(विजय विनीत)
दुपारची वेळ होती. शाळेची घंटा झाली होती. पण त्याचवेळी एका फोन कॉलने एका निरागस जीवाच्या आयुष्याची शेवटची घंटाही वाजवली. ही फक्त एका विद्यार्थ्याची गोष्ट नाही… ही त्या पूर्ण व्यवस्थेची गोष्ट आहे ज्यात जात, सत्ता आणि प्रतिष्ठेच्या दगडावर निरागस स्वप्नं आपटून नष्ट केली जातात. वाराणसीच्या चांदमारी येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचा बारावीत शिकणारा हेमंत कुमार सिंह (पटेल) याला इंजिनियर व्हायचं होतं. त्याचे वडील कैलाश चंद्र वर्मा, वाराणसी जिल्हा न्यायालयात वकीली करतात. आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करणं हेच त्यांचंही स्वप्नही होतं. 22 एप्रिलला दुपारी दीड वाजता शाळेचा सहायक व्यवस्थापक राजविजेंद्र सिंह याचा फोन आला, “हेमंत शाळेत ये, बोलायचं आहे.” हेमंत शाळेत गेला आणि परत आलं त्याचं प्रेत…
असं म्हणतात की शाळेतील एका मुलीसोबत असलेल्या हेमंतच्या ‘कथित’ प्रेम प्रकरणामुळे शाळेचं प्रशासन चिडलं होतं. कोणी याविषयी तक्रार केली नसतानाही, प्रिंसिपल अभय राय, सहायक व्यवस्थापक राजविजेंद्र सिंह आणि त्यांचे वडील, भाजप नेता राम बहादूर सिंह यांनी हेमंतला बोलावलं. बोलण्यासाठी की बोल लावण्यासाठी? हेमंतच्या घरच्यांचा आरोप आहे की त्याचा अपमान करण्यात आला, मानसिकरित्या त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी राजविजेंद्र सिंह उर्फ रवीनं हेमंतला गोळी घातली. 
( वाराणसीच्या चांदमारी येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमधील प्रिंसिपलच्या याच केबीनमध्ये हेमंतवर गोळ्या झाडल्या.)
हेमंतला शाळेत बोलावून घेतलं आणि त्याला गोळी घातली…
हेमंतचं प्रेत शाळा संचालकाच्या घरातील पार्किंग एरीयात असलेल्या एका लहान खोलीत सापडलं. हत्येच्या वेळी हेमंतचे दोन मित्र, शशांक आणि किशन तिथं उपस्थित होते. त्यांनीच रक्तबंबाळ हेमंतला रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी तो मेल्याचं घोषित केलं. गोळी त्याच्या कानशिलात घुसली होती. याची माहिती मिळताच शिवपूर ठाण्यात वकीलांची गर्दी जमली. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतरच गर्दी निवळली. 23 एप्रिलला आपल्या मुलाचं प्रेत घेऊन आई-वडीलांनी न्यायासाठी आक्रोश मांडला.
गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर हेमंतवर मरूई गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. एफआयआरमध्ये राजविजेंद्र सिंह, शशांक, व किशनची नावं आहेत. कैलाशचंद्र वर्मा सांगतात, “माझ्या मुलाची परीक्षा संपली होती. रिझल्टची वाट होती. प्रिंसिपलनं बोलावलं म्हणून तो गेला. शाळेत त्याला शिव्या देण्यात आल्या, मारण्यात आलं. राम बहादुर सिंहानं आपल्या मुलाला म्हटलं, ‘याला गोळी घाल’ आणि दुसऱ्याच क्षणाला राजविजेंद्र सिंहने हेमंतला गोळी घातली. आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो. पण तो रस्त्यातच गेला होता. आमच्या मुलाला न्याय मिळेल का याचाच विचार सध्या आम्ही करतोय?”
(हेमंतच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जमा झालेले निकटवर्तीय.)
