दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचा शिरकाव वाढत असताना, आरोग्यासंदर्भातील माहितीही लोकांपर्यंत याच माध्यमातून पोहोचू लागली आहे. मात्र, ही माहिती खरी किती आणि दिशाभूल करणारी किती हा प्रश्न अधिक गडद होतोय. अलीकडील काळात सोशल मीडियावरील अनेक ‘हेल्थ इन्फ्लुएंसर्स’नी स्वतःला तज्ज्ञ म्हणून मांडायला सुरुवात केली आहे.
पायाला कांदा लावल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, काकडी खाल्ल्याने डोळ्यांची समस्याही दूर होते अशा आशयाचे व्हिडिओस सध्या व्हायरल होतायत. पंधरा मिनिटांत वजन कमी, घरच्या घरी कॅन्सरचे इलाज, आणि ताप बरे करण्यासाठी गरम पाण्यात पाय ठेवण्याचा उपाय, आजच्या काळात आरोग्यविषयक कंटेंटचा महापुर सोशल मीडियावर उसळलेला आहे.
पाच वर्षांपूर्वी, कोविड-19 महामारीच्या दरम्यान सतीशकुमार श्रीवास्तव यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरलझाला होता. ज्यामध्ये श्रीवास्तव यांनी असा दावा केला होता की नाकात लिंबाचा रस ओतल्याने कोविडचा विषाणू मरून जाईल. खूप लोकांनी ते करून पाहिलं. परिस्थिती खूप कठीण होती आणि बऱ्याच लोकांना काय करावं कळत नव्हतं. अनेकांनी हा व्हिडिओ बघून तस करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु त्याने विषाणू तर मेला नाही मात्र अनेकांना वेगळाच त्रास सुरु झाला.
इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप अशा प्लॅटफॉर्म्सवर ‘Health Influencers’ नावाची एक नवी फौज तयार झाली आहे. त्यांचे व्हिडीओ लाखोंच्या संख्येने पाहिले जातात, त्यांचे सल्ले फॉलो केले जातात, पण त्यांचं प्रशिक्षण, त्यांच्या माहितीचा आधार आणि त्यामागचा हेतू हे फार कमी वेळा तपासले जातात. Health Influencers च्या या ट्रेंड्समुळे लोक अॅलोपथीऐवजी फक्त नैसर्गिक अन्नावर भर देऊ लागले आहेत. 
हे इन्फ्लुएन्सर्स अनेक वेळा डॉक्टर नसतात. त्यांना मेडिकल डिग्री नसल्यानं, त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. उदाहरणार्थ, कोणी डायबेटीससाठी घरगुती उपाय सांगतो, कोणी थायरॉईडसाठी दूध-हळद, कोणी वजन कमी करण्यासाठी औषधं. काही वेळा या सल्ल्यामुळे लोक खरे उपचार घेणं थांबवतात — ज्यामुळे परिस्थिती अधिक बिघडते.
'व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी'चा नवा चेहरा
पूर्वी जशी खोटी माहिती WhatsApp वर फॉरवर्ड होत असे, तशीच आता या इन्फ्लुएन्सर्समार्फत ‘ब्रँडेड’ स्वरूपात सोशल मिडियावर पसरते आहे. आणि ही माहिती वाऱ्याच्या वेगानं पसरते. डॉक्टरांना तिचं खंडन करणं, त्यावर विश्वासार्ह माहिती देणं हे खूप कठीण जातं. फॅक्ट-चेक करणाऱ्या संस्थांनाही या स्पीडला गाठणं शक्य होत नाही. एका बाजूला Misinformation वाढते आहे, आणि दुसऱ्या बाजूला लोकांची खरं माहिती शोधायची सवय कमी होते आहे. Instagram reels, YouTube shorts, आणि WhatsApp मेसेजेस यातून लोक आरोग्यावरचे निर्णय घेतात. पण हे निर्णय कधीकधी चुकीच्या दिशेला नेतात.
"रुटीन पाळा, औषधांची गरजच नाही" — हे मत आहे विक्रम सिंह मीणा यांचं, जे बिस्वरूप रॉय चौधरी यांच्या टीममध्ये डाएटिशियन म्हणून काम करतात. चौधरी यांचं सोशल मीडियावर मोठं फॉलोइंग आहे. त्यांचे इंस्टाग्रामवर 3.76 लाख फॉलोअर्स आणि यूट्यूबवर पूर्वी 10 लाखाहून अधिक सब्सक्राइबर्स होते.
संबंधित लेख वाचा: 1) वडापाव, समोसा, कचोरी ठीक आहे, पण आता फक्त 5 ग्रॅम मीठ…? |
त्यांच्या एका व्हिडीओमध्ये ते सांगतात की, ताप बरा करायचा असेल तर फक्त पाय गरम पाण्यात 30 मिनिटं बुडवा, ताप अर्ध्या तासात कमी होईल. औषध घेतलं तर उलट ताप वाढतो, “जे 5 दिवसांत बरे झालं असतं, ते 15 दिवस लागतील,” असं ते ठामपणे सांगतात.
