- राहुल भांगरे
एका अभ्यासानुसार भारतातले 25% लोक हे ओबेस (जाडे) आहेत. भारतात पुरुषांपेक्षा स्त्रिया या जास्त ओव्हरवेट आहेत. साधारणपणे BMI हा आपले वजन आणि पर्यायाने आरोग्याचा एक मापदंड आहे, पण अर्थातच तो परिपूर्ण नाही. तरीही 18 ते 24 हा BMI असणे चांगले असते असे म्हणता येईल. तुमच्या वजनाला (किलोग्रॅममध्ये) तुमच्या उंचीने (मीटर्स मध्ये) दोनदा भागले की तुमचा BMI मिळतो. एखाद्याचे वजन 70 किलो असेल आणि उंची 1.8 मीटर्स असेल तर तुमचा BMI हा 70/(1.8 X1.8)= 70/3.24 = 21.6 इतका होईल. भारतात अनेक लोक 25+ BMIचे आहेत आणि अर्थातच जाडेपणाच्या तोट्यांबद्दल माहिती झाल्याने लोक आता वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत.
खरेतर वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डाएट कंट्रोल आणि एक्सरसाईज हा होय. पण नाही, आपण मानव असे विचित्र प्राणी आहोत की, ज्यांना खूप खाल्ल्यामुळे वाढलेले वजन सुद्धा अजून काहीतरी खाऊनच कमी करायचे असते. त्यामुळे फक्त काहीतरी खाऊन वजन करण्याचा बिझनेस भारतात अत्यंत तेजीत आहे. 2024 मध्ये हा बिजनेस तब्बल 2520 कोटी डॉलर्सचा होता जो अंदाजे 2023 पर्यंत 5600 कोटी डॉलर्सचा होणार आहे.
वजन कमी करण्याचे सध्या दोनतीन प्रचलित प्रकार आहेत. पहिला म्हणजे विविध डाएट प्लॅन्स, दुसरा म्हणजे ऑनलाईन व्यायामाचे लाईव्ह सेशन्स आणि तिसरा म्हणजे काहीतरी वेट लॉस प्रोडक्ट खायला देणे. 
डाएट प्लॅन्सचे फायदे आणि धोके
पहिला प्रकार म्हणजे भारतात दीक्षित, दिवेकर आदि अनेक डॉक्टर्सचे डाएट प्लॅन प्रसिद्ध आहेत. बहुतांश डाएट प्लॅन्स हे सहसा कार्बोहायड्रेड कमी करून प्रोटीन जास्त खायला सांगतात. काही जणांची अनेक टाइमटेबल्स असतात. खरेतर मुळात तुम्ही कमीच खाल्ले तर वजन कमी होतेच, परंतु हे जे स्पेसिफिक डाएट्स असतात त्या डाएट्सचे परिणाम खरेच चांगले होतात का? याचा कोणताही शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. त्यामुळे ते खरेच परिणामकारक आहेत का ते सांगता येऊ शकत नाही.
मुळातच कमी खायला सांगणारे हे डाएट असतात, त्यामुळे वजन कमी होण्याची शक्यता तशीही असतेच. पण ते डाएटच 100 टक्के वजन कमी करेलच याची खात्री नाही. उलट या डाएट्सच्या अतिरेकाने काही लोकांच्या जीवावर देखील बेतलेले आहे. त्यामुळे जरी एखाद्याचे म्हणणे आपल्याला पटले, जरी अनेकांनी आपल्याला फायदा झालाय असे निवेदन दिले, तरीही अशा डाएट्सची वैज्ञानिक स्टडी व ट्रायल्स झालेले नसल्याने त्यांचा अतिरेक करणे जीवघेणे ठरू शकते. तसेच या डाएट्समुळे आहारातील विविधता संपू शकते. तेही वजनाव्यतिरिक्त इतर नुकसान घडवून आणू शकते.