“माझा मुलगा आता शाळेत कधीच जाणार नाही’’
कैलाशचंद्र वर्मा सिंधोरा ठाण्यातील मरूई गावचे रहीवाशी आहेत. त्यांना तीन मुलं आहेत, विशाल जो बीए प्रथमवर्षाला आहे, हेमंत जो बारावीला होता आणि दुर्गैश जो पाचवीत शिकतोय. त्यांना दोन मुलीही आहेत, डॉली आणि परी, ज्या लहान आहेत. आई, आशा पटेल या गृहिणी आहेत. मरूईतील कैलाशचंद्र यांच्या घरात आता दुःखाचं सावट पसरलं आहे. आशा पटेल अजून आपल्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्या नाहीत.
संबंधित लेख वाचा: 1) धक्कादायक… बीटस्-पिलानी, मणीपाल, सिम्बॉयसिससारख्या नामांकित विद्यापीठांमधून दलित-आदिवासी विद्यार्थी गायब! |
काही विचारल्यावर त्या म्हणतात, “माझा मुलगा आता शाळेत कधीच जाणार नाही. जर शिकण्याचा हाच शेवट असेल तर मी माझ्या बाकीच्या मुलांनाही शाळेत पाठवणार नाही. पण मी हेमंतला न्याय मिळवून देईनच.” हेमंतची लहान बहिण परी शाळेत जायला घाबरते. ती म्हणते, “दिदी म्हणते की शाळेची आता भीती वाटू लागली आहे.” डॉली, रडत-रडतच शाळेत जात असते. दुर्गेश झोपेत बडबडत असतो, “भैय्या कधी येणार?” सर्वांत मोठ्या असलेल्या विशालच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. तो उदास बसून असतो.
(संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासमवेत मुख्य आरोपी भाजप नेता राम बहादूर सिंह.)
‘’ही फक्त हत्या नाही तर जातीवरचा हल्ला आहे’’
मागास जातीतील हेमंतच्या हत्येनंतर जातिय भेदभावाची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाली आहे. एकीकडे प्रतिष्ठीत बाप-मुलगा आहे तर दुसरीकडे मागास जातीतील हुशार विद्यार्थी, ज्याच्याकडे ना सत्ता होती ना संरक्षण. ज्या शाळेत तो शिकायला गेला होता त्याच शाळेनं त्याचा जीव घेतला. हेमंतच्या हत्येतील एफआयआर मधील तपशील आणि हेमंतच्या घरच्यांचं म्हणणं यात खूप अंतर पडलं आहे.
पोलिसांनी मूळ एफआयआर मध्ये बदल करून सत्य डागाळलं असल्याचा कैलाश चंद्र यांचा आरोप आहे. ते म्हणतात, “ज्यांनी माझ्या मुलाला मारलं तो दिवसाढवळ्या फिरतोय. माझ्या मुलाचा जीव इतका स्वस्त होता का?” कैलाश चंद्र यांनी एफआयआरसाठी अर्ज करताना गुन्हेगार म्हणून राजविजेंद्र सिंह, अभय राय आणि राम बहादुर सिंह यांची नावं स्पष्टपणे लिहिली होती. या तिघांनी हेमंतच्या खूनाचा कट रचला आणि त्याला मारलं असा त्यांचा आरोप आहे. पोलिसांनी मात्र त्यानंतर ही तिन्ही नावं लिहिलीच नाहीत.
गोळी कोणी मारली त्याचंही नाव गायब झालं आहे त्यामुळे हे सारं प्रकरण संशयास्पद झालं आहे. कैलाशचंद्र सांगतात, “मी स्वतः वकील आहे. हेमंतचा खून एक पूर्वनियोजीत कट होता. त्याला बोलावून अपमानित करण्यात आलं आणि मग गोळी मारण्यात आली. पण एफआयआरमध्ये आरोपींची नावं नोंदवली गेली नाहीत. गोळी चालवण्याऱ्याचाही स्पष्ट उल्लेख नाही. शाळेच्या व्यवस्थापनाला हे आवडलं नव्हतं की एक ‘खालच्या जाती’चा मुलगा एका ‘वरच्या जाती’तील मुलीशी बोलतोय. कोणाचीही कोणतीही तक्रार नसतानाही केवळ जातीय घृणेमुळेच हेमंतला यातना देऊन ठार करण्यात आलं.”
(भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत मुख्य आरोपी)
हेमंतला न्याय मिळवून देण्यासाठी सरदार सेना रस्त्यावर
मरूई गावातील लोक सांगतात की हेमंत चांगला मुलगा होता. अभ्यासात हुशार होता. कोणाचं वाईट करावं अशी त्याची इच्छा नव्हती. त्याचा चांगुलपणा त्याचा दुबळेपणा ठरला. जात, अहंकार आणि सत्तेच्या त्रिकूटानं त्याचा बळी घेतला. आशा पटेल हेमंतच्या फोटोसमोर बसून राहतात. त्यांची एकच मागणी आहे, “हेमंतला न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर या देशातील आयांची कुस अशीच रक्तबंबाळ होत राहिल.” हेमंत आता एक ज्वलंत प्रश्न बनला आहे.
मागास जातीच्या मुलांना स्वप्नं बघण्याचा हक्क नाही का? शाळा सर्वांसाठी समान नसते का? न्याय केवळ प्रतिष्ठीतांसाठीच असतो का? या हत्येच्या विरोधात ‘सरदार सेना’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. एस. पटेल यांनी 25 एप्रिलला परमानंदपूर येथील रॉयल ग्रीन गार्डनमध्ये कुर्मी समाजाची महासभा बोलावली. त्याला कुर्मी अस्मिता आणि न्यायासोबत जोडण्यात आलं. समाजातील सजग आणि विचारवंतांना यात सहभागी होऊन हेमंतला न्याय देण्याचं आवाहन करण्यात आलं. आज जर आवाज उठवला नाहीतर उद्या हीच वेळ आणखी कोणावरही येऊ शकते. डॉ. आर. एस. पटेल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथला शाळेला तात्काळ बंद करण्याचं व आरोपींच्या विरोधात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी केली. हेमंतच्या घरच्यांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई, एका सदस्याला सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी हत्याराचा परवाना देण्यात यावा अशा त्यांच्या अन्य मागण्या आहेत.
सरकारने आम्हाला न्याय दिला नाहीतर सरदार सेना रस्त्यावर उतरून निर्णायक लढाई लढेल असा इशारा त्यांनी दिला आहे. ते म्हणतात, “हा फक्त एक खून नाहीतर लोकशाहीचा खून आहे. सामाजिक न्यायाची हत्या आहे. त्या प्रत्येक स्वप्नाची हत्या आहे, जे डोळ्यात घेऊन गरीबांची मुलं शाळेत जातात. आता प्रश्न हा आहे की त्यांच्यावर सत्ता आणि जातीच्या बंदूकांमधून गोळ्या घालण्यात येतील का? हेमंतला न्याय मिळेल का? की फक्त पेपरमध्ये आलेली एक बातमी बनून राहणार आहे त्याचा खून?”
हेमंतच्या हत्या प्रकरणात राजविजेंद्र आणि इतर दोघांना अटक करण्यात आली आहे पण एफआयआर मध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी नोंदवलेल्या नाहीत असा हेमंतच्या घरच्यांचा आरोप आहे. पोलिसांच्या भूमिकेवर त्यांना संशय आहे. राजविजेंद्र हा भाजपमध्ये काम करायचा व आपल्या वडिलांसोबत तो राजकारणात सक्रिय होता. राम बहादुर सिंह सध्या फरार आहे. हेमंतच्या घरच्यांचा आरोप आहे की पोलिस जाणूनबुजून आरोपींना वाचवत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप पटेल यांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाण्याची मागणी केली आहे.
गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं ते म्हणतात. कायदा आपलं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात की गुन्हेगाराची जाती किंवा धर्म नसतो. गुन्हा हा गुन्हाच असतो आणि त्याला सामाजिक-राजकीय रंग नसतो. त्यांच्या बोलण्यावरून सध्या तरी असं दिसतंय की भाजप कायद्यासोबत उभा आहे आणि न्याय देण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. 
