घटना गेल्या आठवड्याची आहे… वॉशिंग्टन येथील मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात कंपनीचा पन्नासावा वर्धापनदिनाचा भव्य कार्यक्रम सुरू होता. बिल गेट्स, सत्या नाडेला, स्टीव्ह बाल्मोर अशी दिग्गज मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. आणि अचानक समोर बसलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीची एक कर्मचारी उभी राहिली आणि जोरात ओरडली,’’ शेम ऑन यू’... तुम्हा सगळ्यांना लाज वाटली पाहिजे, तुम्ही सगळे ढोंगी आहात…’’
ती महिला तेवढ्यावरच थांबली नाही. सुरक्षा रक्षक तिला सभागृहाबाहेर घेऊन जात असतानाही ती जोरजोरात ओरडून बोलत होती,’’मायक्रोसॉफ्टचे तंत्रज्ञान वापरून 50,000 पॅलेस्टिनींची हत्या करण्यात आली. तुमची हिंमत कशी झाली. त्यांची हत्या साजरी केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. इस्त्राइलशी संबंध तोडून टाका.” 
‘’शेम ऑन यू’... तुम्ही सगळे ढोंगी आहात…’’
आपले वरिष्ठ जे बोलतात त्या सगळ्याला ‘होय’ म्हणणं हे नोकरी टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं याची प्रत्येक कर्मचाऱ्याला कल्पना असते. त्यातून मिठाची गुळणी धरली जाते. पण त्या मुलीने बिल गेट्स, सत्या नाडेला आणि स्टीव्ह बाल्मोर यांच्या ‘कथनी आणि करनी’ ला भर सभागृहात ‘एक्सपोज’ केलं.
मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या या मुलीचे नाव आहे वाणिया अग्रवाल…ती एक भारतीय-अमिरेकन महिला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजंस विभागात वाणिया सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर काम करते.
संबंधित लेख वाचा: 1) गाझापट्टी जर ट्रम्प यांनी ताब्यात घेतली तर साऱ्या जगात उलथापालथ होईल हे नक्की…! |
वाणिया अग्रवालचे मायक्रोसॉफ्टला दिलेले राजीनामा पत्र का व्हायरल झाले?
आपल्या या कृतीनंतर वाणियाने मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीचा राजीनामा तर दिलाच परंतू राजीनामा देताना तिने मायक्रोसॉफ्टला एक खरमरीत पत्रदेखील लिहिले. आपल्या राजीनामा पत्रात वाणिया लिहिते,
हॅलो!
मी वाणिया. दीड वर्ष मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर मी आता मायक्रोसॉफ्ट सोडते आहे. कंपनीच्या ५० व्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनमध्ये सत्या नाडेला बोलत असताना त्याला रोखताना तुम्ही मला बघितलंच आहे… मला तेव्हा का बोलावंसं वाटलं आणि मी मायक्रोसॉफ्ट का सोडायचं ठरवलं ते आज मला तुमच्याशी शेअर करायचंय.
‘’गाझात सुरु असलेल्या जिनोसाईडला बळ देण्याचं काम माझ्या कष्टातून होतंय’’
पॅलेस्टाईनमध्ये इस्त्रायल करत असलेल्या नरसंहाराची सुरुवात 1948 मध्ये झाली. दीड वर्षापूर्वी मी मायक्रोसॉफ्टमध्ये आले तेव्हा त्या नरसंहाराचा चालू ‘एपिसोड’ मी बघत होते. इस्त्रायलकडून मानवी हक्कांची अंदाधुंद पायमल्ली होत असताना, शाळा आणि हॉस्पिटल्स नेम धरुन उद्ध्वस्त केली जात असताना, वर्णभेदाचा सरळ सरळ पुरस्कार होताना आणि यूएन, आयसीसी, आयसीजे सारख्या मानवाधिकार संघटनांकडून जागतिक स्तरावर त्याचा उघडपणे निषेध केला जात असताना आपण सगळेच उघड्या डोळ्यांनी त्याकडे बघतोय.
मी हे लिहित असताना तिकडे इस्रायलने पुन्हा एकदा ‘सीझफायर’ चं उल्लंघन केलंय आणि गाझात पुन्हा एकदा नृशंस हत्याकांडाला सुरुवात झालीये. गाझात इस्त्रायलने 15 पॅरामेडिकल स्टाफ आणि रेस्क्यू वर्कर्सना एक एक करत शोधून शोधून ठार केलंय. मी विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं, गाझात सुरु असलेल्या या जिनोसाईडला बळ देण्याचं काम माझ्या कष्ट आणि घामातून होतंय. जी कंपनी अशा अंदाधुंद हिंसेत सहभागी आहे, त्या कंपनीचा भाग असणं हे माझ्या नैतिकतेला धरुन नाही, म्हणून मी राजीनामा द्यायचं ठरवलंय.
खरं सांगायचं तर इतर अनेकांसारखीच मीही भारावले होते मायक्रोसॉफ्टमध्ये येताना. ‘पृथ्वीवरच्या प्रत्येकाला मोठं होण्यासाठी मदत करण्याच्या’ कंपनीच्या ‘मिशन’ ने मला भुरळ घातली होती. ‘मानवाधिकारांचा आदर आणि त्यांचा पुरस्कार करण्याच्या’ कंपनीच्या वचनबद्धतेवर मी विश्वास ठेवला खरा पण मागच्या दीड वर्षात मिलिट्री इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्समधल्या मायक्रोसॉफ्टच्या वाढत्या गुंतवणुकीचा मला अंदाज आलाय.
