(संजना खंडारे)
‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरो (एनसीआरबी) च्या अहवालानुसार, 2017 ते 2021 या कालावधीत भारतात एकूण 35,493 हुंडाबळीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा, की दररोज सरासरी 20 महिलांचा हुंड्यामुळे बळी जातो. या मृत्यूंपैकी बहुतांश घटना उत्तर भारतात घडतात, जिथे सामाजिक दबाव, पितृसत्ताक मूल्ये आणि आर्थिक असमानता अधिक तीव्र आहे.
उत्तर प्रदेश 7,048, बिहार 4,891, मध्य प्रदेश २,979, पश्चिम बंगाल 2,576, राजस्थान 2,276, महाराष्ट्र 998, आंध्र प्रदेश 869, ओडिशा 785, झारखंड 721, कर्नाटकात 611 महिलांचे हुंडाबळी जातो. महाराष्ट्र देशाच्या औद्योगिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक मानले जाते; परंतु हुंडाबळीच्या बाबतीत राज्याचा सहावा क्रमांक असणे, हे सामाजिक विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
यासंबंधीची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आपल्या सामाजिक विकासाचा खरा आरसा दाखवणारी…
घटना 2006.. स्थळ नाशिक… एका खेडेगावातील गरीब कुटुंबातील मुलीचं लग्न होतं. आई-वडिलांची ती एकुलती एक मुलगी.चांगलं स्थळ आल्यामुळे मुलीचं लग्न झालं.. लग्नाला एक महिना झाला... मुलीने तिच्या सासरी काहीतरी भाजी केली आणि त्यात मीठ कमी पडलं. नवऱ्याला या गोष्टीचा प्रचंड राग आला.. आणि त्या नवऱ्याने तिला कानाखाली एक चापट मारली... या घटनेनंतर मुलगी सरळ दुसऱ्या दिवशी कोणाला न सांगता माहेरी निघून आली. तिच्या आई-वडिलांनी तिला एकही प्रश्न केला नाही की तू इतक्या पहाटे का आली. त्यांनी तिला राहू दिलं. तुला सासरी जायचं का? हे सुद्धा त्यांनी विचारलं नाही.
आठ-पंधरा दिवसानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. सोयरीक जुळवणारी जी मध्यस्थीची लोक असतात त्यांना वाटलं नवीन लग्न झालेलं आहे.. संसार कशाला मोडू द्यायचा. म्हणून त्यांनी दोन्ही ठिकाणी निरोप पाठवला. मुलाच्या आई-वडिलांनी सांगितलं, "आम्ही काही मुलीच्या आणायला जाणार नाही दोन्ही गावाच्या मध्ये जे गाव आहे तिथे आम्ही येऊ त्यांनीही तिथं यावं. पाच पंचासमोर येऊन चर्चा करावी तिथून आम्ही मुलीला घेऊन घरी जाऊ." ठरल्याप्रमणे सगळं झालं. दोन्ही कुटुंब त्याठिकाणी गेले, चर्चा झाली.
मुलाने त्याची चूक मान्य केली. मुलगीही सासरी जायला तयार होती. हे सगळं व्यवस्थितरीत्या होत होतं. तेवढ्यात मुलीचे सासू-सासरे म्हणाले तुमची मुलगी येत आहे. आम्ही नांदायला घेऊन जात आहोत पण त्याआधी आमच्या काही अटी आहेत. पहिली अट अशी, "मुलीच्या आईवडिलांनी दोन्ही गावातील लोकांसमोर आमची माफी मागावी ती यासाठी कारण मुलीने त्यांना पंचासमोर आणलं त्यामुळे त्यांची इज्जत गेली" दुसरी अट अशी, "माहेरच्यांनी मुलीला भेटायला यायचं नाही. सणवार असेल तर तिचा नवरा एक दिवसासाठी तिला आणेल आणि घेऊन जाईल."
