- भागा वरखडे
गंगोत्रीच्या 20 किलोमीटर आधी धारलीमध्ये ढगफुटी झाली. 57 सेंकदाने होत्याचे नव्हते झाले. उत्तराखंडमधील जोशीमठाच्या घटनेची आठवण ताजी झाली. गेल्या काही वर्षांत हिमालयात अशा घटना वारंवार घडत आहेत. धारली, सुखी टॉप, हरिद्वार एकामागून एक निसर्गाच्या प्रकोपाचा अनुभव येत गेला. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी गावेच्या गावे वाहून गेली. त्यात किती मृत्यू झाले, संपत्तीची किती हानी झाली, हे कळायला मार्ग नाही.
गंगा कोपली, की काय होते, याचा अनुभव उत्तराखंडमधील धारालीपासून थेट वाराणसीपर्यंत अनेकांना आला. भागीरथी नदी (गंगा) ने येथे आपले भयानक रूप धारण केले. बाल कंधार मंदिरापर्यंत नदीला तलावाचे रूप आले होते. असंख्य घरे, हॉटेल्स, ‘होम स्टे’, मंदिरे इत्यादी उद्ध्वस्त झाली आहेत. श्रावणामुळे गंगोत्रीत गर्दी होती. त्यातच ही घटना घडल्याने किती जण वाहून गेले, हे कळायला मार्ग नाही. धारलीचे कल्प केदार मंदिर उद्ध्वस्त झाले आहे. शेकडो वाहने अडकली आहेत. प्रवासी बेपत्ता आहेत.
गंगा जेव्हा कोपते तेव्हा…
आपत्ती निवारण कितीही जलद असले, तरी गंगोत्री ते उत्तरकाशी हा महामार्ग घाईघाईने दुरुस्त करता आला नाही. हर्षिलचा आर्मी बेस कॅम्पदेखील वाईट स्थितीत आहे. धाराली आणि सुखी टॉप दरम्यान दोन हेलिकॉप्टर बेस प्लॅटफॉर्म (हेलिपॅड) आहेत, ते देखील उद्ध्वस्त झाले आहेत. जेव्हा ही दुर्घटना घडली, तेव्हा धारलीमध्ये शेकडो पर्यटक होते. याशिवाय हर्षिल खोऱ्यात पर्यटकही जमतात. कोणालाही जीव वाचवायची संधी मिळाली नाही.
डोंगरांवर ढग फुटतात, म्हणजेच मुसळधार पाऊस पडतो. पावसाचे पाणी चिखल आणि लहान दगड सोबत आणते. ते पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत, इतका मलबा असतो, की घरे, दुकाने इत्यादी सर्व उद्ध्वस्त होते. सरकार म्हणू शकते, की ही नैसर्गिक आपत्ती आहे किंवा आम्ही इशारा दिला होता; पण हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे सरकार तेवढ्या गांभीर्याने घेत नाही आणि हवामान खात्याचेही अंदाज चुकत असल्याने सरकारलाही त्यावर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न पडतो.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नदीच्या पायथ्याशी घरे आणि दुकाने बांधण्याची परवानगी कोणी दिली. अर्थात हा प्रश्न एकट्या धारलीपुरता नाही. मुंबईत मिठी नदी अस्तित्वात आहे, हे महाप्रलयानंतर कळले. पुणे, मुंबई, बेंगळुरू अशा अनेक शहरांतील निचऱ्याच्या जागा, ओढे, नाले, साठवण तलाव आता कागदोपत्री अस्तित्त्वात आहेत. तिथे सिमेंटची जंगले झाली आहेत. त्यामुळे थोडा जरी जास्त पाऊस झाला, तर ही शहरे तुंबतात. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आदी ठिकाणी तर नदीपात्राचाच बांधकामांनी घास घेतला आहे.
राजकारणी, स्थानिक स्वराज्य संस्थातील पदाधिकारी आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे नद्यांच्या ब्लू लाईन, रेड लाईन अस्तित्त्वात राहिल्या नाहीत. पूररेषेत बांधकामे झाली आहेत. जोशी मठासह अनेक ठिकाणी नद्यांच्या पात्रानजीक पूररेषेत बांधकामे झाल्याने जेव्हा कमी काळात जास्त पाऊस पडतो, तेव्हा नद्यांचे पाणी पात्र सोडून लगतच्या भागात घुसते. गेल्या वर्षी पुणेकरांनी त्याचा अनुभव घेतला आहे. उत्तराखंडमध्ये हा अनुभव आता वारंवार यायला लागला आहे.
जलविद्युत प्रकल्प, टर्बाइन आणि ढगफुटी
उत्तराखंडमध्ये मंगळवारी झालेली घटना ही 2013 नंतरची सर्वात मोठी दुर्घटना आहे. नदीच्या पात्रातील बांधकामे सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय होत नाहीत. उत्तरकाशी हे जिल्हा मुख्यालय आहे आणि गंगोत्री तेथून 100 किलोमीटर अंतरावर आहे. या संपूर्ण मार्गावर अनेक ठिकाणी तीव्र वळणे आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खूपच अरुंद आहे आणि डोंगर अनेकदा कोसळत राहतात. याचे कारण म्हणजे येथील डोंगर पोकळ आहेत.
| संबंधित लेख वाचा: 1) खरंच, पाऊस पकडायला हवा! |
लोहारी नाग पाला येथे 600 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आला. या भागात जलविद्युत प्रकल्प तसेच अन्य काही कामे करू नयेत, असा तज्ज्ञांचा सल्ला होता. तो डावलण्यात आला. विकासकामे करताना त्याच्या परिणामांचे भान ठेवले नाही, की काय होते, याचा अनुभव आता वारंवार येऊनही आपल्या धोरणकर्त्यांना कळत असूनही वळत नाही.
