- अप्सरा आगा
गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप म्हणाले, "मी सर्वांना विनंती करेन की, दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. दिवाळीनिमित्त खरेदी करताना आपला पैसा आणि आपला नफा फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे, अशी दिवाळी आपण साजरी करायची आहे."
"दिवाळीची खरेदी हिंदूकडूनच"…असे संदेश सोशल मीडियावर फिरायला लागले आहेत, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभर. उत्तरेकडील राज्यात तर अनेक दिवाळी सणाच्या तोंडावरच ‘मुस्लिमांकडून खरेदी करू नका’ अशा आशयाचे बॅनर्स देखील लागले आहेत.
भारतात सुमारे 15% म्हणजेच प्रत्येक सात व्यक्तींमध्ये एक मुस्लीम नागरिक आहे. दिवाळीच्या तोंडावर संग्राम जगतापसारख्या द्वेषाचे राजकारण करणाऱ्या नेत्याकडून मुस्लीम समाजाचा आर्थिक बहिष्कार करण्याचे खुले आवाहन केले जात आहे. अशा राजकारण्यांना भडकाऊ विद्वेषी आणि वादग्रस्त विधानं करत राहणं हे पटकन यशस्वी होण्याचा राजमार्ग वाटू लागला आहे.
कारण भावनिक आवाहनं करून लोकांना फट्कन गोळा करता येते. पण हे असे राजकारण देशाच्या दूरगामी हिताचे निश्चितच नाही. राजकारणात यशस्वी होण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे धर्माचा वापर करून मतांची पोळी भाजणे असा यांना वाटत असला तरी अवघड पण दूरगामी हिताचा मार्ग म्हणजे विकास करून सर्व जाती धर्मांना सलोख्याने सोबत घेऊन लोकांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य सार्वजनिक सोयी-सुविधा ह्यावर धोरणात्मक काम उभे करणे हाच असतो.
“चाचा दुकान क्यू बंद रखा है? हमे सामान चाहिये था”
नेमका हाच धागा पकडून ‘बाईमाणूस’ने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या अनेक बाजारपेठेत फेरफटका मारला. "दिवाळीची खरेदी हिंदूकडूनच" या आवाहनाला मुस्लिम विक्रेते, हिंदू विक्रेते आणि हिंदू ग्राहक यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
गेल्या वीस वर्षांपासून पुण्याच्या मंडईत अगरबत्ती आणि कंदील विकणारे मेहबूब शेख (नाव बदलेले आहे) म्हणतात की, व्यवसाय केवळ पैसे कमावण्याचं साधन नसून, माणुसकी जपण्याचं आणि आपुलकी वाढवण्याचं माध्यमही असू शकतं. “चाचा दुकान क्यू बंद रखा है? हमे सामान चाहिये था”, ही वाक्यं केवळ ग्राहकांची नव्हेत, तर स्थानिकांच्या मनात निर्माण झालेल्या नात्यातून आलेली असतात. व्यापार हा नुसता खरेदी-विक्रीचा व्यवहार नसतो, तो विश्वास, प्रेम आणि सातत्याने उभा राहणारा एक सामाजिक बंध असतो. लोकांचं एवढं प्रेम मिळत असताना काही लोकांच्या बोलण्यावरून आम्हाला काही फरक पडत नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं, प्रेमानं, आपुलकीने राहायचं.”
धर्म, सण आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर निर्माण होणाऱ्या ताणतणावाचं वास्तव जावेद मकानदार (नाव बदलेले आहे) मांडतात. ते म्हणतात की, “सणाच्यावेळी काही राजकीय लोक मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाका असं सांगतात. हे वाक्य फक्त एका व्यक्तीचं दुःख नाही, तर यामुळे लघु व्यावसायिकांवर राजकारणाचा फटका कसा बसू शकतो याचे हे उदाहरण आहे. सणाच्या काळात ज्यांच्यासाठी व्यवसाय हा वर्षभराच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो, त्यांना अशा बहिष्काराच्या हाकांमुळे आर्थिकच नव्हे तर मानसिक तणावालाही सामोरं जावं लागतं. इंदोरसारख्या शहरातील उदाहरण असो वा महाराष्ट्रातील स्थानिक बाजारपेठा, या घटना समाजात “आपण विरुद्ध ते” असा भेद निर्माण करतात.
समाजात “आपण विरुद्ध ते” असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न
जावेद मकानदार सांगतात, “दुकानवाला कोणत्या धर्माचा आहे, याचा लोकांना काही फरक पडत नाही, लोकांना फक्त चांगला माल हवा असतो. सामान्य ग्राहकाला धर्म नव्हे तर प्रामाणिक सेवा, दर्जेदार वस्तू आणि आपुलकी महत्त्वाची असते. राजकीय पातळीवरून निर्माण होणाऱ्या मतभेदांपेक्षा माणुसकी आणि व्यवहारिक नातं हेच टिकून राहतं. कर्ज काढून दुकानात माल भरलेला असतो, पण विक्रीच झाली नाही तर संकटाचं डोंगर उभं राहतं.
आज भारतात मुस्लीम समाज सेवा क्षेत्र, हस्तव्यवसाय, कौशल्याधिष्ठित कामं आणि लघुउद्योग यामध्ये महत्त्वाचं योगदान देतो. फक्त सूडभावना किंवा द्वेष यामुळे जर त्यांना बहिष्कृत केलं, तर स्थानिक व प्रादेशिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा खोल परिणाम होणार. याने संग्राम जगतापसारख्या राजकारण्यांचा तात्कालिक राजकीय फायदा झाला तरी देशाचं काय कल्याण होणार?