मुलीच्या आई-वडिलांनी ते सगळं ऐकून घेतलं. पंचाने मुलीच्या घरच्यांना विचारलं यावर तुमचं काय मत आहे. मुलीच्या आईने फार शांतपणे यावर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या," पहिली गोष्ट मला तुमच्या या कोणत्याही अटी मान्य नाहीत. दुसरी गोष्ट तुम्हाला माझ्या मुलीला न्यायचं असेल तर न्या नाहीतर माझी मी तिला सांभाळायला खंबीर आहे.’’ त्यांनतर सासरच्या लोकांनी असं सांगितलं, "तुमची मुलीची बाजू आहे ती पडती असते. तुम्हाला ते नमतं घ्यावंच लागेल." तेव्हा मुलीच्या आईने त्याला असं उत्तर दिलं .
"ठीक आहे आमची मुलीची बाजू आहे. पण ती पडती नाहीये. विहीणबाई तुम्ही मला एक उत्तर द्या. ज्यावेळेस तुमच्या पोटात तुमचा मुलगा होता. त्यावेळेस मुलाला जन्म देताना तुम्हाला ज्या कळा आल्या त्या मुलगा होता म्हणून तुम्हाला कमी कळा आल्या का? आणि माझ्या पोटात मुलगी म्हणून मला जास्त कळा आल्या का? मग माझी बाजू पडती कशी? मी मुलगी दिली व्यवहार नाही केला. वाटलं तर मुलगी न्या नाहीतर चालते व्हा…"
हा निर्णय होता एका अडाणी बाईचा तिच्या मुलीसाठी. अडाणी या अर्थाने की तिच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नव्हती. एक शेतमजूर बाई होती. तिच्याकडे अवाढव्य पैसा नव्हता. त्यावेळेस समाजाचा विचार न करता तिने तिच्या मुलीसाठी बाजू मांडली आणि निर्णय घेतला. हा असा खंबीर निर्णय आपल्याकडे बहुतांश लोक प्रतिष्ठेच्या नावाखाली घेत नाहीत. आणि यामुळेच वैष्णवी हगवणे सारखी प्रकरणं समोर येतात.
काय आहे वैष्णवी हगवणे प्रकरण?
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून 23 वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली.
त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कृर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.
या प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात. वैष्णवी ही मोठ्या घरातील असून एका राजकीय पक्षाशी तिच्या सासरच्यांचा संबंध असल्याने सगळीकडे हे प्रकरण चर्चिले जात आहे का? महाराष्ट्रात हुंडाबळीमुळे कित्येक मुली जीव गमावतात त्याची चर्चा का होत नाही? हुंडाप्रतिबंधक कायदा 1961 साली लागू झाला असून आज तो मोडकळीस कसा आला? समाजात आजही भेटवस्तू च्या नावाखाली छुप्या पद्धतीने हुंडा दिला जातो का? शिक्षित मुली असूनही आत्महत्या का करतात? असे अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’ने केला आहे..
मुलींनी स्वतःच्या हक्काबाबत जागृत राहायला हवं - ऍड. प्रीती डिग्गीकर
छ. संभाजी नगरच्या ऍड. प्रिती डिग्गीकर म्हणतात, "बरीच लोकं म्हणतात की हुंडापद्धत आता बंद झालीये. 1980-90 च्या दशकात हुंडा प्रकार जास्त चालायचा, आता असं काही होत नाही. मात्र असं काही नसून आता छुप्या स्वरूपात हुंडा घेतला जातो. वैष्णवी हगवणे प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी वगैरे घेतली पण असं सांगितलं जातंय. 
मुलींच्या घरच्यांनी मुलीला भेट म्हणून ते सगळं दिलं. हे आताचं प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे. पण आतापर्यंत बऱ्याच केसेस मध्ये मी अश्या गोष्टी बघितल्या आहेत. मी हुंडाबळीच्या ज्या केसेस बघते त्यामध्ये 'मॅट्रिमोनियल मॅटर' मध्ये नवरा बायकोच भांडण होतं, त्या दोघांची समजूत काढून त्यांचं कॉऊन्सलिंग करून त्या मुलीला सासरी पाठवलं जातं इथपर्यंत ठीक आहे. पण, जेव्हा मुलीच्या जीवावर बेतण्यासारख्या गोष्टी असतात.