टिहरी भागात पर्वत पोकळ करण्यात आले आणि वीज निर्मितीसाठी त्यांच्या आत टर्बाइन बसवण्यात आले. पर्वत पोखरल्यानंतर अचानक 2006 मध्ये पर्यावरण विभागाला जाग आली. त्याने वरातीमागून घोडे नाचवून बंदी घातली; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता, आता ढगफुटी, बर्फवृष्टीसारख्या घटनांनी पर्वत कोसळतात. ढग फुटण्याच्याही अनेक घटना घडतात. 2013 मध्ये जेव्हा केदारनाथची घटना घडली, तेव्हा हा मार्ग अनेक महिने बंद होता. एक दगड हलला, तरी आपत्ती निर्माण होते. पावसात पर्वत धोकादायक बनतात. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचतात. असे असूनही, संपूर्ण श्रावण महिन्यात या मार्गावर कावडिया मोठ्या संख्येने येतात. ते मैदानी प्रदेशातून ट्रकमध्ये सामान आणि प्रवासी घेऊन येतात.
शक्य तितका माल भरण्यासाठी ते ट्रकची उंची निर्धारित मानकांपेक्षा जास्त ठेवतात. त्यांना पर्वती भागातील रस्त्यांवर गाडी चालवण्याची माहिती नसते. त्यांना दरीच्या कडेने गाडी चालवण्याची भीती वाटते, म्हणून ते रस्त्याच्या मधोमध गाड्या चालवतात आणि अनेकदा दुसऱ्या वाहनाला जागा देताना ते ट्रक डोंगराजवळ उभा करतात. अशा वेळी डोंगरावरील एक दगड जरी हलला, तरी तो आपल्यासोबत अन्य अनेक दगड, माती घेऊन येतो. त्यामुळे नुकसान होते. झाडेदेखील तुटतात. झाडे तुटणे आणि दगड पडण्याबरोबरच ढग फुटतात.
दिसेल तिथे हॉटेल आणि रेस्टॉरंटस्
निसर्ग हा नेहमीच संतुलनावर आधारित असतो. जर एकही दगड घसरला, तर संपूर्ण संतुलन बिघडू लागते. याशिवाय हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाब येथून डाक कानवड आणणारे लोक त्यांच्या ट्रकमध्ये डीजे वाजवत राहतात आणि मोटारसायकलींचे सायलेन्सर काढून टाकतात. त्यामुळे खूप आवाज होतो. गर्दीमुळे सर्वत्र कचरा पसरतो. आवाज आणि कचरा जंगलातील शांतता भंग करतो. जंगलात राहणारे प्राणी इकडे तिकडे धावतात. बाहेरून येणारे लोक त्यांच्या गरजांसाठी अंदाधुंदपणे झाडे तोडतात. परिणामी, झाडे पावसाचे पाणी किंवा माती घसरण्यापासून रोखू शकत नाहीत. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे ढगफुटी आणि डोंगर घसरणे थांबवणे अशक्य आहे.
दरी किंवा विस्तीर्ण जागा जिथे दिसेल तिथे हॉटेल आणि रेस्टॉरंटस् उघडणे चुकीचे आहे. उत्तरकाशी-गंगोत्री दरम्यान भटवारी आणि गंगानानी नंतर धारली हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथून सरळ चढाई सुरू होते. बहुतेक लोक येथेच खरेदी करतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, नाश्त्याचे पदार्थ आणि फळे आदी घेऊन नंतर चढाई सुरू होते.
पर्यटक येथेच त्यांची वाहने दुरुस्त करून घेतात. कारण पुढे काहीही उपलब्ध नाही, म्हणून येथे नेहमीच गर्दी असते. धारलीला पर्यटकांची ये-जा असते. हे ठिकाण हर्षिलपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तिथे दुर्घटना झाल्यानंतर सुखी टॉपमध्ये तसेच घडले. मुसळधार पावसामुळे 8000 फूट उंचीवर असलेले हे गाव ढिगाऱ्याखाली दबले. धारली येथील गंगोत्री रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी किमान 20 दिवस लागतील आणि पक्का रस्ता तयार करण्यासाठी अडीच महिने लागतील.
ढगफुटी आता भूकंपासारखे नुकसान करते. हिमालय पर्वत भुसभुशीत आहे. त्याचा खडक कठीण नाही. त्यामुळे ते खोदताना आणि तेथे रस्ते बांधताना काळजी घेतली पाहिजे. चंबा ते दुंडापर्यंत चार पदरी महामार्ग बांधण्यात आला आहे; परंतु अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ता बंद आहे. सरकार उत्तराखंडमध्ये पर्यटन सुलभ करण्यासाठी मैदानी प्रदेशांप्रमाणेच प्रयत्न करत आहे, म्हणूनच मैदानी प्रदेशातील शहरांमध्ये अनेकदा भूकंप होतात आणि पर्वतांमध्ये ढग फुटल्याने अपघात होतात. पर्वतातील लोकांना हे अपघात समजतात; पण मैदानी प्रदेशातील पर्यटकांना नाही. म्हणूनच, जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा पर्यटकांना स्वतःला वाचवण्याचा मार्ग सापडत नाही.