‘’गाझामधील नरसंहारात मायक्रोसॉफ्टचा तांत्रिक सहभाग’’
‘एपी’ च्या ताज्या बातम्यांमधूनही इस्रायल गाझात करत असलेल्या कृष्णकृत्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचा ‘तांत्रिक सहभाग’ असल्याचं समोर आलंच आहे. त्या बातमीत म्हटल्याप्रमाणे इस्रायलचं संरक्षण मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्टमध्ये 133 मिलियन अमेरिकन डॉलर्सचा करार झालाय. या करारांतर्गत मायक्रोसॉफ्ट अझ्यूर आणि एआय इस्रायलच्या स्टेट सर्व्हेलन्समध्ये योगदान देतात. गाझात पॅलेस्टिनी लोकांना लक्ष्य करुन मारण्यातही या तंत्रज्ञानाचं योगदान आहे. मायक्रोसॉफ्ट इस्रायली सैन्यासाठी काही ‘सेन्सिटिव्ह आणि हायली क्लासिफाईड’ प्रोजेक्ट्स करत असल्याचं काही गुप्त कागदपत्रांच्या गळतीतून समोर आलंय. ‘टार्गेट बॅंक’, पॅलेस्टिनी नागरिकांची रजिस्ट्री अशा काही प्रोजेक्ट्सचा त्यात समावेश आहे. गाझात वाट्टेल ती मनमानी करायला इस्रायलला मायक्रोसॉफ्ट क्लाऊड आणि एआयची मदत होते आहे. 
‘’डिजिटल शस्त्रांची निर्मिती करुन मायक्रोसॉफ्ट मानवी संहाराला हातभार लावतंय’’
इस्रायलला गाझात जे जे करायचंय त्यासाठी हवी ती मदत आपल्या कष्टातून आणि घामातून होते आहे हे यातून स्पष्टच होतं. त्यामुळे मला प्रश्न पडतो तो असा की आपल्या तंत्रज्ञानामुळे नेमकं कोण ‘empower’ होतंय? वर्णभेदाच्या राजवटीचा पुरस्कार करणारे अत्याचारी की मनमानी नरसंहार करणारे युद्धखोर? दुर्दैवाने या सगळ्यात मायक्रोसॉफ्टचा सहभाग आहे आणि डिजिटल शस्त्रांची निर्मिती करुन मायक्रोसॉफ्ट वर्णभेद, युद्ध, मानवी संहाराला हातभार लावतंय हे आता सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.
आपण या कंपनीचे कर्मचारी असण्यातून आपणही या नृशंस कृत्यात सहभागी आहोत किंवा त्या कृत्यांना आपला मूक पाठिंबा आहे असा संदेश जातो. आपण मायक्रोसॉफ्ट अझ्यूर किंवा एआयसाठी प्रत्यक्ष काम करत नसलो तरी आपल्या श्रमांचा परिपाक आहेच त्यात अप्रत्यक्षपणे का होईना…
हे सगळं डोळ्यांसमोर घडत असताना आपला वेळ, ऊर्जा, श्रम हे या कंपनीच्या वाढीसाठी खर्ची घालावेत असं मला आता वाटत नाही. कंपनीच्या इतिहासातल्या कृष्णकारकिर्दीचा भाग मी असावं हे माझ्या पचनीच पडत नाही. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देणं हा माझ्यासमोर असलेला एकमेक पर्याय आहे. पण हे कुठेतरी थांबावं असंही मला मनापासून वाटतं.
त्यामुळेच माझा राजीनामा कंपनीकडे सुपूर्द करण्यापूर्वीच मायक्रोसॉफ्टने गाझातल्या नरसंहाराला कुठल्याही प्रकारचं खतपाणी घालू नये अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मी सही केली आहे. कंपनीत असण्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये मी याबद्दल उघडपणे बोलायला हवं असं मला वाटलं, म्हणूनच परवा आपल्या ५० व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात मी सत्या बोलत असताना मध्ये बोलले आणि ही ईमेलही मी त्यासाठीच लिहिते आहे.
माझ्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडणं हा पर्याय अनेकांसाठी ‘प्रॅक्टिकल’ नसेल याची मला कल्पना आहे. पण तुम्ही काम करत असताना कंपनीने इस्रायलचा नाद सोडावा, नरसंहार आणि वर्णभेदाला खतपाणी घालू नये अशी मागणी तरी करु शकता, तेवढं प्लीज करा. मायक्रोसॉफ्टने आपल्या मूल्यांशी तडजोड करु नये हे पाहणं आता तुमच्या हातात आहे… त्यासाठी शक्य ते कराच!
फेअरवेल ॲंड फ्री पॅलेस्टाईन!
गुडबाय,
वाणिया!
कोण आहे वाणिया अग्रवाल?
वाणियाने 2016-19 या काळात ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून बॅचलर्स डिग्री घेतली. 2017 मध्ये विद्यापीठाने तिला 'ग्रेस हॉपर' शिष्यवृत्ती प्रदान केली होती. यापूर्वी तिने ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंटर्न म्हणून काम केलंय. 2023 पासून ती मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहे.
'ज्या कंपनीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये वंशसंहार घडवून आणत आहे, त्या कंपनीशी जोडलेलं राहणं हे माझ्या नैतिकतेला धरून नसल्यामुळे मी राजीनामा देत आहे', असं वाणियाने स्पष्ट केलं आहे. वाणिया वर्णभेदविरोधी विचारांच्या 'No Azure for Apartheid' नावाच्या गटाशी जोडली आहे.
(वाणिया अग्रवालच्या पत्राचा स्वैर अनुवाद - भक्ती बिसुरे कानोलकर)