जिथे थेट हुंडा न मागता भौतिक गोष्टींची डिमांड केली जाते. जसे की, फ्रिज, टीव्ही, गाडी पाहिजे, इतकं सोनं पाहिजे, इतका पैसा पाहिजे, हे आजही सर्रास होतं. हे अजूनही संपलेलं नसून छुप्या पद्धतीने सगळं काही चालू आहे. जुन्या आयपीसी कायद्यानुसार कलम 498 जेव्हा दाखल करण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला जातो. तेव्हा पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये त्या मुलीची समजूत काढली जाते. पण तिथे प्रथमदर्शनी जर असं दिसून येत असेल की मुलीला मारहाण होत आहे तिचा आतोनात छळ केला जात आहे. त्याठिकाणी तिचं काऊंसिलिंग करण्यात काहीच अर्थ नाही आणि तिच्या आई-वडिलांनी तिला पुन्हा परत पाठवूच नये.
ऍड. प्रीती डिग्गीकर पुढे सांगतात "आताच्या काळात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलीने स्वतःच्या हक्काबाबत जागृत राहायला हवं. ऐंशीच्या दशकात जसं होतं ते चित्र आता नाहीये, मुली सुशिक्षित आहेत. आता आईवडील मुलींना व्यावहारिक शिक्षण ही देत आहेत. मुलींना आर्थिक सक्षम होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जर आई-वडील सासरी जा म्हणत असतील आणि तिला जायचं असेल तर ती स्वतः साठी निर्णय घेऊन तिचं आयुष्य स्वतंत्र पद्धतीने जगू शकते.
मुलींनी स्वप्नवत दुनियेत राहू नये. लग्नाच्या वयात लग्न होतीलच, नको त्या वयात लग्नाची प्रेमाची स्वप्न पाहू नका. शिक्षण घ्या, करियर घडवा, आर्थिकरित्या सक्षम व्हा. लग्न-संसार या गोष्टी होणारच आहेत. पण तुम्ही स्वतःच्या पायावर कसं उभं राहणार हे महत्वाचं आहे. अनेकजण म्हणतात की हुंडाबळीच्या कायद्याची अमंलबजावणी होत नाही हे चुकीचं आहे. आपल्याकडे कायद्याची अमंलबजावणी होते. मात्र प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी फक्त न्यायव्यवस्था आणि तपासयंत्रणाच जबाबदार नाहीये. कारण ज्या व्यक्तीवर गुन्हा घडतो त्याची मानसिकता ही महत्वाची असते. बऱ्याचशा अश्या केसेस आहेत ज्यात साक्षीदार साक्ष बदलतात आणि आरोपी सुटतात."
10,00,000 दिये तो ही तुझे ससुराल लेके जायेंगे.. - आयेशा शेख
हुंड्यामुळे अनेक मुलींचा त्यांच्या सासरी छळ होतो. पण हजारो तक्रारी दाखलही होत नाही. गरीब घरातल्या मुलींना वकील करण्यासाठी पैसे नसतात. सरकारी वकील असताना तर कित्येक वर्ष त्या केसचा निकालच लागत नाही. छ. संभाजीनगर शहरातील आयेशा शेख या सामान्य कुटुंबातील मुलीला तिच्या नवऱ्याने लग्नाच्या सहा महिन्यानंतर माहेरी सोडून दिलं.
आज दीड वर्ष होत आहे ती तिच्या माहेरी आहे. ‘बाईमाणूस’ने तिच्याशी संपर्क साधल्यावर 24 वर्षांची आयेशा शेख सांगते, "मी सामान्य कुटुंबातून येते, माझे वडील रिक्षा चालवतात. तरीही त्यांनी मला चांगलं शिकवलं. मी सामान्य कुटुंबातून अशेल असं माझ्या राहणीमानावरून कोणालाही वाटत नव्हतं. वयाच्या 22व्या वर्षी माझं लग्न झालं. मी तेव्हा बीएड द्वितीय वर्षात होते. लग्नानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण करू वगैरे सांगितलं, पण तसं काही करू दिलं नाही. लग्न झाल्यावर त्यांनी पैशांसाठी टोमणे द्यायला सुरवात केली.