संबंधित लेख वाचा: स्त्रियांना सडपातळ करताना ‘लठ्ठ’ होणारा बाजार |
अनेकदा तर भारतासारख्या देशात केवळ माणसांना मांसाहारापासून वंचित ठेवण्यासाठीही सात्विक वगैरे नावांनी अनेक डाएट्स लोकांच्या पुढ्यात फसवून मांडली जातात. लोकांचे अपवादात्मक वा फेक रिझल्ट हे रामबाण उपाय म्हणून तुम्हाला सांगितले जातात. पण हे खरे नसते. कारण त्यांचा काहीही रिसर्च झालेला नसतो. कुणीही उठतो आणि आपल्या डाएट प्लान बद्दल केवळ आकर्षक बोलून देशभर प्रसिद्ध होतो. जगभरात ज्या काही डाएट्सवर स्टडी आणि ट्रायल्स झाले आहेत, त्यात व्हॉल्युमेट्रिक्स डाएट हा प्रकार रिसर्चनुसार त्यातल्या त्यात बरे रिझल्ट देणारा सिद्ध झाला आहे. यात तुम्ही नेहमी खाता तितक्याच प्रमाणात मात्र अगदी कमी कॅलरी असलेले फूड खायचे असते. उदा भाज्या खाणे, सूप पिणे इत्यादी.
ऑनलाईन एक्सरसाइज सेशन्सचे फायदे आणि धोके
दुसरा प्रकार म्हणजे ऑनलाईन एक्सरसाइज सेशन्स. तसे ऑनलाईन एक्सरसाइज करणे एकप्रकारे फायद्याचे आहे, पण जोडीला जर हे लोक काही पेय वा इतर खाद्य पदार्थ विकत घ्यायला लावत असतील, तर मात्र त्यांचे फायदे तोटे हे वजन कमी करण्याच्या खाली दिलेल्या प्रॉडक्टससारखेच असू शकतात. एक्सरसाइजने आरोग्य उत्तम राहू शकते हे खरे आहे, पण केवळ कोणतीही एकच एक्सरसाइज नव्हे तर जमेल तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज करणे महत्वाचे आहे.
चालणे, धावणे, वजन उचलणे, जिम अशा विविध एक्सरसाइज जमेल तशा करत राहणे आवश्यक आहे. नुसते चालणे किंवा नुसते जिम करणे यापेक्षा वेगवेगळ्या एक्सरसाइज करत राहिल्याने सर्वंकष आरोग्य व्यवस्थित राहते. पण आजच्या बिझी युगात लोकांना वेळ नसतो असे मानले तरी किमान धावणे, चालणे, योग हे तरी करत राहणे आवश्यक आहे. ऑनलाईन एक्सरसाइज सेशन्स सुद्धा चांगली ठरतील मात्र त्यामध्ये सोबत काही प्रॉडक्ट सुद्धा विकत असतील तर मात्र सावध राहणे गरजेचे आहे.
वेट लॉस प्रोडक्टचे फायदे आणि धोके
तिसरा प्रकार म्हणजे औषध वा सप्लिमेंट खाऊन वजन कमी करणे. वजन कमी करणाऱ्या औषधांचे बरेच प्रकार आहेत. सगळे तितकेसे प्रभावी नाहीत पण सगळ्यांची स्ट्रॅटेजी बहुदा सेम असते. ती स्ट्रॅटेजी म्हणजे काहीतरी करून कमी अन्न खायला लावणे. अनेकवेळा डायबिटिस वरची औषधेच वजन कमी करण्याचे औषध म्हणून दिली जातात. अनेकवेळा हर्बल असे सांगून काही फूड सप्लिमेंट, ग्रीन टी, प्रोटीन पावडर वा शेक्सनी तुमच्या अन्नाला रिप्लेस करतात किंवा तुम्हाला भूक लागणारच नाही असे औषध देतात.
या प्रकारात सगळ्यात प्रभावी ठरले आहे, ते म्हणजे GLP-1 रिसेप्टर एगोनिस्ट (GLP-1-RA). भारतातही अशीच दोन औषधे अतिशय पॉप्युलर झाली आहेत. हे औषध ब्लड शुगर आणि भूक कंट्रोल करणाऱ्या हार्मोनचा अभिनय (मिमिक) करते. म्हणजे होते काय की हे औषध खाल्ल्याने अन्न हळूहळू पचते, पोट भरलेले आहे असे वाटते, म्हणून भूक लागत नाही, त्यामुळे लोक कमी अन्न खातात आणि खाणे कमी झाल्याने अर्थातच वजन कमी होते. म्हणजेच काय की या औषधाने थेट वजन कमी होत नाही, तर औषध शरीराला फसवून आपली भूक कमी करते, त्यामुळे कॅलरी कमी खाल्ल्या जातात आणि वजन कमी होते. 
