- परोमिता चक्रवर्ती
आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबद्दल, विशेषतः शेरेबाजीला आमंत्रण देऊ शकतील अशा घटनांबद्दल सार्वजनिक जीवनातील स्त्रियांनी सावधगिरी बाळगत व्यक्त व्हावे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या या देशात महुआ मोईत्रा यांनी नेमके उलट वर्तन केले आहे.
आपल्याप्रमाणेच राजकारणात असलेल्या बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांच्याशी खासगीरीत्या पार पाडलेल्या आपल्या विवाहाची छायाचित्रे त्यांनी समाजमाध्यमावर टाकली आहेत. या पन्नास वर्षीय तृणमुलच्या खासदारांनी त्यातून स्वच्छ संदेश दिला आहे की केवळ कुणाच्या तरी चौकटीत बसावे म्हणून स्वतःच्या वर्तनात त्या तिळमात्र बदल करणार नाहीत.
भारतीय राजकारणात स्वीकारार्ह होण्यासाठी स्त्रियांना बऱ्याचदा आपल्या व्यक्तित्वाला मुरड घालावी लागते. अशा वातावरणात महुआ यांची ही सामान्य कृतीसुद्धा क्रांतिकारी ठरते. काही काळापूर्वीच स्त्रीद्वेष्ट्यांच्या ट्रोलिंगला त्यांना तोंड द्यावे लागले होते. त्याचं व्यक्तिगत जीवन, सहचराची निवड, (नोव्हेंबर 23 मध्ये गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःच ही निवड अतिशय वाईट असल्याची कबुली दिली होती.), इतकेच काय थेट त्यांच्या पोशाखापर्यंत काही म्हणून त्या ट्रोलिंगच्या परिघाबाहेर राहिलं नव्हतं.
ऑक्टोबर 2023 मध्ये लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यांना लोकसभेच्या आचार समितीसमोर खेचण्यात आलं. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्याबद्दलची तक्रार महुआ यांचे माजी सहचर जय अनंत देहाद्राई यांनी पुरवलेल्या कागदपत्रांच्या आधारे दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीचा भर रीतसर प्रक्रियेपेक्षा नैतिक निवाडाखोरीवरच अधिक होता.
अशा एका सुनावणीदरम्यान या कांगारू कोर्टाला मान्यता द्यायला नकार देत त्या रागारागाने बाहेर पडल्या. त्यानंतर असहकार करणारी, उद्धट असा उद्धार करत आणि समाजाचे शिक्के न जुमानणाऱ्या स्त्रियांना सहज लावता येणारे “अवघड” हे विशेषण लावत त्यांना तडकाफडकी निष्कासित करण्यात आलं.
एखाद्या बाईने असे “अवघड” असणे म्हणजे स्त्री देहाबद्दल समाजात असणाऱ्या सामूहिक अस्वस्थतेचा भार वहात राहणे ठरते. बहुतेक सगळ्याच स्त्रियांना जुळवून घेण्याच्या संस्कृतीत लहानाचे मोठे व्हावे लागते. संघर्ष न करता अनुपालन करत रहा अशीच भवतालाची अपेक्षा असते.
'अवघड' असणे म्हणजे त्या अपेक्षेच्या, त्या संस्कृतीच्या विरोधात असणे. आणि म्हणून एखादी स्त्री जेव्हा नमते घ्यायला नकार देते तेव्हा तिला अविचारी, अवास्तव, उन्मादी, उखडलेली आणि अतिशय धोकादायक ठरवून वाळीत टाकू पाहणे सोपे असते. शतकभरापूर्वी रिबेका वेस्टने लिहिले होते त्याप्रमाणे “एखाद्या पायपुसण्यापेक्षा किंवा देहविक्रेतीपेक्षा स्वतःला वेगळे ठरवणाऱ्या भावना मी व्यक्त करते तेव्हा ते मला 'स्त्रीवादी' म्हणतात.”
2009 साली इन्व्हेस्टमेंट बँकरची नोकरी सोडून राजकारणात आल्यापासून, लोकांना आवडावे म्हणून आपला धारदार स्वभाव बदलायला महुआंनी नकारच दिलेला आहे. आपले संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या कृतीची संभावना 'एका महिला खासदाराचा अत्यंत हेकटपणे केलेला छळ' आणि “संसदीय समित्यांचे हत्यारीकरण' अशा शब्दांत करत भाजपच्या विरोधात आपण यापुढेही संसदेत, गटारीत आणि रस्त्यावरसुद्धा लढतच राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे.
संबंधित लेख वाचा: 1) महुआ मोइत्रा : माझ्यावर प्रेम करा किंवा तिरस्कार करा, माझी दखल तुम्हाला घ्यावीच लागेल… |
अशा बंडखोर पवित्र्यामुळे काही महुआ महान ठरत नाहीत. पण त्या चारचौघींपेक्षा वेगळ्या ठरतात. साच्यातल्या उरत नाहीत. त्यांची अद्वितीय वैशिष्ट्ये आणि त्यांच्या व्यक्तित्वाची धार भवतालाशी जुळवून घेण्याच्या दगडावर आदळून बोथट होत नाही.