(हेमंतला न्याय मिळवून देण्यासाठी वाराणसीच्या रस्त्यावर उतरलेली जनता.)
पंतप्रधानांच्या मतदारसंघात मागास विद्यार्थ्याची हत्या
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात एका मागास विद्यार्थ्याची अशी हत्या झाल्यानं राजकारण तापलं आहे. मागास जातीतील राजकारणी याला हत्या न म्हणता जातीय दहशतवाद म्हणत आहेत. सिराथूच्या आमदार आणि अपना दल (कमेरावादी) नेता, डॉ. पल्लवी पटेल म्हणतात की जर हेमंतला न्याय मिळाला नाहीतर त्या प्रधानमंत्र्यांच्या संसदीय कार्यालयाला वेढा घालतील. त्या म्हणतात, “ही केवळ हत्या नाही, जातीय दहशतवाद आहे.” त्यांनी हेमंतच्या घरच्यांची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं की न्यायाच्या या लढाईत त्या त्यांच्यासोबत आहेत.
ही लढाई वाराणशीपासून दिल्लीपर्यंत लढण्याचं आश्वासन त्यांनी कैलाशचंद्र यांना दिलं. त्या म्हणतात, “जर देशातील जनताच सुरक्षित नसेल, तर सरकारची जबाबदारी काय कामाची? पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला होतो तो राष्ट्रीय मुद्दा बनतो पण वाराणशीतील या जातीय दहशतवादाची साधी चर्चाही होत नाही. हेमंतची हत्या एका विद्यार्थ्याची हत्या नाहीतर सामाजिक न्यायाची हत्या आहे.”
हेमंतच्या हत्येनंतर सामाजिक संघटनांसोबतच राजकीय पक्षांनीही मोर्चाबंदी सुरू केली आहे. अपना दलसोबत किसान मंच तथा अनेक स्वयंसेवी सामाजिक संघटना एकत्र झाल्या आहेत. 24 एप्रिलला सर्वांनी वाराणशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राज्यपालांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी अर्ज दिला. त्यात म्हटलं आहे की, राम बहादुर सिंह आणि अन्य सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी. ज्ञानदीप शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी आणि हत्येचा तपास वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या समितीने करावा.
हेमंतच्या घरच्यांना एक कोटी रुपये देण्यात यावे आणि आरोपींना भाजपमधून काढण्यात यावं या मागण्याही आहेत. आंदोलनात एक वक्ता म्हणाला, “जेव्हा हनुमानाला आपली शक्ती आठवते तेव्हा लंका जळते. शांत तलावात दगड पडला तर तरंग उठतात. समुद्राची शांती भंग झाली तर तुफान येतं. तसंच शांतीप्रिय कुर्मी समाजाच्या अस्मितेवर घाव पडला तर सरकार पडल्याशिवाय राहणार नाही.” आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष सुरजीत सिंह, महासचिव गगन प्रकाश यादव, शिवशंकर पटेल, राजेश पटेल, राजकुमार पटेल यांच्यासोबत अनेक कार्यकर्ता सामिल झाले होते. सर्वांची एकच मागणी होती की हेमंतला न्याय मिळावा आणि आरोपींना संरक्षण नाहीतर शिक्षा मिळावी.
26 एप्रिलला आमदार डॉ. पल्लवी पटेल आणि पोलिसांमध्ये भेलूपूर परिसरात वाद घडला. त्या मोदींच्या जनसंपर्क कार्यालयाला वेढा द्यायला निघाल्या होत्या तेव्हा पोलिसांनी त्यांना आईपी मॉलजवळ अटकाव केला. पटेल आणि उपस्थित पोलिसांमध्ये त्यानंतर जोरदार वादविवाद झाला. पटेल मग तिथंच रस्त्यावर बैठं आंदोलन करण्यासाठी बसल्या. पटेल म्हणतात, “22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्याच दिवशी वाराणशीत जातीय दहशतवादाची गोळी झाडण्यात आली. हेमंतला शाळेत बोलावून ठार करण्यात आलं. या खुनामागे सामाजिक वर्चस्वाची भावना उघड आहे. कुर्मी समाजात यामुळे प्रचंड आक्रोश आहे.”