त्यांनी दावा केला की एक जपानी डाएट कॅन्सरही बरा करू शकतो. चौधरी यांचे 33 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि ते स्वतःला ‘Dr. BRC’ म्हणवतात. मात्र, त्यांचे दावे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचं फॅक्ट-चेकर्स आणि डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
"इन्फ्लुएंसर्स म्हणजे जाहिरातदार" — पण नियंत्रण कुठे आहे?
डॉ. गुप्ता विचारतात, “रणवीर सिंग SuperYou प्रोटीनचं प्रमोशन करतो, पण तो प्रोटीनमध्ये किती मीठ आणि फॅट आहे हे सांगतो का?” त्यांनी एक RTI (माहितीचा अधिकार) दाखल केला, त्यात गेल्या दीड वर्षात (सप्टेंबर 2023–मार्च 2025) सरकारने एकाही जाहिरातीला 'दिशाभूल करणारी' म्हणून घोषित केले नाही.
2023 मध्ये, ग्राहक व्यवहार विभागाने ‘हेल्थ व वेलनेस इन्फ्लुएंसर्स’साठी काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली होती. “दररोज सनस्क्रीन वापरा,” “हळदीचं दूध प्या,” किंवा “पाणी प्या” असे सामान्य सल्ले द्यायला हरकत नाही. मात्र, आरोग्य तज्ज्ञ असल्याचा दावा करताना स्पष्टता ठेवणं बंधनकारक आहे. 
सरकारने इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी काही नियम दिले आहेत, पण ते फारसे कठोर नाहीत. आता आरोग्य म्हणजे फक्त ‘वेलनेस’ किंवा तंदुरुस्ती असा समज होऊ लागला आहे, आणि त्यामुळे काहीही चालतंय असं वाटू लागलं आहे. बर्याच जणांनी स्वयंपाकघरातील उपाय, जुनं ज्ञान आणि आपला अभिमान याच्या नावावर अॅलोपथी आणि आधुनिक वैद्यकशास्त्रावर अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. फॅक्ट-चेक करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती म्हणजे ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’चा पुढचा टप्पा आहे — अशी एक व्यवस्था जी लोकांच्या अज्ञानावर आणि चुकीच्या माहितीवर वाढत राहते.
“सरकारचं लक्ष आरोग्याचं संरक्षण करण्यात नाही, जेणेकरून व्यावसायिक हितसंबंध किंवा कॉर्पोरेट्स यांना त्रास होईल,” असं न्युट्रिशन ॲडव्होकेसी इन पब्लिक इंटरेस्ट (NAPI) चे डॉ. अरुण गुप्ता सांगतात, “सरकारने हे स्पष्ट केलं पाहिजे की नेमकं दिशाभूल करणं म्हणजे काय. जाहिरातींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संरक्षण देता येणार नाही. नियम खूपच अपुरे आहेत, आणि हेल्थ इन्फ्लुएन्सर्सच्या डीएम (Direct Messages) अक्षरशः भरून वाहत आहेत. इतकं की आता प्रमाणित डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सुद्धा आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी कंटेंट बनवत आहेत. पण फक्त 15 सेकंदांच्या रीलमध्ये इतकी गुंतागुंतीची आरोग्याची माहिती कशी देणार? "
रीलमध्ये उपचार: परंतु वैज्ञानिक आधार आहे का?
उदाहरणार्थ, उपासना व्होरा, ही एक आरोग्यविषयक कंटेंट क्रिएटर, तिच्या रीलमध्ये सांगते की काळे तीळ खाल्ल्याने केसांचे फाटलेले टोकं सुधारतात. घशाला सूज आल्यास, ती सुचवते की तुळशीची पानं, मीठ आणि देशी तूप एकत्र करून गळ्याला लावा. तिच्या अनेक व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळतात, आणि कमेंट्समध्ये लोक अजून उपाय विचारतात, जसे की त्वचेसाठी, केसांसाठी, पचनासाठी.
सतीशकुमार श्रीवास्तव यांना त्यांच्या आजूबाजूच्या अनेक लोकांनी फॉलो केलेले आरोग्याचे विचित्र ट्रेंड्स आठवतात. मित्र, नातेवाईक यांच्यासह. त्यांच्याच एका नातेवाइकाने ‘हक्की पक्की आदिवासी केसांचा तेल’ हे सबस्क्रिप्शन घेऊन पैसे खर्च केले, ज्यामध्ये केस पुन्हा उगवतात आणि मुळं बळकट होतात, असा दावा केला गेला होता जो नंतर खोटा ठरला. त्याशिवाय, “रात्रभर ठेवलेले कांदे खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो” असा दावा करणारे अनेक व्हिडिओ त्यांना वारंवार दिसले.