त्याऐवजी आपणच डाएट करून कॅलरी कमी घेतल्या तरी वजन कमी होतच असते. कुणी कितीही दावा करो, GLP-1-RA हे जे सर्वाधिक प्रभावी औषध आहे, त्याने एका वर्षात आपल्या वजनाच्या 15% इतकेच वजन कमी होते. मात्र त्याच्या जोडीला तुम्ही इतर पथ्यही पाळणे आवश्यक आहे. कोणी जर याहून जास्त वजन कमी करण्याचा दावा करत असेल तर ते मात्र खोटे आहे, आणि जर त्याहून खूप जास्त वजन कमी झाले असेल तर तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त स्ट्रेस दिलेला असू शकतो आणि हे कदाचित आरोग्यास धोकादायक सुद्धा ठरू शकते.
GLP-1-RA… वजन कमी करण्याचे रामबाण औषध, पण?
खरेतर GLP-1-RA अतिशय महाग औषध आहे, म्हणजे त्याची किंमत एक महिन्याला 17 हजार ते 25 हजार इतकी असू शकते. तरीही आपल्या इथे अनेक लोक इतकी किंमत मोजतात म्हणजे हा किती तेजीचा धंदा आहे ते समजून घ्या. मात्र आजकाल जे सर्रासपणे वेट लॉस प्रोडक्ट विकले जातात त्यांत GLP-1-RA आहे की नाही, असले तर पर्याप्त आहे की नाही आणि जे GLP-1-RA म्हणून विकले जातेय ते खरेच GLP-1-RA आहे की नाही तेही सांगता येणार नाही.
भारतात कोणत्याही पदार्थाला हर्बल असे नाव दिले आणि फूड या कॅटेगरीत टाकले की त्याच्या गुणवत्तेची पुरेशी चाचणी केली जात नाही. इतकेच नाही तर अशा एखाद्या औषधाला जरी FSAAIचे सर्टिफिकेशन असेल तरीही ते सर्टिफिकेशन म्हणजे हे औषध खरेच वजन कमी करेल यासाठी नसते तर त्या औषधातील घटक हे हानिकारक नाहीत हे सांगण्यासाठी असते. त्यामुळे FSAAI ची मान्यता आहे म्हणजे हे औषध लागू होईल असे मानू नये. 
बाकी भारतातील बहुतांश वजन कमी करण्याची औषधे ही सर्टिफाईड तर नाहीतच, वरून त्यात नेमके कायकाय घटक आहेत तेही नक्की सांगता येणार नाही. जरी एखाद्या पॅकेट वा डब्यावर त्यातील घटक लिहिलेले असतील तरी ते खरेच असेल याचीही खात्री नाही. जी औषधे अधिकृत रजिस्टर्ड डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आणि मेडीकल स्टोअर व्यतिरिक्त अन्य ठिकाणी विकली जातात त्यांच्या क्वालिटीची काहीही खात्री नसते. कारण त्यांची कोणतीही अधिकृत तपासणी होत नसते. तो आपल्या आरोग्याशी एक जुगारच असतो. कोणी कितीही खात्री देवो, किंवा कितीही इतर लोकांचे सकारात्मक अनुभव तुमच्यापुढे मांडो, त्यावर विश्वास ठेवणे हे सेफ नाही.