सर्व आरोपी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या जातीचे
‘सरदार सेना’नेही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. ‘सरदार सेना’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. एस. पटेल यांनी इशारा दिला की प्रशासनाने तपासात दिरंगाई केली तर लखनऊतील मुख्यमंत्री निवासाला वेढा टाकण्यात येईल. सभेला उद्देशून पटेल म्हणाले, “ही घटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात घडली आहे. सामंतवाद्यांचं धैर्य इतकं वाढलंय की ते एका विद्यार्थ्याला शाळेत गोळ्या घालत आहेत. सर्व आरोपी हे मुख्यमंत्री आदित्यनाथच्या जातीतले आहेत त्यामुळे पोलिस निष्क्रिय बसले आहेत. आमच्या समाजाच्या मुलाला शाळेत बोलावून गोळी घालण्यात आली ही साधी गोष्ट नाही. जर जातीवरून या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर राज्यभरात आंदोलन पेटवण्यात येईल. समाज जर आज गप्प बसला तर उद्या आणखी कोणाच्या घरातील मुल मारलं जाईल. त्यामुळे आत्ताच निर्णायक लढाई लढावी लागेल.”
हेमंतच्या हत्येमुळे कुर्मी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. पोलिसांनी लवकर कारवाई केली नाहीतर परिस्थिती चिघळण्याची भीति व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजेश पटेल यांच्यामते मोदींच्या मतदारसंघात 18 लाख मतदार आहेत. यापैकी 4 लाख कुर्मी मतदार आहेत. पूर्ण वाराणशी जिल्ह्यात 22 लाख मतदार आहेत आणि यात 6 लाख कुर्मी आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत या घटनेचा प्रभाव पडू शकतो. 
(एफआयआरची मूळ प्रत.)
‘’बनारस आता पूर्वीसारखं राहिलं नाही आता ते ‘मोदी की काशी’ झालयं’’
“हेमंतचा खून केवळ एका विद्यार्थ्याचा खून नाहीतर हा इशारा आहे. जेव्हा जात, सत्ता आणि राजकारण एकत्र येतात तेव्हा न्यायाचा मार्ग अस्पष्ट आणि अवघड होऊन जातो. आज वाराणशीच्या गल्ल्यांमधून एकच प्रश्न उठतोय की मुख्यमंत्री आदित्यनाथच्या सरकारमध्ये, सत्तेशी संबंधीत लोकांना कायद्याचं काही भय उरलं नाही का? आता कायदा देखील आरोपीची जात बघून कलमं लावणार आहे का? एका गरीब, मेहनती, मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी सामाजिक न्याय हा फक्त पुस्तकात लिहिलेला शब्दच राहणार आहे का?” राजेश पटेल स्पष्ट आरोप लावतात की आजचं वाराणशी हे पूर्वीचं ‘सुबहे बनारस’ राहिलेलं नाही, ते आता ‘मोदी की काशी’ झाली आहे जिथं सत्ता-संरक्षित गुन्हेगार खुलेआम फिरतात. ही आता ती काशी नाही जिथं गंगेला आपलं जीवन अर्पण करणारे उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब यांची कोणत्याही भेदभावाशिवाय पूजा केली जायची. आता कबीरालाही त्यांची जाती व धर्माच्या चष्म्यातून पाहिलं जात आहे. संत रैदास यांनी ज्या खापरात गंगा आणली होती, आज त्याच्यातच बुडून जावसं वाटत असेल त्यांना.