‘’आम्हाला दुकानदार कोणत्या धर्माचा आहे, याने काही फरक पडत नाही’’
सुरेश वाघमारे (नाव बदलायचे आहे) हे याच मंडईत फुलांच्या हारांचा व्यवसाय करतात. मुस्लिम दुकानदारांच्या रांगेत त्यांचे दुकान आहे. जेव्हा त्यांना याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणतात, 'मी इतक्या वर्षांपासून व्यवसाय करतोय. मला कधीही वाईट अनुभव आले नाहीत. माझ्या आजूबाजूला असलेली सर्व दुकाने मुस्लिम लोकांची आहेत. मुस्लिम समुदाय इतके वेगवेगळे व्यवसाय करतो. कोण पान विक्रेता आहे, कोण बांगडी विक्रेता आहे, अगरबत्ती विक्रेता आहे, पंक्चर विक्रेता आहे. जर या सर्वांवर बंदी घातली तर इतर लोकांसाठी हे कठीण होईल.
मुळात आपल्या देशात कोणत्याही जातीला, धर्माला कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्यांना कष्ट करून जगण्याचा अधिकार आहे. मुस्लिम समुदायाच्या व्यवसायावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार कोणी दिला? महाराष्ट्राला एक वारसा आहे. सर्व जाती आणि धर्माचे लोक एकोप्याने राहतात. म्हणून, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी, वास्तव वेगळे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील बाजारपेठेत सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन व्यवसाय करत आहेत.’
मंडईत मेहबूब शेख (नाव बदलेल आहे) यांच्या दुकानात अगरबत्ती घ्यायला आलेल्या शालिनी ताई (नाव बदलेल आहे) यांना जेव्हा तुम्ही मुस्लिमाकडून अगरबत्ती का घेताय, असे विचारलं. तेव्हा त्या रागाने म्हणाल्या, रोज एकजण उठतो आणि काही तरी गरळ ओकत असतो. हे करू नका, ते करू नका. हे आम्हाला सांगणारे कोण? आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं. आम्हाला कोणत्या जातीचा - धर्माचा आहे काही फरक पडत नाही. आम्ही पैसे देणार, आम्हाला जिथं चांगलं सामान मिळेल तिथे घेणार. या बोलणाऱ्यांच्या नादाला कशाला लागत बसतोय. आम्हाला चांगलं वाटलं आम्ही घेतलं. आमचं घर चालवायला येतात का ते.'
तमन्ना इनामदार यांना संग्राम जगताप यांच्या वक्तव्यबद्दल विचारलं असता, त्या सांगतात, 'संग्राम जगतापला म्हणावं भारतीय संस्कृतीमध्ये मुसलमानाच्या आणि हिंदूंच्या गंगा - जमुनी रिवायंतीबद्दल वाच, अभ्यास कर, गाव-खेड्यात जाऊन तिथला अभ्यास कर. आजही गाव-खेड्यात, शहरात राहणारा मुसलमान आणि हिंदू समाज गुण्या-गोविंदाने नांदतोय. एकमेकांच्या रोजी - रोटीसाठी सहकार्य करतोय.
अनेक बाबतीत एकमेकांना मदत करतोय. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा काही लोकंमुळे खंडित होईल असं नाही. यांच्या बोलण्याचा फारसा परिणाम होणार नाही. आज दर्ग्याच्या बाहेर जाऊन बघितलं तर अनेक हिंदूंची दुकान आहेत. कोणत्याही मार्केटमध्ये बघा हिंदू - मुस्लिम दुकानदार गुण्यागोविंदाने व्यवसाय, व्यवहार करतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांच्या सहकार्याने जीवन व्यतीत करतात.'
संग्राम जगतापांच्या भूमिकेला पक्षातूनच विरोध
या वादाबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येयधोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून पक्षाचा कुठलाही खासदार, आमदार किंवा जबाबदार व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील, तर ती वक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाहीत. ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. शिव- शाहू- फुले- आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो आहे," असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
संग्राम जगताप यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रीस नायकवाडी म्हणाले, "आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, जर त्यांना आमची विचारधारा पटत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांच्यावर योग्य कारवाई करायला आणि त्यांना कसं मोकळं करायचं यासाठी माझा पक्ष आणि माझे नेते समर्थ आहेत. त्यांनी पक्षापासून दूर झालं पाहिजे. कारण ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. ते दूर होत नसतील, तर त्यासाठी काय कार्यवाही करायची असते हे आमचे वरिष्ठ जाणून आहेत," असं मत नायकवाडी यांनी व्यक्त केलं.
आता ‘मेहंदी जिहाद’वरून तणाव…
नुकत्याच झालेल्या करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र, मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये, असे म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता. तसंच, अनेक दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला होता.
कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही, असा दुष्प्रचार करीत काही हिंदूत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी तसंच सामाजिक समानता अबाधित राहावी, या उद्देशाने मुंब्रा येथील मर्जीया शानू पठाण यांच्या पुढाकाराने दिवाळी सणानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लीम महिला एकत्र आल्या. मुस्लीम महिलांनी हिंदू महिलांना त्यांच्या हातावर मेंदी काढून दिली, तर हिंदू महिलांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे.
या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी, हा देश गंगा-जमुनी तहजीब पाळणारा आहे. या देशात सामाजिक एकोपा असावा, अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई; सब है भाई-भाई याच तत्वावर हा देश चालणार आहे, असे सांगितले.






