” मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही पूर्वी या नाटकात विक्रमादित्याच्या वडिलांची भूमिका करत होते. यादव आपल्या भाषणात म्हणाले, “न्यायप्रिय आणि करुणामयी शासक म्हणून विक्रमादित्य आजही वारसारुपानं जीवंत आहे. यातून हेच सिद्ध होतं की सनातन संस्कृती कधी नष्ट होत नाही तर ती गंगेप्रमाणे सतत वाहत राहते.”
कार्यक्रमाची दिल्लीत जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली होती. नाटकाचे लेखक व महाराजा विक्रमादित्य अनुसंधान संस्थानचे संचालक राम तिवारी सांगतात, “आमचा वारसा जाणूनबुजून नष्ट करण्यात आला. विक्रमादित्य एक सार्वभौम सम्राट होते ज्यांच्या तलवारीच्या पात्यावर विदेशी लोकांचं रक्त होतं, भारतीयांचं नाही. आता हा वारसा शोधून लोकांसमोर आणण्याचं काम सुरू झालं आहे.” दिल्लीनंतर, हैदराबाद, इंदौर इथेही नाटकाचे प्रयोग झाले. दिल्लीतील तिन्ही प्रयोग हाऊसफुल होते. तिवारी सांगतात, “इथंच औरंगजेबानं कत्लेआम केला होता. आम्ही इथं भारताचा वारसा दाखवला, फक्त हिंदूंचा नाही.” 
(राजा सुहेलदेव यांना अभिवादन करताना अमीत शहा.)
विक्रमादित्य खरचं होऊन गेला…?
विक्रमादित्याला शालेय इतिहासात अजून जागा मिळाली नाही पण मध्य प्रदेश शासनानं मागील वर्षी सरकारी कार्यालयांत विक्रम संवत कॅलेंडर लागू केलं. तिवारी म्हणतात की विक्रमादित्याशी संबंधित शिक्के, नाणी, मातीची भांडी मिळाली आहेत. जी दिल्लीच्या कार्यक्रमात ठेवण्यात आली होती. त्यातच विक्रमादित्याच्या नवरत्नांची माहितीही देण्यात आली आहे. तिवारी सांगतात की इस्तांबुलचा एक कवी जिर्रहम बिन तोई यानं पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माच्या दीडशे वर्ष आधी विक्रमादित्याचा आपल्या कवितेत उल्लेख केला होता. एका कवितेचा अनुवाद करून तिवारी सांगतातः “ते लोक भाग्यशाली आहेत ज्यांचा राजा विक्रम यांच्या शासन काळात जन्म झाला आहे. तो एक उदात्त, उदार व कर्तव्यनिष्ठ राजा होता जो प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित होता.”
मध्य प्रदेशच्या इतिहासकाराचं म्हणणं आहे की लोककथांमध्ये विक्रमादित्याचं नेहमीच कौतुक करण्यात येतं. विक्रम व वेताळ या प्रसिद्ध कथांमधूनच या नाटकाची प्रेरणा मिळाली आहे. विक्रम राजाची हुशारी व चातुर्य या कथांमधून दिसायचं. मुलांच्या असलेल्या या गोष्टी आता देशाचा वारसा म्हणून पुढे येत आहे. मध्य प्रदेश सरकारचा दावा आहे की या कथांमधील विक्रम केवळ एक पात्र नसून ऐतिहासिक व्यक्ती आहे आणि लोककथा देखील वास्तविकता आहेत.
मुख्यमंत्री मोहन यादव ‘भारत का नववर्ष विक्रम संवत’ या पुस्तकात लिहितात, “विक्रमादित्याशी संबंधित अनेक लोककथा आहेत. यात सिंहासन बत्तीसी व वेताल पच्चीसी प्रमुख आहेत. ज्यातून विक्रमादित्य किती बुद्धीवंत व महान शासक होता हे दिसून येतं.” तिवारींचा दावा आहे की भविष्य पुराणातही विक्रमादित्याचा उल्लेख माळवाचा शासक म्हणून केला आहे जो सध्याच्या पश्चिम मध्य प्रदेश व दक्षिण-पूर्व राजस्थानचा भाग आहे व उज्जैन त्याची राजधानी होती.
पण विक्रमादित्याच्या अस्तित्त्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर्मनीचे विद्वान इतिहासकार मॅक्स मुल्लर सांगतात की, विक्रमादित्याच्या शासनाचा कोणताही दस्तावेज मिळत नाही. इतिहासकारांचं मत यावर विभागलेलं आहे. इतिहासकार डी. सी. सरकार आपल्या पुस्तकात, ‘एंशियंट मालवा अँड दी विक्रमादित्य ट्रॅडीशन’ (1969) यात सांगतात की विक्रमादित्याच्या कथा कदाचित गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय यांच्यापासून प्रेरीत असू शकतात, विशेषतः त्यानं उज्जैनमध्ये शकांवर मिळवलेल्या विजयातून.” इलाहाबाद विद्यापीठाचे निवृत्त इतिहास प्राध्यापक डी. पी. दुबे सांगतात, “विक्रमादित्याची ऐतिहासिकता आजवर सिद्ध झालेली नाही. वारशाच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड व्हायला नको.” 
(महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याला वंदन करताना केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा.)
पण विक्रमादित्याचा नववारसा आता अधिकाधीक भव्य व मोठा होत चालला आहे. इतिहासकारांचे इशारे कोणालाच ऐकू येत नाही आहेत. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक सैय्यद अली रिज़वी सांगतात, “हा मिथकांना इतिहासात बदलण्याचा प्रयत्न आहे. मिथकांच्या मागे कोणताही ठोस आधार नसतो. सध्याची राजकीय सत्ता आपल्या फायद्यासाठी आपल्या मर्जीचा इतिहास लिहत आहे. इतिहास हा गर्व करण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी असतो. भाजप जे करत आहे त्याला ‘इच्छित इतिहास’ म्हणता येईल.
भारताचा इतिहास हिंदू-मुस्लिम वर्गवारीत टाकणं हे निंद्य आहे. भूतकाळ कधीच एकरेषीय नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती मुस्लिम होते आणि राणा सांगाचे साथीदार हसन खान मेवाती आणि महमुद लोधी हे मुस्लिमच होते. राणा सांगाच्या शौर्याविषयी वादच नाही पण सत्य हेच आहे की त्यांना मुस्लिमांनी नाहीतर राजपूतांनीच विष देऊन मारलं होतं. शिवाजी महाराजांवरही पुरंदरच्या तहासाठी हिंदू राजा जयसिंह मिर्झा याचा दबाव होता.”
लाल किल्ल्यातील विक्रमादित्याच्या नाटकात आणखी एक गोष्ट सांगण्यात आली. हिंदूंसाठी ती सर्वांत महत्त्वाची आहे. नाटकात सांगितलं जातं की विक्रमादित्य श्रीरामाची पूजा करायचा व त्यानं अयोध्येत एक मंदिर बांधलं जे नंतर 1528 मध्ये बाबरच्या सेनापतीनं तोडलं. याचा उल्लेख राम मंदिर प्रकरणात न्यायालयात केला गेला होता. ही गोष्ट आता सामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे. तिचा खरेखोटेपणा आता कधीच सिद्ध होण्याची शक्यता नाही. पण विकास सिंह, तो लहान मुलगा स्टेजवर राजा विक्रमादित्याला पांढऱ्या घोड्यावर बसलेला येताना बघून आनंदानं टाळ्या वाजवू लागतो.
(सौजन्य - द प्रिंट)
भाषांतर - प्रतिक पुरी