‘गार्डियन’ला दिलेल्या त्याच मुलाखतीत मोईत्रा म्हणाल्या होत्या, “मी जशी आहे तशी आहे. त्याबाबत काही सारवासारव करणार नाही मी. तुमच्या आदर्श कल्पनांच्या साच्यात बसावं म्हणून मी माझ्यात बदल मुळीच करणार नाही. बदलायचंच असेल तर त्या साच्यानंच बदलावं आणि व्हावं हवं तर माझ्यासारखं. राजकारणात प्रवेश करण्यासाठी मी भारतात आले तेव्हाच माझी भूमिका माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होती. मला सार्वजनिक जीवनात यायचं जरूर होतं. पण माझे 'मी' पण अबाधित राखूनच.”
स्वतःच्या व्यक्तित्वातून बाहेर काढले जायला महुआ मोईत्रा नकार देतात. हा नकारच त्यांना रोचक बनवतो. जैसे थे वादाला आव्हान देतो. जितका कमी अवकाश व्यापाल, तितकी तुमची प्रतिष्ठा वाढेल अशा संस्काराचे ओझे वाहणाऱ्या स्त्रियांसमोर महुआ यांची बेदरकारी एक वेगळा पर्याय ठेवते.
भारतीय राजकारणात गुंतागुंतीचे वैयक्तिक आयुष्य असणाऱ्या पुरुष राजकारण्यांची संख्या काही कमी नाही. एम. करुणानिधींपासून ते जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयींपर्यंत अशी अनेक नावे सांगता येतील. परंतु सार्वजनिक चर्चेत या प्रकरणांचे फारसे तरंगही कधी उमटले नाहीत. त्यांची प्रेमप्रकरणे ही त्यांच्या आयुष्याचा गौण भाग मानली गेली.
सार्वजनिक सेवकांच्या व्यक्तित्वाचे एक महत्त्वाचे अंग या दृष्टीने त्याकडे पाहिले गेले नाही. महिला राजकारण्याच्या बाबतीत मात्र तिची प्रत्येक वैयक्तिक आवडनिवड ही तिच्या चारित्र्यावरील सार्वमताचा विषय बनते. हा दुटप्पी मापदंड पारडे एका बाजूला झुकवूनच थांबत नाही, तर तो एकंदर संरचनेतच असंतुलन निर्माण करतो.
सार्वजनिक जीवनात असलेल्या स्त्रियांसह प्रत्येक स्त्रीचा रास्त अधिकार असलेली मागणीच महुआ करत होत्या. आपल्या वैयक्तिक वर्तनाच्या नव्हे तर आपल्या राजकारणाच्या आधारे आपल्याला पारखले जावे, विस्कटलेले आयुष्य जगण्याचा, प्रेमात चुका करण्याचा, पुन्हा नवी निवड करण्याचा, आपले आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचा, थोडक्यात आपल्या बरोबरच्या पुरुषांना निर्विवादपणे उपजतच मिळतो तोच सामान्य हक्क रास्तपणे आपल्यालाही मिळावा एव्हढीच महुआची मागणी आहे.
संसदेतून त्यांची जाहीर हकालपट्टी केली गेल्यानंतर काही महिन्यातच, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णनगर मतदारसंघातील आपली जागा पुन्हा जिंकून महुआ संसदेत परतल्या आहेत. त्यांच्या विजयाचे श्रेय कुठल्या तरी एकाच बाबीला देणे हे अतिसुलभीकरण ठरेल. भारतीय राजकारणात नारी शक्ती हा आता सकारात्मक घोष बनलेला आहे. महिला आरक्षण विधेयकायोगे स्त्रियांचे प्रतिनिधित्व वाढवले जात आहे.
महुआ यांचा हा विजय, या भारतीय राजकारणात आता अशा अवघड स्त्रीलाही सामावून घेणे गरजेचे असल्याचेच दाखवून देतो. अगदी स्वतःसारखीच राहूनही जी नाती निर्माण करू शकते, आपल्या महत्त्वाकांक्षा किंवा आपली प्रेमभावना याबद्दल जी मुळीच शरमिंदी किंवा दिलगीर होत नाही, आणि सर्वार्थाने आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीची वागणूक आपल्याला मिळावी अशी जिची मागणी आहे अशी अवघड स्त्री.
चला तर मग… आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या या आक्रमक आणि रोखठोक महुआसाठी हातातील चषक आपण आज आनंदाने उंचावू या. त्यांना शुभेच्छा देऊ या. यापुढेही प्रदीर्घ काळ त्या अशा 'अवघड' च राहोत!
(अनुवाद: अनंत घोटगाळकर, साभार - इंडियन एक्स्प्रेस)