तुझ्या घरच्यांनी लग्नात काहीच दिल नाही, आता घर बांधायचं आहे. तुझ्या घरून दहा लाख रुपये घेऊन ये. असं म्हणत सहा महिने माझा छळ केला. मला मारहाणही केली. आई-वडील वयस्कर असल्याने त्यांना सांगितलं तर ते टेन्शन घेतील म्हणून मी घरी काहीच सांगितलं नाही. माझ्या आईची तब्येत खराब झाल्यावर मी माझ्या माहेरी आले. माझा नवरा मला घ्यायला आल्यावर बस स्टॅन्डपर्यंत गेल्यावर घरच्यांना पैशाबद्दल बोललीस का असं त्यांनी विचारलं… मी नाही म्हणल्यावर ते बस स्टॅण्डवर मला सोडून गेले. आज दीड वर्ष होत आहेत मी माझ्या माहेरीच आहे."
"पैसे घेऊन ये तेव्हाच तुला घरात घेऊ अशी माझी सासू आणि नणंद म्हणते. मी वर्षभराआधी सरकारी वकील लावून कोर्टात सासरच्यांविरोधात 498 ची केस ही टाकली मात्र वर्ष होऊन ही कोर्टाकडून नोटीस त्यांना गेलेली नाही. मी वाट बघतेय की कधी त्या केसचा निकाल लागतो आणि कधी मी ह्या सगळ्या टेन्शनमधून बाहेर पडते."
मुलांसाठी विवाहपूर्व समुपदेशन गरजेचं आहे...
स्त्रियांच्या प्रश्नांवर तसेच एकल महिलांसाठी काम करणाऱ्या रेणुका कड यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या, "सध्या सगळ्याठिकाणी चर्चेत असलेल्या हगवणे प्रकरणात एका गोष्टीवर दुर्लक्ष केलs जात आहे की, मुलीच्या घरच्यांनी एवढा पैसा दिला नेमका कशासाठी? मुलीने आत्महत्या केली त्यानंतर आपण कळा काढतोय त्याला अर्थ उरत नाही. जर घरात तुम्ही मुलीला एक चापटही मारत नसाल आणि तिच्या सासरी तिचा जीव जाईपर्यंत तिचा छळ होतो तर तुम्ही मुलींना काय शिकवता? शिक्षण इथे काय कामाचं जर ती मुलगी स्वतःला सुरक्षित नाही ठेऊ शकत? हे प्रश्न उभे राहतात.
लग्नानंतर मुलींसाठी जर तिचं सासर नवखं असतं तर मुलासाठी ही मुलीच्या घरचे नवखे असायला हवे. येणाऱ्या मुलीने सासरच्यां; सेवा करावी हे जसं गृहीत धरलं जातं तसं जावयाने ही तिच्या घरच्यांचा आदर करून त्यांची सेवा करावी. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन होणं गरजेचं आहे. ज्या देशात 1961 पासून हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. तो कायदा इतका मोडकळीस का आणला? की आजही आपल्याला हुंडाबळींची आकडेवारी हजारोंच्या संख्येत दिसते. हा प्रश्न कायम राहतो. पुन्हा कुठली हागवणे होऊ नये म्हणून तुम्ही काय करता? याचा विचार व्हायला हवा. 
सिनेमा आणि मालिकांमध्ये हुंड्याबद्दल काय दाखवलं जातं?
भारतीय सिनेमा अनेक वेळा हुंड्याच्या सामाजिक वास्तवाला पडद्यावर आणतो. 'दहेज' (1950) सारख्या जुन्या चित्रपटात हुंडा न मिळाल्यामुळे वधूवर होणारा छळ दाखवलेला आहे, तर 'विवाह' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' यासारख्या चित्रपटांमध्ये अप्रत्यक्षपणे "स्वाभाविक" गिफ्ट्सच्या नावाखाली हुंडा घेतल्याचे चित्रण आहे. 'शादी मी जरूर आना' मध्ये प्रत्यक्ष हुंडा घेतला जातो, तर 'Peepli Live' आणि '2 States' सारखे चित्रपट समाजातील आर्थिक दबाव आणि हुंड्याची मानसिकता अधोरेखित करतात. मराठीत 'जोगवा' आणि 'मीनाक्षी' या चित्रपटांतही हुंड्याचा अन्यायकारक प्रभाव दिसून येतो.
