कराकरा वाजत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा रुबाब वाढविणाऱ्या कोल्हापुरी चपलेचा बाजार तसा कधीच मंदावला नव्हताच. पण गावच्या मातीशी जुळल्या गेलेल्यांच्या पायात झळकणारी कोल्हापुरी चप्पल देश-विदेशात पोहचली तेव्हा प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलली. पण मग आता प्रख्यात इटालियन फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणल्यावर सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट का उसळली?
PRADA चप्पल चोर! 400 रुपयांची कोल्हापुरी 1 लाखांना
इटलीची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलान शहरात प्राडानं नुकताच एक फॅशन शो आयोजित केला होता. यामध्ये मियुसिया प्राडा आणि राफ सिमन्स यांनी आपलं नवा कलेक्शन सादर केलं. त्यात कोल्हापुरीसारख्या दिसणाऱ्या चप्पलांचाही समावेश आहे. काही लोक या कलेक्शनला भविष्याची झलक म्हणत आहेत. परंतु, अनेकजण त्यावर टीका करत आहेत. प्राडा श्रीमंत लोकांना डोळ्यासमोर ठेवून उत्पादनं बनवत आहे. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत असल्याचं अनेकांनी म्हटलं.
इटालियन कंपनी प्राडा कोल्हापुरी चप्पल सारखी दिसणारी उत्पादनं विकत आहे. यामुळे या कंपनीवर टीकेची झोड उठली आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लक्झरी ब्रँड प्राडावर टीकेचा बाण सोडला. प्राडा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा फायदा घेत आहे. मात्र, त्याचं श्रेय ते भारतीय कारागिरांना देत नाहीत. प्राडा ही चप्पल एक लाख रुपयांहून अधिक किंमतीला विकत आहे.
गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्राडाच्या नव्या कलेक्शनचा फोटोही शेअर केला आहे. 'प्राडा कोल्हापुरी चप्पलसारखा दिसणारा प्रॉडक्ट १ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकत आहे. आमचे कारागीर तीच चप्पल हाताने 400 रुपयांना बनवतात. त्यांना नुकसान होतं, जागतिक ब्रँड आपल्या संस्कृतीतून पैसे कमवत असताना त्यांना त्रास होतो. हे अतिशय दुःखद आहे!' असं गोयंका म्हणाले,
मिळालाय जीआय टॅग
कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्रातील कोल्हापुरात बनवल्या जातात. या चप्पल 12 व्या शतकापासून बनवल्या जात आहेत. भारत सरकारनं 2019 मध्ये याला जीआय टॅग दिला. जीआय टॅगचा अर्थ असा की या चप्पल फक्त कोल्हापुरातच बनवता येतात. यामुळे कोल्हापुरी चप्पलची ओळख आणि महत्त्व अबाधित राहतं.
जीआय टॅग (GI Tag) असलेल्या कोल्हापुरी चप्पलची कॉपी करून विकताना किमान कोल्हापूरच्या कारागिरांना त्याचं श्रेय देण्याचं सौजन्य आणि ब्रॅन्डिंग करताना कोल्हापुरी चप्पल म्हणूनच ब्रॅन्डिंग करण्याचं भान जर प्राडा या कंपनीला नसेल तर अशा चप्पलचोर कंपनीवर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करायला हवी”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीकात्मक पोस्ट केली आहे.
शरद पवार, रोहित पवार, संभाजीराजे छत्रपती यांची टीका
तर कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांना पत्रकार परिषदेत या वादासंदर्भात विचारणा करण्यात आली. तेव्हा शरद पवारांनी पेटंटचा मुद्दा उपस्थित केला. “इटलीत जे घडलं ते चुकीचं आहे. त्यांच्यासाठी पेटंट घेणं आणि उत्तर देणं हा मार्ग आहे. पेटंट घेतलं पाहिजे. पेटंट घेतलं तर काम करता येईल. नाहीतर काहीही करता येणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.
प्राडा कंपनीच्या या चोरीबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवला आहे. “प्राडा कंपनीने कोल्हापूरी चप्पलचा उगम, इतिहास, कोल्हापूर भागातील कारागिरांची कौशल्यपूर्ण कला, किंवा भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेखही केलेला नाही. ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी नाही, ही कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची व शेकडो वर्षे हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
“राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला व कारागिरांना राजाश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली. कोल्हापूरी चप्पल हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून, शेकडो वर्षांची कारागिरी, कौशल्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिलं आहे.
“कोल्हापूरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना त्यासोबत त्या चपलेची मूळ ओळख देखील पोहोचावी, शेकडो वर्षे ही कला ज्यांनी जोपासली, टिकवली, वाढवली व विकसित केली त्या कारागीरांना त्याचा योग्य मोबदला मिळावा, त्या कलाकृती मागील संस्कृती, वारसा व परंपरेची देखील जगाला ओळख व्हावी, यासाठी कोल्हापूरी चप्पलला 2019 साली GI मानांकन मिळाले आहे.