या चुकीच्या माहितीच्या लाटेसोबतच, आता काही लोकांकडून प्रतिकारही सुरू झाला आहे. काही व्यावसायिक, जसं की Masala Lab चे Krish Ashok, यकृततज्ज्ञ डॉ. सायरेक अॅबी फिलिप्स (ज्यांना The Liver Doc म्हणून ओळखलं जातं), आणि The Healthy Indian Project (THIP) चालवणारे सुदीप्त सेनगुप्ता, हे मिथकं आणि ट्रेंड्सची सत्यता तपासत आहेत आणि चुकीची माहिती देणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सला उघड करत आहेत. पण तरीही, ते हेल्थ ट्रेंड्स चालवणाऱ्या लोकांइतके प्रभावी ठरत नाहीत.
“समस्या अशी आहे की आरोग्याच्या बाबतीत लोक अजूनही सहज फसतात,” असं सेंगुप्ता सांगतात. “डिजिटल साक्षरता वाढली असली तरी आरोग्यविषयक साक्षरता अजूनही तिथेच आहे.”
ओझेंपिक, ग्लुकोमा आणि 'सुपर फूड्स': अफवांचं साम्राज्य
डाएबिटीस आणि वजन कमी करण्यासाठी वापरलं जाणारं औषध ओझेंपिक, हे भारतात अधिकृतपणे विक्रीस नसतानाही, लोकांनी OTC (Over The Counter) विकत घेतलं आणि एक क्लायंट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, असं डाएटिशियन अचंतानी सांगतात. ऑस्ट्रेलियन इन्फ्लुएंसर बेल गिब्सन हिने स्वतः कॅन्सर बरा केला, असा दावा करत रेडिएशन आणि औषधं नाकारली — आणि तिच्यावर Netflix वर सुद्धा शो बनला: Apple Cider Vinegar.
Alt News चे प्रतीक सेंगुप्ता सांगतात की त्यांच्या टीमने बिस्वरूप चौधरी यांचे दावे अनेक वेळा फॅक्ट-चेक केले, आणि सर्व डॉक्टरांनी एकमताने ते "अवैज्ञानिक" असल्याचं नमूद केलं. सेंगुप्ता म्हणतात, "माझ्या कुटुंबातल्या एका 70 वर्षांच्या व्यक्तीने मला विचारलं 'मी हे डाएट सुरू करू का?'" हे दाखवतं की सोशल मीडियावर फक्त व्ह्यूज नव्हे, तर लोकांच्या आरोग्याच्या निवडीही प्रभावित होत आहेत. 
डॉ. सायरेक अॅबी फिलिप्स, हे यकृततज्ज्ञ आणि आयुर्वेद व होमिओपथीचे उघड टीकाकार आहेत आणि मोठमोठ्या ब्रँड्सना थेट सवाल विचारण्यास ते अजिबात घाबरत नाहीत. उदाहरणार्थ, The Good Bug या मुंबईस्थित गट हेल्थ स्टार्टअपबद्दल अनेक इन्फ्लुएन्सर्स भावनिक भाषणं देतात आणि त्याच्या फायद्यांचं गुणगान करतात. या स्टार्टअपने नुकताच 100 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.
डॉ. सायरेक फिलिप्स यांनी ‘The Good Bug’ या प्रोबायोटिक ब्रँडवर टीका केली की ते वजन कमी होणे, PCOD, IBS यासारख्या गोष्टींवर आधारहीन दावे करत असून ग्राहकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये The Good Bug ने हे आरोप “बिनबुडाचे” असल्याचं सांगितलं आणि विज्ञाननिष्ठतेची हमी दिली. यावरून हे समोर येतं की इंटरनेटच्या आगमनानंतर आरोग्याचं क्षेत्र किती गुंतागुंतीचं झालं आहे.
आज ग्राहकांवर एकाच वेळी विरोधाभासी तथ्यं आणि विविध समांतर कथा ढगासारख्या कोसळतांना दिसत आहेत. ज्या बहुतेक वेळा विश्वासाच्या प्रणालींवर आधारित असतात, आणि अनेक वेळा जाहिराती संशोधनासारख्या भासतात.
माहितीचा काळा बाजार?
आरोग्याची माहिती ही विज्ञानावर आधारित, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिळावी – हे साधं तत्त्व सध्या सोशल मीडियाच्या गोंधळात हरवतंय. बाजारातील दबाव, फंडिंग मिळवण्याची शर्यत, आणि लोकप्रियतेच्या हव्यासात हेल्थ इन्फ्लुएंसर्सचा काही भाग समाजाला चुकीच्या वाटेवर नेत आहे. शासनाकडून कठोर नियमन, नागरिकांकडून प्रश्न विचारण्याची तयारी आणि माध्यमांनी जबाबदारीने भूमिका बजावणं — हाच यावरचा एकमेव उपाय आहे.
साभार : The Print