सामाजिक दबाव हा मुलीच्या जीवापेक्षा मोठा असतो का? - डॉ. स्मिता अवचार
समाजशास्त्राच्या प्राध्यपिका डॉ. स्मिता अवचार यांच्याशी बाईमाणूसने संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या, "इतक्या दिवस आपण म्हणत होतो बायका बिचाऱ्या अबला. तिच्यावर दबाव टाकतात त्यामुळे ती काहीच करू शकत नाही. हे आपण खूप सहजपणे म्हणून जातो. पण आता आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की ज्या मुली शिकलेल्या आहेत, नोकरी करतात त्या का नाही विरोध करत? त्या का हुंडाबळी बनतात? छ. संभाजीनगर शहरातलीच 4 वर्षांआधीच खूप चर्चिल्या गेलेली हुंडाबळीची केस म्हणजे उज्वला पाटील या स्त्रीरोगतज्ज्ञ मुलीची केस.
तिच्या वडिलांनी 21 लाख लग्नात हुंडा दिला होता. तिला दोन वर्षांचा मुलगा देखील होता. ती नोकरीही करत होती. असं असताना तिचा पैशांसाठी छळ होत असतांना ती स्वतःसाठी लढली का नाही? हा प्रश्न उपस्थित होतो. तिच्या वडिलांना त्या मुलीने पुन्हा त्याच घरात राहावं असं का वाटलं. सामाजिक दबाव हा मुलीच्या जीवापेक्षा मोठा असतो का? हे कळत नाही.
ती मुलगी कमवण्यासाठी सक्षम होती तर तिने तिच्या मुलाला सोबत घेऊन तिचं आयुष्य का नाही जगलं? या साठी तिच्या घरच्यांनी तिला सपोर्ट का नाही केला? जास्तीत जास्त काय झालं असतं दुसऱ्या शहरात तिला नोकरी करावी लागली असती. सुरवातीला अडचणी आल्या असत्या पण सावरलं असतं ना तिने. पण असं न होता जेवढे पैसे मागितले तेवढे तिच्या माहेरचे देत गेले आणि एक दिवस मुलीने आत्महत्या केली. अश्या अनेक घटना आहेत.
पुण्यात आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलीचा पैशांअभावी छळ होतो आणि एकदिवस ती आत्महत्या करते. या अश्या गोष्टींना शिक्षण का उभारी देऊ शकत नाही? आत्मविश्वास का देऊ शकत नाही? समाज एकटं राहण्यासाठी पाठिंबा का देत नाही? जी अशिक्षित आहे जी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे ती बाई संघर्ष करून दारुड्या नवऱ्याला लाथ मारून तिचे उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करते. मग शिक्षित मुलींना हे का जमत नाही? जात,धर्म,पंथ याच्यापलीकडे जाऊन या समस्या आहेत.
सर्व धर्मात या समस्या आहे. सुशिक्षित लोकांमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही जास्त चिंतेची बाब आहे. त्यात अजून एक गोष्ट म्हणजे राजकीय नेतृत्वाकडे समाजाला दिशा देणारं नेतृत्व म्हणून आपण बघतो. पण त्यांच्या घरात जर असं घडत असेल तर आशा कोणाकडून करायची? त्यात हे घडतं पुरोगामीपणाचा टेंभा मिरवणाऱ्या पुण्यात? जिथे आज अनेक कार्यकर्ते आम्ही पुरोगामी आहोत असं म्हणून मिरवतात त्या पुण्यात ? आताच्या या प्रकारणात गुन्हा हा एका व्यक्तीवर होता काम नये तर ज्यांनी हुंडा दिला त्यांच्यावर दिला म्हणून गुन्हा, ज्यांनी घेतला त्यांच्यावर घेतला म्हणून गुन्हा आणि छळ करून त्या मुलीला संपवलं म्हणून गुन्हा दाखल करायला हवा.."