पटेल एक व्हायरल छायाचित्र दाखवत म्हणतात, “तुम्ही या छायाचित्रात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ याच्यासोबत जो तिसरा माणूस बघत आहात तो आहे, राजविजेंद्र सिंह उर्फ रवी ज्याच्यावर हेमंतच्या खूनाचा आरोप आहे. त्यानंच आपल्या वडिलांच्या बंदूकीनं हेमंतच्या डोक्यात गोळी घातली होती. वाराणशी आता सत्ता-संरक्षित गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. इथंच बीएचयू मध्ये तीन भाजप कार्यकर्त्यांनी एका मुलीवर बलात्कार केला होता. तिघेही हिंदू होते, तिघांनाही पोलिसांनी आधी वाचवण्याचा प्रयत्न केला, अटक झाल्यावरही त्यांना लवकरच जामीन मिळाला. हेच सारं हेमंतच्या प्रकरणातही घडेल असं वाटतंय.”
हेमंतच्या खुनाविषयी पटेल म्हणतात, “एफआयआरमध्ये लिहिलंय की 22 एप्रिलला शाळेत बोलावून रवी सिंह यानं हेमंतला गोळी घातली. त्यानं आपल्या वडिलांच्या लायसन्स असलेल्या पिस्तूलाचा वापर केला. गोळी थेट डोक्यात घातली त्यामुळे वाचण्याची शक्यताच नव्हती. या हत्येनं पुन्हा सिद्ध केलं आहे की जमिनदारी मानसिकता आजही जीवंत आहे आणि निर्दोष लोकांना निर्दयीपणे चिरडण्यात येतं.” 
(पोलिसांनी नंतर बदललेली एफआयआरची प्रत.)
ते पुढे प्रश्न विचारतात की योगी सरकार यादव, मुसलमान यांच्याविरोधात किंवा अन्य दलित जातीच्या गुन्हेगारांविरोधात जी कठोर कारवाई करत आहेत, तिच या आरोपींविरोधात करणार का? “राम बहादुर सिंह आणि त्याच्या मुलाचे भाजपच्या मुख्य नेत्यांसोबतच अनेक फोटो आहेत. सत्तेत त्यांची मजबूत पकड आहे हे स्पष्ट दिसून येतं. त्यामुळेच न्यायाविषयी लोकांच्या मनात संशय आहे. जर हेमंतच्या खुन्यांना शिक्षा मिळाली नाहीतर वाराणशीची आत्मा आणखी घायाळ होईल. हा फक्त एक खून नाहीतर काशीच्या समान सांस्कृतिक वारशावरील हल्ला आहे.”
ज्येष्ठ पत्रकार विनय मौर्य सांगतात, “आता प्रश्न फक्त हेमंतला न्याय देण्याचा नाही आहे तर ही सामाजिक न्यायाची मुलभूत लढाई आहे. कुर्मी समाजानं स्पष्ट केलंय की ते यावेळी माघार घेणार नाहीत. या घटनेनं पूर्ण वाराणशी हादरलं आहे. विद्यार्थी संघटनांमध्ये संताप आहे, समाजातील विचारवंत स्तब्ध आहेत. पण पोलिस आणि सरकार अजूनही स्पष्ट कारवाई करत नाही आहे. मोठा प्रश्न हा आहे की सत्तेतील जातीय वर्चस्वाच्या राजकारणासमोर सरकार झुकेल, की कायदा निष्पक्षपणे आपलं काम करेल? यांची उत्तरं येणाऱ्या दिवसात वाराणशीच्या रस्त्यांवर मिळतील, जिथं न्यायासाठी आता एल्गार करण्यात आला आहे.
हेमंत हत्याकांड आता काशीतील जातीय संघर्षाचं आणखी एक उदाहरण बनलं आहे. अनेक लोक हे विचारत आहेत की सीएम आदित्यनाथच्या सत्तेत राजकीय प्रभाव आणि जातीवादाचं जाळ इतकं घट्ट विणल्या गेलं आहे का की गुन्हेगारांना उघडपणे संरक्षण मिळत आहे? या घटनेशी जोडल्या गेलेल्या बाकीच्या घटना पाहिल्यावर ही चिंता आणखी वाढते की सत्तेशी संबंधित नेत्यांच्या आशीर्वादामुळे गुन्हेगारांचं मानसिक बळ इतकं वाढलंय की ते कायद्याला आव्हान द्यायलाही घाबरत नाहीत?”
सौजन्य - जनचौक
अनुवाद - प्रतिक पुरी