या GI मानांकनाच्या अधीन राहून त्याचे सर्व नियम पाळत या कंपनीने कोल्हापुरी चपलेची विक्री केली असती तर कोल्हापुरी जगभरात पोहोचली म्हणून आंनदही व्यक्त केला असता, मात्र सरळसरळ डिझाईन कॉपी करून, चपलेची मूळ ओळख लपवून स्वतःच्या नावाने त्याची विक्री करणे हे कृत्य “सांस्कृतिक अपहार” (Cultural Appropriation) चे मोठे उदाहरण आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
कोल्हापुरी चप्पल कारागिरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
प्राडा कोल्हापुरीसारखी चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे तर, भारतीय कारागीर तीच चप्पल 400 रुपयांमध्ये बनवतात. या संदर्भात कोल्हापुरातील चप्पलबनवणारे कारागिरांमध्ये नाराजी पाहायला मिळत असून त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे प्राडाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
चप्पल बनवणाऱ्या एका समूहाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्राडाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि प्राडाच्या या कृतीवर तीव्र नापसंती दर्शवली. त्यांनी म्हटले की प्राडा भारतीय संस्कृतीचे शोषण करत आहे आणि स्थानिक कारागिरांना यामुळे पैशाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थिती, कारागिरांनी या संदर्भात योग्य कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
मात्र प्राडा कंपनी कडून अद्याप कोणताही प्रतिसाद पाहायला मिळालेला नाही. कोल्हापुरी चपलेला GI टॅग मिळाल्यामुळे तिची ओळख आणि महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे या चप्पलचे उत्पादन फक्त कोल्हापूरमध्येच होऊ शकते पण, प्राडाने कोल्हापुरी चप्पलेसारखे उत्पादन बाजारात आणल्यामुळे GI टॅगचे उल्लंघन झाले आहे का, याबद्दल कायदेशीर तपास होऊ शकते. 
सोशल मिडियावर PRADA ला शिव्या
फॅशन तज्ज्ञ व सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, प्राडाने त्यांच्या सँडलच्या डिझाईनसाठी कोल्हापुरी चप्पलला श्रेय दिले नाही. त्यांचे डिझाइन अगदी कोल्हापुरी चप्पलला मिळणारे आहे. त्यात तेच तपकिरी चामडे, पायाचा अंगठा व आकार दिसून येतो; परंतु ब्रँडच्या शो नोट्समध्ये भारत किंवा भारतातील कारागीरांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यावरूनच मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. जागतिक ब्रँड भारतीय संस्कृतीतून अनेक गोष्टी घेतात; पण भारताला श्रेय देत नाही, हे चुकीचे आहे, असे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले आहे.
‘एक्स’वरील एका वापरकर्त्याने म्हटले, “प्राडा कोल्हापुरी चप्पल 1.2 लाखांना विकत आहे. महाराष्ट्राच्या वारशाचं प्रतीक असलेल्या या हस्तनिर्मित चप्पल कोल्हापूरच्या बाजारपेठेत 300 ते 1500 रुपयांना विकल्या जातात. प्राडा त्यावर स्वतःचा लोगो लावून, त्यांना ‘लेदर सँडल’ म्हणते आणि आपली सांस्कृतिक मुळे पुसून टाकते. ही लक्झरी नसून चोरी आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, ही डिझाईन भारतातील चमार समुदायाकडून चोरण्यात आली आहे. ते पिढ्यान् पिढ्या या चप्पल हाताने विणून तयार करीत आहेत. त्यांना कोणतेही श्रेय देण्यात आलेलं नाही. ही लक्झरी ब्रँडिंगने केलेली चोरी आहे.”
उष्णतेपासून बचाव करणारी, जाडजूड असूनही बारीक नक्षीकामाचे वेगळेपण मिरवणारी ‘कोल्हापुरी चप्पल’ एरवीही अनेकांच्या व्यक्तिमत्त्वाची शान वाढवत असते. जगाच्या बाजारात दर्जेदार चप्पलनिर्मिती क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व आणि दर्जा आजही कोल्हापूरी चपलेने टिकवून ठेवला आहे. चप्पल निर्मिती क्षेत्रात कसबी कारागीर अपवादानेच घडतात अशी या क्षेत्राची जुनी तक्रार आहे. असे असताना जुन्या जाणत्या कारागिरांच्या बोटातील कसबेवर कोल्हापुरी चप्पलची शान आजही टिकून आहे. हायहिल्स आणि फ्लॅट शूजच्या युगातही कोल्हापुरी चप्पल आपले वेगळेपण टिकवून आहे.
या दरम्यान, प्राडाच्या या कथित कृतीमुळे भारतीय बाजारात नाराजी पसरली आहे आणि कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.त्यामुळे आता सरकार या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर PRADA ने मौन बाळगले असून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे, प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळू शकते.