फूड सप्लिमेंट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम
अनेक फूड सप्लिमेंट्सचा आरोग्यावर घातक परिणाम सुद्धा होऊ शकतो. जसे की हायड्रॉक्सीकट या सप्लिमेंटमुळे हार्ट डिसीज, स्ट्रोक, लिव्हर डॅमेज असे दुष्परिणाम सुद्धा झाल्याचे दिसून आले आहे. असेच GLP-१-RA चे सुद्धा काही संभावित घातक परिणाम आहेत. आपल्या देशात विकले जाणारे जे प्रोडक्ट काहीही न्यूट्रिशन टेबल देत नाहीत वा जे सर्टिफाईड नाहीत त्यांचे तर अजूनच घातक परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे अन्य काहीच करता येणे शक्य नसताना घ्यायचेच असतील तर सर्टिफाईड आणि ऑथेंटिक प्रॉडक्टस आणि तेही अधिकृत डॉक्टर वा डाएटिशियन्सच्या सल्ल्याने आणि प्रिस्क्रिप्शननुसारच घेणे योग्य असते. अनेक ब्रँडच्या नावाने विकले जाणारे GLP-1-RA हे महागडे औषध घेणे बंद केल्यावर वजन पुन्हा वाढते. त्यामुळे कितीजण केवळ वजन कमी करण्यासाठी दर महिन्याला 20 हजार रुपये खर्च करू शकतात ते बघणे इंटरेस्टिंग ठरेल. तुम्ही हा खर्च कायम करू शकत असाल तर ठीक आहे, किंवा त्यानंतर आपल्या आहारात बदल करू शकत असाल व व्यायाम करणार असाल तरच तुमचे वजन कमी राहू शकते.
एक गंमत आहे… स्वस्त औषधांपेक्षा महागडी औषधे घेतल्यावर लोकांचे वजन सहसा कमी होते. का? महागडी औषधे जास्त प्रभावी असतात हे त्याचे कारण नाहीय तर आपण इतका लाखभर रुपयांचा खर्च केला आहे तर पथ्य न पाळल्यास तो वाया जाईल म्हणून लोक आहाराचे व व्यायामाचे पथ्य काटेकोरपणे पाळतात आणि म्हणून त्यांचे वजन कमी होते. त्याउलट स्वस्त औषध असेल तर तेवढे पैसे वाया गेल्याने लोकांना फार दुःख होत नाही, त्यामुळे ते औषधाबरोबरच आहाराचे पथ्य काटेकोरपणे पाळत नाहीत त्यामुळे अशा औषधांचा परीणाम दिसत नाही. पैसे वाया जाण्याची भीती हे महागडी औषधे लागू पडण्याचे मुख्य कारण आहे.
प्रोसेस्ड फूड हा आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जे काही आपण पॅकेटमधून काढून थेट खाऊ शकतो ते सहसा घातकच असते. सगळी कोल्डड्रिंक्स व गोड पदार्थ हे आरोग्यास घातकच असतात. तुम्हाला माहीत नसेल पण अनेक विकसित देशांपेक्षा भारतातील कोल्ड्रिंक्समध्ये, लहान मुलांच्या बोर्नव्हिटा वा नटेला मध्ये आणि चॉकलेट्स मधेही कितीतरी जास्त प्रमाणात साखर असते.
साखर हे प्रिजर्वेटिव्ह सुद्धा आहे त्यामुळे प्रॉडक्ट जास्त काळ टिकण्यासाठी खूप साखर टाकली जाते, जी आरोग्याला हानिकारक असते. जाम, जेली, पॅक असलेले फ्रुट ज्यूस या सर्वांत खूप साखर असते. त्यामुळे हे पदार्थ पूर्णतः अव्हॉइड केले पाहिजेत. चिप्स, वेफर्स वा तळलेले पदार्थ यांत खूप तेल म्हणजे फॅट असतात, त्यामुळे तेही टाळणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
खरेतर वजन कमी करण्यासाठी औषधे घेण्याचे कारण म्हणजे आपला आपल्या जिभेवर ताबा नसणे हेच आहे. औषध फक्त आपल्या भुकेला फसवून आपल्या अन्नाचे प्रमाण कमी करते. त्याऐवजी आपणच जिद्दीने ठरवून आपल्या आहारावर कंट्रोल ठेवला, सकस आहार घेत राहीलो आणि पुरेशी एक्सरसाइज करत राहीलो की आपले आरोग्य हमखास उत्तम राहते.
(साभार - राहुल भांगरे यांच्या फेसबुक वॉलवरून)






